Monday, August 24, 2009

गणपती माझा नाचत आला...एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गणेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि..


महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं आगमन झालं. दहशतवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडींग या पाचवीला पुजलेल्या समस्यांबरोबरच स्वाइन फ्लू, महागाई या नव्या संकटांनी भारलेल्या वातावरणात गणेशाचं आगमन झालं. अर्थात आपण इतके सहनशील आहोत की काहीही होवो आपण रडत रडत का होईना पण सण साजरा करतो. संकटं दूर होवोत न होवोत त्यांना तोंड देण्याची शक्ती गणराय आपल्याला नक्की देतो..

आजच्या या लेखाचा सूर थोडा निराशावादी वाटेल खरा.. पण परिस्थिती निराशावादी आहे. सण साजरा करताना आपण या सणाला विकृत स्वरूपापर्यंत पोहोचवले आहे याची जाणीव आपल्याला होतेय का.. हा उत्सव बाजारू स्वरूपात साजरा होतोय. आपल्याला कल्पना येत नाहीये पण आपण फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत आहोत. उत्सव साजरा झाला पाहिजे पण आपल्या उत्सवी स्वरूपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळलाच पाहीजे. इथे एक घटना मला लिहाविशी वाटते..


मार्च २०००.. डोंबिवलीत आमच्या घराजवळ एमआयडीसी विभागातला गणेश विसर्जन तलाव आहे. या तलावाचा उपसा सुरू होता. तलावाचा उपसा करताना विसर्जन झालेल्या हजारो गणेशमुर्तींचा ढिग बाहेर काढला गेले. आणि अत्यंत वाईट अवस्थेतल्या हजारो मुर्तींचा ढिग.. तो ढिगारा पाहून मनाचा थरकाप उडाला.. मग जाणीव झाली याच मुर्तीत आहे आपणही विसर्जित केलेली एक मुर्ती. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. आणि वर्षानुवर्ष तशाच पडून राहतात. या मुर्तींना लावलेले रंग जलाचरांसाठी घातक असतात. त्यामुळे त्या तलावात एकही मासा नव्हता किंवा कोणताही जलचर नव्हता.. रंगामुळे जगणंच शक्य नाही.. त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपला गणपती यापुढे अशा पाण्यात विसर्जित होणार नाही. आमच्या उत्सवामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही हा निश्चय आम्ही केला.

तातडीने एक चांदीची मुर्ती आणली. आणि तिची स्थापना आम्ही करतो.. दिडदिवसांनंतर बादलीत मुर्तीचं विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना घालतो..


उत्सव साजरा जरूर व्हावा पण त्यासाठी आमच्या अमोल पृथ्वीचा आम्ही का बळी द्यावा.. हा हक्क आम्हाला कोणी दिला.
गणेश विसर्जनानंतर नाल्यांमध्ये साचतो थर्माकोलचा ढिग.. किनाऱ्यांवर साचतात मुर्त्यांचे ढिग.. गणेश विसर्जन करून देणाऱ्या पोरांना विचारा त्यांना पाण्यात पायाखाली काय लागतं.. त्यांचं उत्तर तुम्हालाही माहित आहे.. त्यांच्या पायाखाली काय लागतं हे आपण जाणतो तरीही आपण आपली मुर्तीही तिथेच का पाठवतो.. मुर्तीही मातीचीच हवी असे धर्मशास्त्रात सांगितले असेल तर धर्मशास्त्र बदला.. आमचा धर्म आम्ही ठरवू इतका लवचिक हवा.. आणि तो आहेही... मग त्याचा वापर आम्ही कधी करणार... अक्षरशः कायदे करून या मुर्ती बंद करा.. यामुळे मुर्तीकारांच्या पोटाचं काय असा भुक्कड युक्तीवादही होईल, पण मुठभर मुर्तीकारांसाठी आम्ही आमच्या पृथ्वीच्या जीवावर का उठावं..
पर्यावरण संवर्धन वगैरे शब्द फार बोजड वाटतील, पण आपण आणतो त्यामुर्तींनी आपल्याच परिसराला हानी होणार नाही याची काळजी घ्यावी एवढी माफक अपेक्षा आहे. ही जाणीव आलीच पाहीजे.. गणपतीत निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. डोंबिवलीत तसा निर्माल्य खत प्रकल्पही आहे. मात्र निर्माल्य पाण्यात टाकले पाहीजे ही वेडगळ संकल्पना धर्माच्या नावाखाली कोणीतरी पसरवली आहे आणि आम्हीही तिच्याच नादाला लागलोय. हे थांबलं पाहीजे, घाणेरड्या खाडीत, दुषित नदीत आम्ही आमचा गणपती विसर्जित करतो हे थांबले पाहीजे.. परिसर, पर्यावरण यांचा आदर केलाच पाहीजे.. ही जाणीव प्रत्येकाला आलीच पाहीजे.. यावर विचारमंथन झाले पाहीजे.. कायद्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः सुज्ञ होऊन वेळीच काही आचार सुधारले तर पर्यावरणाचा नाश आपण टाळणे शक्य होईल.. तेव्हाच गणपतीसमोर आपण मोकळ्या मनाने प्रार्थना करू..काले वर्षतू पर्जन्यः पृथ्वीसस्यशालिनी...

