Sunday, September 5, 2010

नभः स्पर्शं दीप्तम्भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजवर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. या घेतलेल्या जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्याही. सचिनच्या या खांद्याने आजवर भारतीय क्रिकेट संघाला कितीवेळा तारलं याचं मोजमाप केलं तर धाप लागेल. सचिनच्या या खांद्यांनी भारताची कित्येकवेळा लाज राखली. सचिनने अनेक जबाबदाऱ्या घेत भारताची मान उंचावलीही.

तब्बल २० वर्ष भारताचा युनिफॉर्म अंगावर चढवून सचिन लढला. त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. अगदी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवरचं जेव्हा शंका घेतल्या जाऊ लागल्या तेव्हाही सचिन डळमळला नाही. एका सैनिकासारखा लढला. त्याच्या याच गुणांचा, कार्याचा गौरव करण्यासाठी भारताच्या वायुदलाने त्याला मानद ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केलंय. सचिन या वीराचा गौरव करण्यासाठी वायुदलाने हा निर्णय घेतला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.

एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक जेव्हा सचिनच्या खांद्यावर त्याच्या रँक लावत होते त्यावेळी सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. एक वेगळेच समाधान या क्रिकेट योग्याच्या चेहऱ्यावर होतं. अनेक शतकं, अनेक विक्रम त्याने सहज मोडले. तरिही असे भाव कधीही त्याच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावरची रेष न रेष त्याच्यातल्या देशभक्ताचं दर्शन घडवत होती. प्रचंड श्रम केल्यावर अधिकारी व्यक्तीकडून किंवा आपल्या आदर्शाकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जी भरून पावल्याचा आनंद होतो, तो आनंद सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सचिन आणि देशभक्ती यांचं न तोडता येण्यासारखं नातं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सचिन भारतासाठी मैदानात घाम गाळतोय. या पदाला पोहोचण्यासाठी त्याने आपलं त्याआधीचं आयुष्य खर्ची घातलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मैदानावर खेळत राहतो. वैयक्तीक स्वार्थाचा विचारही करत नाही. विक्रमासाठी खेळत नाही, विक्रम होत राहतात, हा खेळत राहतो.


हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणारा हा पहिला भारतीय फलंदाज. त्याच्या या प्रकारावरून वादही झाले. प्रत्यक्ष न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र तेंडुलकर हरला नाही. त्याच्या हेल्मेटवरचा झेंडा निघाला नाही. अर्थात झेंडा लावण्यासाठी सचिन तेंडुलकरचं मस्तिष्क हीच उत्तम जागा आहे हे प्रत्येकजण मान्य करेल.

ग्रुप कॅप्टन म्हणजे एअर फोर्समधली पाचव्या क्रमांकाची ऑफिसर पोस्ट. साधारणतः २४ वर्ष सर्व्हिस झालेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीतला कर्नल. सैनिकाला त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान एक तत्व शिकवलं जातं. प्रथम माझा देश, त्यानंतर माझं युनिट, त्यानंतर माझे सहकारी आणि त्यानंतर मी या उतरत्या क्रमाने एक सैनिक आपलं काम करत राहतो. म्हणजे युद्धात प्रथम तो आपल्या देशाचं हीत पाहतो. त्यानंतर आपल्या रेजिमेंट/ युनिटचं हीत पाहतो. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांचं हीत पाहतो आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. सचिनच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाका.. सचिनने याच तत्वावर आपली कारकिर्द घडवलीय हे आपल्या लक्षात येईल.

अंगावर अनेक जखमा या शूर सैनिकाने देशासाठी झेलल्या आहेत. सचिनला आत्तापर्यंत झालेल्या जखमांचा हिशेब काढा. टेनिस एल्बो, पायाचा घोटा, टाच, पाठ अशा अनेक अवयवांना दुखापत झाली आहे. तरिही प्रत्येकवेळी तो यातून बाहेर आला. या सगळ्या जखमा, दुखापती त्याला देशासाठी खेळताना झाल्या. तरिही प्रत्येकवेळी त्याच्याच खांद्यावर संघाची मदार राहिली. जबाबदारी टाकताना कोणी विचारलं नाही हा खांदा किती दुखतोय ते...

२००० साली भारतीय क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं. तेव्हाही सगळ्या आशा या सचिनच्या खेळावरच होत्या. सचिन मैदानात आहे तोवर बुकींचे आणि मॅचफिक्सर्सचे घाणेरडे इरादे यशस्वी होणार नाहीत असा विश्वास क्रिकेटप्रेमी बाळगून होते. सचिनने काही प्रमाणात हा विश्वास सार्थही ठरवला.

असा हा सचिन. प्रत्येक कर्णधाराला वाटेल असा एकमेवाद्वितीय आपल्या संघात असावा. वायुदलानं ही संधी साधली. आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतला.
ब्राव्हो सचिन... तू एक निव्वळ क्रिकेटपटू नाहीस, तू एक महान सैनिक आहेस. वायुदलानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय.

Thursday, July 1, 2010

शामू मावशी

आजवर मी माझ्या कोणत्याही नातेवाईकांवर काहीही लिहीले नाही. नातेवाईकांवर लिहावं असं कधी वाटलंच नाही. पण १ जुलै ललै या तारखेला स्वतःला रोखू शकलो नाही. शामू मावशी जाऊन बरोबर एक वर्ष झाले. माझे कोणतेही विधी, कर्मकांडं करू नका अशी तिची इच्छा असली तरी तिची आठवण रहावी यासाठी माझ्या परीने मी हा प्रयत्न करतोय.

शामू मावशी ही माझ्या आईची मावशी. म्हणजे नात्याने माझी आजी. पण मी कधीही तिच्याकडे आजी म्हणून पाहिलेच नाही. नात्याने ती आजी असली तरी मी तिला मावशी म्हणायचो. पण मावशी म्हणालो तरी तिच्याकडे मी मावशी म्हणूनही कधी पाहिले नाही. म्हणजे ती माझी नक्की कोण होती हा ही एक मोठा प्रश्न आहे. मी स्वतः जेव्हा विचार करतो तेव्हा मलाही हे कोडं कधीच सुटत नाही. काहीही असो ती मला खुप हवीहवीशी होती. माझ्या आईची ती मावशी असली तरी ती आईपेक्षा वयाने फार मोठी नव्हती. बऱ्याच गोष्टी शामू मावशीला सांगितल्या की आईला हलकं वाटायचं. माझ्या मते आंबयं हे आईचं आजोळ आणि शामू मावशीचं माहेरचं गाव हा दोघींचा समान धागा असावा. शामू मावशी होती हा आईला मोठा आधार होता. महिन्यातून एकदा तरी शामू मावशीला भेटायचंच हे आईने ठरवलं होतं. अर्थात या दोघींचं नातं हे मावशी भाची पेक्षा मैत्रिणींचं होतं.

