Wednesday, January 4, 2017

आवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज वाचला... गाडी चालवताना समोरचं पाहायला मोठा विंडस्क्रीन असतो. पण मागचं पाहायला एक छोटा आरसा पुरतो... भविष्यातलं पाहायला मोठी दृष्टी हवी पण भूतकाळावर केवळ एक नजर टाकली तरी पुरते, अर्थात भुतकाळाचा फक्त आढावा घ्यायचा असतो, त्यात रमायचं नसतं अशा अर्थाचा तो मेसेज... सुरूवातीला हा मेसेज मला पटला. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या भूतकाळात संपूर्ण संध्याकाळ रमलो, रममाण झालो.  हे केवळ मीच केलं असं नाही तर गेल्या 53 वर्षात डोंबिवलीत राहीलेल्या शेकडो जणांनी माझ्यासारखा अनुभव घेतला. आम्हा सर्वाना सांधणारा दुवा होता टिळकनगर विद्यामंदिर ही आमची शाळा.

1964 साली आमच्या शाळेची स्थापना झाली. तेव्हापासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेत पुन्हा एकत्र बोलवावं असा विचार शाळेच्या संचालक मंडळाने प्रत्यक्षात उतरवला. तारीख ठरली 1 जानेवारी 2017, कित्येक महिने आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झालं. नावही विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आलं. अनेक पर्याय आले. त्यातून निवडलं गेलं 'आवर्तन' हे नाव, टॅगलाईनही ठरली, 'माझी शाळा, माझा जिव्हाळा'. संचालक मंडळ, माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग सर्वच जण कामाला लागले आणि साजरा झाला एक भव्य सोहळा.

खरं म्हणजे हा उपक्रम प्रत्यक्षात आणणं हेच खरं तर मोठं आव्हान होतं. 1964 सालापासून शाळेतून शिकलेले लाखो विद्यार्थी शोधणे, त्यांच्या नावांचं संकलन करणे, लग्न होऊन गेलेल्या मुलींना त्यांच्या नव्या नावांसह शोधणे... केवढं प्रचंड काम, पण शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलण्यात आलं. त्यासाठी मदत घेतली गेली ती इंटरनेटची... मंडप समिती, खानपान समिती, मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणारी समिती... कसल्या कसल्या समित्या स्थापन झाल्या. प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली, त्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकला गेला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. खरं म्हणजे इथे अनेकांची नावं घेण्याचा मोह होतोय. पण कोणाचं नाव न घेऊन अन्याय नको म्हणून तो मोह टाळतोय.

डॉ. महेश ठाकूरांनी वातावरण निर्मिती म्हणून एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला. आवर्तन या नावाचा... या ग्रुपवर या स्नेहसंमेलनाविषयी विविध गप्पा मारायला सुरूवात झाली. प्रसन्नकाका आठवले आपल्या सुंदर कविता करून शाळेची ओढ लावत होते. पर्यवेक्षिका मॅथ्यू बाईही शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्यामुळे लेखमाला लिहून शाळेची ओढ वाढवत होत्या. ग्रुपचा लोगो आमच्या बॅचच्या मिलिंद बडवेने तयार केला. दर विकेंडला आणि आठवड्यातूनही गरजेनुसार मीटींग होत होत्या, त्याचे अपडेट्स ग्रुपवर मिळत होते. यातून प्रचंड वातावरण निर्मिती होत होती. सुरूवातीला रजिस्ट्रेशन कमी होत होतं... रजिस्ट्रेशन समितीने प्रत्येक बॅचनुसार नोंदणीचेॆ आकडे ग्रुपवर टाकायला सुरूवात केली. त्यातून 'शाखेत चला' खेळ खेळल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या माहितीतल्या बॅचमेट्सना रजिस्ट्रेशन करायला भाग पाडू लागले... असं करता करता उगवला 2017 सालचा पहिला दिवस 1 जानेवारी... त्यादिवशी पुन्हा शाळेत जायचं होतं...

संध्याकाळी चार वाजल्यापासून शाळेत विद्यार्थी जमायला सुरूवात झाली, अनेकांनी कित्येक वर्षांनी शाळेत परत प्रवेश केला होता. अनेक जण शाळेच्या जवळच राहायचे, पण कित्येक वर्षात बाहेरून जाताना फक्त शाळा पाहीली होती.. अनेक जण पालक म्हणून अनेकदा शाळेत आले होते, पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा टिळकनगरी होऊन आले होते.. शाळेत शिरताना सर्वांचीच नजर टिळकांच्या पुतळ्याकडे जात होती. अनेकांचे हातही तेव्हासारखेच पटकन जोडले गेले. ओळखीचे चेहरे दिसत होते, मिल्या, पिके, वाशा, चंद्रू, टकल्या, पोटल्या अशा नावांनी एकमेकांनी हाका मारणं सुरू झालं... कित्येक वर्षांनी शाळेचे ग्रुप जमत होते, मिठ्या मारून पाठीत गुद्दे घालून प्रत्येकजण अक्षरशः मूल झाला. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून ज्या शाळेत रोज आले त्या शाळेत आज सगळे रंगीबेरंगी ड्रेस घालून आले होते. पण प्रत्येकाच्या मनात मात्र तोच गणवेश होता. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी गटागटाने विविध बॅचची मुलं गप्पा मारत होती. शिक्षक वर्ग शाळेत प्रवेश करत होता. आपापल्या शिक्षकांना पाहून जवळपास प्रत्येकजण खाली वाकून नमस्कार करत होता. शिंपी सर आले, त्यांच्या भोवती एकदम गर्दी झाली, सर बिचारे आता थकलेत, त्यांना त्रास द्यायला नको या भावनेने... डोळ्याच्या कडा ओलावलेल्या, खाली वाकून पायांना स्पर्श करून प्रत्येक जण त्यांना भेटायला लागला. बर्वेबाई आल्या, त्यांना पाहून अनेक जण भितीने मागे सरकले, न जाणो बाई अजूनही सांगतील, भिडे उभा राहा, देव हा शब्द संपूर्ण चालवून दाखव... गांधीबाई आल्या... त्यांना पाहून पुन्हा भूमितीचा वर्ग आठवला, बंगाली बाई आल्या, त्यांना पाहून हिंदीचा वर्ग आठवला, मॅथ्यू बाई लांबवर आयोजनात दिसत होत्या, त्यांना पटकन जाऊन भेटण्याची हिंमत अजूनही होत नाही. शास्त्राच्या वर्गातलं त्यांचं शिस्तबद्ध शिकवण  आणि केवळ करड्या नजरेतून निर्माण झालेला धाक अजूनही वाटतो... शोभा साळुंखे, मुग्धा साळुंखे बाईंना नजर शोधायला लागली. अत्रेबाई, मनिषा कुलकर्णी बाई, जोग बाई, मनिषा जोशी बाई,चौधरी सर, पाखरे बाई, सरतापे बाई, तामसे सर यांना पाहून पुन्हा वर्गात जाऊन बसावसं वाटलं. राठोड सर, गोखले बाई, कुलकर्णी सर, देशपांडे काकांच्या आठणवींनी भरून आलं. पळधे बाई आल्यावर पुन्हा सगळे जाऊन थेट त्यांना वाकून नमस्कार करायला लागले.. या शिक्षकांनी आमची आयुष्य केवळ घडवली नाहीत तर या आमच्या शाळेतल्या आईच आहेत सगळ्या...

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेला अप्रतिम गाण्याचा कार्यक्रम, नंतर सचिव आशीर्वाद बोंद्रे यांचं भाषण, मॅथ्यू बाईंचं उत्तम निवेदन, त्यानंतर चेरी ऑन द टॉप म्हणजे शाळेचे विद्यार्थी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जगप्रसिद्ध स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांचं उत्तम भाषण झालं. त्यानंतर अल्पोपहार...

शाळेत सगळे भेटले. आमचे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, शाळेत ज्या मुलींशी कधीही बोललोही नाही, त्यांच्याशी शेकहँड करून बोललो.. आधीच्या बॅचचे भेटले, नंतरच्या बॅचचे भेटले... दिवस तुफान गेला... शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री. पुरोहीत सर आले होते. त्यांचा सत्कार होताना संपूर्ण शाळा उभी राहीली, एक साथ नमस्ते असा गजर झाला... मात्र शाळेला घडवणाऱ्या बाजपेयी सरांची उणीव मात्र पदोपदी जाणवत होती... शाळा पुन्हा एकत्र येत होती. हा सुवर्ण दिन पाहायला बाजपेयी सर मात्र नव्हते...

शाळेने सर्वांना एकत्र आणलं... माझ्या वर्गापाशी जाऊन आलो... काही दिवसांनी आमच्या शाळेची मूळ इमारत पाडणार आहेत. तिथे नवी इमारत बांधली जाणार आहे. आमचे वर्ग जातील, आमची शाळा पुन्हा दिसणार नाही. पूर्वी वर्गात मस्ती केली की आम्हाला पायाचे अंगठे धरून उभे करायचे. शाळेला एकच विनंती माझा वर्ग पाडू नका, मायेने शिक्षा होईल अशी जागा या जगात घराव्यतिरिक्त उरलेली नाही. आपल्याच पायाचे अंगठे धरून उभं राहायला, जमिनीवरच कायम राहायला लावणारी आमची ही हक्काची जागा आहे...

शाळेतून परत निघालो. मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता... भाषण सुरू असताना बडबडायची सवय अजूनही गेली नाही, मित्रांना भेटल्यावर अजूनही मस्ती करावीशी वाटते, वर्गातली 'ती' शोधायची सवय अजूनही जागी आहे. शिक्षकांना पाहिल्यावर अजूनही भीती वाटते.. माझ्या वर्गाची शान अजूनही भावते... माझ्या शाळेचं पटांगण अजूनही भव्य वाटतं... वंदे मातरम सुरू झाल्यावर अजूनही भरून आलं... वंदे मातरम संपल्यावर आमच्या शाळेच्या त्या प्रसिद्ध पितळी घंटेचा आवाज मनात ऐकायला यायला लागला. शाळेत असताना घंटेचा तो आवाज हवाहवासा होता... आता मात्र मनात सुरू असलेल्या घंटानादाचे घण सांगत होते की बेटा अजूनही ती लहानपण जपलयस... ते हरवू नको... माझ्या शाळेची इमारत माझ्याशी बोलत होती... परत परत ये, मला भेट, बाहेर खुप चुका करतोस, शहाणपणा करतोस, त्याची शिक्षा म्हणून तुला अंगठे धरून उभं करेन, चांगलं काही केलंस तर कौतुकाने शाबासकीही देईन... पण परत ये... मला विसरू नकोस.... 

