Monday, February 15, 2010

उत्सव निसर्गाचा

हिरवी शामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लवफुलवंती जुई शेवंती
शेंदरी आंबा सजे मोहरू
खेड्यामधले घर कौलारू...

ऊन पाऊस या चित्रपटातलं हे ग.दि. माडगूळकर यांचं गाणं.. हे घर कौलारू मी कधीच अनुभवलं नव्हतं. कोंकणात कोणाकडे पाहूणा म्हणून गेल्यावर मी अशी घरं पाहिली होती. मात्र आपल्या गावाला, आपल्या घरात जाणार आहोत ही भावना त्यात नसायची. माझी पत्नी वैशालीचं मूळ गाव रत्नागिरी जिल्हात देवरूखजवळ निवे हे आहे अशी मला फक्त माहिती होती. मात्र प्रत्यक्ष तिथे जाण्याची वेळ आली नव्हती. महाशिवरात्रीला निव्यात सिद्धेश्वराचा उत्सव असतो अशी माहिती कळली होती. वैशालीच्या वडिलांनी जाहिर केलं आपण सगळे निव्याला उत्सवाला जाणार आहोत. नवपरिणीत दांपत्याला सिद्धेश्वराचं दर्शन घडवणं आणि त्याचबरोबर राजवाड्यांचं मूळ गावही दाखवणं हे दोन्ही उद्देश होतेच. कोकणात जायचं असल्यामुळे आनंदाने निघालो. निव्यात पोहोचेपर्यंत कल्पना येत नव्हती तिथे काय असेल याची. मात्र खरंच सांगतो, परतताना पाय निघत नव्हता...

संगमेश्वरवरून देवरूखकडे आम्ही वळलो आणि गाडीतल्या यच्चयावत राजवाड्यांना गावाची ओढ लागायला लागली. ती ओढ पाहणे आणि अनुभवणे हे काम आम्ही भिडे करत होतो. निवे गावात शिरायच्या आधी गावाच्या वेशीवर आमच्यावरून नारळ ओवाळून टाकण्यात आला. तेव्हापासून आमचं निव्यातलं वास्तव्य खऱ्या अर्थाने सुरू झालं. घरी पोहोचल्यावर पुन्हा एकदा दृष्ट, मग चहापाणी, सुरूवातीच्या गप्पा झाल्यावर आगामी दोन दिवसात हे गाव आपल्याला निश्चित लळा लावणार हे लक्षात आलं.

सुंदर घर, त्याच्या भोवताली सारवलेलं स्वच्छ अंगण, बाजूचा गोठा, मागे वाडी, त्यापलीकडे मिरची, पावटा, चवळीचं शेत. त्याच्यापलीकडे वाहणारा पर्ह्या... त्याचं स्वच्छ, थंड पाणी.. त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा शेत, शेतात उगवलेला हिरवी पावटा, हे सगळं पहात असताना चवळीची कोवळी शेंग खाण्यातली मजा मी त्यादिवशी अनुभवली. तेवढ्यात पर्ह्या पलीकडून हाळी ऐकू आली.. काय चाकरमान्यानू.... कधी आयलय.. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळतीला चाललेला सुर्यनारायण.. ही माझी आणि निव्याची पहिली ओळख. घरांच्या भोवताली शेतं की शेतांत असलेली घरं, निव्याचं वर्णन कसं करावं हे मला कळत नाही.

गावात महाशि़वरात्रीचं वातावरण रंगायला लागलं होतं. रात्री घरात बसून टाळ, मृदुंगाच्या साथीने जोरदार भजन रंगलं. रोज लोकलमध्ये ऐकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं भजन कोकणात होतं असं ऐकलं होतं. त्याचा प्रत्ययही आला.
आजूबाजूला डोळ्यात बोटं घातली तरीही दिसणार नाही असा काळोख, थंड हवा आणि त्यात रंगलेलं भजन खरोखर अवर्णनीय असा माहोल होता. रात्री अंथरूणावर पडल्याबरोबर झोप लागली. सकाळ कधी झाली ते कळलंही नाही. आणि विशेष म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा रोजच्यासारखा थकवा अजिबात नव्हता.

नेहमीसारखा उत्सव पार पडला. आरत्या, भजनं, महाप्रसाद, रूद्रपठण, हे ऐकताना फार प्रसन्न वाटलं. सिद्धेश्वराचं मंदिरही अत्यंत सुंदर ठिकाणी आहे. मंदिराच्या भोवताली किर्रर्र जंगल आहे. थोडं खाली उतरून गेलं की लहानसा पर्ह्या आहे. तिथे जंगली श्वापदं पाणी प्यायला येतात असं सांगतात. त्यातही पाय सोडून पाणी उडवण्याची मजा अनुभवली.

निव्यातली शांतता, पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ, तिथल्या गायी, तिथलं पाणी, शेतं, झाडं हे सगळं खरोखर वेड लावणारं. घरात बसून घेतलेली काजूबीयांची चव, निरसं दूध, भाजीचा फणस, पानात वाढली गेलेली पावट्याची उसळ, हातसडीचा तांदूळ, त्याचा वाफाळता दरवळ, सोबत खारातली मिर्ची, शेतात फिरताना चावलेली कोवळी चवळीची शेंग, गुलकंदाच्या गुलाबाचा सुवास, पर्ह्याच्या पाण्याचा थंडगार स्पर्श, कधीही न विसरता येण्यासारखा. या गोष्टींच्या प्रेमात पडण्यासाठी अजून एक मोठी गोष्ट कोणती सांगू... हे सगळं आपल्या घरातलं आहे, आपल्या जमिनीत पिकलंय ही भावना....
लहानपणापासून मला गाव नाही, त्यामुळे गावाचं महत्त्व काय असतं ते मला नक्कीच माहित आहे. ज्याला गाव आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त... ते सुख मला निव्याने दिलं.

चौकट तीवर बालगणपती,
चौसोपी खण स्वागत करती,
झोपाळ्यावर अभंग कातर,
सवे लागती कड्या करकरू...

Wednesday, February 3, 2010

फाळक्यांची फॅक्टरी

एक तुतारी द्या मज आणून,
फुंकीन मी ती स्वप्राणांनी

एक तुतारी दादासाहेब फाळके फुंकली आणि त्यातून उभं राहीलं एक विश्व. ज्या चित्रपटसृष्टीने भारतात कित्येक हातांना काम, बुद्धीला चालना, अभिनयाला व्यासपीठ, कलेला वाव, सौंदर्याचं कौतूक, आणि रसिकांचं अक्षरशः वेडाकडे झुकणारं प्रेम मिळवून दिलं त्या चित्रपटसृष्टीचं बीज भारतात दादासाहेब फाळके या अवलियाने रूजवले. इंग्रज राजवटीची तलवार, बुरसटलेल्या विचारसरणीत गुरफटलेला कधीही बदलण्याची इच्छा नसलेल्या समाजात चित्रपट तयार करणं, आणि तोही पहिला, हे भयंकर आव्हान होतं, अशक्यच गोष्टं होती. ती दादासाहेबांनी करून दाखवली. दादासाहेबांच्या या कर्तुत्वाची कथा चित्रपटाच्याच माध्यमातून मांडणं हे एक अजून आव्हान. ते परेश मोकाशी यांनी समर्थरीत्या पेललं. भारतात बनलेल्या पहिल्या चित्रपटाची जन्मकथा आणि दादासाहेब फाळक्यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी त्या चित्रपटाच्या जन्मासाठी सोसलेल्या वेणा त्यांचं थोरपण सांगून जातं.
चित्रपटाला कुठेही कंटाळवाणं, निराशावादी न करण्याचं मोठं आव्हान परेश मोकाशी यांनी पेललंय. कारण असे संघर्ष करून ज्या कलाकृती निर्माण होतात त्यावेळी असंख्य त्रास कलाकाराला आणि त्याच्या कुटूंबियांना सोसावा लोगतो त्यातून निर्माण होणारं कारूण्य दाखवून लोकांच्या डोळ्यातून पाणी सहज काढता येतं, पण त्यातून विनोद निर्मिती करूनही वास्तवाचं चित्रण समर्थरीत्या करता येतं हे मोकाशी यांनी सिद्ध केलं. दादासाहेब फाळक्यांच्या स्वभावातला तर्कटपणा, विक्षिप्तपणा दाखवतानाच दादासाहेब फाळक्यांना असलेली नाविन्याची, विज्ञानाची आवड आणि सतत काही तरी शोधून काढण्याची वृत्ती आणि त्यातून आलेला धीटपणा ही खरोखर खुप काही शिकवून जाते. असा हा चित्रपट प्रत्येकाने खरोखर पहावा असाच आहे.
ज्या चित्रपटातून एवढी अवाढव्य चित्रपटसृष्टी निर्माण झाली. हिंदी व्यतिरीक्त प्रत्येक मुख्य भाषेत चित्रपट निर्माण होतायत. याशिवाय चित्रपटसृष्टीशी काहीसी संलग्नता बाळगणारं फॅशन जगत आलं, रूजलं. त्यानंतर छोटा पडदा आला. आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. ही चित्रपट क्रांती निर्माण करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वाची ओळख आजच्या पिढीला परेश मोकाशी यांनी करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद