Thursday, December 13, 2012

पहाटेच्या रंगांचं सौदर्य


मॉर्निंग शिफ्टसाठी चाललो होतोमागच्या सीटवर खिडकीत बसलो होतोशिळफाटा येईपर्यंत मित्रांशी गप्पा झाल्यामग झोपावं की जागं रहावं असा विचार करता करता पाईपलाईनचा डोंगरी रस्ता क्रॉस झालाथंडीमुळे काच बंद होतीखिडकीतून सहज बाहेर पाहीलंउजाडायला लागलं होतंड्रायव्हरने मस्त पंडीत अजित कडकडे यांच्या स्वरातले हरीपाठ लावले होतेते ऐकत होतो. डोंगराच्या कडा दिसल्या.. बाहेर सुर्योदयाआधीचा पहाटेचा प्रकाश होताआकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं..त्याला किनार लाभली होती डोंगरांच्या कडांचीखुप मस्त वाटलं..माझा मित्र अमोल जोशीने न्यूजरूम लाईव्ह या दिवाळी अंकात लिहीलेल्या कथेची आठवण झालीत्यालाही अनेक वर्षांनी अशी सुंदर पहाट पाहायला मिळाली होती.. मला त्या कथेची आठवण आली.

खरच किती सुंदर वातावरण होतं.. बाहेरचं पहाटेच्या रंगांचं सौदर्य पाहात काच थोडी उघडथंड वारा अंगावर घेत होतोकानावर हरीपाठ पडत होतेडोळ्यात ते रूप साठवल्यावर मग अलगद डोळे मिटलेडोळे मिटल्यावर मनाने वेग घेतलामनाने पोचले माथेरानमध्ये.. लक्ष्मी ह़ॉटेलची आमची नेहमीची ठरलेली खोलीत्याच्या समोर असणारी सुंदर बाल्कनीआणि तिथून दिसणारा समोर पसरलेला गार्बट हीलमाथेरानमध्येही आत्ता अशीच पहाट फुलत असणारगार्बट माथेरानच्या पश्चिमेला आहे त्यामुळे तिथे थोडा कमी प्रकाश असणारहा विचार करत असताना खरचं नाकात माथेरानचा सुंदर वास आलाहे क्षण अनुभवतो न अनुभवतो तोच मी अचावक माझ्या गावाला वाईला पोहोचलो.. वाईतही आळीमध्ये अशीच सुंदर पहाट फुलत असेलआत्या राहायची त्या वाड्यात आम्ही राहायला जायचोतिथे वाड्याबाहेर कृष्णाबाईच्या उत्सवाची लगबग सुरू होती.. पालखी येणार म्हणून पहाटेपासूनचं संपूर्ण आळी स्वच्छ झाली होतीबाहेर सडे घातले होते.. रांगोळ्या काढल्या होत्या.. कानावर हरीपाठ पडत होते.. नाकात वाईचा वास आला.. वाईच्या थंड पहाटेचा अनुभव घेतो न घेतो तोच वाई जवळच्या मेणवलीच्या घाटावर पोहोचलोपहाटेच्या प्रकाश होताकृष्णाबाईच्या पाण्यावर धुक्याचं आच्छादन होतं.. बाळं नावाचे पक्षी पाण्याच्या जवळून घिरट्या घालत होते.. समोर शेतात ऊसाचा फड धरला होता.. घाटावर बसून तिथल्या पहाटेचा आस्वाद घेतो तेवढ्यात पुन्हा घरात पोहोचलो.. सातवीत होतो.. सकाळचे पावणेसहा झाले होतेबाबांनी रेडिओ लावला होता.. सुरूवातीला वंदेमातरम् झालं.. मग आकाशवाणीचं म्युझिकमग बाबांनी मला उठवलं.. त्यानंतर रेल्वेवृत्तमग आजचे बाजारभाव,मग चिंतन हाच चिंतामणी आणि त्यानंतर मग भक्तीगीतं.. त्यातही आर एन पराडकरांची दत्ताची गाणी.. त्या वेळापत्रकावर इथे आमची शाळेची आवराआवरसहा चाळीसची बस पकडून शाळेत गेलोरेडीओवर त्यानंतर काय लागतं माहिती नाही.. कानावर हरिपाठ पडतच होते...

मनाने प्रचंड वेग घेतला.. एमआयडीसी ते डोंबिवली ही बस पकडायच्या ऐवजी मी पोहोचलो एकदम लांबपल्ल्याच्या गाडीतगाडी चालली होती भोपाळला.. मी चाललो होतो एसएसबीला(एसएसबी म्हणजे सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्डथोडक्यात आर्मीसाठीचा इंटरव्ह्यू,युपीएससीची सीडीएस पास झाल्यावर द्यावी लागणारी परिक्षा), माझं रिझर्वेशन वेटींगवरच अडलं..मग दाराजवळ पांघरूण गुंडाळून रात्रभऱ खाली बसून प्रवासत्यातच पहाट झालीगाडी मस्त वेगात चालली होतीभुसावळ जाऊन साधारणतः गाडी एमपीमध्ये शिरली होती.. पहाटेचा गार वारा झोंबत होता.. प्रवास संपतच नव्हता.. कानावर हरीपाठ येत होते.. त्यानंतर भोपाळला पोहोचेन असं वाटत असताना मी मात्र मनाने पोहोचलो अलाहाबादला.. पहिली एसएसबी.. प्रचंड दडपणफक्त साडेचार टक्के रिझल्ट लागला होता.. माझ्या बॅचमध्ये भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ३० मुलं होती.. पहाटे सहा वाजात नाश्ता करून साडेसहा वाजता आम्ही फॉलइन करून उभे.. एक ग्रुप टेस्टींग ऑफीसर मेजर मेहता पुढे कशा टेस्ट असतील याची माहिती देत होता... त्या ऐकताना परत प्रचंड दडपण आलं.. कानावर हरीपाठ पडतच होते..
ते दडपण ओसरत नाही तोवर अचानक पोहोचलो वैष्णोदेवीला.. रात्री रांगेत उभं राहून दर्शन केलं होतं.. पावणेपाचला वरती भैरोबाबाच्या मंदिरात पोहोचलो.. तिथे दर्शन घेतलंउजाडायला लागणार होतं.. समोर लांब बर्फाच्छादीत शिखरांवर पहिली सुर्यकिरणं पोहोचून तिथे सोनं तयार झालं होत... थंड वातावरणतिथला वास नाकात रेंगाळला.. तो वास घेतो न घेतो तोवर अचानक मी एकदम मागे गेलो... वय वर्ष दहाच्या आत.. पुण्याला आमच्या काकांकडे भिडे वाड्यात आम्ही राहायला जायचो... सातनंतर झोपलेलं काकांना चालायचं नाही.. अंथरूणावर पडलो होतो... पहाट होत होतीखालच्या प्राजक्ताच्या फुलांचा सुवास येत होता.. वाड्यात दुसऱ्या मजल्यावर शास्त्रीय गायिका मंजिरी आलेगावकर राहायचीत्यावेळी ती कर्वे होतीतिचा रोजचा पहाटेचा रियाझ सुरू झाला होता.. पहाटेच्या वातावरणात शास्त्रीय संगीताचे सूर.. आजही ते आठवलं की डोळ्यात पाणी येतं.. कानावर हरीपाठ पडतंच होता...

काय होत होतं.. माझं मलाच कळत नव्हतं... अचानक आठवलं अरे आज १२ डिसेंबर बरोबर ३ वर्षांपूर्वी अशाच एका सुंदर पहाटे मी आंघोळीच्या आधी खुर्चीवर बसलो होतोआई ताई आणि वहिन्यांनी मला हळद लावली होती.. लग्नाची तयारी सुरू झाली होती.. काही जण चिडवत होते.मग आवरंलं.. आणि आम्ही हॉलमधे पोहोचलो.. गाणी लावली होतीकानावर हरीपाठ पडत होते...


आमच्या गाडीला एकाने कट मारला.. गाडी पटकन थांबलीदचकून डोळे उघडले.. पाम बिचरोडवर नेरूळ क्रॉस होत होतं... हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणापुण्याची गणना कोण करी..कानावर स्पष्ट आवाज आलाज्ञानोबांनी सांगितलेला हरीपाठ मला फार आवडला.. मनाचा वेग किती असतो हे ज्ञानदेवांनी सांगितलं होतंत्याचा अनुभव आलापहाट किती सुंदर असते हे त्यातून दिसलंअनेक पहाटे आपण पाहिल्या होत्या.. पण त्यांचं सौदर्य तेव्हा कळलं.. मन केवढी भरारी मारून आलं होतं.. वायुवेग काय होता हे कळलं.. मग विचार सुरू झालेझेवियर्समध्ये आम्हाला शिकवायला कवी महेश केळुसकर होते.. रेडीओ या माध्यमाविषयी त्यांनी आम्हाला शिकवलं होतं.. त्यावेळी 'पहाटही गोष्ट त्यांनी अक्षरशः उच्चारातून दाखवला होता..त्यावेळपासून पहाट आवडायला लागली होतीपण का आवडली पहाट.. दिवसाच्या प्रत्येक वेळेत काहीतरी उत्तम आहेच की.. मग पहाटचं का... पुलंनी म्हटलंय एखादी गाण्याची मैफल जागवून घरी परतताना अचानक भेटते ती पहाट.. खरंच आयुष्यातल्या काही पहाट अशाच भेटल्या...दिवाळीच्या दिवशी घडवून आणलेला दिवाळी पहाटेचा कार्यक्रम नाही.. तर अशा अवचित भेटलेल्या पहाटेंनी अशा अनेक दिवाळ्या मी जगलो होतो हे त्यादिवशी कळलंमात्र प्रत्येक पहाटेत एक साम्य होतं.. प्रत्येक पहाट ही कसली तरी सुरूवात होती.. म्हणून ती आवडली होती.. काही तरी सुरू करण्याचा आनंद असतोच की.. हरीपाठ कानावर पडतचं होते.. आता सूरही यायला लागले..

Thursday, August 16, 2012

मी पाहीलेला मुख्यमंत्री


एमए (पोलिटीकल सायन्सच्या )दुसऱ्या वर्षी विद्यापिठामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला जायला मिळतं.. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनतर्फे राज्यातल्या सर्वच विद्यापिठातून पोलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याची संधी मिळते. मुंबई विद्यापीठाच्या आमच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभागातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात मलाही संधी मिळाली. राज्यशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्षात चालणारा संसदीय लोकशाहीचा कारभार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची चांगली संधी या अभ्यास दौऱ्यात मिळते. या दौऱ्यावर जाण्यासाठी खूप आकर्षण होतं.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ( आर.आर. पाटील, त्यांची खुप क्रेझ होती तेव्हा) भेटणार, इतरही मंत्री, विरोधी पक्षातली मंडळी, अरूण गवळी ( त्यावेळी नुकताच आमदार झाला होता) हे सगळे पाहता येणार म्हणून प्रचंड उत्सुकता होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभाहातली भाषणं, तिथला गदारोळ अनुभवता, पाहता येणार म्हणून खुप उत्सुकता होती. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.. विलासरावांचं काल (14 ऑगस्ट 2012) या दिवशी निधन झालं. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी झालेलं बोलणं याची खुप आठवण आली. त्यासाठी ही पोस्ट टाकावीशी वाटली.

6 डिसेंबर 2005ला आम्ही नागपूरला उतरलो.. 5 तारखेपासूनच अधिवेशनाला सुरूवात झाली होती. 7 तारखेपासून खऱ्य़ा अर्थाने आमच्या अभ्यास दौऱ्याला सुरूवात झाली.  विधान परिषदेच्या सभागृहात आमचे वर्ग होत. सकाळी आठ ते अकरा असे लेक्चर असे. या तीन तासात एक किंवा दोन वक्ते येत. तर 7 तारखेला ओरिएंटेशन होतं.. ओरिएंटेशनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही ज्येष्ठ मंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्य सचिव आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सचिव असे अनेक मान्यवर आमच्यासमोर बोलणार होते. विलासराव त्यावेळी मुख्यमंत्री, आर. आर. आबा उपमुख्यमंत्री, नारायण राणे विरोधी पक्षनेते, विलास पाटील मुख्य सचिव होते. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढ्या जवळून पाहीलं होतं. पांढरा सदरा, त्यावर त्यांच स्पेशल जॅकेट, कपाळावर आलेल्या बटा, आणि एकदम विलासी हास्य असं पेपर किंवा टीव्हीत पाहीलेलं त्यांचं रूप आम्ही जवळून पाहात होतो. अनेकांची भाषणं झाली. त्यानंतर नारायण राणे बोलले. आणि सगळ्यात शेवटी विलासराव बोलायला उभे राहीले.. पहिल्या काही वाक्यात, विद्यार्थ्यांना शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर त्यांनी एकदम राजकारणालाच हात घातला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांतला फरक काय असतो ते समजावून देताना त्यांनी अचानक नारायण राणेंकडे नजर टाकली आणि पुन्हा छद्मी हसत जोरदार टाँट मारला.. विलासराव म्हणाले , नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत की यावेळीही जनतेने त्यांच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपदच टाकलंय. आणि आमच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद... विलासरावांच्या या उदगाराने आम्ही सगळे फक्त हसले. राण्यांचा चेहरा पडला होता. तरीही उसनं हसू चेहऱअयावर ठेऊन तेही हसले, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात विलासरावांच्या या वाक्याची बातमी झाली होती.. त्यामुळे आम्हीही खुष.. आपल्यासमोर मुख्यमंत्री काल बोलले त्याची बातमी पेपरमध्ये छापून आली.. क्या बात है...

त्यानंतर नियमीत सत्र सुरू झाली.. तीन ते चार दिवसांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली. त्यानुसार दुपारी बारा साडेबाराच्या सुमाराला आम्ही त्यांच्या केबिनबाहेर जाऊन बसलो. पाच मिनिटात आम्हाला आत सोडलंही.. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची केबिन, विद्यार्थी वयात प्रचंड आकर्षणाचा विषय. केबिनमध्ये एक भलंमोठं टेबल होतं.. त्यामागे खुर्षी.. त्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख बसलेले. वर्णन सेम.. पांढरा कुडता. त्यावर त्यांचं स्पेशल जॅकेट.. कपाळावर आलेल्या बटा..आणि चेहऱअयावर विलासी हास्य... मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर चार चार खुर्च्यांच्या चार रांगा.. एकदम शेवटच्या रांगेत आम्हाला बसवलं.. पहिल्या रांगेत दोनजण बसले होते.. बहुतेक प्रिंटवाले पत्रकार असावेत. त्यांच्याशी विलासरावांनी काहीतरी चर्चा केली.. मग ते दोघे निघून गेले.. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाहीलं.. बाजूच्या पीएला विचारलं.. विद्यार्थी.. कोणती युनिव्हर्सिटी.. पीएने सांगितलं मुंबई विद्यापीठ... पुन्हा एकदा विलासी हास्य.. विलासरावांचा पहिला प्रश्न.. काय मुंबई विद्यापीठ. चार मुली.. दोन मुलगे.. मुलींच संख्या जास्त दिसत्ये...आम्ही थंड.. मग त्यांनी आम्हाला पुढच्या रांगेत येऊन बसायला सांगितलं. पहिल्या रांगेत 4 मुली बसल्या. दुसऱ्या रांगेत मी आणि माझा मित्र महेश दाभिळकर आणि आमच्या मॅडम मेघा देवळे होत्या.. विलासरावांना मग मॅडमनी एमएची थोडीशी माहिती दिली.. कोणते पेपर आहेत. कशी लेक्चर्स चालतात. आत्तापर्यंत अभ्यासदौऱयात काय काय झालं.. इत्यादी.. त्यानंतर विलासरावांनी आम्हाल प्रश्न विचारायला सांगितले.. आम्ही परत थंड. कोणाला प्रश्नच सुचेनात.. विलासराव हसले.. काय मुंबई विद्यापीठ.. प्रश्नच पडत नाहीत की काय.. मग देवळे मॅडमनी आमची बाजू सांभाळली.. मुख्यमंत्र्यांना पाहून मुलं बुजली आहेत असं सांगत त्यांनी आमची बाजू सांभाळली.. विलासराव हसले.. म्हणाले साहाजीकच आहे.. शेवटी आमच्यातून अनुया वर्टीने पहिला प्रश्न विचारला.. त्याचं उत्तर विलासरावांनी दिलं.. मग मला थोडा जोर आला.. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला.. त्यावेळी एनरॉनची वीज खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.. त्यावर एमएच्या मुंबईच्या वर्गात चर्चाही झाली होती.. त्यावरून मी प्रश्न विचारला.. माझा प्रश्न होता.. एनरॉन प्रकरणावरून राज्यात पुढे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतील आणि दुसऱ्या राज्यात गुंतवणूक करतील अशी शक्यता आहे का, यामुळे राज्याचं नुकसान आहे.. असा मी प्रश्न त्यांना विचारला.. विलासरावांनी त्याचंही आम्हाला समजेल असं उत्तर दिलं.. स्वतःच्या भूमिकेचं समर्थनही केलं.. आणि एनरॉनच्या निमित्ताने युतीलाही कोपरखळ्या मारल्या.. अजून दोन तीन प्रश्न झाले.मग ठरल्याप्रमाणे आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला मिळाले.. 

Mumbai University Students with CM Vilasrao Deshmukh
प्रचंड एक्साईटेड वातावरणात आम्ही बाहेर पडलो.. ग्रेट आज आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो हा आनंद आणि भारलेपणा घेऊन आम्ही बाहेर पडलो...

त्यानंतर एका वर्षात मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलो.. त्यांच्याशी पुन्हा बोलायची संधी मिळाली ती क्रिकेटच्या निमित्ताने..ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि मग एमसीएचे अध्यक्ष असताना आम्ही त्यांचे विविध विषयावर फोनो घ्यायचो.. त्यावेळी त्यांना फोन करायला मिळायचा..

विलासराव यकृताच्या आजाराने गेले. मी विदयार्थी असताना त्यांच्या रूपात आम्हाला राज्याचा मुख्यमंत्री पहायला मिळाला.. त्याचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की मुख्यमंत्री हा शब्द उच्चारला की आजही मला डोळ्यासमोर पांढरा कुडता, स्पेशल काळं जॅकेट, कपाळावर केसांच्या बटा आणि चेहऱ्यावर विलासी हास्य असलेले विलासरावच आठवतात... 

Wednesday, February 8, 2012

माझी अशीच एक पिशवी होती....

काही गोष्टी अशा असतात की आपण त्या का करतो हे कधीच कळत नाही. त्या गोष्टी आत्ता आपल्याला आवश्यक असतातच असं नाही. पण तरीही त्यांची आठवण येत राहते. आत्ता त्या गोष्टी हातात मिळाल्या तरीही त्यांचा उपयोग शुन्य असतो. तरीही त्या गोष्टींची आठवण पुसता पुसली जात नाही.. असं सगळं कंफ्युजिंग मी का लिहीत असेन असा विचार मी स्वतः करतोय. पण खरोखर या वाक्यांसारखाच मी पण एका गोष्टीसाठी कन्फ्युज झालोय. खरोखर माझ्याकडे एक अशीच पिशवी होती. साधी पांढरी प्लॅस्टीकची पिशवी होती. आता मी विचार केला तर कशासाठी ती माझ्याकडे होती मला आठवत नाहीये. मात्र जेव्हा ती पिशवी होती तेव्हा तिचं मोल माझ्यासाठी खुप जास्त होतं.

माझ्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून ते इयत्ता पाचवीपर्यंत मी डोंबिवली पश्चिमेला मयुर बिल्डींग इथे रहायचो. त्या काळात ती पिशवी माझ्याकडे होती. नेहमी मी ती गॅलरीत टांगून ठेवलेली असायची. ती पिशवी माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी होती. शाळेत येताजाता रस्त्यात दिसेल ती पडलेली निरूपयोगी वस्तू उचलायची मला सवय होती. लॉटरीची तिकीटं, संगमरवरी दगड, पट्ट्याचं बक्कल, कपड्यांची बटणं, वाळूतले रंगीत पांढरे दगड, वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपले, असल्या काय काय वस्तू त्या पिशवीत असायच्या. त्यातही त्यातले संगमरवरी दगड मला फार आवडायचे. मला वाटतं आमच्या बिल्डींगजवळ कोणीतही घरात रिनोव्हेशन केलं होतं. त्यातले टाकून दिलेले छोटे आयताकृती संगमरवराचे तुकडे मी जमवले होते. त्या संगमरवरावरचं राखाडी डिझाईन, त्याच्या चार बाजूंपैकी एका बाजूचा मऊ गुळगुळीत स्पर्ष, इतर तीन भागांचा खरखरीत स्पर्ष मी कधीच विसरू शकत नाही. तेल लावल्याने उरलेले तीन भाग गुळगुळीत होतील असं वाटल्यामुळे मी रोज त्या भागांना तेल लावून ठेवायचो. वाळूत मिळालेले पांढरे दगडही तेला बुडवून ठेवायचो. मला कळत नाही तेव्हा असं काही तरी का करावलं वाटायचं.. ती पिशवी माझी प्रॉपर्टी होती. अतिषय आवडती होती. त्यात अनेक निरर्थक वस्तू होत्या. आत्ता त्या निरर्थक वाटतात, पण तेव्हा मला त्या अतिषय आवडायच्या. हे असलं काही का जमवावसं वाटतं देव जाणे...

ती जागा आम्ही सोडली आणि डोंबिवली ईस्टला एमआयडीसीत ऋतुजा सोसायटीत रहायला आलो. ती पिशवी जुन्याच जागेत राहीली. आता तर एमआयडीसीतूनही आम्ही नव्या जागेत रहायला आलोय. पण अजूनही ती गॅलरीत अडकवलेली माझी पिशवी मला विसरता येत नाहीये.