Saturday, April 9, 2016

माती मधुनी दरवळणारे हे गाव... भाग-3

फडके रोड ही गोष्ट आम्हा डोंबिवलीकरांसाठी किती महत्त्वाची आहे हे केवळ एक सच्चा डोंबिवलीकरच जाणू शकेल. मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीचं बिरूद मिरवणाऱ्या या शहरात या रस्त्यावर ही संस्कृती नांदते. याचं कारण म्हणजे फडके रोडच्या एका टोकाला असलेलं आमचं ग्रामदैवत गणेशाचं भव्य मंदिर. डोंबिवलीतल्या अनेक कलांचा उगम या मंदिरात झाला. डोंबिवलीकर कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं हे व्यासपीठ. शहरातल्या अनेक कलाकारांनी इथल्या गणेशापुढे कला सादर करून पुढे देशाविदेशात मैफिली गाजवल्या. दिवाळीच्या दिवशी पहाटे फडके रोडवर जमणाऱ्या तरूणाईला फॅड म्हणून न हेटाळता या मंदिराने 'युवा शक्ती, युवा भक्ती दिन' म्हणत सामावून घेतलं. असाच उत्साह दिसतो तो गुढीपाडव्याच्या निमित्ताने.






गुढीपाडवा, मराठी नववर्षाचं स्वागत जल्लोषात आणि तितक्यात सुसंस्कृत पद्धतीने करण्याचा मंत्र डोंबिवलीने महाराष्ट्राला दिला. त्याची संकल्पनाही इथे मंदिरात उगम पावली आणि त्याचा केंद्रबिंदू झाला फडके रोड. 1990 मध्ये हा भव्य उपक्रम सुरू झाला. शहराच्या विविध भागातून भारतीय विशेषतः मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ, दिंड्या, पालख्या, पथकं, ढोल ताशे पथकं एका विशिष्ट ठरलेल्या मार्गाने प्रवास करून गणेश मंदिराजवळ नेहरू मैदानात एकत्र येतात. गंमत म्हणजे या उत्सवाच्या आयोजनात तरूणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. सर्व वयोगटातले डोंबिवलीकर आपापल्या चित्ररथ, शोभायात्रांच्या माध्यमातून एकत्र येतात.

अक्षरशः वय, देहभान, तहान भूक विसरून हा उत्सव साजरा केला जातो. कुठेही थिल्लरपणा नाही, गडबड गोंधळ, धिंगाणा नाही अशा प्रकारे हा सण साजरा होतो. शोभायात्रांचे विषयही कितीतरी... पाणीबचतीच्या संदेशापासून, पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि अध्यात्मापासून ते विज्ञान महतीपर्यंत.. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आणखी एका उत्साही कार्यक्रमाची भर पडलीय. डोंबिवलीत विविध ढोलपथकं निर्माण झाली आहेत. या ढोलपथकांची वर्षभर विविध ठिकाणी सुरू असलेली प्रॅक्टीस आणि त्यांची गुढीपा़डव्याच्या दिवशीची फडके रोडवरची अदाकारी निव्वळ पाहण्या आणि ऐकण्यासारखीच. अक्षरशः आमचा फडके रोड दणाणून जातो.


पण एवढे ढोल, ताशे वाजत असले तरी त्यात कुठेही कानठळ्या बसवणाऱ्या डिजेचा उबगावणेपणा नसतो. साऊंड आणि म्युझिक यातला फरक तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतो. ढोल, ताशे, झांजा, त्रिकोण, टोला आणि तत्सम वाद्य यांनी अक्षरशः भव्य वातावरण अनुभवायला मिळतं. मला कौतुक याचं वाटतं की फडके रोडच्या दुतर्फा हजारो नागरिक राहतात. पण कोणीही या प्रात्यक्षिकांना विरोध करत नाही. एकाच रंगाचे झब्बा सलवार घालून डोक्यावर फेटे, कमरेला शेले बांधून या पथकातले युवक युवती ढोल वादन करतात. अप्रतिम...

गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांची सुरूवात खरं म्हणजे चार दिवस आधीपासूनच होते. दीपोत्सव, सुक्त पठण, भीत्ती चित्र स्पर्धा असे विविध उपक्रम साजरे होतात. संपूर्ण डोंबिवली यात सहभागी होते.

सांगण्यासारखं बरच काही आहे... डोंबिवली हे शहर म्हणजे मुंबई नावाच्या बोर्ड रूमला लागून असलेली एक बेडरूम असं वर्णन केलं जातं. डोंबिवलीकराला हे वर्णन आवडत नाही, पण परिस्थिती खरंच तशी आहे हे तो मनोमन जाणून असतो. सकाळी 7.26, 7.43, 8.13, 9.52 अशा विचित्र वेळा दाखवणाऱ्या गाड्यांना लटकत मुंबई गाठणे, दिवसभर मरमर काम करणे आणि रात्री तशाच विक्राळ वेळा दाखवणाऱ्या गाड्यांना लटकत परतणं हे डोंबिवलीकरांच्या पाचवीला पुजलेलं. तरीही डोंबिवलीकर आपली सांस्कृतिक ओळख टिकवू शकला ते केवळ आणि केवळ अशा सुंदर सणांमुळे... असे सण साजरे केल्यावर हा डोंबिवलीकर पुन्हा तयार होतो, पुढच्या सोमवारसाठी.... 

Tuesday, September 22, 2015

मी तो गणेशोत्सव खुप मीस करतो...



घरात नातेवाईक खुप जमलेत. आजीच्या बहिणी, आजोबांचे भाऊ बहीण, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं... घरात लेकी सुना एकत्र काम करत आहेत, हास्यकल्लोळ चाललाय, 50 जणांच्या रोजच्या स्वयंपाकात लुडबूड करत पुरूष मंडळी चहाची फर्माईश करत आहेत. बाहेर एखादे अण्णा मामा किंवा आजोबा तरूणांना, ''काय रे सध्या काय?'' असा सवाल करतायत... स्वयंपाकघरात काही आज्या हातातलं काम निपटवत असताना एकमेकींची सुखदुःख वाटून घेत आहेत... आणि बाहेर दिवाणखान्यात मखरात गणराय विराजमान झालेत. दुपारच्या आरतीची वेळ झालीय. सोवळं नेसलेला मामा आरतीला चला रे अशी हाक मारतो... बायका पदराला हात पुसत पुसत बाहेर येतात. घरात इकडे तिकडे करत असलेली मुलं गणपतीसमोर जागा पटकावतात. ठेवणीतल्या पिशवीतून झांजा बाहेर पडतात. आरामखुर्चीवर बसलेल्या आजोबांना एखादे काका धरून बाहेर आणतात. खणखणीत आवाजात आरती सुरू होते... मामाच्या हातातल्या ताम्हनात निरांजन, कापूर ओवाळला जात असतो. सुखकर्ता, दुखहर्तापासून सर्व देवांच्या आरत्या होतात.  येई यो विठ्ठलेला चांगला टीपेला आवाज लावला जातो... घालीन लोटांगण होतं... मंत्रपुष्पांजलीतला प्रत्येकाचा वेगळा स्वर अंगावर शहारा आणतो... आरतीचं तबक फिरतं... त्यातल्या कापूराच्या ज्योतीचा उबदार स्पर्ष हाताला जाणवतो. गणरायासोबत घरातले सर्व तृप्त होतात... आता नैवेद्य... आणि नंतर जेवणं... घरातले सगळ्यांच्या पंगती बसतात. आई, काकू, मामी, मावशी वाढायला येते. मोदकांचा आग्रह होतो. मोदक खाण्याच्या स्पर्धा लागतात. गणेशोत्सवाचे असे ते सुंदर पाच किंवा सात दिवस...
मी असा गणेशोत्सव अनुभवला आहे. आमच्या घरी असाच गणपती साजरा होत असे. पण आमच्या घरी गणपती आणण्याआधी आम्ही पुण्याला आमच्या काकांकडे, ठाण्याला आमच्या आजोबांकडे आणि डोंबिवलीत आमच्या आईच्या मामाकडे गणपतीला जायचो.. त्यातही डोंबिवलीत आईच्या मामाच्या घरी सुरेश मामाच्या घरी गणपतीला सर्वाधिक वेळा गेलोय. अगदी आमच्या घरी गणपती सुरू केल्यावर, दीड दिवसांचं विसर्जन झाल्यावरही आम्ही लगेच सुरेश मामाकडे जायचो. काय वातावरण असायचं. घरात माझे पणजी पणजोबा होते, माझ्या आजीचं ते माहेर... माझ्या आजीच्या सगळ्या बहीणी, भाऊ इथे यायचेच पण त्याच बरोबर माझ्या आजीच्या आत्याही आलेल्या मला आठवत आहेत. माझी आई सांगते आजीची आत्या, बबन आत्या, आईची मावशी सिंधू मावशी, हेमू मावशी, या सगळ्या आज्या करायच्या तसे मोदक जगात कोणी केले नसतील. मुळ्यांचा गणपती म्हणून या सगळ्या ज्येष्ठ स्त्रिया लीलया गणपतीची जबाबदारी घ्यायच्या. अंजू मामी त्यांची कॅप्टन आणि पणजी कोच... अशी मस्त टीम असायची. मी तेव्हा लहान होतो म्हणून मला कधी स्वयंपाकघरात थांबून ती मजा अनुभवता नाही आली. पण केवढ्या गप्पा रंगत असतील तिथे.. माझी आई, तिची मावशी शामू मावशी, शालन मावशी आणि अंजू मामी या तशा एकाच पिढीतल्या, काही वर्ष इकडे तिकडे... त्यांची एक टीम असायची. बाहेर अद्वैत, किशोर, चंदामामा, राजू मामा यांची एक टीम, तिकडे टीनू, लिनू, तुषार, मी यांची एक टीम, त्याही पलीकडे बेडरूममध्ये पणजोबा, माझे आजोबा, अण्णा मामा, सुरेश मामा, विसू मामा, रवी मामा, शेखर मुळे मामा, मोघे काका, पुण्याचे पिटपिट उर्फ मिराशी काका, पेंढारकर काका यांच्या झकास गप्पा रंगलेल्या असायच्या... विषय शेअर बाजारापासून क्रिेकेटच्या मैदानापर्यंत... क्या बात है...
मला आठवतं गणपतीचं मखर तयार करण्याची जबाबदारी चंदामामा आणि अद्वैत यांची असायची... थर्माकोलवर अप्रतिम नक्षी काढून, ती अर्ध्या ब्लेडने कापली जायची..गणपती आधी सुरेशमामाकडे गेलं तर हे दोघे ते काम मन लावून करत बसलेले दिसायचे. अप्रतिम मखर हे मुळ्यांच्या गणपतीचं वैशिष्ट्य..
गणपतीच्या दिवशी सकाळ अशी मस्त जायची. संध्याकाळी या पाच सात दिवसांत अक्षरशः हजारो माणसं दर्शनाला येऊन जायची. त्यांना मस्त मोदक पेढ्याचा प्रसाद आणि कॉफी किंवा बहुदा दूध असा मस्त कार्यक्रम असायचा. टिनू, लिनू या माझ्या मावशा त्या कामी पुढे असायच्या... काय धमाल... बाहेर गणपतीला आलेले विविध लोक पाहणं हा माझा एक तेव्हा आवडता कार्यक्रम असायचा. त्यांच्याशी घरातले बोलतात कसे, ते कसे बोलतात, काय बोलतात हे ऐकायला मजा यायची. अद्वैत, किशोर हे माझे मामा तसे माझे आदर्श असायचे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांशी हे दोघे काय बोलतात याचं निरिक्षण मी आणि तुषार करत बसायचो. तुषार हा माझा अजून एक मामा... मुळ्यांच्यातला सर्वात लहान भाऊ... माझ्या आईचा मावसभाऊ, शाळेत माझ्या एक वर्ष पुढे असलेला. त्यामुळे त्याचं आणि माझं जाम जमायचं.
गणपतीच्या अखेरच्या दिवशी, विसर्जनाला मजा असायची, समोर पाटलांचा गणपती, आणि मुळ्यांचा गणपती एकत्र निघायचा. मुळ्यांची सगळी गँग असायची... संगीतावाडीतल्या विहिरीवर विसर्जन व्हायचं... तिथून येताना सगळे सुन्न असायचे.. घरी आल्यावर परत वातावरण हलकं फुकलं करण्यासाठी कानिटकरच्या वडापावचं औषध असायचं... काय मजा यायची...
असा हा गणेशोत्सव... काळाच्या ओघात घरातले वयोवृद्ध गेले. पणजोबा, पणजी गेले, आजीच्या आत्या गेल्या, आईच्या काही मावश्या गेल्या. स्वतः सुरेश मामाचं कुटुंबही पुण्यात स्थायिक झालं...
आमच्या घरातल्या गणपतीचे दीड दिवस आम्ही भक्तीभावाने साजरे करतोच पण सुरेशमामाकडचा गणपतीच माझ्या आणि माझ्या ताईच्या मनावर कोरला गेलाय. आठवण त्या बाप्पाची निघतेच...
मला वाटतं मखरातला गणपती हे एक निमित्त असतं, ओढ असते ती गणपतीला जमलेल्या आपल्या गोतावळ्याची.. मोदक तर सगळेच सारखे असतात पण ते करणारे हातच खास असतात नाही का...?

Tuesday, September 15, 2015

आठवण गणरायाची...

गणपतीच्या आगमनाची तयारी घरात पूर्ण झालीय. उद्या सकाळी गणपती आणायचा... माझ्या स्वतःच्या गाडीतून मी यावर्षी गणपती आणणार आहे याचा आनंद आहेच. पण गेल्यावर्षीपासून मनात एक खंतही सतावतेय. माझा चांदीचा गणराय आता आमच्यात नाही. एका विशिष्ट कारणासाठी आम्ही काही वर्षापूर्वी एका विशिष्ट कारणासाठी चांदीच्या गणेशाची सुंदर मूर्ती आणली होती. त्यावर मी एक पोस्ट याआधी टाकलीही आहे.. 

http://www.janeeva.blogspot.in/2009/08/blog-post_23.html

मात्र आता हा गणराय आमच्याकडे नाही. 20 मे 2014 या दिवशी आमच्या घरात घरफोडी झाली. त्यात हा गणराय चोरट्यांच्या हाती लागला. 800 ग्रॅमची ही मूर्ती चोरट्यांनी लांबवली. तेव्हापासून हा गणराय आमच्यापासून दूर गेलाय. कळत नाहीये काय करू. असंख्यवेळा पोलीस स्टेशनच्या खेपा घातल्या पण पोोलिसांनाही काही क्लू लागत नाहीये. पोलीस आता त्यात विशेष रसही घेत नाहीयेत. एका विशिष्ट कारणासाठी आमच्या घरात आलेला हा गणराय निघून गेलाय. 

 बिल्डींगच्या गेटपासून आत गजर करत गणपती आणायचा. त्याची शास्त्रोक्त दीड दिवस पूजा करायची आणि नंतर पार्कींगमध्ये पाण्याची बादली भरून त्यात विसर्जन करायचं. पाणी झाडांना घालायचं अशा स्वरूपात ही मूर्ती आम्ही काही वर्षे पूजली. त्यावरून आमच्यावर टीकाही झाली. प्रश्नही विचारले गेले. पण त्या गणपतीवरची आणि त्यापेक्षाही ज्या कारणासाठी तो आणला त्या तत्वावरची आमची निष्ठा अजिबात ढळली नाही. माझ्या घरातल्या गणपतीने मी नैसर्गिक जलस्त्रोत खराब होऊ देणार नाही ही त्यामागची भावना होती. पण मूर्ती चोरणा-या त्या हातांना या कोणत्याही तत्वांची किंवा उदात्त हेतूची वगैरे पडलेली नसते. 800 ग्रॅम चांदी... बास पळवा... एवढा एकमेव हेतू मनात ठेऊन ते आमच्या बाप्पाला घेऊन गेले. 

ठिक आहे, माझ्या मनात हे तत्व कायम आहे. ते त्या गणरायालाही माहिती आहे. आमच्या घरात राहून राहून त्याला कंटाळा आला असेल त्यामुळे सध्या तो फिरायला बाहेर गेला असेल. पण तो परत येईल हा माझा विश्वास आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात त्या मूर्तीचं रूपडं जिवंत आहे. त्याचा स्पर्ष माझ्या हाताला नेहमीच जाणवत असतं. आमचा हेतू प्रामाणिक होता. तो त्याला माहिती होता. त्या हेतूलाच पुन्हा मूर्त रूप देण्यासाठी आमचा चांदीचा गणराय पुन्हा येईल. 

गणपती बाप्पा मोरया... 

Thursday, December 13, 2012

पहाटेच्या रंगांचं सौदर्य


मॉर्निंग शिफ्टसाठी चाललो होतो. मागच्या सीटवर खिडकीत बसलो होतो. शिळफाटा येईपर्यंत मित्रांशी गप्पा झाल्या. मग झोपावं की जागं रहावं असा विचार करता करता पाईपलाईनचा डोंगरी रस्ता क्रॉस झाला. थंडीमुळे काच बंद होती. खिडकीतून सहज बाहेर पाहीलं. उजाडायला लागलं होतं. ड्रायव्हरने मस्त पंडीत अजित कडकडे यांच्या स्वरातले हरीपाठ लावले होते. ते ऐकत होतो. डोंगराच्या कडा दिसल्या.. बाहेर सुर्योदयाआधीचा पहाटेचा प्रकाश होता. आकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं..त्याला किनार लाभली होती डोंगरांच्या कडांची. खुप मस्त वाटलं..माझा मित्र अमोल जोशीने न्यूजरूम लाईव्ह या दिवाळी अंकात लिहीलेल्या कथेची आठवण झाली. त्यालाही अनेक वर्षांनी अशी सुंदर पहाट पाहायला मिळाली होती.. मला त्या कथेची आठवण आली.

खरच किती सुंदर वातावरण होतं.. बाहेरचं पहाटेच्या रंगांचं सौदर्य पाहात काच थोडी उघडल, थंड वारा अंगावर घेत होतो. कानावर हरीपाठ पडत होते. डोळ्यात ते रूप साठवल्यावर मग अलगद डोळे मिटले. डोळे मिटल्यावर मनाने वेग घेतला. मनाने पोचले माथेरानमध्ये.. लक्ष्मी ह़ॉटेलची आमची नेहमीची ठरलेली खोली. त्याच्या समोर असणारी सुंदर बाल्कनी, आणि तिथून दिसणारा समोर पसरलेला गार्बट हील. माथेरानमध्येही आत्ता अशीच पहाट फुलत असणार. गार्बट माथेरानच्या पश्चिमेला आहे त्यामुळे तिथे थोडा कमी प्रकाश असणार, हा विचार करत असताना खरचं नाकात माथेरानचा सुंदर वास आला. हे क्षण अनुभवतो न अनुभवतो तोच मी अचावक माझ्या गावाला वाईला पोहोचलो.. वाईतही आळीमध्ये अशीच सुंदर पहाट फुलत असेल. आत्या राहायची त्या वाड्यात आम्ही राहायला जायचो. तिथे वाड्याबाहेर कृष्णाबाईच्या उत्सवाची लगबग सुरू होती.. पालखी येणार म्हणून पहाटेपासूनचं संपूर्ण आळी स्वच्छ झाली होती. बाहेर सडे घातले होते.. रांगोळ्या काढल्या होत्या.. कानावर हरीपाठ पडत होते.. नाकात वाईचा वास आला.. वाईच्या थंड पहाटेचा अनुभव घेतो न घेतो तोच वाई जवळच्या मेणवलीच्या घाटावर पोहोचलो. पहाटेच्या प्रकाश होता. कृष्णाबाईच्या पाण्यावर धुक्याचं आच्छादन होतं.. बाळं नावाचे पक्षी पाण्याच्या जवळून घिरट्या घालत होते.. समोर शेतात ऊसाचा फड धरला होता.. घाटावर बसून तिथल्या पहाटेचा आस्वाद घेतो तेवढ्यात पुन्हा घरात पोहोचलो.. सातवीत होतो.. सकाळचे पावणेसहा झाले होते. बाबांनी रेडिओ लावला होता.. सुरूवातीला वंदेमातरम् झालं.. मग आकाशवाणीचं म्युझिक, मग बाबांनी मला उठवलं.. त्यानंतर रेल्वेवृत्त, मग आजचे बाजारभाव,मग चिंतन हाच चिंतामणी आणि त्यानंतर मग भक्तीगीतं.. त्यातही आर एन पराडकरांची दत्ताची गाणी.. त्या वेळापत्रकावर इथे आमची शाळेची आवराआवर. सहा चाळीसची बस पकडून शाळेत गेलो. रेडीओवर त्यानंतर काय लागतं माहिती नाही.. कानावर हरिपाठ पडतच होते...

मनाने प्रचंड वेग घेतला.. एमआयडीसी ते डोंबिवली ही बस पकडायच्या ऐवजी मी पोहोचलो एकदम लांबपल्ल्याच्या गाडीत. गाडी चालली होती भोपाळला.. मी चाललो होतो एसएसबीला(एसएसबी म्हणजे सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड, थोडक्यात आर्मीसाठीचा इंटरव्ह्यू,युपीएससीची सीडीएस पास झाल्यावर द्यावी लागणारी परिक्षा), माझं रिझर्वेशन वेटींगवरच अडलं..मग दाराजवळ पांघरूण गुंडाळून रात्रभऱ खाली बसून प्रवास, त्यातच पहाट झाली. गाडी मस्त वेगात चालली होती. भुसावळ जाऊन साधारणतः गाडी एमपीमध्ये शिरली होती.. पहाटेचा गार वारा झोंबत होता.. प्रवास संपतच नव्हता.. कानावर हरीपाठ येत होते.. त्यानंतर भोपाळला पोहोचेन असं वाटत असताना मी मात्र मनाने पोहोचलो अलाहाबादला.. पहिली एसएसबी.. प्रचंड दडपण, फक्त साडेचार टक्के रिझल्ट लागला होता.. माझ्या बॅचमध्ये भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ३० मुलं होती.. पहाटे सहा वाजात नाश्ता करून साडेसहा वाजता आम्ही फॉलइन करून उभे.. एक ग्रुप टेस्टींग ऑफीसर मेजर मेहता पुढे कशा टेस्ट असतील याची माहिती देत होता... त्या ऐकताना परत प्रचंड दडपण आलं.. कानावर हरीपाठ पडतच होते..
ते दडपण ओसरत नाही तोवर अचानक पोहोचलो वैष्णोदेवीला.. रात्री रांगेत उभं राहून दर्शन केलं होतं.. पावणेपाचला वरती भैरोबाबाच्या मंदिरात पोहोचलो.. तिथे दर्शन घेतलं. उजाडायला लागणार होतं.. समोर लांब बर्फाच्छादीत शिखरांवर पहिली सुर्यकिरणं पोहोचून तिथे सोनं तयार झालं होत... थंड वातावरण. तिथला वास नाकात रेंगाळला.. तो वास घेतो न घेतो तोवर अचानक मी एकदम मागे गेलो... वय वर्ष दहाच्या आत.. पुण्याला आमच्या काकांकडे भिडे वाड्यात आम्ही राहायला जायचो... सातनंतर झोपलेलं काकांना चालायचं नाही.. अंथरूणावर पडलो होतो... पहाट होत होती. खालच्या प्राजक्ताच्या फुलांचा सुवास येत होता.. वाड्यात दुसऱ्या मजल्यावर शास्त्रीय गायिका मंजिरी आलेगावकर राहायची. त्यावेळी ती कर्वे होती. तिचा रोजचा पहाटेचा रियाझ सुरू झाला होता.. पहाटेच्या वातावरणात शास्त्रीय संगीताचे सूर.. आजही ते आठवलं की डोळ्यात पाणी येतं.. कानावर हरीपाठ पडतंच होता...

काय होत होतं.. माझं मलाच कळत नव्हतं... अचानक आठवलं अरे आज १२ डिसेंबर बरोबर ३ वर्षांपूर्वी अशाच एका सुंदर पहाटे मी आंघोळीच्या आधी खुर्चीवर बसलो होतो. आई ताई आणि वहिन्यांनी मला हळद लावली होती.. लग्नाची तयारी सुरू झाली होती.. काही जण चिडवत होते.मग आवरंलं.. आणि आम्ही हॉलमधे पोहोचलो.. गाणी लावली होती. कानावर हरीपाठ पडत होते...


आमच्या गाडीला एकाने कट मारला.. गाडी पटकन थांबली. दचकून डोळे उघडले.. पाम बिचरोडवर नेरूळ क्रॉस होत होतं... हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..कानावर स्पष्ट आवाज आला. ज्ञानोबांनी सांगितलेला हरीपाठ मला फार आवडला.. मनाचा वेग किती असतो हे ज्ञानदेवांनी सांगितलं होतं. त्याचा अनुभव आला. पहाट किती सुंदर असते हे त्यातून दिसलं. अनेक पहाटे आपण पाहिल्या होत्या.. पण त्यांचं सौदर्य तेव्हा कळलं.. मन केवढी भरारी मारून आलं होतं.. वायुवेग काय होता हे कळलं.. मग विचार सुरू झाले. झेवियर्समध्ये आम्हाला शिकवायला कवी महेश केळुसकर होते.. रेडीओ या माध्यमाविषयी त्यांनी आम्हाला शिकवलं होतं.. त्यावेळी 'पहाट' ही गोष्ट त्यांनी अक्षरशः उच्चारातून दाखवला होता..त्यावेळपासून पहाट आवडायला लागली होती. पण का आवडली पहाट.. दिवसाच्या प्रत्येक वेळेत काहीतरी उत्तम आहेच की.. मग पहाटचं का... पु. लं. नी म्हटलंय एखादी गाण्याची मैफल जागवून घरी परतताना अचानक भेटते ती पहाट.. खरंच आयुष्यातल्या काही पहाट अशाच भेटल्या...दिवाळीच्या दिवशी घडवून आणलेला दिवाळी पहाटेचा कार्यक्रम नाही.. तर अशा अवचित भेटलेल्या पहाटेंनी अशा अनेक दिवाळ्या मी जगलो होतो हे त्यादिवशी कळलं. मात्र प्रत्येक पहाटेत एक साम्य होतं.. प्रत्येक पहाट ही कसली तरी सुरूवात होती.. म्हणून ती आवडली होती.. काही तरी सुरू करण्याचा आनंद असतोच की.. हरीपाठ कानावर पडतचं होते.. आता सूरही यायला लागले..

Thursday, August 16, 2012

मी पाहीलेला मुख्यमंत्री


एमए (पोलिटीकल सायन्सच्या )दुसऱ्या वर्षी विद्यापिठामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला जायला मिळतं.. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनतर्फे राज्यातल्या सर्वच विद्यापिठातून पोलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याची संधी मिळते. मुंबई विद्यापीठाच्या आमच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभागातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात मलाही संधी मिळाली. राज्यशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्षात चालणारा संसदीय लोकशाहीचा कारभार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची चांगली संधी या अभ्यास दौऱ्यात मिळते. या दौऱ्यावर जाण्यासाठी खूप आकर्षण होतं.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ( आर.आर. पाटील, त्यांची खुप क्रेझ होती तेव्हा) भेटणार, इतरही मंत्री, विरोधी पक्षातली मंडळी, अरूण गवळी ( त्यावेळी नुकताच आमदार झाला होता) हे सगळे पाहता येणार म्हणून प्रचंड उत्सुकता होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभाहातली भाषणं, तिथला गदारोळ अनुभवता, पाहता येणार म्हणून खुप उत्सुकता होती. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.. विलासरावांचं काल (14 ऑगस्ट 2012) या दिवशी निधन झालं. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी झालेलं बोलणं याची खुप आठवण आली. त्यासाठी ही पोस्ट टाकावीशी वाटली.

6 डिसेंबर 2005ला आम्ही नागपूरला उतरलो.. 5 तारखेपासूनच अधिवेशनाला सुरूवात झाली होती. 7 तारखेपासून खऱ्य़ा अर्थाने आमच्या अभ्यास दौऱ्याला सुरूवात झाली.  विधान परिषदेच्या सभागृहात आमचे वर्ग होत. सकाळी आठ ते अकरा असे लेक्चर असे. या तीन तासात एक किंवा दोन वक्ते येत. तर 7 तारखेला ओरिएंटेशन होतं.. ओरिएंटेशनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही ज्येष्ठ मंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्य सचिव आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सचिव असे अनेक मान्यवर आमच्यासमोर बोलणार होते. विलासराव त्यावेळी मुख्यमंत्री, आर. आर. आबा उपमुख्यमंत्री, नारायण राणे विरोधी पक्षनेते, विलास पाटील मुख्य सचिव होते. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढ्या जवळून पाहीलं होतं. पांढरा सदरा, त्यावर त्यांच स्पेशल जॅकेट, कपाळावर आलेल्या बटा, आणि एकदम “विलासी” हास्य असं पेपर किंवा टीव्हीत पाहीलेलं त्यांचं रूप आम्ही जवळून पाहात होतो. अनेकांची भाषणं झाली. त्यानंतर नारायण राणे बोलले. आणि सगळ्यात शेवटी विलासराव बोलायला उभे राहीले.. पहिल्या काही वाक्यात, विद्यार्थ्यांना शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर त्यांनी एकदम राजकारणालाच हात घातला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांतला फरक काय असतो ते समजावून देताना त्यांनी अचानक नारायण राणेंकडे नजर टाकली आणि पुन्हा छद्मी हसत जोरदार टाँट मारला.. विलासराव म्हणाले , “नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत की यावेळीही जनतेने त्यांच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपदच टाकलंय. आणि आमच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद... ” विलासरावांच्या या उदगाराने आम्ही सगळे फक्त हसले. राण्यांचा चेहरा पडला होता. तरीही उसनं हसू चेहऱअयावर ठेऊन तेही हसले, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात विलासरावांच्या या वाक्याची बातमी झाली होती.. त्यामुळे आम्हीही खुष.. आपल्यासमोर मुख्यमंत्री काल बोलले त्याची बातमी पेपरमध्ये छापून आली.. क्या बात है...

त्यानंतर नियमीत सत्र सुरू झाली.. तीन ते चार दिवसांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली. त्यानुसार दुपारी बारा साडेबाराच्या सुमाराला आम्ही त्यांच्या केबिनबाहेर जाऊन बसलो. पाच मिनिटात आम्हाला आत सोडलंही.. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची केबिन, विद्यार्थी वयात प्रचंड आकर्षणाचा विषय. केबिनमध्ये एक भलंमोठं टेबल होतं.. त्यामागे खुर्षी.. त्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख बसलेले. वर्णन सेम.. पांढरा कुडता. त्यावर त्यांचं स्पेशल जॅकेट.. कपाळावर आलेल्या बटा..आणि चेहऱअयावर विलासी हास्य... मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर चार चार खुर्च्यांच्या चार रांगा.. एकदम शेवटच्या रांगेत आम्हाला बसवलं.. पहिल्या रांगेत दोनजण बसले होते.. बहुतेक प्रिंटवाले पत्रकार असावेत. त्यांच्याशी विलासरावांनी काहीतरी चर्चा केली.. मग ते दोघे निघून गेले.. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाहीलं.. बाजूच्या पीएला विचारलं.. विद्यार्थी.. कोणती युनिव्हर्सिटी.. पीएने सांगितलं मुंबई विद्यापीठ... पुन्हा एकदा विलासी हास्य.. विलासरावांचा पहिला प्रश्न.. काय मुंबई विद्यापीठ. चार मुली.. दोन मुलगे.. मुलींच संख्या जास्त दिसत्ये...आम्ही थंड.. मग त्यांनी आम्हाला पुढच्या रांगेत येऊन बसायला सांगितलं. पहिल्या रांगेत 4 मुली बसल्या. दुसऱ्या रांगेत मी आणि माझा मित्र महेश दाभिळकर आणि आमच्या मॅडम मेघा देवळे होत्या.. विलासरावांना मग मॅडमनी एमएची थोडीशी माहिती दिली.. कोणते पेपर आहेत. कशी लेक्चर्स चालतात. आत्तापर्यंत अभ्यासदौऱयात काय काय झालं.. इत्यादी.. त्यानंतर विलासरावांनी आम्हाल प्रश्न विचारायला सांगितले.. आम्ही परत थंड. कोणाला प्रश्नच सुचेनात.. विलासराव हसले.. काय मुंबई विद्यापीठ.. प्रश्नच पडत नाहीत की काय.. मग देवळे मॅडमनी आमची बाजू सांभाळली.. मुख्यमंत्र्यांना पाहून मुलं बुजली आहेत असं सांगत त्यांनी आमची बाजू सांभाळली.. विलासराव हसले.. म्हणाले साहाजीकच आहे.. शेवटी आमच्यातून अनुया वर्टीने पहिला प्रश्न विचारला.. त्याचं उत्तर विलासरावांनी दिलं.. मग मला थोडा जोर आला.. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला.. त्यावेळी एनरॉनची वीज खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.. त्यावर एमएच्या मुंबईच्या वर्गात चर्चाही झाली होती.. त्यावरून मी प्रश्न विचारला.. माझा प्रश्न होता.. एनरॉन प्रकरणावरून राज्यात पुढे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतील आणि दुसऱ्या राज्यात गुंतवणूक करतील अशी शक्यता आहे का, यामुळे राज्याचं नुकसान आहे.. असा मी प्रश्न त्यांना विचारला.. विलासरावांनी त्याचंही आम्हाला समजेल असं उत्तर दिलं.. स्वतःच्या भूमिकेचं समर्थनही केलं.. आणि एनरॉनच्या निमित्ताने युतीलाही कोपरखळ्या मारल्या.. अजून दोन तीन प्रश्न झाले.मग ठरल्याप्रमाणे आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला मिळाले.. 

Mumbai University Students with CM Vilasrao Deshmukh
प्रचंड एक्साईटेड वातावरणात आम्ही बाहेर पडलो.. ग्रेट आज आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो हा आनंद आणि भारलेपणा घेऊन आम्ही बाहेर पडलो...

त्यानंतर एका वर्षात मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलो.. त्यांच्याशी पुन्हा बोलायची संधी मिळाली ती क्रिकेटच्या निमित्ताने..ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि मग एमसीएचे अध्यक्ष असताना आम्ही त्यांचे विविध विषयावर फोनो घ्यायचो.. त्यावेळी त्यांना फोन करायला मिळायचा..

विलासराव यकृताच्या आजाराने गेले. मी विदयार्थी असताना त्यांच्या रूपात आम्हाला राज्याचा मुख्यमंत्री पहायला मिळाला.. त्याचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की मुख्यमंत्री हा शब्द उच्चारला की आजही मला डोळ्यासमोर पांढरा कुडता, स्पेशल काळं जॅकेट, कपाळावर केसांच्या बटा आणि चेहऱ्यावर विलासी हास्य असलेले विलासरावच आठवतात... 

Wednesday, February 8, 2012

माझी अशीच एक पिशवी होती....

काही गोष्टी अशा असतात की आपण त्या का करतो हे कधीच कळत नाही. त्या गोष्टी आत्ता आपल्याला आवश्यक असतातच असं नाही. पण तरीही त्यांची आठवण येत राहते. आत्ता त्या गोष्टी हातात मिळाल्या तरीही त्यांचा उपयोग शुन्य असतो. तरीही त्या गोष्टींची आठवण पुसता पुसली जात नाही.. असं सगळं कंफ्युजिंग मी का लिहीत असेन असा विचार मी स्वतः करतोय. पण खरोखर या वाक्यांसारखाच मी पण एका गोष्टीसाठी कन्फ्युज झालोय. खरोखर माझ्याकडे एक अशीच पिशवी होती. साधी पांढरी प्लॅस्टीकची पिशवी होती. आता मी विचार केला तर कशासाठी ती माझ्याकडे होती मला आठवत नाहीये. मात्र जेव्हा ती पिशवी होती तेव्हा तिचं मोल माझ्यासाठी खुप जास्त होतं.

माझ्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून ते इयत्ता पाचवीपर्यंत मी डोंबिवली पश्चिमेला मयुर बिल्डींग इथे रहायचो. त्या काळात ती पिशवी माझ्याकडे होती. नेहमी मी ती गॅलरीत टांगून ठेवलेली असायची. ती पिशवी माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी होती. शाळेत येताजाता रस्त्यात दिसेल ती पडलेली निरूपयोगी वस्तू उचलायची मला सवय होती. लॉटरीची तिकीटं, संगमरवरी दगड, पट्ट्याचं बक्कल, कपड्यांची बटणं, वाळूतले रंगीत पांढरे दगड, वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपले, असल्या काय काय वस्तू त्या पिशवीत असायच्या. त्यातही त्यातले संगमरवरी दगड मला फार आवडायचे. मला वाटतं आमच्या बिल्डींगजवळ कोणीतही घरात रिनोव्हेशन केलं होतं. त्यातले टाकून दिलेले छोटे आयताकृती संगमरवराचे तुकडे मी जमवले होते. त्या संगमरवरावरचं राखाडी डिझाईन, त्याच्या चार बाजूंपैकी एका बाजूचा मऊ गुळगुळीत स्पर्ष, इतर तीन भागांचा खरखरीत स्पर्ष मी कधीच विसरू शकत नाही. तेल लावल्याने उरलेले तीन भाग गुळगुळीत होतील असं वाटल्यामुळे मी रोज त्या भागांना तेल लावून ठेवायचो. वाळूत मिळालेले पांढरे दगडही तेला बुडवून ठेवायचो. मला कळत नाही तेव्हा असं काही तरी का करावलं वाटायचं.. ती पिशवी माझी प्रॉपर्टी होती. अतिषय आवडती होती. त्यात अनेक निरर्थक वस्तू होत्या. आत्ता त्या निरर्थक वाटतात, पण तेव्हा मला त्या अतिषय आवडायच्या. हे असलं काही का जमवावसं वाटतं देव जाणे...

ती जागा आम्ही सोडली आणि डोंबिवली ईस्टला एमआयडीसीत ऋतुजा सोसायटीत रहायला आलो. ती पिशवी जुन्याच जागेत राहीली. आता तर एमआयडीसीतूनही आम्ही नव्या जागेत रहायला आलोय. पण अजूनही ती गॅलरीत अडकवलेली माझी पिशवी मला विसरता येत नाहीये.

Wednesday, June 15, 2011

एका नाईट शिफ्टचा प्रवास....

नाईट शिफ्ट तुम्ही अनेकदा केली असेल. नाईटसाठी घरातून निघताना प्रचंड कंटाळा आलेला असतो. निघताना कामावरून परतणारी मंडळी आपल्याला विचारतात, “ अरे वा नाईट वाटतं..” आपण त्यांना हो.. काय करणार असं म्हणून हसून उत्तर देतो.. स्टेशनवरही आपण प्रवाहाच्या विरूद्ध चालत आहोत याची जाणीव होते. आपली गाडी येते, आपण अगदी रिकाम्या गाडीत बसतो.. गाडी सुरू होते.. मजल दर मजल करत आपण ऑफीसमध्ये पोहोचतो. आणि गपगुमान कामाला लागतो.. असा एक सर्वसाधारणपणे आपला नाईटशिफ्टचा प्रवास होतो.

पण आज नाईटला जाताना मी अत्यंत सुंदर प्रवास अनुभवला.. अचानक, काहीही ध्यानीमनी नसताना अतिषय तृप्त प्रवास झाला.. नेहमीसारखा कंटाळलेल्या वातावरणात ठाण्यापर्यंत आलो. माझं ऑफीस सीबीडी बेलापूरला आहे त्यामुळे मला ठाण्याला गाडी बदलावी लागते. ठाण्याला पनवेल गाडीत बसलो. रात्रीची १०.५० ची पनवेल असल्यामुळे रिकामीच होती. सरळ विंडो मिळाली. त्यामुळे गाडी सुरू होईपर्यंत सुखावलो होतो. गाडी निघायला पाच मिनिटं होती. झोप आणायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. मग कानाला इयरफोन लावला आणि मोबाईलवर गाणी ऐकायला सुरूवात केली. सुरूवात झाली ती हरीहरन यांच्या गझलांनी.. पहिलीच गझल सुरू झाली ती गुलो में रंग भरे, खरं म्हणजे ही गझल मेहंदी हसन यांची.. ती हरीभाईंच्या आवाजात माझ्याकडे आहे.. गुलो में रंग भरे, बादे नौ बहार चले... वा.. क्या बात है..

गुलो में रंग भरे, बाद नौ बहार चले,
चले भी आओ, के गुलशन का कारोबार चले..

गझल ऐकताना अचानक डोळे मिटले गेले, गाडी सुरू झाली... सगळं विसरायला झालं.. गुलो में रंग भरे पाठोपाठ सुरू झाली हरीभाईंच्याच धीरगंभीर आवाजातली...
हवा का जोर भी काफी बहाना होता है..
अगर चराग किसी को जलाना होता है..

बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता.. थंड तुषार चेहऱ्यावर उडत होते. डोळे उघडवत नव्हते. थंड वारा आणि पावसाचे तुषार चेहऱ्याला सुखावत होते. सुंदर सारंगी, कडक तबला आणि त्याला संतूर आणि बासरीची उत्तम साथ अशी हरीभाईंची जबरदस्त मैफल रंगली.

हमने इक शाम चरागो से सजा रखी है
शर्त लोगो ने हवाओ से लगा रखी है..

एकामागोमाग एक गझला सुरू झाल्या.. दिलनशीनमधली हमने काटी है तेरी याद मे राते अक्सर... त्यानंतर काश मधली झुम ले हस बोल दे प्यारी अगर है जिंदगी... त्यानंतर हाझीरमधली मरीज इश्क का जिया ना जिया..त्याला हरीभाईंना मिळालेली झाकीरभाईंची तुफान साथ... या दोघांनाही काही ठिकाणी वरचढ ठरणारी संतूरची साथ.. वेड लावून गेली. पावसाच्या तुषारांमुळे चेहरा संपूर्ण भिजला होता. पाणी उडतं म्हणून माझ्या बाजूचा माणूस वैतागला होता.. तो बहुदा नंतर कुठे तरी उतरून गेला.. पण मला अजिबात डोळे उघडवत नव्हते. काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधेपे तेरा सर होता.. वा क्या बात है.. नेरूळ ते सीबीडी या टप्प्यात या गझलेने धुंद केलं. हरीभाई बेस्ट की त्यांना साथ करणारी सतार बेस्ट की इलेक्ट्रीक गिटारवर वाजलेलं फ्युजन नावाजावं असा प्रश्न पडला. काय सुंदर ताळमेळ.. सीबीडी स्टेशन आलं. काय करणार ऑफीसला जायचं असल्यामुळे उतरावं लागलं...

उसने उलझा दिया दुनिया में मुझे,
वरना एक और कलंदर होता..

सीबीडीला उतरल्यावर इतर काहीही बोलण्याची ऐकण्याची इच्छा राहीली नाही.. हेडफोन काढून शांतपणे ऑफीसकडे चालत निघालो.. चाळीस मिनिटांपूर्वी आलेला कंटाळा, शीण, थकवा संपला होता.. रामदेव, त्याचं आंदोलन, क्रिकेट मॅच, भाजप, काँग्रेस, मुंडे असली सगळी जळमटं उडून गेली होती..

Wednesday, March 16, 2011

सेवाव्रत

या मुंबई शहरात अनेक लोक अनेक कारणांनी येतात. प्रत्येकाची या मुंबापुरीकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे शहर पूर्ण करतंय. एक गोष्ट इथं स्पष्ट केली पाहीजे हे शहर याचा अर्थ इथला समाज.

मुंबईत कोणीही उपाशी रहात नाही, प्रत्येकाला काम मिळतंच. त्याची हातातोंडाची गाठ पडतेच असं अभिमानाने म्हटलं जातं. त्यामुळे या शहराला जॉब हब असंही म्हणतात. जॉब मिळाला की सगळंच मिळतं जातं.. मुंबई सर्वांची गरज पूर्ण करते. पण याच मुंबईची अजून एक ओळख आहे. अद्ययावत वैद्यकीय मदत देणारी ही नगरी.. मेडिकल हब असं म्हणा ना.. त्यातही कँसर, हार्ट अशा असाध्य आणि किचकट रोगांवर इलाज हे मुंबईचं वैशिष्ट्य. राज्यातून, देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक रूग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. केईएम, टाटा, वाडीया, जसलोक, कूपर, कँसर रिसर्च सोसायटी अशी अनेक हॉस्पिटल्स इथे उभी आहेत. रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर इलाज सुरू आहेत. या हॉस्पिटल्सचे खरोखर उपकार आहेत. पण तेवढचे उपकार आहेत इथल्या काही सामाजीक संस्थांचे..

अशाच एका संस्थेत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. नाना पालकर रूग्ण सेवा समिती या संस्थेचं रूग्ण सेवा सदन परळला आहे. रूग्ण सेवा समितीद्वारे केलं जाणारं काम पाहीलं आणि थक्क व्हायला झालं. मुंबईत उपचारासाठी आल्यावर रूग्णांवर तर हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. पण या रूग्णांच्या नातेवाईकांचं काय. त्यांनी मुंबईत रहायचं कुठे. तर अशा रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी रूग्ण सेवा सदन सारखी वास्तू उभी आहे. आज तब्बल दहा मजल्यांची ही वास्तू आहे. तब्बल ७६ रूग्ण, प्रत्येक रूग्णांचे दोन नातेवाईक अशा एकूण २२८ जणांच्या भोजन निवासाची सोय इथे होते. एका खोलीत दोन रूग्ण आणि त्यांचे दोन दोन सहकारी अशी व्यवस्था केली जाते. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह पंखे, सोलरद्वारे गरम पाणी, लॉकर अशी सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे अतिषय नाममात्र दरात ही सोय केली जाते. इथे नाममात्र म्हणजे अक्षरशः नाममात्र असं म्हटलं पाहीजे. कारण त्यापेक्षाही कमी दरात सोय करायची असं म्हटलं तर म्हणजे फुकट असंच म्हटलं पाहीजे.. आणि तशी अक्षरशः फुकट सोयही इथे अतिषय गरीब आणि गरजूंचीही केली जाते हे नमुद केलंच पाहीजे.



नाना पालकर हे संघाचे एक विचारवंत कार्यकर्ते. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. एवढ्या कमी आयु्ष्यात नानांनी सेवाकार्य हेच आपलं जीवनध्येय आहे असं मानून संघकार्यासाठी जीवन समर्पित केलं. उत्तम लेखक, कवी, कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, ल अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. रूग्णसेवेविषयी त्यांना आत्यंतिक निष्ठा आणि आस्था होती. १९६७ मध्ये नाना पालकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर त्यांच्या सहयोगींनी १९६८ साली नाना पालकर स्मृती समितीची स्थापना केली.

या संस्थेने चालवलेले उपक्रम हे खरोखर गरीबांसाठी उपकारक ठरले आहेत. १० मजली रूग्ण सेवा सदनाची आपण ओळख वर करून घेतली आहेच. याशिवाय नाना पालकर चिकित्सालय, डॉ. ग. कृ. पाटणकर क्षय रोग चिकित्सा केंद्र, गोखले डायलेलिस केंद्र, तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी, मधू औषध पेढी, प्रभाकर कुटूंब कल्याण केंद्र, रूग्णमित्र हे वैद्यकीय मासिक असे अनेक मोठे उपक्रम राबवले जातात. याशिवाय रायगड जिल्ह्यात कुपोषित आजारी मुले व माता पोषक आहार, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव कुपोषण निर्मुलन, माटुंगा आणि औरंगाबाद इथे लिथोस्ट्रीप्सी केंद्र, टाटा हॉस्पिटलसमोरचं डॉ. शिवानंद लवेकर चिकित्सालय, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मोघालय इथे सेवा भारती आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम आणि सहउपक्रम नाना पालकर स्मृती समितीतर्फे राबवले जातात.

डायलेसिस सेंटर, लिथोस्ट्रीप्सी सेंटर, किंवा पॅथोलॉजिकल लॅब चालवणे यात नवल ते काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की या सर्व ठिकाणी हे सर्व उपचार आणि तपासण्या अतिषय नाममात्र दरात आणि काही केसेसमध्ये फुकटसुद्धा दिल्या जातात. आज मुंबईत डायलेसिसचे दर काय आहेत याची माहिती करून घ्या.. या संस्थेमध्ये डायलेसिस अवघ्या ३५० रूपयात केले जातात. विशेष म्हणजे २००४ पासून हे दर एक रूपयानेही वाढलेले नाहीत. सदनात १२ मशिन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण ३६ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळतो. याशिवाय तुलसियानी स्पेश्यालिटी लॅबोरेटरीमध्ये एड्स एचआयव्ही संबंधीत सी.डी.३, सी.डी. ४ तपासण्या अवघ्या २५० रूपयात केल्या जातात. याशिवाय बाकीच्या सर्व तपासण्या अत्यंत नाममात्र दरात केल्या जातात. मधु औषध पेढीमार्फत आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करू न शकणाऱ्या रूग्णांना औषधोपचार, आहार, फळे, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, जेवण, कपडे यांसाठी लागणारी मदत दिली जाते.


याशिवाय या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध रूग्णालयात बालरूग्णांच्या मातांना पोळी भाजी, बाल रूग्णांसाठी नाश्ता, फळवाटप केलं जातं. वाडिया, जेजे, नायर, सायन, पॅराप्लेजीक सोसायटी केईएम, रिसर्च सोसायटी, शिवडी, हाजी बच्चुअली रूग्णायल, क्षयरोग रूग्णालय या हॉस्पिटल्सना आर्थिक मदत दिली जाते. या हॉस्पिटल्समध्ये रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लागणारी आहार आणि औषध विषयक मदत दिली जाते.





या संस्थेचा मदतीचा आवाका पाहून थक्क व्हायला झालं. स्वतः नाना पालकरांसोबत काम केलेल्या ज्येष्ठांच्या हातात आज या संस्थेची धुरा आहे. श्री. छत्रे, श्री बोपर्डीकर, श्री. खरे, डॉ. अजित फडके यांच्या समर्थ हातात या संस्थेचं कार्य निस्पृहपणे सुरू आहे. यातल्या श्री. छत्रे आणि श्री. बोपर्डीकर यांच्याबरोबर ही संस्था पाहण्याचा योग आला. श्री. छत्रे स्वतः ८३ वर्षांचे आहेत. तर श्री. बोपर्डीकर ७५ वर्षांचे आहेत. पण या दोघांचा कामाचा आवाका, रूग्ण सेवेची कळकळ, आणि संस्थेवर असलेलं प्रेम पाहून 'तेथे कर माझे जुळती' अशी मनाची अवस्था होते.

काही व्यक्ती आणि संस्थांच्या चांगुलपणावर समाज टिकून आहे असं म्हणतात, त्यातली एक संस्था पहायचा योग आला एवढं नक्की..

Thursday, March 3, 2011

पोटासाठी वाटेल ते..

टीचभर खळगीसाठी माणसाला काय काय करावं लागतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मायानगरी मुंबईत नशिब काढायला आलेल्यांनी तर काय काय धंदे केलेत, काय काय पचवलंय याचे तर अगणित किस्से आहेत. त्यात आता आणखी एक किस्सा.. या फोटोतली ही मॉडेल आहे सोफिया हयात..

