Wednesday, February 8, 2012

माझी अशीच एक पिशवी होती....

काही गोष्टी अशा असतात की आपण त्या का करतो हे कधीच कळत नाही. त्या गोष्टी आत्ता आपल्याला आवश्यक असतातच असं नाही. पण तरीही त्यांची आठवण येत राहते. आत्ता त्या गोष्टी हातात मिळाल्या तरीही त्यांचा उपयोग शुन्य असतो. तरीही त्या गोष्टींची आठवण पुसता पुसली जात नाही.. असं सगळं कंफ्युजिंग मी का लिहीत असेन असा विचार मी स्वतः करतोय. पण खरोखर या वाक्यांसारखाच मी पण एका गोष्टीसाठी कन्फ्युज झालोय. खरोखर माझ्याकडे एक अशीच पिशवी होती. साधी पांढरी प्लॅस्टीकची पिशवी होती. आता मी विचार केला तर कशासाठी ती माझ्याकडे होती मला आठवत नाहीये. मात्र जेव्हा ती पिशवी होती तेव्हा तिचं मोल माझ्यासाठी खुप जास्त होतं.

माझ्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून ते इयत्ता पाचवीपर्यंत मी डोंबिवली पश्चिमेला मयुर बिल्डींग इथे रहायचो. त्या काळात ती पिशवी माझ्याकडे होती. नेहमी मी ती गॅलरीत टांगून ठेवलेली असायची. ती पिशवी माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी होती. शाळेत येताजाता रस्त्यात दिसेल ती पडलेली निरूपयोगी वस्तू उचलायची मला सवय होती. लॉटरीची तिकीटं, संगमरवरी दगड, पट्ट्याचं बक्कल, कपड्यांची बटणं, वाळूतले रंगीत पांढरे दगड, वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपले, असल्या काय काय वस्तू त्या पिशवीत असायच्या. त्यातही त्यातले संगमरवरी दगड मला फार आवडायचे. मला वाटतं आमच्या बिल्डींगजवळ कोणीतही घरात रिनोव्हेशन केलं होतं. त्यातले टाकून दिलेले छोटे आयताकृती संगमरवराचे तुकडे मी जमवले होते. त्या संगमरवरावरचं राखाडी डिझाईन, त्याच्या चार बाजूंपैकी एका बाजूचा मऊ गुळगुळीत स्पर्ष, इतर तीन भागांचा खरखरीत स्पर्ष मी कधीच विसरू शकत नाही. तेल लावल्याने उरलेले तीन भाग गुळगुळीत होतील असं वाटल्यामुळे मी रोज त्या भागांना तेल लावून ठेवायचो. वाळूत मिळालेले पांढरे दगडही तेला बुडवून ठेवायचो. मला कळत नाही तेव्हा असं काही तरी का करावलं वाटायचं.. ती पिशवी माझी प्रॉपर्टी होती. अतिषय आवडती होती. त्यात अनेक निरर्थक वस्तू होत्या. आत्ता त्या निरर्थक वाटतात, पण तेव्हा मला त्या अतिषय आवडायच्या. हे असलं काही का जमवावसं वाटतं देव जाणे...

ती जागा आम्ही सोडली आणि डोंबिवली ईस्टला एमआयडीसीत ऋतुजा सोसायटीत रहायला आलो. ती पिशवी जुन्याच जागेत राहीली. आता तर एमआयडीसीतूनही आम्ही नव्या जागेत रहायला आलोय. पण अजूनही ती गॅलरीत अडकवलेली माझी पिशवी मला विसरता येत नाहीये.