आर रामचंद्रन नावाचा एक मोटरमन होता तो गेला. एक प्रवासीही गेला, १२ जखमी झाले. पेपरवाल्यांनी त्यांची नावं छापली.. हे लोकही या जगात होते आहेत याचा एकमेव छापिल पुरावा राहीला. रेल्वेने मदत जाहीर केली. आणि झालं. अजून एक केस बंद झाली. गाड्या सुरू होतील ठाणे स्टेशन सोडल्यावर मुलुंडकडे जाताना अनेकवेळा त्या स्पॉटवरून जातील, सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल.. Saturday, October 24, 2009
आम्हीच का ???
आर रामचंद्रन नावाचा एक मोटरमन होता तो गेला. एक प्रवासीही गेला, १२ जखमी झाले. पेपरवाल्यांनी त्यांची नावं छापली.. हे लोकही या जगात होते आहेत याचा एकमेव छापिल पुरावा राहीला. रेल्वेने मदत जाहीर केली. आणि झालं. अजून एक केस बंद झाली. गाड्या सुरू होतील ठाणे स्टेशन सोडल्यावर मुलुंडकडे जाताना अनेकवेळा त्या स्पॉटवरून जातील, सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल.. Sunday, October 18, 2009
माती मधुनी दरवळणारे हे गाव माझे.....

डोंबिवलीत राहुनही आढळतो.. मुंबईची सांस्कृतीक राजधानी असं बिरूद डोंबिवली अभिमानानं मिरवते.. प्रत्येक सण साजरा करण्याचा आमचा अंदाजच वेगळा.. डोंबिवलीत फडके रोडवर दिवाळी साजरी होते तशी कुठेच होत नसेल. ( हो ! खरं म्हणजे या प्रकाराची कॉपी ठाणेकरांनी आणि तत्सम इतर शहरांनी सुरू केली आहे. पण आमच्या दिवाळीची शानच न्यारी..) तशीच आमची विशेष गुढीपाडवा स्वागतयात्राही.. तर सध्या विषय चाललाय दिवाळीचा..सर्वसामन्यातः दिवाळी कशी साजरी करायची, फटाके आणायचे की नाही, आणले तर किती.. किल्ला करायचा की नाही, कोणता करायचा.. कपडे कोणते घ्यायचे असले प्रश्न इतर मुलांना पडत असतील.
डोंबिवलीकरांना दिवाळीचे प्रश्न वेगळे पडतात. फडके रोडवर पहाटे किती वाजता जायचं.. कोणता पेहराव यावेळी करायचा.. कोण कोण येणार आहे. कुठे भेटायचं, मित्रमंडळींना पहाटे कोण कसं किती वाजता उठवणार.. बाईक न्यायची की नाही.. नेली तर कुठे ठेवायची.. देवळात जाऊया, कीाहेरचा कार्यक्रम बघुया, की गर्दीत नुसते फिरूया.. मग घरी फराळ करायचा की मॉडर्न कॅफेत कॉफी पिऊया.... हे प्रश्न सच्चा डोंबिवलीकराला पडतात. फडके रोडची बातचं न्यारी.. फडके रोड हे नाव या रस्त्याला कोणी दिले. हे फडके कोण हे बहुतांश जणांना माहितही नसणार हे नक्की..पण फडके रोड आणि आमचं एक भावनीक नातं आहे.. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा .. असा कोणताही मराठी सण असो किंवा फ्रेंडशिप डे असो, व्हॅलेंटाईन डे असो, डोंबिवलीकर तरूण फडकेवर एकत्र येतात.एकतर फडके रोडच्या एका टोकाला असलेलं गणेश मंदिर संस्थान आणि गणपती डोंबिवलीकरांचा जीव की प्राण.. आणि डोंबिवली गणेश मंदिर संस्थानालाही डोंबिवलीतल्या युवापिढीचं वावडं नाही.. विविध निमित्तानं तरूण आपण होऊन या रस्त्यावर एकत्र येतायत हे जाणून संस्थानाने तरूणांसाठी विविध उपक्रम आयोजीत केले. त्यातलाच एक दिवाळीचा युवा शक्ती, युवा भक्ती दिन..
फडके रोडवर फिरणे म्हणजे मुली पहायला जाणे अशी डोंबिवलीबाहेरच्या लोकांची धारणा आहे. ती १०० टक्के खरी नाही. सध्या आपल्या आयुष्यात सोशल नेटवर्कींग साईटचे जे महत्त्व आहे तेच फडके रोडचे.. सोशल नेटवर्कींग साईट्स सुरू होण्या अगोदरपासून डोंबिवलीकर फडकेरोडवर फिरतायत. (मग फिरता फिरता काही पाहण्यासारखे चेहरे दिसले तर का पहायचे नाहीत!!!!)