मुळची पाकिस्तानी मॉडेल. मुंबईत आपलं करियर घडवण्यासाठी ती आलीये. तशी ती ब्रिटीश नागरिक, पण जन्माने पाकिस्तानी. ही मॉ़डेल, टीव्ही एँकर, एँक्ट्रेस आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बॉलिवूडचा तुफान पैसा तिला खुणावतोय. पण 'इये बॉलिवूडचीये नगरी' बस्तान बसवायचं म्हणजे फार कठीण काम आहे. अनेकजणी आल्या आणि गेल्या. या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्यात. त्यांना स्ट्ररगलर्स असं गोंडस नाव देण्यात आलं. त्या स्ट्रगलर्सच्या यादीत आता सोफियाचंही नाव सामील झालंय. तर सांगायचा मुद्दा असा की आता सोफियाचा हा फोटो पहा.. या फोटोत ती भारताला प्रमोट करत आहे.

भारताला प्रमोट का.. तर आता तिचा पहिलावहिला भारतीय सिनेमा म्हणजेच बॉलिवूड चित्रपट येतोय. त्याचं नाव आहे 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.. हा चित्रपट फारसा कोणी ऐकलेला नाही. पण सोफियाची बॉलीवूडमध्ये जम बसवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानी मुलगी भारताची झेंडा गालावर कोरून, स्वतःच्या उघड्या पाठीवर किंवा कंबरेवर भारताला शुभेच्छा गोंदवून, भारताला चिअर करत्ये..वा.. पोटासाठी काय काय करावं लागतं.. एक पाकिस्तानी मुलगी अशा भारताला शुभेच्छा देत आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या कलाकारांना व्हीसा नामंजूर करतोय. राहत फतेह अली खानच्या प्रकरणानंतर पाकिस्ताननं भारतात जाणाऱ्या कलाकारांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घातलंय.

पण एवढं सगळं झालं तरी सोफिया भारताला चिअर करत्ये. क्या बात है.. पोट काय काय करायला लावतं..

Monday, February 7, 2011

हम दोनो- रंगीन..

रविवार साजरा करायचा होता. तीन सिनेमे नजरेत होते. ये साली जिंदगी, दिल तो बच्चा है जी, किंवा भागमभाग.. यापैकी कोणत्या सिनेमावर पैसे फुकट घालवायचे याचा विचार सुरू होता. सकाळी सकाळी मोहम्मद रफींची सीडी लावली होती. माझ्याकडे रफिसाहेबांची जवळपास दोनशे अडीचशे गाणी आहेत. त्यापैकी 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही' हे तुफान आवडतं गाणं. ते गाणं ऐकताना नेहमी वाटायचं की मोठ्या स्क्रीनवर हे गाणं ऍकायला कसं वाटेल. त्याचवेळी आठवलं अरे आपण तीन दिवसापूर्वीच हम दोनोच्या रंगीत आवृत्तीची बातमी केलीय. लगेच निर्णय झाला.. वर उल्लेख केलेले तीनही चित्रपट बाद.. डोंबिवलीत पूजा टॉकीजला दुपारी साडेतीनचा हम दोनो रंगीन चा शो आहे.. तोच पहायचा.. बाबांना विचारलं पिक्चर चांगला आहे का.. बाबा म्हणाले त्यांनी कॉलेजमध्ये बंक करून तीन वेळा हा चित्रपट पाहीलाय. गाणी ऐकण्यासाठी आम्ही पिक्चर पहायचो.. क्या बात है ! अभी ना जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्ला तेरो नाम.. अशी एकसे बढकर एक गाणी मोठ्या स्क्रीनवर ऐकण्याची इच्छा अनावर झाली.


आयत्यावेळी थिएटरवर पोचलो तरी तिकीटं मिळतील याची खात्री होती त्याप्रमाणे तिकीट मिळाली. पिक्चर पहायला अगदी थोडी माणसं आली होती. टिव्हीवर पन्नासवेळा लागलेला हा सिक्सटीजमधला सिनेमा पहायला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आलेले खरोखर दर्दी आले होते. माझे आई बाबा मी आणि बायको असे आम्ही एकच पूर्ण फॅमिलीवाले होतो. बाकी लोकांत बहुतेकांनी साठी ओलांडलेली होती. त्यातले सगळेजण देव आनंदला पुन्हा एकदा स्क्रीनवर पहायला आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चॉकलेट हिरोला पहाण्यासाठी लकाकी आली होती. एक आजी आजोबा हातात हात घालून आले होते. थिएटरमध्ये आत सोडल्यावर सिनेमा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनीटात सर्व आजी आजोबात ओळखपाळख नसताना संवाद रंगला.. देव आनंद तेव्हा काय दिसायचा.. त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षाच नव्हती.. तीन तास तू फक्त पडद्यावर दिस.. रफीसाहेबांचा आवाज.. देव आनंदला त्यांचाच आवाज कसा सूट व्हायचा..जयदेवने संगीत देताना काय कमाल केली.. असे अनेक विषय निघाले. प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह संचारला होता. आणि तेवढ्यात सुरू स्क्रीनवर सुरू झाला म्हाताऱ्या देव आनंदचा प्रेक्षकांशी साधलेला संवाद.. नमश्कार.. मै देव आनंद बोल रहा हू.. हम दोनो मेरी आखरी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म.. असं त्याने सांगायला सुरूवात केली. त्यानंतर मै जिंदगी का साथ निभाता चला गयाची लायटरची सुंदर धून सुरू झाली. आणि मग ते अलगत फेड आऊट होत स्क्रीनवर आलं सेन्सॉर सर्टीफिकेट.. त्यावर मुद्दाम लिहीलं होतं.. हम दोनो रंगीन... सिनेमास्कोप.. क्या बात है..


मी ही चित्रपट याआधी पाहिला नव्हता.. त्यामुळे मला सगळाच नवा होता.. पण तळ्याकाठी बसलेल्या रंगीत देवआनंदला पाहिल्यावर थिएटरमध्ये एक अलगद चित्कार ऐकायला आला.. पहिल्या जवळपास दोन अडीच सीनमध्ये एकही डॉयलॉग नाही.. फक्त देव आनंद, साधना आणि लायटरची धून.. त्यानंतर माझं तुफान आवडतं गाणं सुरू झालं. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज मोठ्या स्क्रीनवर मी प्रथमच ऐकला होता. त्याआधी टायटल प्ले होताना सुद्धा.. स्क्रीनवर सिंगरच्या खाली मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले ही तीन नावं मी माझ्या आयुष्यात प्रथमच वाचली.. घरात बसून या सगळ्यांच्या सीडी ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यांची नावं स्क्रीनवर पहाणं यात मोठा फरक आहे. तो अनुभव मला घ्यायचा होता. तो मिळाला.. अभी ना जाओ छोडकर ऐकताना खुप सुंदर वाटतं. थिएटरच्या साऊंड सिस्टीमवर हे गाणं फक्त रफीसाहेबांचा आवाज, अत्यंत सुंदर वाजणारा धा तीं तीं ताक धीं धीं वाजणारा तबला आणि हार्मोनियम, आणि इतर थोडकी वाद्य.. आणि संतूरची कमाल.. हा एक तुफान अनुभव होता. वाद्यांच्या आवाजात हरवून जाण्याच्या या काळात रफीसाहेबांचा गोड गंभीर आवाज ऐकण्यासाठी थिएटरचीच सिस्टीम हवी..

मला एक न उलगडलेलं कोडं आहे.. रफीसाहेबांनी देव आनंदला आवाज दिला, दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि राज कपूर वगळता इतरांनाही दिला. पण प्रत्येक वेळी गाणं ऐकताना त्यांनी त्या त्या हिरोला सूट करेल अशाच आवाजात गाणं गायलय. हे कसं ते कळत नाही. देव आनंदला दिलेल्या आवाजाची ढब आणि शम्मी कपूरला दिलेल्या आवाजाची ढब वेगळी कशी.. ही काय जादू हा देवमाणूस करतो.. हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत या.. हर फिक्र को धुए मै उडाता चला गया म्हणणाला कॅप्टन आनंद अप्रतिम..

पिक्चर संपला. बाहेर आलो.. तेव्हा काही बोलायचं नव्हतं. सिक्सटीजमध्ये लोकांना देव आनंदने का वेड लावलं. तू फक्त पडद्यावर तीन तास दीस.. अभिनयाची अपेक्षा नाही.. मोहम्मद रफी हे काय रसायन आहे. फक्त गाणी ऐकण्यासाठी आम्ही तीन वेळा हा चित्रपट पाहिला असं बाबा का म्हणाले. याचं रहस्य उलडगडलं. यही कहो गे तुम सदा के दिल अभी नही भरा.. असं खट्याळपणे म्हणणारी आशा भोसले की साधना.. एक जादू मनावर घेऊन बाहेर आलो.. अजून त्यातून बाहेर येता येत नाहीये..

Sunday, September 5, 2010

नभः स्पर्शं दीप्तम्



भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजवर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. या घेतलेल्या जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्याही. सचिनच्या या खांद्याने आजवर भारतीय क्रिकेट संघाला कितीवेळा तारलं याचं मोजमाप केलं तर धाप लागेल. सचिनच्या या खांद्यांनी भारताची कित्येकवेळा लाज राखली. सचिनने अनेक जबाबदाऱ्या घेत भारताची मान उंचावलीही.

तब्बल २० वर्ष भारताचा युनिफॉर्म अंगावर चढवून सचिन लढला. त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. अगदी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवरचं जेव्हा शंका घेतल्या जाऊ लागल्या तेव्हाही सचिन डळमळला नाही. एका सैनिकासारखा लढला. त्याच्या याच गुणांचा, कार्याचा गौरव करण्यासाठी भारताच्या वायुदलाने त्याला मानद ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केलंय. सचिन या वीराचा गौरव करण्यासाठी वायुदलाने हा निर्णय घेतला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.

एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक जेव्हा सचिनच्या खांद्यावर त्याच्या रँक लावत होते त्यावेळी सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. एक वेगळेच समाधान या क्रिकेट योग्याच्या चेहऱ्यावर होतं. अनेक शतकं, अनेक विक्रम त्याने सहज मोडले. तरिही असे भाव कधीही त्याच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावरची रेष न रेष त्याच्यातल्या देशभक्ताचं दर्शन घडवत होती. प्रचंड श्रम केल्यावर अधिकारी व्यक्तीकडून किंवा आपल्या आदर्शाकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जी भरून पावल्याचा आनंद होतो, तो आनंद सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सचिन आणि देशभक्ती यांचं न तोडता येण्यासारखं नातं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सचिन भारतासाठी मैदानात घाम गाळतोय. या पदाला पोहोचण्यासाठी त्याने आपलं त्याआधीचं आयुष्य खर्ची घातलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मैदानावर खेळत राहतो. वैयक्तीक स्वार्थाचा विचारही करत नाही. विक्रमासाठी खेळत नाही, विक्रम होत राहतात, हा खेळत राहतो.


हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणारा हा पहिला भारतीय फलंदाज. त्याच्या या प्रकारावरून वादही झाले. प्रत्यक्ष न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र तेंडुलकर हरला नाही. त्याच्या हेल्मेटवरचा झेंडा निघाला नाही. अर्थात झेंडा लावण्यासाठी सचिन तेंडुलकरचं मस्तिष्क हीच उत्तम जागा आहे हे प्रत्येकजण मान्य करेल.

ग्रुप कॅप्टन म्हणजे एअर फोर्समधली पाचव्या क्रमांकाची ऑफिसर पोस्ट. साधारणतः २४ वर्ष सर्व्हिस झालेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीतला कर्नल. सैनिकाला त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान एक तत्व शिकवलं जातं. प्रथम माझा देश, त्यानंतर माझं युनिट, त्यानंतर माझे सहकारी आणि त्यानंतर मी या उतरत्या क्रमाने एक सैनिक आपलं काम करत राहतो. म्हणजे युद्धात प्रथम तो आपल्या देशाचं हीत पाहतो. त्यानंतर आपल्या रेजिमेंट/ युनिटचं हीत पाहतो. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांचं हीत पाहतो आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. सचिनच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाका.. सचिनने याच तत्वावर आपली कारकिर्द घडवलीय हे आपल्या लक्षात येईल.

अंगावर अनेक जखमा या शूर सैनिकाने देशासाठी झेलल्या आहेत. सचिनला आत्तापर्यंत झालेल्या जखमांचा हिशेब काढा. टेनिस एल्बो, पायाचा घोटा, टाच, पाठ अशा अनेक अवयवांना दुखापत झाली आहे. तरिही प्रत्येकवेळी तो यातून बाहेर आला. या सगळ्या जखमा, दुखापती त्याला देशासाठी खेळताना झाल्या. तरिही प्रत्येकवेळी त्याच्याच खांद्यावर संघाची मदार राहिली. जबाबदारी टाकताना कोणी विचारलं नाही हा खांदा किती दुखतोय ते...

२००० साली भारतीय क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं. तेव्हाही सगळ्या आशा या सचिनच्या खेळावरच होत्या. सचिन मैदानात आहे तोवर बुकींचे आणि मॅचफिक्सर्सचे घाणेरडे इरादे यशस्वी होणार नाहीत असा विश्वास क्रिकेटप्रेमी बाळगून होते. सचिनने काही प्रमाणात हा विश्वास सार्थही ठरवला.

असा हा सचिन. प्रत्येक कर्णधाराला वाटेल असा एकमेवाद्वितीय आपल्या संघात असावा. वायुदलानं ही संधी साधली. आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतला.
ब्राव्हो सचिन... तू एक निव्वळ क्रिकेटपटू नाहीस, तू एक महान सैनिक आहेस. वायुदलानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय.

Thursday, July 1, 2010

शामू मावशी

आजवर मी माझ्या कोणत्याही नातेवाईकांवर काहीही लिहीले नाही. नातेवाईकांवर लिहावं असं कधी वाटलंच नाही. पण १ जुलै ललै या तारखेला स्वतःला रोखू शकलो नाही. शामू मावशी जाऊन बरोबर एक वर्ष झाले. माझे कोणतेही विधी, कर्मकांडं करू नका अशी तिची इच्छा असली तरी तिची आठवण रहावी यासाठी माझ्या परीने मी हा प्रयत्न करतोय.

शामू मावशी ही माझ्या आईची मावशी. म्हणजे नात्याने माझी आजी. पण मी कधीही तिच्याकडे आजी म्हणून पाहिलेच नाही. नात्याने ती आजी असली तरी मी तिला मावशी म्हणायचो. पण मावशी म्हणालो तरी तिच्याकडे मी मावशी म्हणूनही कधी पाहिले नाही. म्हणजे ती माझी नक्की कोण होती हा ही एक मोठा प्रश्न आहे. मी स्वतः जेव्हा विचार करतो तेव्हा मलाही हे कोडं कधीच सुटत नाही. काहीही असो ती मला खुप हवीहवीशी होती. माझ्या आईची ती मावशी असली तरी ती आईपेक्षा वयाने फार मोठी नव्हती. बऱ्याच गोष्टी शामू मावशीला सांगितल्या की आईला हलकं वाटायचं. माझ्या मते आंबयं हे आईचं आजोळ आणि शामू मावशीचं माहेरचं गाव हा दोघींचा समान धागा असावा. शामू मावशी होती हा आईला मोठा आधार होता. महिन्यातून एकदा तरी शामू मावशीला भेटायचंच हे आईने ठरवलं होतं. अर्थात या दोघींचं नातं हे मावशी भाची पेक्षा मैत्रिणींचं होतं.

मला आठवतं लहानपणी बिनधास्त रहायला जावं असं ठिकाण म्हणजे शामू मावशीचं घर. फार लहान असताना मला अंधुक आठवतंय मी विनायक काकांना फार घाबरायचो. पण नंतर मी बिनधास्त जायचो. एवढचं नाही शामू मावशीसुद्धा मला हौसेने रहायला घेऊन जायची. हा कटकट करतो, याची जेवणाची नाटकं आहेत, हा रड्या आहे अशी कोणतीही वाक्य एकट्या शामू मावशीने कधीही म्हटली नाहीत. मी ही आवडीने जायचो कारण मला माहित होतं माझी सगळी नाटकं इथे पुरवली जायची. एकटी शामू मावशी नाही तर किशोर आणि टिनूही अक्षरशः कौतुकं करायचे. टिनू, शामू मावशीची मुलगी, ही माझी मावशी, माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी होती. त्यामुळे तिच्याशी माझं चांगलं जमायचं. टिनूने लहानपणी खुप लॉटरीची तिकीटं गोळा केली होती. त्याशिवाय सुरेशमामाकडून तिने शेअर्सचे फॉर्म, आणि तत्सम कागदपत्र जमवली होती. ती कागदपत्र घेऊन आम्ही दुपारी बँक बँक खेळायचो. आणि संध्याकाळी मंगल सोसायटीत टिनूच्या मैत्रिणींबरोबर विशांमृत किंवा लंगडी. टिनूच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मैत्रिणींच्यातही मी खेळलो आहे, नाटकालाही गेलो आहे. कोजागिरीला मंगल सोसायटीत धमाल कार्यक्रम असायचा. त्यासाठी शामू मावशी मला घेऊन जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री कितीवेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो आहे याची गणतीच नाही.

मंगल सोसायटीत जाणं हा खरोखर एक आनंद होता. एकतर टिनू आणि माझं कधीही भांडण व्हायचं नाही. शामू मावशीच्या घराबरोबरच शेजारी टिकेकरांकडेही लाड व्हायचे. त्यामुळे मी नेहमीच तयार.

लहानपणी मला कोणी हुशार मुलांचे दाखले दिले की मला राग यायचा. पण टिनूचे पेपर बघणं मला फार आवडायचं. टिनू तुफान हुशार होती. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क, सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकसमान अक्षरात, एकही काठ न मरता, मुद्देसूद, देखणा, काळ्या शाईपेनाने अतिषय स्वच्छ पेपर टिनू लिहायची. अजिबात अतिषयोक्ती करत नाही. पण टिनूचा पेपर तिच्या वर्गात आदर्श पेपर म्हणून दाखवला जायचा. त्याशिवाय टिनूची चित्रकला. विविध रंगांच्या शेड्स ती उत्तम तयार करायची. मंगल सोसायटीत बाहेरच्या खोलीत असलेल्या कपाटावर टिनूच्या चित्रांच्या गठ्ठा होता. तो बघणं हे माझं आवडतं काम.. आणि खरं सांगतो, हुशार मुलांच्या आया जसं वागतात तसं शामू मावशी एकदाही वागली नाही.

शामू मावशी स्वतः खरोखर निटनेटकी होती. तिची तब्येत नाजूक होती. त्यामुळे दुपारी किती जेवायचं, कोणत्या भाज्या खायच्या, त्या कशा करायच्या याचं सगळं प्रमाण ठरलेलं होतं. एवढच कशाला किती बोलाय़चं, आवाज केवढा ठेवायचा हे देखील तिने ठरवून घेतलं असावं. जेवण झाल्यावर दुपारी भाजलेली, हळद लावलेली बडिशोब आणि त्यानंतर पत्ते खेळायला तिला आवडायचं.

शामू मावशी खुप कणखर होती हे आज विचार केल्यावर मला जाणवतं. विनायक काका गेल्यावर मुलांना मोठं करणं त्यांचे संसार उभे करणं हे तीने फार कसोशीने केलं. मला आठवतं विनायक काका गेले त्यावेळी ती डोंबिवली फिवरसारख्या भयानक आजारातून उठली होती. त्यानंतरही काही वर्षांनी तिला आतड्यांचा त्रास जाणवू लागला होता. टिनू त्यावेळी कॉलेजमध्ये होती. त्यावेळी माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिच्या आतड्याचा काही भाग काढला होता. हे तिच्या जिवावरंच दुखणं होतं. त्यावेळीही तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या दुखण्यातून मार्ग काढला. माझी आई म्हणते ती खुप धीराची होती. तिची इच्छाशक्ती प्रबळ होती.

सातवीत असताना माझा क्लास टिळकनगर शाळेच्या जवळ पाध्येबाईंच्या घरी दुपारी असायचा. एमआयडीसीत घरी येऊन पुन्हा क्लासला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सातवी आणि आठवीत असताना रोज शाळा सुटल्यावर दोन तास शामू मावशीकडे जायचो. खरोखर हक्काने जायचो.

कॉलेजला जायला लागल्यावर मात्र मी तिथे फारसा जाईनासा झालो. महिन्यात एखादीच चक्कर टाकायचो. कारण मलाही माहित नाही. खरोखर वेळ नसावा, मला शिंगं फुटली असावीत किंवा इतर काहीही असो. पण आठवण मात्र यायची.

आज शामू मावशी नाही. तिला जाऊन तब्बल एक वर्ष झालं. तिची आठवण मात्र येते. टिनू दुबईला असली, शामू मावशी तिथे नसली तरी त्या घराची ओढ अजूनही आहे. चारू(मामी) अजिबात या दोघींची उणीव जाणवू देत नाही. तरीही तिथे शामू मावशी नाही ही जाणीव अस्वस्थ करते. नात्याने माझी आजी, म्हणायचो मावशी, तरीही ती माझी नक्की कोण होती या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही.