Monday, February 7, 2011

हम दोनो- रंगीन..

रविवार साजरा करायचा होता. तीन सिनेमे नजरेत होते. ये साली जिंदगी, दिल तो बच्चा है जी, किंवा भागमभाग.. यापैकी कोणत्या सिनेमावर पैसे फुकट घालवायचे याचा विचार सुरू होता. सकाळी सकाळी मोहम्मद रफींची सीडी लावली होती. माझ्याकडे रफिसाहेबांची जवळपास दोनशे अडीचशे गाणी आहेत. त्यापैकी 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही' हे तुफान आवडतं गाणं. ते गाणं ऐकताना नेहमी वाटायचं की मोठ्या स्क्रीनवर हे गाणं ऍकायला कसं वाटेल. त्याचवेळी आठवलं अरे आपण तीन दिवसापूर्वीच हम दोनोच्या रंगीत आवृत्तीची बातमी केलीय. लगेच निर्णय झाला.. वर उल्लेख केलेले तीनही चित्रपट बाद.. डोंबिवलीत पूजा टॉकीजला दुपारी साडेतीनचा हम दोनो रंगीन चा शो आहे.. तोच पहायचा.. बाबांना विचारलं पिक्चर चांगला आहे का.. बाबा म्हणाले त्यांनी कॉलेजमध्ये बंक करून तीन वेळा हा चित्रपट पाहीलाय. गाणी ऐकण्यासाठी आम्ही पिक्चर पहायचो.. क्या बात है ! अभी ना जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्ला तेरो नाम.. अशी एकसे बढकर एक गाणी मोठ्या स्क्रीनवर ऐकण्याची इच्छा अनावर झाली.


आयत्यावेळी थिएटरवर पोचलो तरी तिकीटं मिळतील याची खात्री होती त्याप्रमाणे तिकीट मिळाली. पिक्चर पहायला अगदी थोडी माणसं आली होती. टिव्हीवर पन्नासवेळा लागलेला हा सिक्सटीजमधला सिनेमा पहायला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आलेले खरोखर दर्दी आले होते. माझे आई बाबा मी आणि बायको असे आम्ही एकच पूर्ण फॅमिलीवाले होतो. बाकी लोकांत बहुतेकांनी साठी ओलांडलेली होती. त्यातले सगळेजण देव आनंदला पुन्हा एकदा स्क्रीनवर पहायला आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चॉकलेट हिरोला पहाण्यासाठी लकाकी आली होती. एक आजी आजोबा हातात हात घालून आले होते. थिएटरमध्ये आत सोडल्यावर सिनेमा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनीटात सर्व आजी आजोबात ओळखपाळख नसताना संवाद रंगला.. देव आनंद तेव्हा काय दिसायचा.. त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षाच नव्हती.. तीन तास तू फक्त पडद्यावर दिस.. रफीसाहेबांचा आवाज.. देव आनंदला त्यांचाच आवाज कसा सूट व्हायचा..जयदेवने संगीत देताना काय कमाल केली.. असे अनेक विषय निघाले. प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह संचारला होता. आणि तेवढ्यात सुरू स्क्रीनवर सुरू झाला म्हाताऱ्या देव आनंदचा प्रेक्षकांशी साधलेला संवाद.. नमश्कार.. मै देव आनंद बोल रहा हू.. हम दोनो मेरी आखरी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म.. असं त्याने सांगायला सुरूवात केली. त्यानंतर मै जिंदगी का साथ निभाता चला गयाची लायटरची सुंदर धून सुरू झाली. आणि मग ते अलगत फेड आऊट होत स्क्रीनवर आलं सेन्सॉर सर्टीफिकेट.. त्यावर मुद्दाम लिहीलं होतं.. हम दोनो रंगीन... सिनेमास्कोप.. क्या बात है..


मी ही चित्रपट याआधी पाहिला नव्हता.. त्यामुळे मला सगळाच नवा होता.. पण तळ्याकाठी बसलेल्या रंगीत देवआनंदला पाहिल्यावर थिएटरमध्ये एक अलगद चित्कार ऐकायला आला.. पहिल्या जवळपास दोन अडीच सीनमध्ये एकही डॉयलॉग नाही.. फक्त देव आनंद, साधना आणि लायटरची धून.. त्यानंतर माझं तुफान आवडतं गाणं सुरू झालं. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज मोठ्या स्क्रीनवर मी प्रथमच ऐकला होता. त्याआधी टायटल प्ले होताना सुद्धा.. स्क्रीनवर सिंगरच्या खाली मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले ही तीन नावं मी माझ्या आयुष्यात प्रथमच वाचली.. घरात बसून या सगळ्यांच्या सीडी ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यांची नावं स्क्रीनवर पहाणं यात मोठा फरक आहे. तो अनुभव मला घ्यायचा होता. तो मिळाला.. अभी ना जाओ छोडकर ऐकताना खुप सुंदर वाटतं. थिएटरच्या साऊंड सिस्टीमवर हे गाणं फक्त रफीसाहेबांचा आवाज, अत्यंत सुंदर वाजणारा धा तीं तीं ताक धीं धीं वाजणारा तबला आणि हार्मोनियम, आणि इतर थोडकी वाद्य.. आणि संतूरची कमाल.. हा एक तुफान अनुभव होता. वाद्यांच्या आवाजात हरवून जाण्याच्या या काळात रफीसाहेबांचा गोड गंभीर आवाज ऐकण्यासाठी थिएटरचीच सिस्टीम हवी..

मला एक न उलगडलेलं कोडं आहे.. रफीसाहेबांनी देव आनंदला आवाज दिला, दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि राज कपूर वगळता इतरांनाही दिला. पण प्रत्येक वेळी गाणं ऐकताना त्यांनी त्या त्या हिरोला सूट करेल अशाच आवाजात गाणं गायलय. हे कसं ते कळत नाही. देव आनंदला दिलेल्या आवाजाची ढब आणि शम्मी कपूरला दिलेल्या आवाजाची ढब वेगळी कशी.. ही काय जादू हा देवमाणूस करतो.. हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत या.. हर फिक्र को धुए मै उडाता चला गया म्हणणाला कॅप्टन आनंद अप्रतिम..

पिक्चर संपला. बाहेर आलो.. तेव्हा काही बोलायचं नव्हतं. सिक्सटीजमध्ये लोकांना देव आनंदने का वेड लावलं. तू फक्त पडद्यावर तीन तास दीस.. अभिनयाची अपेक्षा नाही.. मोहम्मद रफी हे काय रसायन आहे. फक्त गाणी ऐकण्यासाठी आम्ही तीन वेळा हा चित्रपट पाहिला असं बाबा का म्हणाले. याचं रहस्य उलडगडलं. यही कहो गे तुम सदा के दिल अभी नही भरा.. असं खट्याळपणे म्हणणारी आशा भोसले की साधना.. एक जादू मनावर घेऊन बाहेर आलो.. अजून त्यातून बाहेर येता येत नाहीये..