शाळा सोडून तुम्हाला कितीही वर्ष झालेली असोत.. कॉलेजमधल्या मित्रांना तुम्हाला नेहमी भेटताही येत नसेल.. मात्र दिवाळीच्या दिवशी फडकेवर अगदी अनपेक्षितरीत्या कोणीही तुम्हाला भेटणारच भेटणार... यावर्षी साकेत लिमये या माझ्या एका मित्राने डोंबिवली सोडली आणि तो सि़डनीत राहायला गेला.. आम्हाला वाटलं तो आता कायमचा गेला. मात्र हा पठ्ठया सकाळी फडकेरोडवर दिसलाच... हा इसम दिवाळी फडकेवर साजरी व्हावी यासाठी सुट्टी काढून घरी आला आणि त्याने फडके मिस केलं नाही....या वर्षी दिवाळीच्या पहाटे फडकेरोडवर तरूणाईची अशीच झुंबड उडाली होती. मात्र यावेळी गर्दी विभागली जावी यासाठी संस्कार भारतीतर्फे रांगोळीचा भलामोठा दुभाजक रस्त्याच्या मधोमध आखला जात होता. आणि खरं सांगतो.. रांगोळीवरून चालत जाण्याचा नतद्रष्टपणा एकानेही केला नाही.. अगदी प्रत्येकजण रांगोळीला आपला पाय लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता.
अतिषय सुंदर झब्बा सलवार घालून त्यावर दुपट्टा मिरवत तरूण चालले होते. काहीजण चक्क धोतर नेसून आले होते. मुलींनी सुंदर साड्या नेसल्या होत्या... साडीवरून एक सांगतो.. या साड्यांमध्ये या मुली इतक्या आकर्षक दिसतात... मात्र एकदा दिवाळीच्या दिवशी पाहिलेल्या मुली नंतर परत डोंबिवलीत कुठे लुप्त होतात कोणास ठाऊन.. मी नंतर परत कधीही त्यांना पाहिलेले नाही.. त्यादिवशी त्या जशा दिसतात तशा परत कधीच दिसत नाहीत!!!!
लग्नाआधीची शेवटची दिवाळी असल्यामुळे यावर्षी फडके रोडवर जायचंच असं मी ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही मित्र सकाळी जमलोही.. मी का आलो हे मी बोलूनही दाखवलं. तेवढ्यात एक शाळेतला जुना मित्र गर्दीत भेटला. त्याच्याबरोबर त्याची नविनच लग्न झालेली बायकोही... त्याला म्हटलं अजून फडकेवरच ? तो म्हणाला जिथे जमलं ते ठिकाण कसं विसरू.. तेव्हा एक गोष्ट नक्की केली. आपलं फडकेवर जमलं नसलं तरी काय झालं. फडके रोड सगळ्यांना सामावून घेतो. त्यामुळे घरी जाता जाता मनात एक गोष्ट निश्चित झाली. लग्नाआधीची ही शेवटची दिवाळी असली तरी फडकेवरची शेवटची नाही!!!
Monday, September 14, 2009
एकमेवाद्वितीय...
तरूण असणं ही फक्त वयाशी संबंधित गोष्ट आहे, असं अजिबात नाही.. तारूण्य ही वयावर नाही तर मनावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. शारीरिक वय कितीही झालं तरी मनानं नेहमीच तरूण असणारी काही माणसं या भूतलावर अवतरली त्यातला एक म्हणजे सचिन तेंडुलकर... तिरंगी एकदिवसीय मालिकेतल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात सचिननं आपलं ४४ वं शतक पूर्ण केलं. त्यानिमित्ताने साम मराठीच्या आमच्या बातम्यांसाठी एक पॅकेज लिहीले होते ते मला येथे पोस्ट म्हणून टाकावेसे वाटले..
त्याचं शारीरिक वय आहे ३६ वर्ष १४४ दिवस. त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला १८ डिसेंबर १९८९ या दिवशी म्हणजे बरोबर ४ दिवसांनी त्याच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होतील.. तब्बल ४२७ एकदिवसीय सामने त्याने खेळले आहेत. तरिही धावांची भूक कायम आहे... नव्हे आता दुप्पट वाढलीय. आजही सर्वोत्तम सलामीवीर तोच आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलामीला आल्यावर ६ धावांची धावगती तो सहज राखू शकतो.. आणि आपलं शतक पूर्ण करताना आजही तो अवघे ९३ चेंडू घेऊ शकतो. शतक पूर्ण करताना त्याने अवघे ८ चौकार मारले.. याचा अर्थ त्याने ६८ धावा या पळून काढल्या .. श्रीलंकेतल्या सध्याच्या
उकाड्यात या ६८ धावा पळून काढणं किती कठीण आहे हे सांगायला नकोच. आणि एवढ्या धावा पळून काढूनही तो अवघ्या ९३ चेंडूत शतक झळकावू शकतो.. शतक झाल्यावरही तो आडवीतीडवी बॅट फिरवून विकेट पणाला लावत धावांच्या मागे लागत नाही. टिकून राहत धावांचा वेग मंदावणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतो.. धावा काढतानाचा त्याचा उत्साह आजही तरूण क्रिकेटपटूंना लाजवतो.. त्याचं चौकार मारतानाचं पदलालित्य आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावं असं.. त्याची फलंदाजी हा धावांचा ओघवता धबधबा आहेच, पण तो एक संदर्भ ग्रंथही आहे. क्रिकेट शिकणाऱ्या प्रत्येकानं क्रिकेट कसं खेळायचं यापेक्षा क्रिकेट का खेळायचं याचा परिपाठ देणारी त्याची फलंदाजी... मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात तो आजही त्याचे सहजसुंदर फटके मारतो.
ड्राईव्हज्, कट्स, पुल, हुक यांचा सुंदर मिलाफ तो घडवतो. ऑफसाईडला त्याला सापळ्यात पकडण्यासाठी पाच पाच क्षेत्ररक्षकांचं कडं उभारलं तरीही तो ते लिलया भेदून दाखवतो... सापळ्याच्या विरूद्ध दिशेला खेळून समोरच्या कर्णधारालाच सापळ्यात पकडण्याचं त्याचं चातुर्य तर लाजवाब. आपल्या खेळीनं संघाच्या धावा वाढवायच्या, संघाची जबाबदारी वाहायची, आपल्या चाहत्यांना खूष करायचंच त्याचबरोबर आपल्य़ा टीकाकारांनाही शांत ठेवायचं.. एवढी सगळी व्यवधानं गेली २० वर्षं अव्याहतपणे वाहणारा सचिन खरोखर एकमेवाद्वितीय...
( हा ब्लॉग प्रदर्शित करण्यासाठी साम मराठी वृत्तविभागाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार)
Thursday, September 10, 2009
माय...
त्यातून त्यांनी अनाथांची माय होण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीला दूर ठेवणाऱ्या या मायनं चिखलदरा येथे जवळपास 175 मुली, माळेगाव ठेका (जि. वर्धा) येथे 25 वयोवृद्ध व परितक्त्या, कुंभारवळण ता. पुरंदर) येथे ममता बालसदनात 80 मुले, गुहा (जि. नगर) येथे 90 मुले व पुण्यातील हडपसर भागात 52 मुले-मुली, अशा 422 अनाथ मुला-मुलींचा व निराधारांचा सांभाळ केलाय. ज्याला कोणीच नाही, अशा मुलाला त्या सपकाळ व मुलगी असेल, तर साठे हे आडनाव त्या देतात. सिंधूताई 39 सुनांच्या व 182 जावयांच्या सासू झाल्या आहेत. हे पाहिल्यावर उर दडपतो. शुन्यातून विश्व उभे करणाऱ्यात आपण नेहमी प्रतिष्ठीतांची नावं घेतो. पण शुन्यातून खरोखर विश्व उभं करणं म्हणजे काय याची जाणीव या मायकडे पाहिल्यावर होते. सिंधूताईंनी म्हटलंय की स्त्री कधीही आत्महत्या करत नाही, ती तग धरते. त्या उदाहरण देतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्यामागे त्यांच्या घराचा आधार झाल्यात. स्त्री कोणालाही वाऱ्यावर टाकू शकत नाही कारण तीच्यात लपलेली असते एक माय.. या मायची जाणीव करून दिली सिंधूताई सकपाळ या मायनं.
Friday, August 28, 2009
गौरी झाली दुर्गा...
या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. हातकणंगले तालुक्यातले वारणा नदीच्या काठावरचे भादोले गाव. ऊस उत्पादनामुळे सधन आणि संपन्न गाव. या गावात शिरकाव केलेल्या परमिट रूम आणि दारूच्या गुत्त्यांना हद्दपार करण्याचा विडा या गावातल्या महिलांनी उचलला. त्यासाठी दारूबंदी कृती समितीचीही स्थापना केली. त्यासाठी मतदान घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार झाला. गावातल्या एकूण तीन हजार सातशे ब्याण्णव मतांपैकी अठराशे सत्ताण्णव मतांची गरज होती. महिलांनी मतदानात सहभाग घेतला आणि बहुमत मिळवत दारूबंदीचा लढा जिंकला....
एवढी साधी सोपी सरळ वाटणारी ही या लढ्याची गोष्ट... मात्र वाटते तेवढी साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मतदान घेऊ शांततेच्या मार्गानं आदोलन जिंकण्याचा निर्धार केलेल्या ग्राम भगिनींसमोर वेगळेच आव्हान होते. दारूबंदी व्हावी, गावातून दारू हद्दपार व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा होती का हा खरा प्रश्न आहे. मतदानासाठी जो दिवस निवडला गेला तो होता गौरी भोजनाचा. ग्रामिण भागात या सणाला केवढे महत्त्व असते आणि त्यादिवशी गरिब असो वा श्रीमंत गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी असते हे आपल्याला माहित
आहेच. हा सण खरोखर स्त्रीचा सण असतो. अशावेळी स्वयंपाकघरात गढून गेलेल्या स्त्रीला अशा सामाजिक प्रश्नासाठी मतदानासाठी घराबाहेर पडणे खरोखर कठीण आहे. याचा परिणाम मिळणाऱ्या मतांवर होणार हे उघड आहे. अशावेळी हाच दिवस मतदानासाठी ठरवला गेला. मात्र महिला हरल्या नाहीत. ग्रामभगिनींनी हिरीरीने उत्सवही साजरा केला आणि
मतदानासाठीही आवर्जून उपस्थिती लावली. आणि बहुमतही मिळवले. घरची जबाबदारी पार पाडून गावाच्या समोर उभा असलेला दारूरूपी राक्षस त्यांनी धुळीला मिळवला. तरूणींपासून अगदी म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्याजणींनी एकीचे बळ सिद्ध केले. तब्बल पाचशे चौतीस मतांची
आघाडी घेतली. गौरी म्हणून माहेरवाशिणीचे कौतुक सांगणाऱ्या देवीने दुर्गेचे रूप धारण करत दैत्याचा नायनाट केला. जिथे मांगल्य असते तिथे सरस्वती वास करते असं
म्हटलं जातं. दुर्गेचे रूप धारण करून भादोलीतल्या गौरींनी गौरी भोजन संपन्न केलंच आहे. आता अशा पवित्र ठिकाणी सरस्वती आणि त्यापाठोपाठ लक्ष्मीही नक्की कृपादृष्टी ठेवेल...( या ब्लॉगसाठी साम मराठी वृत्तविभागाचे अनंत सहकार्य मिळाले आहे. साम मराठी वृत्तविभाग आणि कोल्हापूरचे प्रतिनिधी निशिकांत तोडकर यांचे आभार )
Monday, August 24, 2009
गणपती माझा नाचत आला...
एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गणेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि..
मार्च २०००.. डोंबिवलीत आमच्या घराजवळ एमआयडीसी विभागातला गणेश विसर्जन तलाव आहे. या तलावाचा उपसा सुरू होता. तलावाचा उपसा करताना विसर्जन झालेल्या हजारो गणेशमुर्तींचा ढिग बाहेर काढला गेले. आणि अत्यंत वाईट अवस्थेतल्या हजारो मुर्तींचा ढिग.. तो ढिगारा पाहून मनाचा थरकाप उडाला.. मग जाणीव झाली याच मुर्तीत आहे आपणही विसर्जित केलेली एक मुर्ती. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. आणि वर्षानुवर्ष तशाच पडून राहतात. या मुर्तींना लावलेले रंग जलाचरांसाठी घातक असतात. त्यामुळे त्या तलावात एकही मासा नव्हता किंवा कोणताही जलचर नव्हता.. रंगामुळे जगणंच शक्य नाही.. त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपला गणपती यापुढे अशा पाण्यात विसर्जित होणार नाही. आमच्या उत्सवामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही हा निश्चय आम्ही केला.
तातडीने एक चांदीची मुर्ती आणली. आणि तिची स्थापना आम्ही करतो.. दिडदिवसांनंतर बादलीत मुर्तीचं विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना घालतो.. Friday, August 21, 2009
जाणीव...
जन्माला आल्याआल्या विश्वात आल्याची जाणीव.. आईसोबत आहे याची जाणीव.. भुकेची जाणीव, झोपेची जाणीव, स्पर्शाची जाणीव, इथपासून या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असते ती आपली जाणीव.. हीच जाणीव सोबत आहे आणि प्रत्येक क्षणाला राहील हे लक्षात घेऊन या ब्लॉगला नाव दिलं जाणीव.. असो ब्लॉगचा नामकरण विधी तर झालाय, आता पाहूया लिहायला काय काय सुचतंय. तुर्तास तरी इथेच थांबावं हे उत्तम....