Thursday, August 16, 2012

मी पाहीलेला मुख्यमंत्री


एमए (पोलिटीकल सायन्सच्या )दुसऱ्या वर्षी विद्यापिठामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला जायला मिळतं.. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनतर्फे राज्यातल्या सर्वच विद्यापिठातून पोलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याची संधी मिळते. मुंबई विद्यापीठाच्या आमच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभागातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात मलाही संधी मिळाली. राज्यशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्षात चालणारा संसदीय लोकशाहीचा कारभार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची चांगली संधी या अभ्यास दौऱ्यात मिळते. या दौऱ्यावर जाण्यासाठी खूप आकर्षण होतं.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ( आर.आर. पाटील, त्यांची खुप क्रेझ होती तेव्हा) भेटणार, इतरही मंत्री, विरोधी पक्षातली मंडळी, अरूण गवळी ( त्यावेळी नुकताच आमदार झाला होता) हे सगळे पाहता येणार म्हणून प्रचंड उत्सुकता होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभाहातली भाषणं, तिथला गदारोळ अनुभवता, पाहता येणार म्हणून खुप उत्सुकता होती. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.. विलासरावांचं काल (14 ऑगस्ट 2012) या दिवशी निधन झालं. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी झालेलं बोलणं याची खुप आठवण आली. त्यासाठी ही पोस्ट टाकावीशी वाटली.

6 डिसेंबर 2005ला आम्ही नागपूरला उतरलो.. 5 तारखेपासूनच अधिवेशनाला सुरूवात झाली होती. 7 तारखेपासून खऱ्य़ा अर्थाने आमच्या अभ्यास दौऱ्याला सुरूवात झाली.  विधान परिषदेच्या सभागृहात आमचे वर्ग होत. सकाळी आठ ते अकरा असे लेक्चर असे. या तीन तासात एक किंवा दोन वक्ते येत. तर 7 तारखेला ओरिएंटेशन होतं.. ओरिएंटेशनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही ज्येष्ठ मंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्य सचिव आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सचिव असे अनेक मान्यवर आमच्यासमोर बोलणार होते. विलासराव त्यावेळी मुख्यमंत्री, आर. आर. आबा उपमुख्यमंत्री, नारायण राणे विरोधी पक्षनेते, विलास पाटील मुख्य सचिव होते. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढ्या जवळून पाहीलं होतं. पांढरा सदरा, त्यावर त्यांच स्पेशल जॅकेट, कपाळावर आलेल्या बटा, आणि एकदम विलासी हास्य असं पेपर किंवा टीव्हीत पाहीलेलं त्यांचं रूप आम्ही जवळून पाहात होतो. अनेकांची भाषणं झाली. त्यानंतर नारायण राणे बोलले. आणि सगळ्यात शेवटी विलासराव बोलायला उभे राहीले.. पहिल्या काही वाक्यात, विद्यार्थ्यांना शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर त्यांनी एकदम राजकारणालाच हात घातला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांतला फरक काय असतो ते समजावून देताना त्यांनी अचानक नारायण राणेंकडे नजर टाकली आणि पुन्हा छद्मी हसत जोरदार टाँट मारला.. विलासराव म्हणाले , नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत की यावेळीही जनतेने त्यांच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपदच टाकलंय. आणि आमच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद... विलासरावांच्या या उदगाराने आम्ही सगळे फक्त हसले. राण्यांचा चेहरा पडला होता. तरीही उसनं हसू चेहऱअयावर ठेऊन तेही हसले, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात विलासरावांच्या या वाक्याची बातमी झाली होती.. त्यामुळे आम्हीही खुष.. आपल्यासमोर मुख्यमंत्री काल बोलले त्याची बातमी पेपरमध्ये छापून आली.. क्या बात है...

त्यानंतर नियमीत सत्र सुरू झाली.. तीन ते चार दिवसांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली. त्यानुसार दुपारी बारा साडेबाराच्या सुमाराला आम्ही त्यांच्या केबिनबाहेर जाऊन बसलो. पाच मिनिटात आम्हाला आत सोडलंही.. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची केबिन, विद्यार्थी वयात प्रचंड आकर्षणाचा विषय. केबिनमध्ये एक भलंमोठं टेबल होतं.. त्यामागे खुर्षी.. त्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख बसलेले. वर्णन सेम.. पांढरा कुडता. त्यावर त्यांचं स्पेशल जॅकेट.. कपाळावर आलेल्या बटा..आणि चेहऱअयावर विलासी हास्य... मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर चार चार खुर्च्यांच्या चार रांगा.. एकदम शेवटच्या रांगेत आम्हाला बसवलं.. पहिल्या रांगेत दोनजण बसले होते.. बहुतेक प्रिंटवाले पत्रकार असावेत. त्यांच्याशी विलासरावांनी काहीतरी चर्चा केली.. मग ते दोघे निघून गेले.. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाहीलं.. बाजूच्या पीएला विचारलं.. विद्यार्थी.. कोणती युनिव्हर्सिटी.. पीएने सांगितलं मुंबई विद्यापीठ... पुन्हा एकदा विलासी हास्य.. विलासरावांचा पहिला प्रश्न.. काय मुंबई विद्यापीठ. चार मुली.. दोन मुलगे.. मुलींच संख्या जास्त दिसत्ये...आम्ही थंड.. मग त्यांनी आम्हाला पुढच्या रांगेत येऊन बसायला सांगितलं. पहिल्या रांगेत 4 मुली बसल्या. दुसऱ्या रांगेत मी आणि माझा मित्र महेश दाभिळकर आणि आमच्या मॅडम मेघा देवळे होत्या.. विलासरावांना मग मॅडमनी एमएची थोडीशी माहिती दिली.. कोणते पेपर आहेत. कशी लेक्चर्स चालतात. आत्तापर्यंत अभ्यासदौऱयात काय काय झालं.. इत्यादी.. त्यानंतर विलासरावांनी आम्हाल प्रश्न विचारायला सांगितले.. आम्ही परत थंड. कोणाला प्रश्नच सुचेनात.. विलासराव हसले.. काय मुंबई विद्यापीठ.. प्रश्नच पडत नाहीत की काय.. मग देवळे मॅडमनी आमची बाजू सांभाळली.. मुख्यमंत्र्यांना पाहून मुलं बुजली आहेत असं सांगत त्यांनी आमची बाजू सांभाळली.. विलासराव हसले.. म्हणाले साहाजीकच आहे.. शेवटी आमच्यातून अनुया वर्टीने पहिला प्रश्न विचारला.. त्याचं उत्तर विलासरावांनी दिलं.. मग मला थोडा जोर आला.. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला.. त्यावेळी एनरॉनची वीज खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.. त्यावर एमएच्या मुंबईच्या वर्गात चर्चाही झाली होती.. त्यावरून मी प्रश्न विचारला.. माझा प्रश्न होता.. एनरॉन प्रकरणावरून राज्यात पुढे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतील आणि दुसऱ्या राज्यात गुंतवणूक करतील अशी शक्यता आहे का, यामुळे राज्याचं नुकसान आहे.. असा मी प्रश्न त्यांना विचारला.. विलासरावांनी त्याचंही आम्हाला समजेल असं उत्तर दिलं.. स्वतःच्या भूमिकेचं समर्थनही केलं.. आणि एनरॉनच्या निमित्ताने युतीलाही कोपरखळ्या मारल्या.. अजून दोन तीन प्रश्न झाले.मग ठरल्याप्रमाणे आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला मिळाले.. 

Mumbai University Students with CM Vilasrao Deshmukh
प्रचंड एक्साईटेड वातावरणात आम्ही बाहेर पडलो.. ग्रेट आज आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो हा आनंद आणि भारलेपणा घेऊन आम्ही बाहेर पडलो...

त्यानंतर एका वर्षात मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलो.. त्यांच्याशी पुन्हा बोलायची संधी मिळाली ती क्रिकेटच्या निमित्ताने..ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि मग एमसीएचे अध्यक्ष असताना आम्ही त्यांचे विविध विषयावर फोनो घ्यायचो.. त्यावेळी त्यांना फोन करायला मिळायचा..

विलासराव यकृताच्या आजाराने गेले. मी विदयार्थी असताना त्यांच्या रूपात आम्हाला राज्याचा मुख्यमंत्री पहायला मिळाला.. त्याचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की मुख्यमंत्री हा शब्द उच्चारला की आजही मला डोळ्यासमोर पांढरा कुडता, स्पेशल काळं जॅकेट, कपाळावर केसांच्या बटा आणि चेहऱ्यावर विलासी हास्य असलेले विलासरावच आठवतात... 

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Superb, Amit! Parva phone var athvani tajya zalya hotya, ithe ankhi spasht zalya. Kharech ahe...to advitiya anubhav hota. Vilasrao=CM he equation-ach janu dokyat ajun basle ahe. Ashok Chavan, Prithviraj Chavan tya image madhe basatach nahit. RIP, Vilasrao...despite Adarsh.

    P.S.: Thx for remembering and mentioning my question here. For old times sake, my question was about medical tourism...another hot topic back then. He gave quite a smart answer to that one too.

    ReplyDelete
  3. व्वा... खरंच मस्त जमून आलाय ब्लॉग...

    ReplyDelete
  4. Amit, khup sundar. Mi study karit astanna phone batmi milali ki Vilasrao gele, agodar Vishwas basala nahi. Natar congress cya block yuth precident ca phone aala, tevha samjale te Satya ahe he mi samjun gelo. Dole Panavale Hote Vilasraosathi. Tya 2 divast Jevan hi gele nahi. Sarkhe Mi & Pariwarche sarv TV samor basun hote. Ase watat Hote Ki mazya Pariwaracac Ek Sadasya Gela. AntyaSanskar chya Divashi Konic Jevale Nahi. Mi tyanchya Nagpur Bhetiche Photo pahat Sunn Zalo hoto. Yaveli Tuzi, Mahesh, Anuya,Swati sarvanchi Khup Athawan aali. Ase VILASRAO Aatta Hone Nahi ............

    ReplyDelete