Friday, August 28, 2009

गौरी झाली दुर्गा...

सकाळी सातच्या बातम्या वाचत होतो. साधारणतः अँकर वाचून झाला की स्टोरी प्ले होते. अशावेळी अँकरचे स्टोरीकडे लक्ष्य असतेच असं नाही. मात्र एका स्टोरीने आवर्जुन लक्ष वेधून घेतले. गौरी भोजनाच्या दिवशी हातकणंगले तालुक्यातल्या भादोले गावातल्या महिलांनी दारूबंदी आंदोलन यशस्वी केले. दारूबंदी आणि त्यासंबंधातल्या बातम्या सतत येतच असतात. त्यात महिलांनी उग्र रूप धारण करून गाव दारूमुक्त केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र या स्टोरीत काहीतरी वेगळं होतं.
या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. हातकणंगले तालुक्यातले वारणा नदीच्या काठावरचे भादोले गाव. ऊस उत्पादनामुळे सधन आणि संपन्न गाव. या गावात शिरकाव केलेल्या परमिट रूम आणि दारूच्या गुत्त्यांना हद्दपार करण्याचा विडा या गावातल्या महिलांनी उचलला. त्यासाठी दारूबंदी कृती समितीचीही स्थापना केली. त्यासाठी मतदान घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार झाला. गावातल्या एकूण तीन हजार सातशे ब्याण्णव मतांपैकी अठराशे सत्ताण्णव मतांची गरज होती. महिलांनी मतदानात सहभाग घेतला आणि बहुमत मिळवत दारूबंदीचा लढा जिंकला....
एवढी साधी सोपी सरळ वाटणारी ही या लढ्याची गोष्ट... मात्र वाटते तेवढी साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मतदान घेऊ शांततेच्या मार्गानं आदोलन जिंकण्याचा निर्धार केलेल्या ग्राम भगिनींसमोर वेगळेच आव्हान होते. दारूबंदी व्हावी, गावातून दारू हद्दपार व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा होती का हा खरा प्रश्न आहे. मतदानासाठी जो दिवस निवडला गेला तो होता गौरी भोजनाचा. ग्रामिण भागात या सणाला केवढे महत्त्व असते आणि त्यादिवशी गरिब असो वा श्रीमंत गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी असते हे आपल्याला माहित आहेच. हा सण खरोखर स्त्रीचा सण असतो. अशावेळी स्वयंपाकघरात गढून गेलेल्या स्त्रीला अशा सामाजिक प्रश्नासाठी मतदानासाठी घराबाहेर पडणे खरोखर कठीण आहे. याचा परिणाम मिळणाऱ्या मतांवर होणार हे उघड आहे. अशावेळी हाच दिवस मतदानासाठी ठरवला गेला. मात्र महिला हरल्या नाहीत. ग्रामभगिनींनी हिरीरीने उत्सवही साजरा केला आणि मतदानासाठीही आवर्जून उपस्थिती लावली. आणि बहुमतही मिळवले. घरची जबाबदारी पार पाडून गावाच्या समोर उभा असलेला दारूरूपी राक्षस त्यांनी धुळीला मिळवला. तरूणींपासून अगदी म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्याजणींनी एकीचे बळ सिद्ध केले. तब्बल पाचशे चौतीस मतांची आघाडी घेतली. गौरी म्हणून माहेरवाशिणीचे कौतुक सांगणाऱ्या देवीने दुर्गेचे रूप धारण करत दैत्याचा नायनाट केला.
जिथे मांगल्य असते तिथे सरस्वती वास करते असं म्हटलं जातं. दुर्गेचे रूप धारण करून भादोलीतल्या गौरींनी गौरी भोजन संपन्न केलंच आहे. आता अशा पवित्र ठिकाणी सरस्वती आणि त्यापाठोपाठ लक्ष्मीही नक्की कृपादृष्टी ठेवेल...

( या ब्लॉगसाठी साम मराठी वृत्तविभागाचे अनंत सहकार्य मिळाले आहे. साम मराठी वृत्तविभाग आणि कोल्हापूरचे प्रतिनिधी निशिकांत तोडकर यांचे आभार )

Monday, August 24, 2009

गणपती माझा नाचत आला...एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गणेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि..


महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं आगमन झालं. दहशतवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडींग या पाचवीला पुजलेल्या समस्यांबरोबरच स्वाइन फ्लू, महागाई या नव्या संकटांनी भारलेल्या वातावरणात गणेशाचं आगमन झालं. अर्थात आपण इतके सहनशील आहोत की काहीही होवो आपण रडत रडत का होईना पण सण साजरा करतो. संकटं दूर होवोत न होवोत त्यांना तोंड देण्याची शक्ती गणराय आपल्याला नक्की देतो..

आजच्या या लेखाचा सूर थोडा निराशावादी वाटेल खरा.. पण परिस्थिती निराशावादी आहे. सण साजरा करताना आपण या सणाला विकृत स्वरूपापर्यंत पोहोचवले आहे याची जाणीव आपल्याला होतेय का.. हा उत्सव बाजारू स्वरूपात साजरा होतोय. आपल्याला कल्पना येत नाहीये पण आपण फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत आहोत. उत्सव साजरा झाला पाहिजे पण आपल्या उत्सवी स्वरूपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळलाच पाहीजे. इथे एक घटना मला लिहाविशी वाटते..


मार्च २०००.. डोंबिवलीत आमच्या घराजवळ एमआयडीसी विभागातला गणेश विसर्जन तलाव आहे. या तलावाचा उपसा सुरू होता. तलावाचा उपसा करताना विसर्जन झालेल्या हजारो गणेशमुर्तींचा ढिग बाहेर काढला गेले. आणि अत्यंत वाईट अवस्थेतल्या हजारो मुर्तींचा ढिग.. तो ढिगारा पाहून मनाचा थरकाप उडाला.. मग जाणीव झाली याच मुर्तीत आहे आपणही विसर्जित केलेली एक मुर्ती. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. आणि वर्षानुवर्ष तशाच पडून राहतात. या मुर्तींना लावलेले रंग जलाचरांसाठी घातक असतात. त्यामुळे त्या तलावात एकही मासा नव्हता किंवा कोणताही जलचर नव्हता.. रंगामुळे जगणंच शक्य नाही.. त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपला गणपती यापुढे अशा पाण्यात विसर्जित होणार नाही. आमच्या उत्सवामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही हा निश्चय आम्ही केला.

तातडीने एक चांदीची मुर्ती आणली. आणि तिची स्थापना आम्ही करतो.. दिडदिवसांनंतर बादलीत मुर्तीचं विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना घालतो..


उत्सव साजरा जरूर व्हावा पण त्यासाठी आमच्या अमोल पृथ्वीचा आम्ही का बळी द्यावा.. हा हक्क आम्हाला कोणी दिला.
गणेश विसर्जनानंतर नाल्यांमध्ये साचतो थर्माकोलचा ढिग.. किनाऱ्यांवर साचतात मुर्त्यांचे ढिग.. गणेश विसर्जन करून देणाऱ्या पोरांना विचारा त्यांना पाण्यात पायाखाली काय लागतं.. त्यांचं उत्तर तुम्हालाही माहित आहे.. त्यांच्या पायाखाली काय लागतं हे आपण जाणतो तरीही आपण आपली मुर्तीही तिथेच का पाठवतो.. मुर्तीही मातीचीच हवी असे धर्मशास्त्रात सांगितले असेल तर धर्मशास्त्र बदला.. आमचा धर्म आम्ही ठरवू इतका लवचिक हवा.. आणि तो आहेही... मग त्याचा वापर आम्ही कधी करणार... अक्षरशः कायदे करून या मुर्ती बंद करा.. यामुळे मुर्तीकारांच्या पोटाचं काय असा भुक्कड युक्तीवादही होईल, पण मुठभर मुर्तीकारांसाठी आम्ही आमच्या पृथ्वीच्या जीवावर का उठावं..
पर्यावरण संवर्धन वगैरे शब्द फार बोजड वाटतील, पण आपण आणतो त्यामुर्तींनी आपल्याच परिसराला हानी होणार नाही याची काळजी घ्यावी एवढी माफक अपेक्षा आहे. ही जाणीव आलीच पाहीजे.. गणपतीत निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. डोंबिवलीत तसा निर्माल्य खत प्रकल्पही आहे. मात्र निर्माल्य पाण्यात टाकले पाहीजे ही वेडगळ संकल्पना धर्माच्या नावाखाली कोणीतरी पसरवली आहे आणि आम्हीही तिच्याच नादाला लागलोय. हे थांबलं पाहीजे, घाणेरड्या खाडीत, दुषित नदीत आम्ही आमचा गणपती विसर्जित करतो हे थांबले पाहीजे.. परिसर, पर्यावरण यांचा आदर केलाच पाहीजे.. ही जाणीव प्रत्येकाला आलीच पाहीजे.. यावर विचारमंथन झाले पाहीजे.. कायद्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः सुज्ञ होऊन वेळीच काही आचार सुधारले तर पर्यावरणाचा नाश आपण टाळणे शक्य होईल.. तेव्हाच गणपतीसमोर आपण मोकळ्या मनाने प्रार्थना करू..काले वर्षतू पर्जन्यः पृथ्वीसस्यशालिनी...

Friday, August 21, 2009

जाणीव...

जाणीव... ब्लॉग लिहावा.. ब्लॉगिंग करावं असं मला वाटलं तेव्हा तातडीने ब्लॉग पेज तयार केलं, मात्र घोडं नावावर अडलं होतं. नाव काय द्यावं. विचार केला खुप आणि हे नाव सुचलं. जाणीव... जाणीव आहे म्हणून आपण जिवंत आहोत. संवेदना, असंही मनात आलं होतं. मात्र जाणीव त्याच्यापेक्षाही जास्त जवळचं वाटलं.. जगात पाऊल ठेवल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असते ती जाणीव.. जाणीव संपली की सगळं संपलं.. जिवंतपणाचं लक्षण.
जन्माला आल्याआल्या विश्वात आल्याची जाणीव.. आईसोबत आहे याची जाणीव.. भुकेची जाणीव, झोपेची जाणीव, स्पर्शाची जाणीव, इथपासून या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असते ती आपली जाणीव.. हीच जाणीव सोबत आहे आणि प्रत्येक क्षणाला राहील हे लक्षात घेऊन या ब्लॉगला नाव दिलं जाणीव.. असो ब्लॉगचा नामकरण विधी तर झालाय, आता पाहूया लिहायला काय काय सुचतंय. तुर्तास तरी इथेच थांबावं हे उत्तम....