6 comments:

 1. अमित... एकदम सही... मुळात तू 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण...' असं वागत नाहीस. तू स्वतःपासून सुरूवात केली आहेस, हे खूपच छान आहे. पण एक परखड प्रश्न असा, की जर तू त्या तलावातल्या मूर्ती प्रत्यक्ष पाहिल्या नसत्यास, तर तू आणि तुझ्या घरच्यांनी हा निर्णय घेतला असता का? केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून आपली कथित परंपरा मोडायला तयार झाला असतास का? आज तसं होण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाला 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असं दिसेतच, याची शाश्वती काय? आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचा... मुंबईत तर मोठमोठ्या मूर्ती करण्याची स्पर्धाच लागलेली असते. आपल्या देखाव्यांमधून पर्यावरण जागृतीचा संदेश देणारी ही मंडळं स्वतः मात्र २०-२०, २५-२५ फूट उंचीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतात... त्यांना कोण थांबणार? एक वीस फूट उंचीची मूर्ती म्हणजे घरगुती गणपतीच्या जवळजवळ ५० पट जास्त पीओपीचा वापर... हा वापर थांबला तर खूप फरक पडू शकेल... शिवाय घराघरातून हा बदल झाला, तर स्वागतार्हच आहे...
  बाकी लेख मस्त आहे. तुझी लेखनशैली खूप छान आणि ओघवती आहे. Keep It Up...

  ReplyDelete
 2. Thank you अमोल.. तू म्हणतोस ते खरे आहे. ही परिस्थिती मी स्वतः पाहिली नसती तर आज खरोखर मी माझ्यातही बदल करू शकलो असतो का असा मलाच प्रश्न पडतो.. प्रत्येक गोष्ट लोकांना प्रत्यक्ष दिसल्याशिवाय ती जाणवतंच नाही. आणि ती त्यांना जाणवली तरी त्याच्यावर धर्माचा पगडा असेल तर मग संपलचं. मार्क्सनं म्हटल्याप्रमाणे धर्म ही खरोखर एक अफूची गोळी आहे. ती खाल्ली की डोळ्यावर, मनावर धुंदी चढते.. मग आपलं स्वतःचं भलंही आपल्याला दिसेनासं होतं. पण काय करणार आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपण काहीतरी बोलू, लिहू शकतो.. पण प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद...

  ReplyDelete
 3. गणेशोत्सवामुळे पर्यावरणाची होणारी हानी हा विषय सातत्याने चर्चिला जातो. पण, त्यावर ठोस उपाय सांगणारे, पर्याय देणारे फार मोजके लोक असतात. भिडे कुटुंबीयांनी एक उत्तम उदाहरण समोर ठेवलंय. अशी आणखी उदाहरणं सातत्यानं लोकांसमोर आली पाहिजेत. डोंबिवलीतल्या निर्माल्य खत प्रकल्पावर अधिक सविस्तर लिहिले तर चांगले होईल. म्हणजे विधायक कार्याचा आणखी एक पैलू विस्तृतपणे समोर येईल. चांगला लेख आहे. शुभेच्छा...

  ReplyDelete
 4. अमित, अगदी माझ्या मनातलं लिहिलंय. आणि आमच्यासारख्या धर्म न पाळणाऱ्या व्यक्तींना याबाबतीत काही बोलणं फार कठीण असतं, कारण ताबडतोब कोट्यवधी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचा ठपका बसतो. पण धर्म ही अफुची गोळी आहे, त्यापेक्षाही धर्ममार्तंडांनी धर्माला तसं बनवलंय असं म्हणायला पाहिजे. काही ठिकाणी गणपती बसवतात, पण त्याचं विसर्जन करत नाहीत, त्याऐवजी बादलीत सुपारीचं विसर्जन करतात, हाही चांगला पर्याय ठरु शकतो. एकंदरीतच बहुतेक सण मूळ स्वरुपात हे निसर्गाच्या जवळ नेणारे असतात. आपण मात्र त्यांना निसर्गापासून फार दूर नेलंय. दिवाळी हेसुद्धा त्याचंच उदाहरण. पण त्याविषयी दिवाळीच्या थोडं आधी लिहिता येईल. बाकी लेख मस्तच.

  ReplyDelete
 5. होय मित्रा तू जे म्हणतोस ते अगदी खरं आहे....आमच्या घरी शाडूचा गणपती आणण्याची प्रथा आहे....कदाचित अजोबाच एको फ्रेंडली विचारांचे असावेत असं म्हणून ही प्रथा मी विनोदानं स्विकारतो...पण कधी कधी असं वाटतं...सगळ्यांनी शाडूच्या मूर्ती बसवायचं ठरवलं तर तितकी शाडू उपलब्ध होईल का....असो....तुझ्या माझ्या सारखा विचार जेव्हा कुटुंबातला प्रत्येक तरुण करायला लागेल तेव्हा काही तरी होईल अर्थात हे सगळं एकदम बदलणार नाही....हे निश्चित (जायला स्क्रीप्टींग करुन करुन प्रत्येक गोष्टीचा शेवट हे निश्चित असाच होतोय राव....काय तरी करायला हवं हे निश्चित)

  चांगभलं

  ReplyDelete
 6. श्रीकृष्ण...
  अमित मित्रा प्रथम तुझे अभिनंदन तु छान विषय निवडला. मी फेस बुकवर तुझ्याअगोदर गणपती मुर्तीदान करा पर्यावरण वाचवा हा कॉज घेतला असून त्याला माझ्या मित्रांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विषय कोणी निवडला हा भाग वेगळा आहे,पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात गणपतीचा जिव्हाळ्याचा वि्षय निवडून तु लिखान केले त्याबद्दल पुन्हा तुझे अभिनंदन भविष्यात असेच जिव्हाळ्याचे आणि ताजे विषय निवड, तु निवडणार हे नक्कीच

  ReplyDelete