Tuesday, September 22, 2015

मी तो गणेशोत्सव खुप मीस करतो...घरात नातेवाईक खुप जमलेत. आजीच्या बहिणी, आजोबांचे भाऊ बहीण, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं... घरात लेकी सुना एकत्र काम करत आहेत, हास्यकल्लोळ चाललाय, 50 जणांच्या रोजच्या स्वयंपाकात लुडबूड करत पुरूष मंडळी चहाची फर्माईश करत आहेत. बाहेर एखादे अण्णा मामा किंवा आजोबा तरूणांना, ''काय रे सध्या काय?'' असा सवाल करतायत... स्वयंपाकघरात काही आज्या हातातलं काम निपटवत असताना एकमेकींची सुखदुःख वाटून घेत आहेत... आणि बाहेर दिवाणखान्यात मखरात गणराय विराजमान झालेत. दुपारच्या आरतीची वेळ झालीय. सोवळं नेसलेला मामा आरतीला चला रे अशी हाक मारतो... बायका पदराला हात पुसत पुसत बाहेर येतात. घरात इकडे तिकडे करत असलेली मुलं गणपतीसमोर जागा पटकावतात. ठेवणीतल्या पिशवीतून झांजा बाहेर पडतात. आरामखुर्चीवर बसलेल्या आजोबांना एखादे काका धरून बाहेर आणतात. खणखणीत आवाजात आरती सुरू होते... मामाच्या हातातल्या ताम्हनात निरांजन, कापूर ओवाळला जात असतो. सुखकर्ता, दुखहर्तापासून सर्व देवांच्या आरत्या होतात.  येई यो विठ्ठलेला चांगला टीपेला आवाज लावला जातो... घालीन लोटांगण होतं... मंत्रपुष्पांजलीतला प्रत्येकाचा वेगळा स्वर अंगावर शहारा आणतो... आरतीचं तबक फिरतं... त्यातल्या कापूराच्या ज्योतीचा उबदार स्पर्ष हाताला जाणवतो. गणरायासोबत घरातले सर्व तृप्त होतात... आता नैवेद्य... आणि नंतर जेवणं... घरातले सगळ्यांच्या पंगती बसतात. आई, काकू, मामी, मावशी वाढायला येते. मोदकांचा आग्रह होतो. मोदक खाण्याच्या स्पर्धा लागतात. गणेशोत्सवाचे असे ते सुंदर पाच किंवा सात दिवस...
मी असा गणेशोत्सव अनुभवला आहे. आमच्या घरी असाच गणपती साजरा होत असे. पण आमच्या घरी गणपती आणण्याआधी आम्ही पुण्याला आमच्या काकांकडे, ठाण्याला आमच्या आजोबांकडे आणि डोंबिवलीत आमच्या आईच्या मामाकडे गणपतीला जायचो.. त्यातही डोंबिवलीत आईच्या मामाच्या घरी सुरेश मामाच्या घरी गणपतीला सर्वाधिक वेळा गेलोय. अगदी आमच्या घरी गणपती सुरू केल्यावर, दीड दिवसांचं विसर्जन झाल्यावरही आम्ही लगेच सुरेश मामाकडे जायचो. काय वातावरण असायचं. घरात माझे पणजी पणजोबा होते, माझ्या आजीचं ते माहेर... माझ्या आजीच्या सगळ्या बहीणी, भाऊ इथे यायचेच पण त्याच बरोबर माझ्या आजीच्या आत्याही आलेल्या मला आठवत आहेत. माझी आई सांगते आजीची आत्या, बबन आत्या, आईची मावशी सिंधू मावशी, हेमू मावशी, या सगळ्या आज्या करायच्या तसे मोदक जगात कोणी केले नसतील. मुळ्यांचा गणपती म्हणून या सगळ्या ज्येष्ठ स्त्रिया लीलया गणपतीची जबाबदारी घ्यायच्या. अंजू मामी त्यांची कॅप्टन आणि पणजी कोच... अशी मस्त टीम असायची. मी तेव्हा लहान होतो म्हणून मला कधी स्वयंपाकघरात थांबून ती मजा अनुभवता नाही आली. पण केवढ्या गप्पा रंगत असतील तिथे.. माझी आई, तिची मावशी शामू मावशी, शालन मावशी आणि अंजू मामी या तशा एकाच पिढीतल्या, काही वर्ष इकडे तिकडे... त्यांची एक टीम असायची. बाहेर अद्वैत, किशोर, चंदामामा, राजू मामा यांची एक टीम, तिकडे टीनू, लिनू, तुषार, मी यांची एक टीम, त्याही पलीकडे बेडरूममध्ये पणजोबा, माझे आजोबा, अण्णा मामा, सुरेश मामा, विसू मामा, रवी मामा, शेखर मुळे मामा, मोघे काका, पुण्याचे पिटपिट उर्फ मिराशी काका, पेंढारकर काका यांच्या झकास गप्पा रंगलेल्या असायच्या... विषय शेअर बाजारापासून क्रिेकेटच्या मैदानापर्यंत... क्या बात है...
मला आठवतं गणपतीचं मखर तयार करण्याची जबाबदारी चंदामामा आणि अद्वैत यांची असायची... थर्माकोलवर अप्रतिम नक्षी काढून, ती अर्ध्या ब्लेडने कापली जायची..गणपती आधी सुरेशमामाकडे गेलं तर हे दोघे ते काम मन लावून करत बसलेले दिसायचे. अप्रतिम मखर हे मुळ्यांच्या गणपतीचं वैशिष्ट्य..
गणपतीच्या दिवशी सकाळ अशी मस्त जायची. संध्याकाळी या पाच सात दिवसांत अक्षरशः हजारो माणसं दर्शनाला येऊन जायची. त्यांना मस्त मोदक पेढ्याचा प्रसाद आणि कॉफी किंवा बहुदा दूध असा मस्त कार्यक्रम असायचा. टिनू, लिनू या माझ्या मावशा त्या कामी पुढे असायच्या... काय धमाल... बाहेर गणपतीला आलेले विविध लोक पाहणं हा माझा एक तेव्हा आवडता कार्यक्रम असायचा. त्यांच्याशी घरातले बोलतात कसे, ते कसे बोलतात, काय बोलतात हे ऐकायला मजा यायची. अद्वैत, किशोर हे माझे मामा तसे माझे आदर्श असायचे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांशी हे दोघे काय बोलतात याचं निरिक्षण मी आणि तुषार करत बसायचो. तुषार हा माझा अजून एक मामा... मुळ्यांच्यातला सर्वात लहान भाऊ... माझ्या आईचा मावसभाऊ, शाळेत माझ्या एक वर्ष पुढे असलेला. त्यामुळे त्याचं आणि माझं जाम जमायचं.
गणपतीच्या अखेरच्या दिवशी, विसर्जनाला मजा असायची, समोर पाटलांचा गणपती, आणि मुळ्यांचा गणपती एकत्र निघायचा. मुळ्यांची सगळी गँग असायची... संगीतावाडीतल्या विहिरीवर विसर्जन व्हायचं... तिथून येताना सगळे सुन्न असायचे.. घरी आल्यावर परत वातावरण हलकं फुकलं करण्यासाठी कानिटकरच्या वडापावचं औषध असायचं... काय मजा यायची...
असा हा गणेशोत्सव... काळाच्या ओघात घरातले वयोवृद्ध गेले. पणजोबा, पणजी गेले, आजीच्या आत्या गेल्या, आईच्या काही मावश्या गेल्या. स्वतः सुरेश मामाचं कुटुंबही पुण्यात स्थायिक झालं...
आमच्या घरातल्या गणपतीचे दीड दिवस आम्ही भक्तीभावाने साजरे करतोच पण सुरेशमामाकडचा गणपतीच माझ्या आणि माझ्या ताईच्या मनावर कोरला गेलाय. आठवण त्या बाप्पाची निघतेच...
मला वाटतं मखरातला गणपती हे एक निमित्त असतं, ओढ असते ती गणपतीला जमलेल्या आपल्या गोतावळ्याची.. मोदक तर सगळेच सारखे असतात पण ते करणारे हातच खास असतात नाही का...?