मला आठवतं लहानपणी बिनधास्त रहायला जावं असं ठिकाण म्हणजे शामू मावशीचं घर. फार लहान असताना मला अंधुक आठवतंय मी विनायक काकांना फार घाबरायचो. पण नंतर मी बिनधास्त जायचो. एवढचं नाही शामू मावशीसुद्धा मला हौसेने रहायला घेऊन जायची. हा कटकट करतो, याची जेवणाची नाटकं आहेत, हा रड्या आहे अशी कोणतीही वाक्य एकट्या शामू मावशीने कधीही म्हटली नाहीत. मी ही आवडीने जायचो कारण मला माहित होतं माझी सगळी नाटकं इथे पुरवली जायची. एकटी शामू मावशी नाही तर किशोर आणि टिनूही अक्षरशः कौतुकं करायचे. टिनू, शामू मावशीची मुलगी, ही माझी मावशी, माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी होती. त्यामुळे तिच्याशी माझं चांगलं जमायचं. टिनूने लहानपणी खुप लॉटरीची तिकीटं गोळा केली होती. त्याशिवाय सुरेशमामाकडून तिने शेअर्सचे फॉर्म, आणि तत्सम कागदपत्र जमवली होती. ती कागदपत्र घेऊन आम्ही दुपारी बँक बँक खेळायचो. आणि संध्याकाळी मंगल सोसायटीत टिनूच्या मैत्रिणींबरोबर विशांमृत किंवा लंगडी. टिनूच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मैत्रिणींच्यातही मी खेळलो आहे, नाटकालाही गेलो आहे. कोजागिरीला मंगल सोसायटीत धमाल कार्यक्रम असायचा. त्यासाठी शामू मावशी मला घेऊन जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री कितीवेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो आहे याची गणतीच नाही.

मंगल सोसायटीत जाणं हा खरोखर एक आनंद होता. एकतर टिनू आणि माझं कधीही भांडण व्हायचं नाही. शामू मावशीच्या घराबरोबरच शेजारी टिकेकरांकडेही लाड व्हायचे. त्यामुळे मी नेहमीच तयार.

लहानपणी मला कोणी हुशार मुलांचे दाखले दिले की मला राग यायचा. पण टिनूचे पेपर बघणं मला फार आवडायचं. टिनू तुफान हुशार होती. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क, सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकसमान अक्षरात, एकही काठ न मरता, मुद्देसूद, देखणा, काळ्या शाईपेनाने अतिषय स्वच्छ पेपर टिनू लिहायची. अजिबात अतिषयोक्ती करत नाही. पण टिनूचा पेपर तिच्या वर्गात आदर्श पेपर म्हणून दाखवला जायचा. त्याशिवाय टिनूची चित्रकला. विविध रंगांच्या शेड्स ती उत्तम तयार करायची. मंगल सोसायटीत बाहेरच्या खोलीत असलेल्या कपाटावर टिनूच्या चित्रांच्या गठ्ठा होता. तो बघणं हे माझं आवडतं काम.. आणि खरं सांगतो, हुशार मुलांच्या आया जसं वागतात तसं शामू मावशी एकदाही वागली नाही.

शामू मावशी स्वतः खरोखर निटनेटकी होती. तिची तब्येत नाजूक होती. त्यामुळे दुपारी किती जेवायचं, कोणत्या भाज्या खायच्या, त्या कशा करायच्या याचं सगळं प्रमाण ठरलेलं होतं. एवढच कशाला किती बोलाय़चं, आवाज केवढा ठेवायचा हे देखील तिने ठरवून घेतलं असावं. जेवण झाल्यावर दुपारी भाजलेली, हळद लावलेली बडिशोब आणि त्यानंतर पत्ते खेळायला तिला आवडायचं.

शामू मावशी खुप कणखर होती हे आज विचार केल्यावर मला जाणवतं. विनायक काका गेल्यावर मुलांना मोठं करणं त्यांचे संसार उभे करणं हे तीने फार कसोशीने केलं. मला आठवतं विनायक काका गेले त्यावेळी ती डोंबिवली फिवरसारख्या भयानक आजारातून उठली होती. त्यानंतरही काही वर्षांनी तिला आतड्यांचा त्रास जाणवू लागला होता. टिनू त्यावेळी कॉलेजमध्ये होती. त्यावेळी माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिच्या आतड्याचा काही भाग काढला होता. हे तिच्या जिवावरंच दुखणं होतं. त्यावेळीही तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या दुखण्यातून मार्ग काढला. माझी आई म्हणते ती खुप धीराची होती. तिची इच्छाशक्ती प्रबळ होती.

सातवीत असताना माझा क्लास टिळकनगर शाळेच्या जवळ पाध्येबाईंच्या घरी दुपारी असायचा. एमआयडीसीत घरी येऊन पुन्हा क्लासला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सातवी आणि आठवीत असताना रोज शाळा सुटल्यावर दोन तास शामू मावशीकडे जायचो. खरोखर हक्काने जायचो.

कॉलेजला जायला लागल्यावर मात्र मी तिथे फारसा जाईनासा झालो. महिन्यात एखादीच चक्कर टाकायचो. कारण मलाही माहित नाही. खरोखर वेळ नसावा, मला शिंगं फुटली असावीत किंवा इतर काहीही असो. पण आठवण मात्र यायची.

आज शामू मावशी नाही. तिला जाऊन तब्बल एक वर्ष झालं. तिची आठवण मात्र येते. टिनू दुबईला असली, शामू मावशी तिथे नसली तरी त्या घराची ओढ अजूनही आहे. चारू(मामी) अजिबात या दोघींची उणीव जाणवू देत नाही. तरीही तिथे शामू मावशी नाही ही जाणीव अस्वस्थ करते. नात्याने माझी आजी, म्हणायचो मावशी, तरीही ती माझी नक्की कोण होती या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही.

Saturday, June 19, 2010

पावसाची कविता

बाहेर सुंदर पाऊस पडतोय. अशावेळी पावसावर काहीतरी लिहावं असं वाटतं होतं. मात्र मला सुचत नव्हतं. पण एकेदिवशी माझ्या बायकोने मला एक मस्त बातमी सांगितली. माझ्या मेव्हण्याने पावसातून प्रेरणा घेत एक झकास पहिली वहिली रोमँटीक कविता लिहीली आहे. कविता वाचल्यावर मला आवडली. परागला लगेच विचारलं त्याची काही हरकत नसेल तर या कवितेला मी माझ्या ब्लॉगवर अपलोड करायला उत्सुक आहे. त्याने परवानगी दिलीय. तेव्हा आता माझा मेव्हणा पराग राजवाडे यांनी केलेली ही कविता वाचा...

चिंब भिजलेल्या अंगावर पडणारा पाऊस, आणि वाहणारा धुंद वारा,
तुझ्या माझा प्रेमाचा अर्थ, उलगडून सांगे सारा

तुझ्या सौंदर्यामुळे विचार थक्क होऊन जातात
हातात छत्री नसताना, तुला छत्रीत घेऊ पाहतात.

नजरेला चुकून मिळालेली नजर, झटक्यात काम करून जाते
मनात उत्कंठा निर्माण करून, भावनांच्या जाळ्यात अडकू पहाते

भावनांच्या अटीतटीच्या खेळात पाऊस थांबतो, पण मन थांबत नाही
बसता उठता खाता पिता सतत, तुझ्याच सावलीचा पाठलाग करत राही

थेंब पाण्याचे हळूहळू खाली सरताना, जणू अंधारात कुठेतरी वाट शोधत राहतात
हळूच ओठांमध्ये गुडूप होताना, शहारलेल्या तनाची मजा आवडीने पाहतात

पावसात भिजल्यावर.. सखे तू वाटावीस अशी, वृक्षावर नवी पालवी अशी
एकीकडे वादळातही तग धरून राहणारी झाडे असताना, छोट्याशा स्पर्शाने शहारलेली लाजाळू जशी

अखेरीस एकच प्रश्न मनात येतो, मनात हे काव्य रचताना
की देवाने मनात प्रेम का द्यावे, कोणालाही त्याचा अर्थ कळत नसताना

- पराग राजवाडे
('जाणीव' या ब्लॉग स्पॉटवर आपली कविता अपलोड करायला परवानगी दिल्याबद्दल पराग राजवाडे यांना धन्यवाद)

Tuesday, June 15, 2010

माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे- भाग दोन

डोंबिवली हे माझे शहर. खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी या शहरात असलेल्या उघड्या गटारांमुळे आणि डासांमुळे आजही हे शहर हेटाळणीचा विषय आहे. उघडी गटारं आणि डास आणि त्यामुळे निर्माण होणारी रोगराई हा डोंबिवलीत तरी इतिहास झालाय. इतर शहरांचं आम्हाला माहित नाही. तर डोंबिवली हे खरोखर सुंदर शहर आहे असं प्रत्येक मूळ डोंबिवलीकराला वाटतं. पण नुसतं वाटून उपयोग नाही. त्यामुळे आपल्या जाणीव या ब्लॉगच्या माध्यमातून डोंबिवली शहरातली सौंदर्यस्थळ दाखवण्याचा प्रयत्न मी सुरू केला. त्याला माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे असं नाव मला सुचलंय. गेल्यावेळी आपण डोंबिवलीतली फडके रोडवरची दिवाळी पहाट पाहिली होती. आता आपण फेरफटका मारूया डोंबिवलीतल्या भोपर या गावातल्या टेकडीवर.. साधारणतः प्रत्येक डोंबिवलीकराला भोपर हे गाव ऐकून माहित आहे. मात्र तिथे असलेल्या छोट्याशा टेकडीवर एखादी संध्याकाळ फार प्रसन्न वातावरणात घालवू शकता याची माहिती मात्र अनेकांना नसेल.

भोपरची टेकडी ओळखली जाते ती अनेक वर्षांपासून असलेल्या गावदेवीच्या मंदिरामुळे. कोपर स्टेशनमध्ये गाडी शिरायच्या आधी ही टेकडी दूरवर पाहू शकाल. अर्थात भोपर हे गाव डोंबिवलीत अनेकांना माहित असलं तरी प्रत्यक्ष त्या गावात जाण्याचं धाडस अनेक जुन्या आणि जाणत्या डोंबिवलीकरांनी कधी केलं नसेल. अगदी नांदीवलीपर्यंतच्या भागाचा विकास जोमाने झाला. पण भोपर हे नेहमीच गाव राहीलं. मात्र भोपर जवळ श्री गणेश मंदिर निर्माण झालं आणि डोंबिवलीकरांचा या ठिकाणी राबता सुरू झाला. मग गणेश मंदिराबरोबर गावदेवीचं दर्शन घ्यायलाही गर्दी वाढायला लागली. भोपरच्या या गावदेवी मैदानाच्या बाजूलाच थोडासा मोकळा पठारी भाग आहे. त्या पठारावर उभं राहिलं की दूरवर पारसिक ते हाजीमलंग अशी पसरलेली डोंगररांग मोहक दिसते. तिथून दिसणाऱ्या या सृष्टी सौदर्यांवर मोहीत होऊन आणि स्वच्छ हवा खाण्यासाठी डोंबिवलीतून लोक इथे यायला लागले. त्यातच भोपरच्या ग्रामपंचायतीनेही फिरायला आलेल्या पाहुण्यांसाठी या पठारावर सुशोभिकरणातून सुंदर बेंचेस बांधले. दिव्यांची व्यवस्था केली आहे. ज्याला बसायला बेंचेस मिळणार नाहीत त्यांच्यासाठी जमिनीवर सिमेंटचे चौथरे बांधले आहेत. त्यामुळे अगदी पाय मोकळे पसरून आरामात बसा.. भेळ खा.. सुंदर सोय आहे.

या पठारावर तुम्ही उभे राहिलात की पश्चिमेला मुंब्रा देवीचा डोंगर दिसेल. तर पुर्वेला हाजी मलंग डोंगररांग दिसेल. उत्तरेला डोंबिवली शहराचा विस्तार दिसेल. तर दक्षिणेला मोठ्या माळा पलिकडे मुंब्रा कौसा हा विभाग दिसेल. या टेकडीच्या भोवताली मोठा माळ असल्यामुळे आणि खाडी जवळ असल्यामुळे संध्याकाळी पश्चिमेचा थंड वारा मोहून टाकतो.
या ठिकाणी तुमची एखादी संध्याकाळ झकास जाऊ शकते. मोकळी हवा खात गप्पांचा झकास अड्डा जमू शकतो. भोपर ग्रामपंचायतीने या भागाची खरोखर काळजी घेतली आहे. टेकडी वरच्या पठारापर्यंत गाडी वर पर्यंत यावी यासाठी त्यांनी सिमेंटचा रस्ताही बांधलाय. अर्थात अशा ठिकाणी लव्हर्स स्पॉट निर्माण होण्याची भिती असते. तसंच अशा ठिकाणी बाटल्या उघडणाऱ्यांचाही त्रास होऊ शकतो. पण घाबरू नका. याची काळजीही ग्रामपंचायतीने घेतली आहे. या भागात मद्यपींना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच या टेकडीच्या पायथ्याशी भोपर ग्रामपंचायतीने एक खतरनाक संदेश लिहिला आहे. प्रेमी युगुलांनी हा संदेश आधी वाचा आणि मगच या टेकडीची पायरी चढा. नियम हे मोडण्यासाठी असतात वगैरे वाक्य तुम्ही किमान भोपर गावात तरी उच्चारण्याची हिंमत करू नका.. त्यामुळे स्वच्छंदी, मोकळ्या वातावरणात एखादी संध्याकाळी आनंददायी करण्यासाठी भोपर टेकडीला नक्कीच भेट द्या.. मजा येईल.

Wednesday, March 10, 2010

मित्रौ दी गड्डी

फुल से काटे अच्छे जो दामन थाम लेते है,
दोस्त से दुष्मन अच्छे जो जलकर बी नाम लेते है..

रस्त्यातून जाताना पुढे आरामात चाललेल्या एका ट्रकवाल्याला बरेच हॉर्न दिल्यावर त्याच्या बाजूला गाडी स्लो केली आणि जोरदार शिवी दिली.. काय रे बापाचा आहे का असा जोरदार प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्याने फक्त एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं आणि जाऊ दे अशा अर्थी हात दाखवला. थोड्यावेळाने त्याने पुन्हा एकदा ओव्हरटेक केलं. त्यावेळी त्याच्या नावाने लाखोली वाहून झाल्यावर त्याच्या मागे लिहीलेल्या या ओळी वाचल्या.. आणि मग मात्र हसायला आलं..

भारत हा एवढा अवाढव्य देश, या देशातून एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सतत ये जा करणारे हे ट्रकवाले हे खरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाचं.. अजब रसायन.. रस्ता त्यांच्या बापाचा नाही, त्यांचा स्वतःचाच.. हायवेंवर त्यांचाच हक्क..

समाजातला सर्वात उपेक्षित घटक कोणता असा प्रश्न मला विचाराल तर मी पहिल्यांदा या ट्रकवाल्यांचं नाव घेईन. या ट्रकवाल्यांना नाव, जात, धर्म, पंथ काहीही नसतो.. त्यांची ट्रकवाला एवढीच ओळख असते.. त्यांच्या हातात त्यांचं भविष्यही नसतं. असतं ते फक्त स्टिअरींग व्हिल.. व्हिल म्हणजे चाकाने मानवाच्या उत्क्रांतीत मोठा वाटा उचलला असं म्हणतात, ट्रकवाल्यांच्या हातात असलेल्या चाकानं या भारतात अर्थव्यवस्थेची घडी बसवली.. व्यापार उदीम, उद्योगधंदे, शेतकरी, बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजारसमित्या, काहीही असो ट्रकवाल्यांचा हातभार प्रत्येक धंद्यात आहेच. अशा पद्धतीने थोडा विचार केल्यावर मी या ट्रकवाल्यांच्या आणि त्यांच्या विश्वाच्या प्रेमातच पडलो..
जरा विचार करा.. श्रीनगरमधून माल घेऊन निघालेला ट्रक कन्याकुमारीला पोहोचेपर्यंत किती विविध अनुभव, विविध वातावरण, विविध शहरं, माणसं, रस्ते, माती, डोंगरदऱ्या, वाहनं, वेगवेगळे पोलीस, सरकारी अधिकारी, टोलवाले, धाबे पहात हे ट्रकवाले जात असतील.
या ट्रकमध्येही केवढे वेगवेगळे प्रकार आहेत. टाटा, अशोक लेलँड, आयशर, स्वराज मझदा अशा अनेक कंपन्या भारतात ट्रक बनवतात, विकतात. व्होल्वो, मर्सिडीझ सारख्या कंपन्याही आता भारताच्या रस्त्यांवर आल्या आहेत. मात्र तरीही भारतीय ट्रक म्हणजे अशोक लेलँड आणि टाटाचेच..
बरं, हे ट्रकवाले रसिकही तेवढेच असतात. कधी ट्रकच्या मागे केलेलं नक्षीकाम, रंगकाम पहा.. रंगीबेरंगी मोरापासून ते प्रियकराची डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या तरूणीपर्यंत अनेक चित्र आपण ट्रकच्या मागे पाहू शकू. बुरी नजर वाले तेरा मूह काला, एक तू ही निरंकार, हॉर्न ओके प्लीज ही वचनं तर आपण रोजच्या भाषेतही वापरायला लागलोय.
आई बाबांचा आशिर्वाद, सुजाता मुन्नी आणि बंटी, साथी हाथ बढाना..सोनू मोनू दी गड्डी, मित्रौ दी गड्डी.. अशा ओळी लिहून ट्रकवाले आपला कुटूंबवत्सलपणा दाखवतो.
बघतोस काय मुजरा कर असं ठणकावून ट्रकवाला आपला मुजोर स्वभावही दाखवून देतो. जवळपास प्रत्येक ट्रकवर मेरा भारत महान आणि जयहिंद लिहीलेलं असतं. याशिवाय काहीवेळा ट्रकवाले समाजप्रबोधनही करतात. अर्थात ते त्यांच्या खास स्टाईलमध्ये असतं..
एड्स टाळण्यासाठी काय कराल हे सांगण्यासाठी ट्रकवाल्यांची एखादी ओळ बास असते. मागून ठोकू नका, आय एम एचआयव्ही पॉझीटीव्ह, असं सांगणारा ट्रक ड्रायव्हर स्वतःची आणि आपल्या गाडीचीही.. वाचवतो.. (काय करणार त्याची पद्धत), कंडोम कब कब, यौन संबंध जब जब हे वाक्य देखील तो बिनधास्त लिहीतो..
ट्रकवाले नालायक असतात, ते रस्त्यात इतरांचा विचार करत नाहीत, गाड्या भरधाव चालवतात, ते दारू पितात, त्यांना अनेक रोग व्याधी असतात असे अनेक आरोप या जमातीवर केले जातात..
माझं मत वेगळं आहे. ते भरधाव गाडी चालवत नाहीत. हायवेवरून जरा निरीक्षण करा.. रस्त्यांची स्लो लेन पकडून ट्रकवाले आपला रस्ता कापत असतात. त्यांना त्यांचा स्पीड हा नियंत्रीत करावाच लागतो. भरलेला माल आणि तोडायचं अंतर यांचा विचार केला तर त्यांना एकाच स्पीडने का जावं लागतं हे तुम्हाला पटेल. घाटात कृपया त्यांना त्रास देऊ नका,, कारण मालाने ठासून भरलेला ट्रक चढणावर थांबला तर त्यांना परत चालायला प्रचंड जोर द्यावा लागतो. घाटात थांबणं कोणत्याही ट्रकवाल्याला आवडत नाही. ट्रकवाले दारू पितात, हो ते दारू पितात. गुजरातमधून आसाममध्ये ट्रक न्यायचा असेल, एवढं अंतर कापायचं असेल. एवढे त्रास सहन करायचे असतील तर रात्री ट्रकवाले दारू पितातच, मी म्हणीन तो त्यांचा हक्क आहे. ट्रकवाले वेश्यागमन करतात.. असाही आरोप होत असेल. खराही असेल तो.. महिनोनमहिने आपल्या कुटूंबापासून लांब रहायला लागल्यावर अशिक्षित ट्रकवाल्याने
काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे..


असे हे ट्रकवाले.. रस्त्यावरचा सर्वात दुर्बल घटक.. पोलीस, सरकारी अधिकारी, इतर वाहनधारक, टोलवाले, राज्याराज्यातले वेगवेगळे कायदे असे अनेक त्रास सहन करत भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारे हे अशिक्षित ट्रकवाले.. रस्त्यावर आडवा झालेला ट्रक आणि त्याच्याबाजूला हताश होऊन विडी फुंकत बसलेला ट्रकवाला हे चित्र तुम्ही हायवेवर पाहिलं असेल. कधीतरी त्याच आडव्या ट्रकबाजूला चादरीत लपेटलेला ट्रकवालाही तुम्ही पाहिला असेल. समाजातल्या अनेक घटकांची चिंता आपण करत असू.. या समाजाविषयी चिंतेतला च ही आपल्या मनात येत नाही.

अर्थात तुम्ही चिंता करा करू नका, त्यांच्यावर लेख लिहा, शॉर्ट फिल्म करा, टिका करा, शिव्या घाला हे सगळं बघायला त्यांना वेळ नसतो.. कारण त्यांना गाठायचं असतं त्याचं ठिकाण.. गाडी तर ओव्हर लोड झालेली असते.. मालकाने दोन दिवसात हजार किलोमीटर तोडण्याचं आव्हान दिलेलं असतं.. वाटेत पोलीस किती असतील, झोप मिळेल नाही मिळेल माहित नाही अशी स्थिती असते.. पुढे वाहात राहिलेल्या हायवेसारखं हे आयुष्य वाहात राहीलं पाहिजे हे तो जाणतो.. तेव्हा आपला हा ट्रकवाला गाडीला स्टार्टर मारतो.. आणि सरळ निघतो... त्याच्या पाठी लिहीलेलं असतं
यारां दा ट्रक बलिये... आयुष्य म्हणजेच ट्रक मित्रा..

Monday, February 15, 2010

उत्सव निसर्गाचा

हिरवी शामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लवफुलवंती जुई शेवंती
शेंदरी आंबा सजे मोहरू
खेड्यामधले घर कौलारू...

ऊन पाऊस या चित्रपटातलं हे ग.दि. माडगूळकर यांचं गाणं.. हे घर कौलारू मी कधीच अनुभवलं नव्हतं. कोंकणात कोणाकडे पाहूणा म्हणून गेल्यावर मी अशी घरं पाहिली होती. मात्र आपल्या गावाला, आपल्या घरात जाणार आहोत ही भावना त्यात नसायची. माझी पत्नी वैशालीचं मूळ गाव रत्नागिरी जिल्हात देवरूखजवळ निवे हे आहे अशी मला फक्त माहिती होती. मात्र प्रत्यक्ष तिथे जाण्याची वेळ आली नव्हती. महाशिवरात्रीला निव्यात सिद्धेश्वराचा उत्सव असतो अशी माहिती कळली होती. वैशालीच्या वडिलांनी जाहिर केलं आपण सगळे निव्याला उत्सवाला जाणार आहोत. नवपरिणीत दांपत्याला सिद्धेश्वराचं दर्शन घडवणं आणि त्याचबरोबर राजवाड्यांचं मूळ गावही दाखवणं हे दोन्ही उद्देश होतेच. कोकणात जायचं असल्यामुळे आनंदाने निघालो. निव्यात पोहोचेपर्यंत कल्पना येत नव्हती तिथे काय असेल याची. मात्र खरंच सांगतो, परतताना पाय निघत नव्हता...

संगमेश्वरवरून देवरूखकडे आम्ही वळलो आणि गाडीतल्या यच्चयावत राजवाड्यांना गावाची ओढ लागायला लागली. ती ओढ पाहणे आणि अनुभवणे हे काम आम्ही भिडे करत होतो. निवे गावात शिरायच्या आधी गावाच्या वेशीवर आमच्यावरून नारळ ओवाळून टाकण्यात आला. तेव्हापासून आमचं निव्यातलं वास्तव्य खऱ्या अर्थाने सुरू झालं. घरी पोहोचल्यावर पुन्हा एकदा दृष्ट, मग चहापाणी, सुरूवातीच्या गप्पा झाल्यावर आगामी दोन दिवसात हे गाव आपल्याला निश्चित लळा लावणार हे लक्षात आलं.

सुंदर घर, त्याच्या भोवताली सारवलेलं स्वच्छ अंगण, बाजूचा गोठा, मागे वाडी, त्यापलीकडे मिरची, पावटा, चवळीचं शेत. त्याच्यापलीकडे वाहणारा पर्ह्या... त्याचं स्वच्छ, थंड पाणी.. त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा शेत, शेतात उगवलेला हिरवी पावटा, हे सगळं पहात असताना चवळीची कोवळी शेंग खाण्यातली मजा मी त्यादिवशी अनुभवली. तेवढ्यात पर्ह्या पलीकडून हाळी ऐकू आली.. काय चाकरमान्यानू.... कधी आयलय.. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळतीला चाललेला सुर्यनारायण.. ही माझी आणि निव्याची पहिली ओळख. घरांच्या भोवताली शेतं की शेतांत असलेली घरं, निव्याचं वर्णन कसं करावं हे मला कळत नाही.

गावात महाशि़वरात्रीचं वातावरण रंगायला लागलं होतं. रात्री घरात बसून टाळ, मृदुंगाच्या साथीने जोरदार भजन रंगलं. रोज लोकलमध्ये ऐकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं भजन कोकणात होतं असं ऐकलं होतं. त्याचा प्रत्ययही आला.
आजूबाजूला डोळ्यात बोटं घातली तरीही दिसणार नाही असा काळोख, थंड हवा आणि त्यात रंगलेलं भजन खरोखर अवर्णनीय असा माहोल होता. रात्री अंथरूणावर पडल्याबरोबर झोप लागली. सकाळ कधी झाली ते कळलंही नाही. आणि विशेष म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा रोजच्यासारखा थकवा अजिबात नव्हता.

नेहमीसारखा उत्सव पार पडला. आरत्या, भजनं, महाप्रसाद, रूद्रपठण, हे ऐकताना फार प्रसन्न वाटलं. सिद्धेश्वराचं मंदिरही अत्यंत सुंदर ठिकाणी आहे. मंदिराच्या भोवताली किर्रर्र जंगल आहे. थोडं खाली उतरून गेलं की लहानसा पर्ह्या आहे. तिथे जंगली श्वापदं पाणी प्यायला येतात असं सांगतात. त्यातही पाय सोडून पाणी उडवण्याची मजा अनुभवली.

निव्यातली शांतता, पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ, तिथल्या गायी, तिथलं पाणी, शेतं, झाडं हे सगळं खरोखर वेड लावणारं. घरात बसून घेतलेली काजूबीयांची चव, निरसं दूध, भाजीचा फणस, पानात वाढली गेलेली पावट्याची उसळ, हातसडीचा तांदूळ, त्याचा वाफाळता दरवळ, सोबत खारातली मिर्ची, शेतात फिरताना चावलेली कोवळी चवळीची शेंग, गुलकंदाच्या गुलाबाचा सुवास, पर्ह्याच्या पाण्याचा थंडगार स्पर्श, कधीही न विसरता येण्यासारखा. या गोष्टींच्या प्रेमात पडण्यासाठी अजून एक मोठी गोष्ट कोणती सांगू... हे सगळं आपल्या घरातलं आहे, आपल्या जमिनीत पिकलंय ही भावना....
लहानपणापासून मला गाव नाही, त्यामुळे गावाचं महत्त्व काय असतं ते मला नक्कीच माहित आहे. ज्याला गाव आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त... ते सुख मला निव्याने दिलं.

चौकट तीवर बालगणपती,
चौसोपी खण स्वागत करती,
झोपाळ्यावर अभंग कातर,
सवे लागती कड्या करकरू...

Wednesday, February 3, 2010

फाळक्यांची फॅक्टरी

एक तुतारी द्या मज आणून,
फुंकीन मी ती स्वप्राणांनी

एक तुतारी दादासाहेब फाळके फुंकली आणि त्यातून उभं राहीलं एक विश्व. ज्या चित्रपटसृष्टीने भारतात कित्येक हातांना काम, बुद्धीला चालना, अभिनयाला व्यासपीठ, कलेला वाव, सौंदर्याचं कौतूक, आणि रसिकांचं अक्षरशः वेडाकडे झुकणारं प्रेम मिळवून दिलं त्या चित्रपटसृष्टीचं बीज भारतात दादासाहेब फाळके या अवलियाने रूजवले. इंग्रज राजवटीची तलवार, बुरसटलेल्या विचारसरणीत गुरफटलेला कधीही बदलण्याची इच्छा नसलेल्या समाजात चित्रपट तयार करणं, आणि तोही पहिला, हे भयंकर आव्हान होतं, अशक्यच गोष्टं होती. ती दादासाहेबांनी करून दाखवली. दादासाहेबांच्या या कर्तुत्वाची कथा चित्रपटाच्याच माध्यमातून मांडणं हे एक अजून आव्हान. ते परेश मोकाशी यांनी समर्थरीत्या पेललं. भारतात बनलेल्या पहिल्या चित्रपटाची जन्मकथा आणि दादासाहेब फाळक्यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी त्या चित्रपटाच्या जन्मासाठी सोसलेल्या वेणा त्यांचं थोरपण सांगून जातं.
चित्रपटाला कुठेही कंटाळवाणं, निराशावादी न करण्याचं मोठं आव्हान परेश मोकाशी यांनी पेललंय. कारण असे संघर्ष करून ज्या कलाकृती निर्माण होतात त्यावेळी असंख्य त्रास कलाकाराला आणि त्याच्या कुटूंबियांना सोसावा लोगतो त्यातून निर्माण होणारं कारूण्य दाखवून लोकांच्या डोळ्यातून पाणी सहज काढता येतं, पण त्यातून विनोद निर्मिती करूनही वास्तवाचं चित्रण समर्थरीत्या करता येतं हे मोकाशी यांनी सिद्ध केलं. दादासाहेब फाळक्यांच्या स्वभावातला तर्कटपणा, विक्षिप्तपणा दाखवतानाच दादासाहेब फाळक्यांना असलेली नाविन्याची, विज्ञानाची आवड आणि सतत काही तरी शोधून काढण्याची वृत्ती आणि त्यातून आलेला धीटपणा ही खरोखर खुप काही शिकवून जाते. असा हा चित्रपट प्रत्येकाने खरोखर पहावा असाच आहे.
ज्या चित्रपटातून एवढी अवाढव्य चित्रपटसृष्टी निर्माण झाली. हिंदी व्यतिरीक्त प्रत्येक मुख्य भाषेत चित्रपट निर्माण होतायत. याशिवाय चित्रपटसृष्टीशी काहीसी संलग्नता बाळगणारं फॅशन जगत आलं, रूजलं. त्यानंतर छोटा पडदा आला. आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. ही चित्रपट क्रांती निर्माण करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वाची ओळख आजच्या पिढीला परेश मोकाशी यांनी करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

Monday, January 11, 2010

अतुलनीय.....

नटरंग हा चित्रपट आणि त्यातली गाणी फारच जोरात सगळीकडे वाजत होती. 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' ही गाणी खरोखर वेड लावत होती. मात्र नटरंग पहायला जाण्याचं कारण वेगळं होतं. अतुल कुलकर्णीला पाहण्यासाठी हा चित्रपट
पहायचा होता. मी अगदी खरं सांगतो, याआधी कधीही अतुलला पहायचं म्हणून हौसेने मी कोणताही चित्रपट पाहिला नव्हता. यावेळी गोष्ट वेगळी होती.

अतुलने आपल्या विविध भुमिकांतून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आपोआप अपेक्षा निर्माण होतात. बहुतांश वेळा तो त्या पूर्णही करतो. यावेळच्या अपेक्षा अजून वाढल्या होत्या. सध्याचा जमाना हा हिरोंच्या मेक ओव्हरचा आहे. सलमान खान, शाहरूख खान, सैफ अली खान यांनी हा प्रयोग केला. मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानलाही याचा आधार घ्यावा लागला. मराठीत मात्र हिरोनी कधी मेकओव्हर केल्याचं आढळलं नव्हतं. मात्र अतुलने हा प्रयोग केला. नटरंगसाठी गुणा कागलकर हे व्यक्तीचित्र उभे करताना त्याने केलेले परिश्रम आपल्याला माहित आहेतच. त्यामुळे अतुलने काय
केलंय हे पहायचं होत आणि त्यासाठी चित्रपटाची तिकीटं काढली.

तमाशा आणि त्यातला नाच्या यांचं पुनरूज्जीवन करायचं आणि त्यांच्या आधारावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणायचं हे आव्हान आहे. ते पेलणारा नटही तसाच तगडा हवा. मुळात आत्तापर्यंत अतुलने साकारलेली विविध पात्र आवडली असली तरी अतुल आणि तमाशा हा काही मेळ मनात जमत नव्हता. मात्र मित्रांनो अतुलने जिंकलं. गुणा कागलकर हे एका नावाचं पात्र अतुलने चित्रपटात तीन रंगात रंगवलं आहे. पैलवान गुणा, स्टेजवरचा नाच्या गुणा आणि पडद्यामागचा शाहीर गुणा.. प्रत्येकवेळा त्याचा आवाज त्याचं बेअरींग त्यानं एवढं चांगलं सांभाळलं आहे. कधीही नाच्या आणि शाहीर यांची गल्लत होत नाही. अतुलला खरोखर सलाम..

अर्थात अतुलने आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तीरेखा आठवा. प्रत्येकवेळी त्याने केलेलं काम उत्तमचं झालं. रंग दे बसंती मधला
सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है म्हणणारा लक्ष्मण पांडे आठवतो. पांडेने असंचं आपल्याला वेड लावलं होतं. हिंदूत्ववादी नेता लक्ष्मण पांडे, आणि नंतर परिवर्तन झालेला मित्र लक्ष्मण पांडे सुंदर झाला होता. अगदी अमीरच्या डिज्जे एवढाच लक्ष्मण पांडेही लक्षात राहील असा होता.

रंग दे बसंती मधला अतुल सगळ्यांच्या लक्षात आला असेल तर आता जरा मागे या.. दहावी फ मधला विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक आठवतो. दंगेखोर दहावी फ तुकडीतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने जात शिस्त लावणारा आणि त्याच वेळी मूल्यवर्धक शिक्षण पद्धतीचं महत्त्व सांगणारा एक शिक्षक कुठेही कंटाळवाणा झाला नाही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनाचं जेवढं कौशल्य तेवढचं किंबहुना
त्यापेक्षा जास्त कौशल्य अतुलचं हे मान्य करायला हवं.

आता अजून थोडं आठवा, 'देवराई' हा चित्रपट आठवतो का.. फारसा गाजला नसला तरीही वेगळ्या पठडीतला चित्रपट म्हणून देवराईचं खुप कौतुक झालं. त्यातला मनाने खचलेला शेश हा तरूण अतुलने साकारलाय. गावागावातल्या माळरानातल्या झपाट्याने कमी होत चाललेल्या देवराया आणि शेशचं हळुवार मनं या दोन गोष्टी अतुलने दाखवल्या. या दोन गोष्टींची कशी सांगड त्याने घातली असेल हा प्रश्न पडला होता. अर्थात पुन्हा एकदा भावे आणि सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीचं कौतुक करावं की त्यांची संकल्पना जशीच्या तशी मांडणारा अतुल नावाजावा हा प्रश्न पडतो. पण मनाला विचाराल तर ती संकल्पनासमजून पडद्यावर साकारणारा अतुलंच श्रेष्ठ वाटतो.

याशिवाय 'हे राम' हा चित्रपट कमल हसनसाठी लोकांनी पाहिला पण या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मात्र अतुल कुलकर्णी घेऊन गेला. श्रीराम अभ्यंकर हे पात्र, त्याचे संवाद त्याचे डोळे, त्याचे विचार अतुलने मांडले आणि ते खरं म्हणजे मनात खुपले. फार भयानक असं ते पात्र अतुलने जबरदस्त मांडलं.
याशिवाय अतुलने वळूमध्ये साकारलेला स्वानंद गड्डमवार असो, किंवा चांदनी बारमधला पोत्या सावंत हा भाई असो. अतुलने प्रत्येकवेळी कौतुकाची थाप मिळवली आहे. मात्र अतुलचा गुणा कागलकर लक्ष्मण पांडे, दहावी फ मधले सर आणि देवराईतला शेश ही पात्र खरोखर अतुलनीय अशीच आहेत. हॅट्स ऑफ गड्या !!!

Saturday, January 9, 2010

मज लोभस हा इहलोक हवा...

सुट्टीत फिरायला कुठे जायचं हा विषय निघाला की अनेक ठिकाणं आपल्या डोळ्यांपुढे येतात. सिमला कुलू मनाली, नैनिताल मसूरी, राजस्थान, पंजाब ही उत्तर भारतातली ठिकाणं पाहून झालेली. मध्यभारतात जबलपूर, भेडाघाट यांचीही चलती आहे. दक्षिण भारतात केरळाला सर्वाधिक पसंती मिळते. मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर अनेक ठिकाणं भारतात आहेत. त्याचा शोध घेतला तर फार सुंदर पर्यटन अनुभव आपल्याला येऊ शकतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय.

लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी ठिकाणांची शोध मोहीम सुरू होती. हनिमुनर्सचं आवडतं ठिकाण म्हणजे केरळ.. पण केरळमध्ये नंतर फिरायला जा.. हनिमूनसाठी अजिबात नको ही सल्ला अनुभवी नातलगांनी दिला. बंगलोर मैसूर उटी कोडाई हा प्लॅन ठरत होता. मात्र बंगलोरमध्ये आता पाहायचं काय हा प्रश्न पडला. उत्तरेकडे जायचं नव्हतं. आणि परदेश खिशाला परवडणारा नव्हता... तेवढ्यात दोन ठिकाणं कळली.. वायनाड आणि कूर्ग ही त्यांची नावं ऐकल्यावर ही भारतात आहेत का हा प्रश्न पडला. भारतातच आहेत, दक्षिणेकडे आहेत, आणि खिशाला परवडतील अशीही आहेत हे कळल्यावर नेटवर माहिती वाचली. कूर्गचं वर्णन स्कॉटलंड ऑफ इंडिया असं केलं होतं. ते वर्णन ऐकलं. फोटो पाहीले आणि ठरवलं.... बसं... वायनाड आणि कूर्गलाच जायचं...

आता ही ठिकाणं कुठे आहेत ते तुम्हालाही सांगतो. कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला केरळ सीमेला लागून कूर्ग हा जिल्हा आहे. आणि त्यालाच जोडून केरळमध्ये वायनाड हा जिल्हा आहे....

साधारणतः आठ दिवसात ही दोन्ही ठिकाणं पाहून होऊ शकतात. थंड हवा, सदाहरीत जंगलांचा प्रदेश, कमी गर्दी, चांगले लोक या सगळ्याच गोष्टींमुळे एक चांगलं मधूचंद्राचं ठिकाण म्हणून या ठिकाणांकडे पाहता येईल.

प्रथम वायनाड आणि मग कूर्ग या क्रमाने ही ठिकाणं पाहणं सोयीचं ठरतं.
वायनाडला जाण्यासाठी कालिकतला जाणे आवश्यक आहे. कालिकतचं नाव आठवतं का.. आठवत नसेल तर इतिहासाच्या
पुस्तकात डोकवा. वास्को द गामा हा पोर्तुगिज व्यापारी कालिकत बंदरात उतरला असा उल्लेख तुम्हाला आढळेल. रेल्वे रिझर्वेशन चार्टवर मात्र कालिकत असा उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. कालिकतला रेल्वेखातं कोझिकोडे असं म्हणते. आणि प्रत्यक्ष कालिकत, कोझिकोडे या शहरातले नागरिक त्यांच्या शहराला कोळीकोड असं म्हणतात. असो.... नावात काय आहे.

कोकण रेल्वेमार्गे कोळीकोड स्टेशनला उतरलं की व्यापारी बाजारपेठ असलेल्या शहरातून मार्गक्रमण करताना आपला हिरमोड होऊ शकतो. मात्र थांबा एकदम हिरमुसू नका.. कोळीकोडपासून १३ किलोमीटरवर असलेला कप्पड बीच नक्की पहा. साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा हा बीच पाहून खरोखर मनं सुखावतं.. थोडी जाडसर पिवळ्या धमक रंगाची अतीस्वच्छ वाळू.. त्यावर येणाऱ्या हिरव्या जर्द लाटा पाहून मन सुखावतं. आणि हो! हा बीच पर्यटकांच्या यादीत नाही. त्यामुळे सगळा बीच आपलाच असल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्यानंतर कोळीकोडमध्ये खास केरळी पद्धतीचं जेवण घ्या. कोळीकोडमध्ये एक दिवसाचा मुक्काम करावा लागतो आणि तो घ्या असा आग्रहही आहे. दुसऱया दिवशी सकाळी वायनाडला जाण्यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते तीन तासांचा अवधी तरी आवश्यक आहे.

एक सल्ला देईन ही टूर प्लॅन करताना हॉटेल बुकींग्जबरोबर कोळीकोडलाच कारही ठरवून घ्या. कोळीकोड-वायनाड-कूर्ग अशी टूर एरेंज करणाऱया कारचं बुकींग मुंबईतूनही करता येतं.

कोळीकोडमधून निघाल्यावर शहरी भाग सोडल्यावर मलबार विभागाचं खरं सौदर्य दिसायला लागलं. उंचचं उंच डोंगररांगा, सदाहरीत जंगलं, त्यामुळे उत्तुंग जाड बुंध्याची झाडं असा हा परिसर तुम्हाला भुरळ घालायला सुरूवात करतो. पाऊस एकदातरी हजेरी लावून जातो. त्यामुळे जंगलाला नेहमी एक ओलसर हिरवेपणा असतो. आजूबाजूला मसाल्याच्या पदार्थांचा बगिचा आणि त्यातून वाट काढत जाणारी कार असा हा एकंदर सुंदर अनुभव. वळणं वळणं घेत वायनाडचा घाट चढायला सुरूवात करते. गच्च जंगलातून मार्ग काढणारा हा घाटरस्ता खरोखर श्वास रोखून धरायला लावणारा आहे. मात्र एकदा का घाट संपला की रस्ताच्या दुतर्फा सुरू होतात चहाचे मळे. टेकड्यांच्या उतारावर लागवड करण्यात आलेले चहाचे मळे, पावसाळी हवा, आणि त्यामधला गुळगूळीत रस्त्यावरचा प्रवास वेड लावतो.

वायनाडला रहाण्याची सोय जिल्हा मुख्यालय असलेल्या कलपेट्टा या शहरात होते. काही चांगली हॉटेल्स या शहरात आहेत. स्टार हॉटेल्सही आहेत.

वायनाडला फिरण्यासारख्या मुख्यत्वे जागा म्हणजे एडेक्कल केव्हज्, मिनमुट्टी फॉल्स, पोकोट्ट लेक आणि कोरोव्हा आयलंड्स. यातील एडेक्कल केव्हज आणि मिनमुट्टी फॉल्स तुम्ही एकाच दिवशी करू शकाल. साधारणतः सकाळी एडेक्कल केव्हज् करून दुपारी मिनमुट्टी फॉल्स पहाता येतील. अर्थात या दोन्ही ठिकाणी चांगल्यापैकी चालावं लागतं.


एडेक्कल केव्हजवर जाण्याचा डोंगरातला मार्ग आकर्षक आहे. याठिकाणी तुम्ही पुरातन काळात कोरलेली भित्तीचित्र पाहू शकता. विशेष म्हणजे ती अजूनही उत्तम स्थितीत आहेत. आणि नीट लक्ष देऊन पाहिल्यास त्यांचा अर्थही कळू शकतो.

एडेक्कल केव्हज वरून निघाल्यावर साधारणतः १३ किलोमीटर्सवर मिनमुट्टी फॉल्स आहेत. याठिकाणी तीनशे रूपये प्रवेश फी घेतात. मात्र प्रवेश फीकडे पाहू नका. त्याच फीमध्ये तुम्हाला गाईड दिला जातो. हा गाईड घेतल्याशिवाय मिनमुट्टी फॉल्सना जाता येत नाही. कारण साधारण एक दिड किलोमीटरचा सगळा रस्ता डोंगरातला आहे. त्यापेक्षाही विशेष म्हणजे आधी चहाच्या आणि नंतर कॉफीच्या मळ्यातून, अक्षरशः मळ्यातून चालत जावं लागतं. कॉफीच्या झाडाखालून वाकून जाण्याचा आनंद काही वेगळाचं. डोंगरातून बरीच चढउतार केल्यावर मग दिसतो तो रौद्रभीषण प्रपात.
अप्रतिम याशिवाय कोणत्याच शब्दाने या प्रपाताचं वर्णन होत नाही. वायनाडमधला तो दिवस नक्की लक्षात राहील कारण रात्री झोपताना सुद्धा तो मिनमुट्टी फॉल्सचा धीरगंभीर आवाज तुमच्या कानात घुमत राहील.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पोक्कोट लेकला जाणं योग्य. अत्यंत निसर्गरम्य अशा तीन टेकड्यांच्यामध्ये हा तलाव आहे. या तलावात बोटींगची व्यवस्था आहे. तलावाच्या चहूबाजूंनी तलावाला फेरी मारण्यासाठी मातीचा पक्का रस्ता आहे. त्याचा नक्की आनंद घ्या.. हनिमून टूरमधला सर्वोत्तम हनिमून स्पॉट असं मी याचं वर्णन करीन. तलावाच्या काठावर एक छोटेसे कँटीन आहे. तिथे होममेड चॉकोलेट्स आणि स्पेशल वायनाड फिल्टर कॉफीचा आनंद नक्की घ्या. त्या थंड हवेत केळ्याची भजीही सुंदर लागतात. त्याशिवाय विशेष केरळी वस्तू मिळणारं एक सुंदर दुकानही आहे. येथे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ, कॉफी, चहा आणि अनेक उत्तम स्थानिक पदार्थ मिळू शकतात.
पोक्कोट लेकवरून पाऊल निघत नाही. मात्र मित्रांनो कोरोव्हो आयलंड्सना जाण्यासाठी आपल्याला निघायचं आहे. आणि पल्लाही मोठा आहे.
कोरोव्हो आयलंड्स हा एक चमत्कार म्हटला पाहीजे. नदीमध्ये कमीतकमी पाच पावलं आणि जास्तीत जास्त एक किलोमीटर परिघ असलेली तब्बल ६४ बेटं आहेत. या प्रत्येक बेटावर आपण नदीतून चालत जाऊ शकतो. फक्त त्यासाठी कमरेएवढ्या पाण्यातून चालण्याची तयारी हवी. त्यासाठी जास्तीचे कपडे घेऊन चला, पण प्रत्येक बेट फिरून नक्की पहा. तिथून आपण पुन्हा कलपेट्टाला येऊ शकतो.


कलपेट्टामध्ये सुंदर अशा वेगळ्याच रंगीबेरंगी मिरच्या मिळतात. त्यांचा अप्रतिम तिखट स्वाद चाखायलाच हवा. त्याशिवाय कलपेट्टामध्ये अप्रतिम असा हलवा बनवतात. बदामी हलव्यासारखा दिसणारा हा हलवा चवीला अत्यंत सुंदर असतो. याशिवाय दालवडा आणि अप्पम हे अख्ख्या केरळचे ट्रेड मार्क पदार्थ. कलपेट्टातही छोट्या छोट्या हॉटेल्सवर हे पदार्थ सुंदर मिळतात.
वायनाडमधला मुक्काम सोडताना मित्रांनो खरोखर डोळे पाणावतात. केरळला गॉड्स ओन कंट्री का म्हणतात हे पटतं.

वायनाडवरून आपण दुतर्फा किर्रर्र जंगल असलेल्या रस्त्यातून मार्गक्रमणा करत पोहोचतो मेडीकेरीला.. मेडीकेरी हे कर्नाटक राज्यातल्या कूर्ग या जिल्ह्याचं मुख्यालय... स्कॉटलंड ऑफ इंडिया असं या शहराला म्हणतात. डोंगर उतारावर वर्तुळाकार आकारात वसलेलं हे शहर पहिल्या दर्शनातच प्रेमात पाडतं.

राजासीट, ओंकारेश्वर मंदीर, फोर्ट, पॅलेस ही ठिकाणं शहरातचं आहेत, ती पहिल्याच दिवशी पाहून घ्या. राजासीटवरून दिसणारा सुर्यास्ताचा देखावा विलोभनीय.

दुसऱ्या दिवशी दुबारे फॉरेस्टचा प्लॅन करता येतो. दुबारे फॉरेस्टमध्ये हत्ती फार्म आहे. मैसूरमधला दसरा उत्सव फेमस आहे. त्यासाठी लागणारे हत्ती इथे सजवले जातात. या हत्ती फार्मवर जाण्यासाठी बोटीतून नदी पार करावी लागते. हत्तीवरून सैर, हत्तीची अंघोळ आणि हत्तीचे इतर कारनामे इथे दाखवले जातात.
तिथून जवळचं आहे गोल्डन टेंपल. अप्रतिम असं हे बुद्ध मंदीर पहायलाच हवं. हे चुकवलंत तर काहीतरी मोठं पहायचं राहून गेलं याची हुरहूर लागेल.
गोल्डन टेंपल पाहून झाल्यावर मेडीकेरीकडे परत जाताना कावेरी निसर्गधाम लागते. बांबूचे हे वन नक्की पहा. बांबूच्या बनात एवढं सौंदर्य दडलेलं असतं हे तिथे कळतं. तिथेच बाजूला कावेरी नदीचा सुंदर प्रवाह आहे. या प्रवाहात संध्याकाळ घालवणं आनंददायी.
मेडीकेरीजवळच कावेरी नदीचा उगम आहे. या स्थळाचं नाव आहे थलकावेरी. एवढ्या मोठ्या पवित्र कावेरी नदीचं उगमस्थान फार सुंदर बांधून काढलं आहे. प्रसन्न धार्मिक वातावरणाला शिस्तचं सुंदर बंधन घातलं आहे. तिथून परतत असताना भगमंडला नावाचं गाव लागतं. येथे सुंदर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचं शंकर, गणपती आणि विष्णू यांचे मंदीर आहे. अप्रतिम कोरीव काम असलेली ही तीनही मंदीर ब्रिटीशांशी झालेल्या संघर्षात उध्वस्त झाली होती. मात्र आता त्याचा जिर्णोद्धार झालाय. या मंदिरातली देवाची मुर्ती, त्याला केलेली फुलांची आरास आणि त्या भोवताली असलेली दिव्यांची शोभा पाहून फार प्रसन्न वाटतं. भगमंडलातल्या देवळांच्या बाजूलाच सुंदर असा त्रिवेणी संगम आहे.

मेडीकेरीच्या बाजारात चांगले मसाल्याचे पदार्थ, होममेड कॉफी चॉकलेट्स, फिल्टर कॉफी, ग्रीन टी, काजू मिळतात. मेडिकेरी गावातून चालत डोंगरउतारांवरू फेरफटका मारतानाही वेळ चांगला जातो.

अशी ही वायनाड कूर्गची सुंदर सफर. मित्रांनो परतीच्या प्रवासासाठी आपण एकतर मैसूरला येऊ शकतो किंवा मंगलोरला येणेही सोयीचे पडते.
या सबंध प्रवासात काय वेगळं आहे हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. भारतातली तीच ती पर्यटन स्थळ पाहून तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हाला हा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो या अख्ख्या प्रवासात मला एकदाही फसवणूकीचा अनुभव आला नाही. भाषा समजत नाही तर या लोकांना नाडा ही वृत्ती इथल्या लोकांत आढळत नाही. आलेले पर्यटक आपले आहेत. त्यांची काळजी घेणं ही जबाबदारी आहे हे कटाक्षाने पाळलं जातं. वायनाड कूर्गवर जेवढा निसर्गाचा वरदहस्त आहे तेवढीच तिथली माणसंही चांगली आहेत. वायनाड आणि कूर्ग वरून परतत माझ्या पत्नीने कवी बा.भ. बोरकरांची एक कविता ऐकवली ती कविता सतत मनात रूंजी घालत होती.

स्वर्ग नको सूरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा,
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष नी शोक हवा