Thursday, September 10, 2009

माय...

मधूरा नावाचा एक मुलाखतीचा कार्यक्रम साम मराठीवर प्रसारीत केला जातो. हा कार्यक्रम मी स्वतः एकदाही पाहीला नव्हता.. मात्र या बुधवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दुपारी सहज तीन वाजता हा कार्यक्रम पाहीला आणि एका शक्तीचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांची मुलाखत झाली. अनाथांची माय झालेल्या सिंधूताईंच्य़ा जीवनाची त्यांनी त्या एक तासात झलक दाखवली. त्यांचा प्रत्येक शब्द अक्षरशः महाकाव्य होता. आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी वगैरे मला मिळाली की नाही माहित नाही. पण काहीतरी मिळालं हे नक्की. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सासूने लहानग्या मुलीसकट सिंधूताईंना घराबाहेर काढलं. पोटच्या तान्ह्या मुलीला घेऊन वणवण भटकणे नशीबी आले यापेक्षा कोणते मोठे संकट येऊ शकते.. एकट्या पडलेल्या स्त्रीसाठी ही परिस्थिती किती भयानक असेल हा फक्त विचारच शहारे आणतो. रेल्वेमध्ये भीक मागणं. जिवंत माणसं स्मशानात यायला घाबरतात म्हणून स्मशानात रात्री काढणं.. जळणाऱ्या प्रेताला विसावा म्हणून थोडे पिठ घातले जाते. त्याची भाकरी त्याच निखाऱ्यांवर भाजून पोटाची आग विझवण्याची पाळी या माऊलीवर आली. आपली पोटची पोर दगडूशेठ हलवाई प्रतिष्ठानच्या पायरीवर सोडून जाताना त्यांना काय यातना झाल्या असतील. त्यातून त्यांनी अनाथांची माय होण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीला दूर ठेवणाऱ्या या मायनं चिखलदरा येथे जवळपास 175 मुली, माळेगाव ठेका (जि. वर्धा) येथे 25 वयोवृद्ध व परितक्‍त्या, कुंभारवळण ता. पुरंदर) येथे ममता बालसदनात 80 मुले, गुहा (जि. नगर) येथे 90 मुले व पुण्यातील हडपसर भागात 52 मुले-मुली, अशा 422 अनाथ मुला-मुलींचा व निराधारांचा सांभाळ केलाय. ज्याला कोणीच नाही, अशा मुलाला त्या सपकाळ व मुलगी असेल, तर साठे हे आडनाव त्या देतात. सिंधूताई 39 सुनांच्या व 182 जावयांच्या सासू झाल्या आहेत. हे पाहिल्यावर उर दडपतो. शुन्यातून विश्व उभे करणाऱ्यात आपण नेहमी प्रतिष्ठीतांची नावं घेतो. पण शुन्यातून खरोखर विश्व उभं करणं म्हणजे काय याची जाणीव या मायकडे पाहिल्यावर होते. सिंधूताईंनी म्हटलंय की स्त्री कधीही आत्महत्या करत नाही, ती तग धरते. त्या उदाहरण देतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्यामागे त्यांच्या घराचा आधार झाल्यात. स्त्री कोणालाही वाऱ्यावर टाकू शकत नाही कारण तीच्यात लपलेली असते एक माय.. या मायची जाणीव करून दिली सिंधूताई सकपाळ या मायनं.

2 comments:

 1. मस्त रे अमित...
  या मायच्या मायेची, आपुलकीची, प्रेमाची जाणीव तिच्या समोर गेलात की क्षणार्धात होते. मधुरा साठी जेव्हा सिंधुताई स्टुडिओत आल्या होत्या, तेव्हा, लता मंगेशकरांचा वाढदिवस आहे, तुमची प्रतिक्रिया हवी आहे, असं म्हंटलं.. बूम समोर घ्यायचा अवकाश, कॅमेरा ऑन व्हायच्या आत सिंधुताईंच्या तोंडून पटापट शब्द निघू लागले..पण हे शब्द नव्हते, हा होता जीवनातील संघर्षमय अनुभवाचा साक्षात्कार..लतादीदींची वर्णन त्यांनी या शब्दात केलं...

  आम्ही जेव्हा कोसळलो होतो, तेव्हा दीदींचेच स्वर आमचं जगन
  जरा सुसह्य करत होते...दीदींच्या गाण्यांनीच आम्हाला
  देशप्रेम शिकवलं...आणि त्या गुणगुणायला लागल्या...
  पायाखाली वाळवंट, पायावरी भेग
  परी काळजात माझ्या वाहे चंद्रभागा
  वाटेवर काटे..वाटेवर काटे...

  आमच्या काळजाचे टाळ वाजवायला दीदींनी भाग पाडलं,
  म्हणून आमच्यातलं संगीत जिवंत राहिलं..
  संघर्ष पचवायसाठी दीदींनी संगीत दिलं
  आणि म्हणूनच आमचं जीवन फुललं...
  दीदींच्या जीवनातही काय कमी काटे आले काय..असं म्हणत त्यांनी आपल्याच या काटेरी वाटेचा मार्ग किती सहजपणे चालवताना दाखवला, याची प्रकर्षानं जाणीव झाली...
  भिडे, तुमच्या याच जाणीवेनं पुन्हा एकदा सिंधुताईंसमोरच्या त्या क्षणांची आम्हाला जाणीव करून दिलीत...मनस्वी धन्यवाद

  ReplyDelete
 2. amit,
  ashich ek tarun lagna na keleli may aahe dr.suvarna rawal.suvarnatai aaj hajaro bhatakkya-vimukta lokaanchya mulaanchya may zalelya aahet.

  ReplyDelete