Saturday, June 19, 2010

पावसाची कविता

बाहेर सुंदर पाऊस पडतोय. अशावेळी पावसावर काहीतरी लिहावं असं वाटतं होतं. मात्र मला सुचत नव्हतं. पण एकेदिवशी माझ्या बायकोने मला एक मस्त बातमी सांगितली. माझ्या मेव्हण्याने पावसातून प्रेरणा घेत एक झकास पहिली वहिली रोमँटीक कविता लिहीली आहे. कविता वाचल्यावर मला आवडली. परागला लगेच विचारलं त्याची काही हरकत नसेल तर या कवितेला मी माझ्या ब्लॉगवर अपलोड करायला उत्सुक आहे. त्याने परवानगी दिलीय. तेव्हा आता माझा मेव्हणा पराग राजवाडे यांनी केलेली ही कविता वाचा...





चिंब भिजलेल्या अंगावर पडणारा पाऊस, आणि वाहणारा धुंद वारा,
तुझ्या माझा प्रेमाचा अर्थ, उलगडून सांगे सारा

तुझ्या सौंदर्यामुळे विचार थक्क होऊन जातात
हातात छत्री नसताना, तुला छत्रीत घेऊ पाहतात.

नजरेला चुकून मिळालेली नजर, झटक्यात काम करून जाते
मनात उत्कंठा निर्माण करून, भावनांच्या जाळ्यात अडकू पहाते

भावनांच्या अटीतटीच्या खेळात पाऊस थांबतो, पण मन थांबत नाही
बसता उठता खाता पिता सतत, तुझ्याच सावलीचा पाठलाग करत राही

थेंब पाण्याचे हळूहळू खाली सरताना, जणू अंधारात कुठेतरी वाट शोधत राहतात
हळूच ओठांमध्ये गुडूप होताना, शहारलेल्या तनाची मजा आवडीने पाहतात

पावसात भिजल्यावर.. सखे तू वाटावीस अशी, वृक्षावर नवी पालवी अशी
एकीकडे वादळातही तग धरून राहणारी झाडे असताना, छोट्याशा स्पर्शाने शहारलेली लाजाळू जशी

अखेरीस एकच प्रश्न मनात येतो, मनात हे काव्य रचताना
की देवाने मनात प्रेम का द्यावे, कोणालाही त्याचा अर्थ कळत नसताना

- पराग राजवाडे




('जाणीव' या ब्लॉग स्पॉटवर आपली कविता अपलोड करायला परवानगी दिल्याबद्दल पराग राजवाडे यांना धन्यवाद)

Tuesday, June 15, 2010

माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे- भाग दोन

डोंबिवली हे माझे शहर. खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी या शहरात असलेल्या उघड्या गटारांमुळे आणि डासांमुळे आजही हे शहर हेटाळणीचा विषय आहे. उघडी गटारं आणि डास आणि त्यामुळे निर्माण होणारी रोगराई हा डोंबिवलीत तरी इतिहास झालाय. इतर शहरांचं आम्हाला माहित नाही. तर डोंबिवली हे खरोखर सुंदर शहर आहे असं प्रत्येक मूळ डोंबिवलीकराला वाटतं. पण नुसतं वाटून उपयोग नाही. त्यामुळे आपल्या जाणीव या ब्लॉगच्या माध्यमातून डोंबिवली शहरातली सौंदर्यस्थळ दाखवण्याचा प्रयत्न मी सुरू केला. त्याला माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे असं नाव मला सुचलंय. गेल्यावेळी आपण डोंबिवलीतली फडके रोडवरची दिवाळी पहाट पाहिली होती. आता आपण फेरफटका मारूया डोंबिवलीतल्या भोपर या गावातल्या टेकडीवर.. साधारणतः प्रत्येक डोंबिवलीकराला भोपर हे गाव ऐकून माहित आहे. मात्र तिथे असलेल्या छोट्याशा टेकडीवर एखादी संध्याकाळ फार प्रसन्न वातावरणात घालवू शकता याची माहिती मात्र अनेकांना नसेल.

भोपरची टेकडी ओळखली जाते ती अनेक वर्षांपासून असलेल्या गावदेवीच्या मंदिरामुळे. कोपर स्टेशनमध्ये गाडी शिरायच्या आधी ही टेकडी दूरवर पाहू शकाल. अर्थात भोपर हे गाव डोंबिवलीत अनेकांना माहित असलं तरी प्रत्यक्ष त्या गावात जाण्याचं धाडस अनेक जुन्या आणि जाणत्या डोंबिवलीकरांनी कधी केलं नसेल. अगदी नांदीवलीपर्यंतच्या भागाचा विकास जोमाने झाला. पण भोपर हे नेहमीच गाव राहीलं. मात्र भोपर जवळ श्री गणेश मंदिर निर्माण झालं आणि डोंबिवलीकरांचा या ठिकाणी राबता सुरू झाला. मग गणेश मंदिराबरोबर गावदेवीचं दर्शन घ्यायलाही गर्दी वाढायला लागली. भोपरच्या या गावदेवी मैदानाच्या बाजूलाच थोडासा मोकळा पठारी भाग आहे. त्या पठारावर उभं राहिलं की दूरवर पारसिक ते हाजीमलंग अशी पसरलेली डोंगररांग मोहक दिसते. तिथून दिसणाऱ्या या सृष्टी सौदर्यांवर मोहीत होऊन आणि स्वच्छ हवा खाण्यासाठी डोंबिवलीतून लोक इथे यायला लागले. त्यातच भोपरच्या ग्रामपंचायतीनेही फिरायला आलेल्या पाहुण्यांसाठी या पठारावर सुशोभिकरणातून सुंदर बेंचेस बांधले. दिव्यांची व्यवस्था केली आहे. ज्याला बसायला बेंचेस मिळणार नाहीत त्यांच्यासाठी जमिनीवर सिमेंटचे चौथरे बांधले आहेत. त्यामुळे अगदी पाय मोकळे पसरून आरामात बसा.. भेळ खा.. सुंदर सोय आहे.

या पठारावर तुम्ही उभे राहिलात की पश्चिमेला मुंब्रा देवीचा डोंगर दिसेल. तर पुर्वेला हाजी मलंग डोंगररांग दिसेल. उत्तरेला डोंबिवली शहराचा विस्तार दिसेल. तर दक्षिणेला मोठ्या माळा पलिकडे मुंब्रा कौसा हा विभाग दिसेल. या टेकडीच्या भोवताली मोठा माळ असल्यामुळे आणि खाडी जवळ असल्यामुळे संध्याकाळी पश्चिमेचा थंड वारा मोहून टाकतो.
या ठिकाणी तुमची एखादी संध्याकाळ झकास जाऊ शकते. मोकळी हवा खात गप्पांचा झकास अड्डा जमू शकतो. भोपर ग्रामपंचायतीने या भागाची खरोखर काळजी घेतली आहे. टेकडी वरच्या पठारापर्यंत गाडी वर पर्यंत यावी यासाठी त्यांनी सिमेंटचा रस्ताही बांधलाय. अर्थात अशा ठिकाणी लव्हर्स स्पॉट निर्माण होण्याची भिती असते. तसंच अशा ठिकाणी बाटल्या उघडणाऱ्यांचाही त्रास होऊ शकतो. पण घाबरू नका. याची काळजीही ग्रामपंचायतीने घेतली आहे. या भागात मद्यपींना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच या टेकडीच्या पायथ्याशी भोपर ग्रामपंचायतीने एक खतरनाक संदेश लिहिला आहे. प्रेमी युगुलांनी हा संदेश आधी वाचा आणि मगच या टेकडीची पायरी चढा. नियम हे मोडण्यासाठी असतात वगैरे वाक्य तुम्ही किमान भोपर गावात तरी उच्चारण्याची हिंमत करू नका.. त्यामुळे स्वच्छंदी, मोकळ्या वातावरणात एखादी संध्याकाळी आनंददायी करण्यासाठी भोपर टेकडीला नक्कीच भेट द्या.. मजा येईल.