Tuesday, September 15, 2015

आठवण गणरायाची...

गणपतीच्या आगमनाची तयारी घरात पूर्ण झालीय. उद्या सकाळी गणपती आणायचा... माझ्या स्वतःच्या गाडीतून मी यावर्षी गणपती आणणार आहे याचा आनंद आहेच. पण गेल्यावर्षीपासून मनात एक खंतही सतावतेय. माझा चांदीचा गणराय आता आमच्यात नाही. एका विशिष्ट कारणासाठी आम्ही काही वर्षापूर्वी एका विशिष्ट कारणासाठी चांदीच्या गणेशाची सुंदर मूर्ती आणली होती. त्यावर मी एक पोस्ट याआधी टाकलीही आहे.. 

http://www.janeeva.blogspot.in/2009/08/blog-post_23.html

मात्र आता हा गणराय आमच्याकडे नाही. 20 मे 2014 या दिवशी आमच्या घरात घरफोडी झाली. त्यात हा गणराय चोरट्यांच्या हाती लागला. 800 ग्रॅमची ही मूर्ती चोरट्यांनी लांबवली. तेव्हापासून हा गणराय आमच्यापासून दूर गेलाय. कळत नाहीये काय करू. असंख्यवेळा पोलीस स्टेशनच्या खेपा घातल्या पण पोोलिसांनाही काही क्लू लागत नाहीये. पोलीस आता त्यात विशेष रसही घेत नाहीयेत. एका विशिष्ट कारणासाठी आमच्या घरात आलेला हा गणराय निघून गेलाय. 

 बिल्डींगच्या गेटपासून आत गजर करत गणपती आणायचा. त्याची शास्त्रोक्त दीड दिवस पूजा करायची आणि नंतर पार्कींगमध्ये पाण्याची बादली भरून त्यात विसर्जन करायचं. पाणी झाडांना घालायचं अशा स्वरूपात ही मूर्ती आम्ही काही वर्षे पूजली. त्यावरून आमच्यावर टीकाही झाली. प्रश्नही विचारले गेले. पण त्या गणपतीवरची आणि त्यापेक्षाही ज्या कारणासाठी तो आणला त्या तत्वावरची आमची निष्ठा अजिबात ढळली नाही. माझ्या घरातल्या गणपतीने मी नैसर्गिक जलस्त्रोत खराब होऊ देणार नाही ही त्यामागची भावना होती. पण मूर्ती चोरणा-या त्या हातांना या कोणत्याही तत्वांची किंवा उदात्त हेतूची वगैरे पडलेली नसते. 800 ग्रॅम चांदी... बास पळवा... एवढा एकमेव हेतू मनात ठेऊन ते आमच्या बाप्पाला घेऊन गेले. 

ठिक आहे, माझ्या मनात हे तत्व कायम आहे. ते त्या गणरायालाही माहिती आहे. आमच्या घरात राहून राहून त्याला कंटाळा आला असेल त्यामुळे सध्या तो फिरायला बाहेर गेला असेल. पण तो परत येईल हा माझा विश्वास आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात त्या मूर्तीचं रूपडं जिवंत आहे. त्याचा स्पर्ष माझ्या हाताला नेहमीच जाणवत असतं. आमचा हेतू प्रामाणिक होता. तो त्याला माहिती होता. त्या हेतूलाच पुन्हा मूर्त रूप देण्यासाठी आमचा चांदीचा गणराय पुन्हा येईल. 

गणपती बाप्पा मोरया...