Thursday, November 12, 2009

प्रिय सचिन तेंडुलकर यांस
सप्रेम नमस्कार ..
आमच्या आयुष्यावर आपण जी एक गडद छाया निर्माण केली आहे त्याला या १५ नोव्हेंबर २००९ ला वीस वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलण्यापेक्षा थेट आपल्यालाच लिहावं असं वाटलं.. म्हणून हा पत्रप्रपंच..
एक सांगू का.. लिहीताना ' तुम्हाला, तुमचे, आपण ' असे आदरार्थी उल्लेख करायचे आहेत. ते आमच्या मनात आहेत. पण लिहीताना फार कठीण जातंय. रोज बोलताना सचिन असा स्पष्ट एकेरी उल्लेख करतो. मॅच सुरू असताना कधीतरी ' तेंडल्या ' असं स्पष्टपणे म्हणतो. त्यामुळे या पत्रातही पुढे सचिन असा एकेरी उल्लेख करणार आहे. त्याबद्दल तुला राग येणार नाही अशी आशा आहे.
सचिन पत्राच्या सुरूवातीला म्हटलं की आमच्या आयुष्यावर तुझी गडद छाया पसरली आहे. मात्र ती छाया काळी नाही. कठोर उन्हाळ्यानंतर पावसाचं आगमन होतं. त्यावेळी ढगांची जी शितल छाया सृष्टीवर पसरते ना.. तशी ही छाया आहे. कारण तुला सांगू त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही मित्रांनी एक प्रयोग केला, दिवसभरात एकदाही सचिन हे नाव घेतले नाही असे किती दिवस आले मोजायचं. महिनाभरात असा एकही दिवस आला नाही. इतका तुझा प्रभाव. सचिन माझे वडिल सांगतात, सुनील गावसकर निवृत्त झाले त्यावेळी त्यांना असं वाटलं आता का क्रिकेट पहायचं, सचिन नेमकी हीच माझीही भावना आहे. तुझ्या निवृत्तीनंतर आम्ही का क्रिकेट पहायचं..
सचिन, तुझी क्रिकेट कारकिर्द आणि माझी शालेय आणि महाविद्यालयीन कारकिर्द एकाच काळातली. मी आणि माझ्या अवतीभवती असणारी मुलं आम्हा सर्वांना तू एक शिस्त लावलीस. माझ्या कॉलेजमध्ये एक सर होते, त्यांनी एकदा आमची कानउघडणी केली होती. त्यावेळी त्या क्रिकेटवेड्या सरांनी तुझे उदाहरण दिले होते. तुझ्या खेळातली खासीयत म्हणजे तुझा बॅलंस, तुझी खेळाकडे बघण्याची दृष्टी, एकाग्र होण्याची तुझी शक्ती, आणि फार थोड्या लोकांना मिळते अशी शक्ती म्हणजे दूरदृष्टी.. या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यावेळी त्याआम्हाला कळल्या नाहीत. खरंच सांगतो. त्यावेळी आम्ही फक्त ' तेंडल्या असा खेळला. तेंडल्याने वॉर्नला असा धुतला ' यातच रमलो. पण तुझ्या खेळातून आम्ही काय शिकू शकलो असतो हे तेव्हा उमगलेच नाही. तुला सांगू तुझ्यात आणि उतर टिन एजर्समध्ये असलेला हा मोठा फरक. टीनएजमध्ये जे आम्ही शिकावं ते तू आत्मसात केलं होतंस. आम्हाला काय शिकायचं आहे हेच कळलं नव्हतं.. असो शेवटी तेंडुलकर एकमेवाद्वितीय का आहे.. याचं हे उत्तर आहे.
सचिन तुझ्या कारकिर्दीतले अनेक क्षण न विसरता येण्यासारखे.. एकोणीसाव्या वर्षी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर तू केलेलं पराक्रमी शतक खतरनाक असं होतं. त्याआधी १९९० मध्ये इंग्लंडविरूद्ध ओल्ड ट्रॅफर्डवरचं पहिलं वहिलं शतकही न विसरता येण्यासारखं. १९९६-९७ हंगामातली केप टाऊनमधली खेळी लाजवाब. १९९९मध्ये पाकिस्तानविरूद्धची पाठदुखीने त्रस्त झाल्यावरही तुझ्या झुंजार १३६ धावा मी कधीच विसरू शकत नाही. कारण अवघ्या १२-१३ धावांनी हरल्यावर घरात मी रडलो होतो. ड्रेसिंगरूममध्ये तुझीही वेगळी अवस्था नव्हती अशी बातमी नंतर पेपरात वाचली होती. सचिन त्यानंतर इंग्लंडविरूद्ध पुन्हा एकदा चेन्नईतच तू शतकी खेळी केलीस आणि आपण तो सामना जिंकलो होतो.
सचिन पण आपण तुझ्या खेळी आठवताना शतकंच का आठवतो. दरबानमध्ये विश्वचषकात शोएब अख्तरला तू आणि सेहवागने दाखवलेली कयामत पाहून ऊर भरून आला होता. त्यावेळी तुला मिडऑफला रझाकने टाकल्यावर अक्रम भडकलेला पाहून खुप हसू आलं होतं. मात्र त्या सामन्यात तुझे शतक झाले नाही याची हळहळ वाटते. आणि म्हणून शोएबचा रागही येतो. शोएबवरून आठवलं. सचिन तुझी एक आठवण शोएबने सांगितली आहे ती आठवते. भारतात पाकिस्तानी संघ कसोटी मालिका खेळायला आला होता. त्यावेळी कोलकाता कसोटीच्या आदल्या दिवशी सरावाआधी पाकिस्तानी संघ एका अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या मुलांना भेटणार होता. त्या शाळेतल्या एका मूकबधीर मुलाला शोएबने विचारलं.. बेटा मै आपके लिये क्या करू ? त्यावर त्यामुलाने त्याला एका कागदावर उत्तर लिहून दिलं होतं. सिर्फ सचिनको आऊट मत करना...
सचिन मला काही प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. तुझ्या पदार्पणाच्या कसोटीत तुला वकारचा चेंडू तोंडावर लागला होता. रक्ताने तुझे तोंड माखले होते. तू फक्त सोळा वर्षांचा होतास. त्यावेळी तू घाबरला नाहीस.. ही शक्ती तुझ्याकडे कुठून आली. सचिन नवज्योत सिंग सिद्धू ती आठवण एकदा टिव्हीवर सांगत होता. त्यावेळी त्याने जोरात अली इराणीला हाक मारली.. रक्त पाहिल्यावर तो पॅनिक झाला होता. मात्र त्यावेळी तू एकच शब्द उच्चारलास... मै खेलेगा !
सचिन दुसरं म्हणजे पाठदुखीने तू त्रस्त असतानाही १३६ धावा करणं किंवा अनेकवेळा भारताची जबाबदारी एकट्य़ाने उचलणं हे धाडस करताना तू स्वतःचा विचार कधीच का केला नाहीस....
सचिन सर डोनल्ड ब्रॅडमन यांनी तुला भेटीसाठी बोलावले त्यावेळी तूझा मनात कोणत्या भावना उचंबळून आल्या होत्या.
सचिन हेन्री ओलोंगाला तू तिरंगी मालिकेत धुतला होतास आठवते का.. ते तू खुन्नस खाऊन मारले होतेस की नाही...
सचिन तूझे २५ वे एकदिवसीय शतक आटवतं का.. त्यावेळी तू केलेला सर्वाधिक कंटाळवाणा खेळ (मला माफ कर) ... आदल्या सामन्यात रनआऊट झाल्याचा तो राग होता का...
सचिन, भारताचे सामने जेव्हा फिक्स होत होते. तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या या भयानक गोष्टीत तू तूझे चित्त स्थिर कसं ठेवलंस. सचिन आहे तोवर फिक्सर्सचे घाणेरडे डाव कधीच यशस्वी होणार नाहीत असा विश्वास तू आमच्या मनात निर्माण केला होतास.. एखादा मोठा भाऊ असतो ना.. त्याच्याविषयी जो विश्वास मनात असतो ना तो हा विश्वास....
सचिन एवढ्यावेळा तू मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहेस तूला आता त्यात काही नाविन्य वाटतं का..
सचिन ज्यावेळी तुझ्यावर टिकेचे पहाड कोसळतात, ज्यावेळी आम्ही तुझ्यावर सर्व भार टाकून मोकळे होतो... त्यावेळी तुला कधी आमचा राग येतो का..
सचिन तुझ्यावर आम्ही अपेक्षांचे ओझे टाकतो... हो.. प्रत्येक सामन्यात तू शतक झळकवावेस असं आम्हाला वाटते. कोट्यावधी डोळे तुझ्या प्रत्येक कृतीकडे लागलेले असतात. तू काय करतोस, कसा खेळतोस याविषयी आम्ही प्रत्येकाने बोलण्याचा अधिकार घेतला आहे. हजारो होर्डींग्जवर आम्ही तुला पाहतो. आम्ही सगळे तूला ओळखतो.. तू आम्हाला ओळखत नाहीस. तरीही तू आमच्या अपेक्षा ओळखतोस आणि त्या पेलतोस.. म्हणून तू महान ठरतोस.
लोकांना सौंदर्यात काय पहायला आवडतं माहीत आहे ? सिमिट्री.. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असलेली प्रमाणबद्धता... सचिन मैदानातल्या तुझ्या हालचाली, तुझे वागणे, तुझे शॉट सिलेक्शन, तुझी खेळण्याची लकब, प्रतीपक्षाकडे पाहण्याची तुझी नजर, त्यांचे डावपेच ओळखण्याची तुझी धूर्तता, आणि प्रतीपक्षाला संपवण्याचा तुझा बेधडकपणा या सगळ्याच गोष्टीत एक प्रमाणबद्धता आहे. सचिन म्हणून सौंदर्यशास्त्रानुसारही तू मिस्टर परफेक्टच ( सॉरी राहुल..)
सचिन भारताची तू शान आहेस. तू भारतरत्न आहेस.. तू एक चांगला कर्णधार होऊ शकत नाहीस अशी टिका तुझ्यावर करतात. पण सचिन मला त्यांना असं उत्तर द्यावसं वाटतं की सचिन संघाला रूढार्थाने नेतृत्व देत नाहीस. पण तू उदाहरणांनी, स्वतःच्या कृतीतून नेतृत्व देतोस.. तू कर्णधार नाहीस तू त्यापेक्षाही पुढे आहेस.. एक आदर्श..
सचिन नुकतीच तू दोन एकदिवसीय शतके झळकावलीस.. त्यातली ऑस्ट्रेलियाविरूद्धची १७५ धावांची खेळी अजरामर. सचिन त्यावेळी तू पुन्हा एकदा तरूण झाल्यासारखा वाटलास. पुन्हा एकदा १९९८ मधला सचिन, शेनवॉर्नला डाऊन द ट्रॅक येत हाणणारा सचिन, कॅस्प्रोवीचला समोरच्या साईट स्क्रीनवर हवाईमार्गान दणकावणारा सचिन, थर्डमॅनला शोएबला भिरकावून देणारा सचिन, नजाकतदार पॅडलस्वीप सारखा भन्नाट शॉट इंप्रोवाईज करणारा सचिन, १९९४मध्ये सांगून चामिंडा वासला खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हज् मारणारा सचिन, तो सचिन पुन्हा एकदा अवतरल्यासारखं वाटलं.
सचिन एक क्रीडा पत्रकार म्हणून तुला मी अनेकवेळा पाहिला आहे. मी क्रीडापत्रकारीता क्षेत्रात पाऊल टाकेपर्यंत तू आमच्यापासून खुप लांब गेला होतास. तुझाशी बोलणं म्हणजे चंद्रावर जाऊन येण्यासारखं आहे. मात्र तरीही प्रत्यक्ष बोललो नसलो तरीही प्रत्येकवेळी तू अगदी माझ्यासारख्या युवा पत्रकाराचीही दखल घेतोस. तुझ्या नजरेत मी कधीही हा कोण हा भाव पाहिला नाही.. प्रत्येकवेळी तू सगळ्यांची दखल घेतोस, कधी बोलून कधी नजरेनं.. सचिन आजच्या युवा क्रिकेटपटूंमध्ये मला हे कधीही दिसत नाही.. तू शिखरावर आहेस पण तू आमच्याकडेही लक्ष देतोस..
सचिन हे पत्र संपवताना मला एक ओळ लिहावीशी वाटते.. ही ओळ माझी नाही... तुझ्या एका फॅनने तुझ्याविषयी हे लिहीले होते... इयन बॉथम हा क्रिकेटचा एरोल फ्लिन असेल, विव्ह रिचर्डस् क्रिकेटचा मार्टीन ल्यूथर किंग असेल, शेन वॉर्न क्रिकेटचा मर्लिन मन्रो असेल, मुथय्या मुरलीधरन क्रिकेटचा हॉबीट असेल.. तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला एक धर्मनिरपेक्ष संत आहे.. तू संत आहेस, खरोखर क्रिकेट हा धर्म असलेल्या भारत देशात तू एक संत आहेस...
तुझी कारकिर्द अशीच बहरत जावे आणि तुझ्या छायेतून आम्हाला बाहेर पडायची संधीही कधीही न मिळो अशी आमची तुला शुभेच्छा...
तुझा चाहता
अमित सुभाष भिडे