Thursday, July 1, 2010

शामू मावशी

आजवर मी माझ्या कोणत्याही नातेवाईकांवर काहीही लिहीले नाही. नातेवाईकांवर लिहावं असं कधी वाटलंच नाही. पण १ जुलै ललै या तारखेला स्वतःला रोखू शकलो नाही. शामू मावशी जाऊन बरोबर एक वर्ष झाले. माझे कोणतेही विधी, कर्मकांडं करू नका अशी तिची इच्छा असली तरी तिची आठवण रहावी यासाठी माझ्या परीने मी हा प्रयत्न करतोय.

शामू मावशी ही माझ्या आईची मावशी. म्हणजे नात्याने माझी आजी. पण मी कधीही तिच्याकडे आजी म्हणून पाहिलेच नाही. नात्याने ती आजी असली तरी मी तिला मावशी म्हणायचो. पण मावशी म्हणालो तरी तिच्याकडे मी मावशी म्हणूनही कधी पाहिले नाही. म्हणजे ती माझी नक्की कोण होती हा ही एक मोठा प्रश्न आहे. मी स्वतः जेव्हा विचार करतो तेव्हा मलाही हे कोडं कधीच सुटत नाही. काहीही असो ती मला खुप हवीहवीशी होती. माझ्या आईची ती मावशी असली तरी ती आईपेक्षा वयाने फार मोठी नव्हती. बऱ्याच गोष्टी शामू मावशीला सांगितल्या की आईला हलकं वाटायचं. माझ्या मते आंबयं हे आईचं आजोळ आणि शामू मावशीचं माहेरचं गाव हा दोघींचा समान धागा असावा. शामू मावशी होती हा आईला मोठा आधार होता. महिन्यातून एकदा तरी शामू मावशीला भेटायचंच हे आईने ठरवलं होतं. अर्थात या दोघींचं नातं हे मावशी भाची पेक्षा मैत्रिणींचं होतं.

मला आठवतं लहानपणी बिनधास्त रहायला जावं असं ठिकाण म्हणजे शामू मावशीचं घर. फार लहान असताना मला अंधुक आठवतंय मी विनायक काकांना फार घाबरायचो. पण नंतर मी बिनधास्त जायचो. एवढचं नाही शामू मावशीसुद्धा मला हौसेने रहायला घेऊन जायची. हा कटकट करतो, याची जेवणाची नाटकं आहेत, हा रड्या आहे अशी कोणतीही वाक्य एकट्या शामू मावशीने कधीही म्हटली नाहीत. मी ही आवडीने जायचो कारण मला माहित होतं माझी सगळी नाटकं इथे पुरवली जायची. एकटी शामू मावशी नाही तर किशोर आणि टिनूही अक्षरशः कौतुकं करायचे. टिनू, शामू मावशीची मुलगी, ही माझी मावशी, माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी होती. त्यामुळे तिच्याशी माझं चांगलं जमायचं. टिनूने लहानपणी खुप लॉटरीची तिकीटं गोळा केली होती. त्याशिवाय सुरेशमामाकडून तिने शेअर्सचे फॉर्म, आणि तत्सम कागदपत्र जमवली होती. ती कागदपत्र घेऊन आम्ही दुपारी बँक बँक खेळायचो. आणि संध्याकाळी मंगल सोसायटीत टिनूच्या मैत्रिणींबरोबर विशांमृत किंवा लंगडी. टिनूच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मैत्रिणींच्यातही मी खेळलो आहे, नाटकालाही गेलो आहे. कोजागिरीला मंगल सोसायटीत धमाल कार्यक्रम असायचा. त्यासाठी शामू मावशी मला घेऊन जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री कितीवेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो आहे याची गणतीच नाही.

मंगल सोसायटीत जाणं हा खरोखर एक आनंद होता. एकतर टिनू आणि माझं कधीही भांडण व्हायचं नाही. शामू मावशीच्या घराबरोबरच शेजारी टिकेकरांकडेही लाड व्हायचे. त्यामुळे मी नेहमीच तयार.

लहानपणी मला कोणी हुशार मुलांचे दाखले दिले की मला राग यायचा. पण टिनूचे पेपर बघणं मला फार आवडायचं. टिनू तुफान हुशार होती. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क, सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकसमान अक्षरात, एकही काठ न मरता, मुद्देसूद, देखणा, काळ्या शाईपेनाने अतिषय स्वच्छ पेपर टिनू लिहायची. अजिबात अतिषयोक्ती करत नाही. पण टिनूचा पेपर तिच्या वर्गात आदर्श पेपर म्हणून दाखवला जायचा. त्याशिवाय टिनूची चित्रकला. विविध रंगांच्या शेड्स ती उत्तम तयार करायची. मंगल सोसायटीत बाहेरच्या खोलीत असलेल्या कपाटावर टिनूच्या चित्रांच्या गठ्ठा होता. तो बघणं हे माझं आवडतं काम.. आणि खरं सांगतो, हुशार मुलांच्या आया जसं वागतात तसं शामू मावशी एकदाही वागली नाही.

शामू मावशी स्वतः खरोखर निटनेटकी होती. तिची तब्येत नाजूक होती. त्यामुळे दुपारी किती जेवायचं, कोणत्या भाज्या खायच्या, त्या कशा करायच्या याचं सगळं प्रमाण ठरलेलं होतं. एवढच कशाला किती बोलाय़चं, आवाज केवढा ठेवायचा हे देखील तिने ठरवून घेतलं असावं. जेवण झाल्यावर दुपारी भाजलेली, हळद लावलेली बडिशोब आणि त्यानंतर पत्ते खेळायला तिला आवडायचं.

शामू मावशी खुप कणखर होती हे आज विचार केल्यावर मला जाणवतं. विनायक काका गेल्यावर मुलांना मोठं करणं त्यांचे संसार उभे करणं हे तीने फार कसोशीने केलं. मला आठवतं विनायक काका गेले त्यावेळी ती डोंबिवली फिवरसारख्या भयानक आजारातून उठली होती. त्यानंतरही काही वर्षांनी तिला आतड्यांचा त्रास जाणवू लागला होता. टिनू त्यावेळी कॉलेजमध्ये होती. त्यावेळी माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिच्या आतड्याचा काही भाग काढला होता. हे तिच्या जिवावरंच दुखणं होतं. त्यावेळीही तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या दुखण्यातून मार्ग काढला. माझी आई म्हणते ती खुप धीराची होती. तिची इच्छाशक्ती प्रबळ होती.

सातवीत असताना माझा क्लास टिळकनगर शाळेच्या जवळ पाध्येबाईंच्या घरी दुपारी असायचा. एमआयडीसीत घरी येऊन पुन्हा क्लासला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सातवी आणि आठवीत असताना रोज शाळा सुटल्यावर दोन तास शामू मावशीकडे जायचो. खरोखर हक्काने जायचो.

कॉलेजला जायला लागल्यावर मात्र मी तिथे फारसा जाईनासा झालो. महिन्यात एखादीच चक्कर टाकायचो. कारण मलाही माहित नाही. खरोखर वेळ नसावा, मला शिंगं फुटली असावीत किंवा इतर काहीही असो. पण आठवण मात्र यायची.

आज शामू मावशी नाही. तिला जाऊन तब्बल एक वर्ष झालं. तिची आठवण मात्र येते. टिनू दुबईला असली, शामू मावशी तिथे नसली तरी त्या घराची ओढ अजूनही आहे. चारू(मामी) अजिबात या दोघींची उणीव जाणवू देत नाही. तरीही तिथे शामू मावशी नाही ही जाणीव अस्वस्थ करते. नात्याने माझी आजी, म्हणायचो मावशी, तरीही ती माझी नक्की कोण होती या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही.