Sunday, September 5, 2010

नभः स्पर्शं दीप्तम्भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजवर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. या घेतलेल्या जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्याही. सचिनच्या या खांद्याने आजवर भारतीय क्रिकेट संघाला कितीवेळा तारलं याचं मोजमाप केलं तर धाप लागेल. सचिनच्या या खांद्यांनी भारताची कित्येकवेळा लाज राखली. सचिनने अनेक जबाबदाऱ्या घेत भारताची मान उंचावलीही.

तब्बल २० वर्ष भारताचा युनिफॉर्म अंगावर चढवून सचिन लढला. त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. अगदी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवरचं जेव्हा शंका घेतल्या जाऊ लागल्या तेव्हाही सचिन डळमळला नाही. एका सैनिकासारखा लढला. त्याच्या याच गुणांचा, कार्याचा गौरव करण्यासाठी भारताच्या वायुदलाने त्याला मानद ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केलंय. सचिन या वीराचा गौरव करण्यासाठी वायुदलाने हा निर्णय घेतला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.

एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक जेव्हा सचिनच्या खांद्यावर त्याच्या रँक लावत होते त्यावेळी सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. एक वेगळेच समाधान या क्रिकेट योग्याच्या चेहऱ्यावर होतं. अनेक शतकं, अनेक विक्रम त्याने सहज मोडले. तरिही असे भाव कधीही त्याच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावरची रेष न रेष त्याच्यातल्या देशभक्ताचं दर्शन घडवत होती. प्रचंड श्रम केल्यावर अधिकारी व्यक्तीकडून किंवा आपल्या आदर्शाकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जी भरून पावल्याचा आनंद होतो, तो आनंद सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सचिन आणि देशभक्ती यांचं न तोडता येण्यासारखं नातं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सचिन भारतासाठी मैदानात घाम गाळतोय. या पदाला पोहोचण्यासाठी त्याने आपलं त्याआधीचं आयुष्य खर्ची घातलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मैदानावर खेळत राहतो. वैयक्तीक स्वार्थाचा विचारही करत नाही. विक्रमासाठी खेळत नाही, विक्रम होत राहतात, हा खेळत राहतो.


हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणारा हा पहिला भारतीय फलंदाज. त्याच्या या प्रकारावरून वादही झाले. प्रत्यक्ष न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र तेंडुलकर हरला नाही. त्याच्या हेल्मेटवरचा झेंडा निघाला नाही. अर्थात झेंडा लावण्यासाठी सचिन तेंडुलकरचं मस्तिष्क हीच उत्तम जागा आहे हे प्रत्येकजण मान्य करेल.

ग्रुप कॅप्टन म्हणजे एअर फोर्समधली पाचव्या क्रमांकाची ऑफिसर पोस्ट. साधारणतः २४ वर्ष सर्व्हिस झालेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीतला कर्नल. सैनिकाला त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान एक तत्व शिकवलं जातं. प्रथम माझा देश, त्यानंतर माझं युनिट, त्यानंतर माझे सहकारी आणि त्यानंतर मी या उतरत्या क्रमाने एक सैनिक आपलं काम करत राहतो. म्हणजे युद्धात प्रथम तो आपल्या देशाचं हीत पाहतो. त्यानंतर आपल्या रेजिमेंट/ युनिटचं हीत पाहतो. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांचं हीत पाहतो आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. सचिनच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाका.. सचिनने याच तत्वावर आपली कारकिर्द घडवलीय हे आपल्या लक्षात येईल.

अंगावर अनेक जखमा या शूर सैनिकाने देशासाठी झेलल्या आहेत. सचिनला आत्तापर्यंत झालेल्या जखमांचा हिशेब काढा. टेनिस एल्बो, पायाचा घोटा, टाच, पाठ अशा अनेक अवयवांना दुखापत झाली आहे. तरिही प्रत्येकवेळी तो यातून बाहेर आला. या सगळ्या जखमा, दुखापती त्याला देशासाठी खेळताना झाल्या. तरिही प्रत्येकवेळी त्याच्याच खांद्यावर संघाची मदार राहिली. जबाबदारी टाकताना कोणी विचारलं नाही हा खांदा किती दुखतोय ते...

२००० साली भारतीय क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं. तेव्हाही सगळ्या आशा या सचिनच्या खेळावरच होत्या. सचिन मैदानात आहे तोवर बुकींचे आणि मॅचफिक्सर्सचे घाणेरडे इरादे यशस्वी होणार नाहीत असा विश्वास क्रिकेटप्रेमी बाळगून होते. सचिनने काही प्रमाणात हा विश्वास सार्थही ठरवला.

असा हा सचिन. प्रत्येक कर्णधाराला वाटेल असा एकमेवाद्वितीय आपल्या संघात असावा. वायुदलानं ही संधी साधली. आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतला.
ब्राव्हो सचिन... तू एक निव्वळ क्रिकेटपटू नाहीस, तू एक महान सैनिक आहेस. वायुदलानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय.