Sunday, October 18, 2009

माती मधुनी दरवळणारे हे गाव माझे.....










तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा..



यावेळी मला माझ्या गावावर लिहावेसे वाटत आहे. गाव...! खरं म्हणजे डोंबिवलीला गाव म्हणणं मला स्वतःला जड जातयं. पण मुंबईत राहुनही आपल्या गावाविषयी लोकांत जो हळवेपणा आढळतो, तोच हळवेपणा आम्हा डोंबिवलीकरांना डोंबिवलीत राहुनही आढळतो.. मुंबईची सांस्कृतीक राजधानी असं बिरूद डोंबिवली अभिमानानं मिरवते.. प्रत्येक सण साजरा करण्याचा आमचा अंदाजच वेगळा.. डोंबिवलीत फडके रोडवर दिवाळी साजरी होते तशी कुठेच होत नसेल. ( हो ! खरं म्हणजे या प्रकाराची कॉपी ठाणेकरांनी आणि तत्सम इतर शहरांनी सुरू केली आहे. पण आमच्या दिवाळीची शानच न्यारी..) तशीच आमची विशेष गुढीपाडवा स्वागतयात्राही.. तर सध्या विषय चाललाय दिवाळीचा..
सर्वसामन्यातः दिवाळी कशी साजरी करायची, फटाके आणायचे की नाही, आणले तर किती.. किल्ला करायचा की नाही, कोणता करायचा.. कपडे कोणते घ्यायचे असले प्रश्न इतर मुलांना पडत असतील. डोंबिवलीकरांना दिवाळीचे प्रश्न वेगळे पडतात. फडके रोडवर पहाटे किती वाजता जायचं.. कोणता पेहराव यावेळी करायचा.. कोण कोण येणार आहे. कुठे भेटायचं, मित्रमंडळींना पहाटे कोण कसं किती वाजता उठवणार.. बाईक न्यायची की नाही.. नेली तर कुठे ठेवायची.. देवळात जाऊया, कीाहेरचा कार्यक्रम बघुया, की गर्दीत नुसते फिरूया.. मग घरी फराळ करायचा की मॉडर्न कॅफेत कॉफी पिऊया.... हे प्रश्न सच्चा डोंबिवलीकराला पडतात. फडके रोडची बातचं न्यारी.. फडके रोड हे नाव या रस्त्याला कोणी दिले. हे फडके कोण हे बहुतांश जणांना माहितही नसणार हे नक्की..पण फडके रोड आणि आमचं एक भावनीक नातं आहे.. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा .. असा कोणताही मराठी सण असो किंवा फ्रेंडशिप डे असो, व्हॅलेंटाईन डे असो, डोंबिवलीकर तरूण फडकेवर एकत्र येतात.
एकतर फडके रोडच्या एका टोकाला असलेलं गणेश मंदिर संस्थान आणि गणपती डोंबिवलीकरांचा जीव की प्राण.. आणि डोंबिवली गणेश मंदिर संस्थानालाही डोंबिवलीतल्या युवापिढीचं वावडं नाही.. विविध निमित्तानं तरूण आपण होऊन या रस्त्यावर एकत्र येतायत हे जाणून संस्थानाने तरूणांसाठी विविध उपक्रम आयोजीत केले. त्यातलाच एक दिवाळीचा युवा शक्ती, युवा भक्ती दिन..
फडके रोडवर फिरणे म्हणजे मुली पहायला जाणे अशी डोंबिवलीबाहेरच्या लोकांची धारणा आहे. ती १०० टक्के खरी नाही. सध्या आपल्या आयुष्यात सोशल नेटवर्कींग साईटचे जे महत्त्व आहे तेच फडके रोडचे.. सोशल नेटवर्कींग साईट्स सुरू होण्या अगोदरपासून डोंबिवलीकर फडकेरोडवर फिरतायत. (मग फिरता फिरता काही पाहण्यासारखे चेहरे दिसले तर का पहायचे नाहीत!!!!)
शाळा सोडून तुम्हाला कितीही वर्ष झालेली असोत.. कॉलेजमधल्या मित्रांना तुम्हाला नेहमी भेटताही येत नसेल.. मात्र दिवाळीच्या दिवशी फडकेवर अगदी अनपेक्षितरीत्या कोणीही तुम्हाला भेटणारच भेटणार... यावर्षी साकेत लिमये या माझ्या एका मित्राने डोंबिवली सोडली आणि तो सि़डनीत राहायला गेला.. आम्हाला वाटलं तो आता कायमचा गेला. मात्र हा पठ्ठया सकाळी फडकेरोडवर दिसलाच... हा इसम दिवाळी फडकेवर साजरी व्हावी यासाठी सुट्टी काढून घरी आला आणि त्याने फडके मिस केलं नाही....
या वर्षी दिवाळीच्या पहाटे फडकेरोडवर तरूणाईची अशीच झुंबड उडाली होती. मात्र यावेळी गर्दी विभागली जावी यासाठी संस्कार भारतीतर्फे रांगोळीचा भलामोठा दुभाजक रस्त्याच्या मधोमध आखला जात होता. आणि खरं सांगतो.. रांगोळीवरून चालत जाण्याचा नतद्रष्टपणा एकानेही केला नाही.. अगदी प्रत्येकजण रांगोळीला आपला पाय लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता.
अतिषय सुंदर झब्बा सलवार घालून त्यावर दुपट्टा मिरवत तरूण चालले होते. काहीजण चक्क धोतर नेसून आले होते. मुलींनी सुंदर साड्या नेसल्या होत्या... साडीवरून एक सांगतो.. या साड्यांमध्ये या मुली इतक्या आकर्षक दिसतात... मात्र एकदा दिवाळीच्या दिवशी पाहिलेल्या मुली नंतर परत डोंबिवलीत कुठे लुप्त होतात कोणास ठाऊन.. मी नंतर परत कधीही त्यांना पाहिलेले नाही.. त्यादिवशी त्या जशा दिसतात तशा परत कधीच दिसत नाहीत!!!!
लग्नाआधीची शेवटची दिवाळी असल्यामुळे यावर्षी फडके रोडवर जायचंच असं मी ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही मित्र सकाळी जमलोही.. मी का आलो हे मी बोलूनही दाखवलं. तेवढ्यात एक शाळेतला जुना मित्र गर्दीत भेटला. त्याच्याबरोबर त्याची नविनच लग्न झालेली बायकोही... त्याला म्हटलं अजून फडकेवरच ? तो म्हणाला जिथे जमलं ते ठिकाण कसं विसरू.. तेव्हा एक गोष्ट नक्की केली. आपलं फडकेवर जमलं नसलं तरी काय झालं. फडके रोड सगळ्यांना सामावून घेतो. त्यामुळे घरी जाता जाता मनात एक गोष्ट निश्चित झाली. लग्नाआधीची ही शेवटची दिवाळी असली तरी फडकेवरची शेवटची नाही!!!

1 comment: