Monday, September 14, 2009

एकमेवाद्वितीय...

तरूण असणं ही फक्त वयाशी संबंधित गोष्ट आहे, असं अजिबात नाही.. तारूण्य ही वयावर नाही तर मनावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. शारीरिक वय कितीही झालं तरी मनानं नेहमीच तरूण असणारी काही माणसं या भूतलावर अवतरली त्यातला एक म्हणजे सचिन तेंडुलकर... तिरंगी एकदिवसीय मालिकेतल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात सचिननं आपलं ४४ वं शतक पूर्ण केलं. त्यानिमित्ताने साम मराठीच्या आमच्या बातम्यांसाठी एक पॅकेज लिहीले होते ते मला येथे पोस्ट म्हणून टाकावेसे वाटले..

त्याचं शारीरिक वय आहे ३६ वर्ष १४४ दिवस. त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला १८ डिसेंबर १९८९ या दिवशी म्हणजे बरोबर ४ दिवसांनी त्याच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होतील.. तब्बल ४२७ एकदिवसीय सामने त्याने खेळले आहेत. तरिही धावांची भूक कायम आहे... नव्हे आता दुप्पट वाढलीय. आजही सर्वोत्तम सलामीवीर तोच आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलामीला आल्यावर ६ धावांची धावगती तो सहज राखू शकतो.. आणि आपलं शतक पूर्ण करताना आजही तो अवघे ९३ चेंडू घेऊ शकतो. शतक पूर्ण करताना त्याने अवघे ८ चौकार मारले.. याचा अर्थ त्याने ६८ धावा या पळून काढल्या .. श्रीलंकेतल्या सध्याच्या उकाड्यात या ६८ धावा पळून काढणं किती कठीण आहे हे सांगायला नकोच. आणि एवढ्या धावा पळून काढूनही तो अवघ्या ९३ चेंडूत शतक झळकावू शकतो.. शतक झाल्यावरही तो आडवीतीडवी बॅट फिरवून विकेट पणाला लावत धावांच्या मागे लागत नाही. टिकून राहत धावांचा वेग मंदावणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतो.. धावा काढतानाचा त्याचा उत्साह आजही तरूण क्रिकेटपटूंना लाजवतो.. त्याचं चौकार मारतानाचं पदलालित्य आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावं असं.. त्याची फलंदाजी हा धावांचा ओघवता धबधबा आहेच, पण तो एक संदर्भ ग्रंथही आहे. क्रिकेट शिकणाऱ्या प्रत्येकानं क्रिकेट कसं खेळायचं यापेक्षा क्रिकेट का खेळायचं याचा परिपाठ देणारी त्याची फलंदाजी... मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात तो आजही त्याचे सहजसुंदर फटके मारतो. ड्राईव्हज्, कट्स, पुल, हुक यांचा सुंदर मिलाफ तो घडवतो. ऑफसाईडला त्याला सापळ्यात पकडण्यासाठी पाच पाच क्षेत्ररक्षकांचं कडं उभारलं तरीही तो ते लिलया भेदून दाखवतो... सापळ्याच्या विरूद्ध दिशेला खेळून समोरच्या कर्णधारालाच सापळ्यात पकडण्याचं त्याचं चातुर्य तर लाजवाब. आपल्या खेळीनं संघाच्या धावा वाढवायच्या, संघाची जबाबदारी वाहायची, आपल्या चाहत्यांना खूष करायचंच त्याचबरोबर आपल्य़ा टीकाकारांनाही शांत ठेवायचं.. एवढी सगळी व्यवधानं गेली २० वर्षं अव्याहतपणे वाहणारा सचिन खरोखर एकमेवाद्वितीय...

( हा ब्लॉग प्रदर्शित करण्यासाठी साम मराठी वृत्तविभागाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार)

Thursday, September 10, 2009

माय...

मधूरा नावाचा एक मुलाखतीचा कार्यक्रम साम मराठीवर प्रसारीत केला जातो. हा कार्यक्रम मी स्वतः एकदाही पाहीला नव्हता.. मात्र या बुधवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दुपारी सहज तीन वाजता हा कार्यक्रम पाहीला आणि एका शक्तीचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांची मुलाखत झाली. अनाथांची माय झालेल्या सिंधूताईंच्य़ा जीवनाची त्यांनी त्या एक तासात झलक दाखवली. त्यांचा प्रत्येक शब्द अक्षरशः महाकाव्य होता. आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी वगैरे मला मिळाली की नाही माहित नाही. पण काहीतरी मिळालं हे नक्की. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सासूने लहानग्या मुलीसकट सिंधूताईंना घराबाहेर काढलं. पोटच्या तान्ह्या मुलीला घेऊन वणवण भटकणे नशीबी आले यापेक्षा कोणते मोठे संकट येऊ शकते.. एकट्या पडलेल्या स्त्रीसाठी ही परिस्थिती किती भयानक असेल हा फक्त विचारच शहारे आणतो. रेल्वेमध्ये भीक मागणं. जिवंत माणसं स्मशानात यायला घाबरतात म्हणून स्मशानात रात्री काढणं.. जळणाऱ्या प्रेताला विसावा म्हणून थोडे पिठ घातले जाते. त्याची भाकरी त्याच निखाऱ्यांवर भाजून पोटाची आग विझवण्याची पाळी या माऊलीवर आली. आपली पोटची पोर दगडूशेठ हलवाई प्रतिष्ठानच्या पायरीवर सोडून जाताना त्यांना काय यातना झाल्या असतील. त्यातून त्यांनी अनाथांची माय होण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीला दूर ठेवणाऱ्या या मायनं चिखलदरा येथे जवळपास 175 मुली, माळेगाव ठेका (जि. वर्धा) येथे 25 वयोवृद्ध व परितक्‍त्या, कुंभारवळण ता. पुरंदर) येथे ममता बालसदनात 80 मुले, गुहा (जि. नगर) येथे 90 मुले व पुण्यातील हडपसर भागात 52 मुले-मुली, अशा 422 अनाथ मुला-मुलींचा व निराधारांचा सांभाळ केलाय. ज्याला कोणीच नाही, अशा मुलाला त्या सपकाळ व मुलगी असेल, तर साठे हे आडनाव त्या देतात. सिंधूताई 39 सुनांच्या व 182 जावयांच्या सासू झाल्या आहेत. हे पाहिल्यावर उर दडपतो. शुन्यातून विश्व उभे करणाऱ्यात आपण नेहमी प्रतिष्ठीतांची नावं घेतो. पण शुन्यातून खरोखर विश्व उभं करणं म्हणजे काय याची जाणीव या मायकडे पाहिल्यावर होते. सिंधूताईंनी म्हटलंय की स्त्री कधीही आत्महत्या करत नाही, ती तग धरते. त्या उदाहरण देतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्यामागे त्यांच्या घराचा आधार झाल्यात. स्त्री कोणालाही वाऱ्यावर टाकू शकत नाही कारण तीच्यात लपलेली असते एक माय.. या मायची जाणीव करून दिली सिंधूताई सकपाळ या मायनं.