Monday, February 15, 2010

उत्सव निसर्गाचा

हिरवी शामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लवफुलवंती जुई शेवंती
शेंदरी आंबा सजे मोहरू
खेड्यामधले घर कौलारू...

ऊन पाऊस या चित्रपटातलं हे ग.दि. माडगूळकर यांचं गाणं.. हे घर कौलारू मी कधीच अनुभवलं नव्हतं. कोंकणात कोणाकडे पाहूणा म्हणून गेल्यावर मी अशी घरं पाहिली होती. मात्र आपल्या गावाला, आपल्या घरात जाणार आहोत ही भावना त्यात नसायची. माझी पत्नी वैशालीचं मूळ गाव रत्नागिरी जिल्हात देवरूखजवळ निवे हे आहे अशी मला फक्त माहिती होती. मात्र प्रत्यक्ष तिथे जाण्याची वेळ आली नव्हती. महाशिवरात्रीला निव्यात सिद्धेश्वराचा उत्सव असतो अशी माहिती कळली होती. वैशालीच्या वडिलांनी जाहिर केलं आपण सगळे निव्याला उत्सवाला जाणार आहोत. नवपरिणीत दांपत्याला सिद्धेश्वराचं दर्शन घडवणं आणि त्याचबरोबर राजवाड्यांचं मूळ गावही दाखवणं हे दोन्ही उद्देश होतेच. कोकणात जायचं असल्यामुळे आनंदाने निघालो. निव्यात पोहोचेपर्यंत कल्पना येत नव्हती तिथे काय असेल याची. मात्र खरंच सांगतो, परतताना पाय निघत नव्हता...

संगमेश्वरवरून देवरूखकडे आम्ही वळलो आणि गाडीतल्या यच्चयावत राजवाड्यांना गावाची ओढ लागायला लागली. ती ओढ पाहणे आणि अनुभवणे हे काम आम्ही भिडे करत होतो. निवे गावात शिरायच्या आधी गावाच्या वेशीवर आमच्यावरून नारळ ओवाळून टाकण्यात आला. तेव्हापासून आमचं निव्यातलं वास्तव्य खऱ्या अर्थाने सुरू झालं. घरी पोहोचल्यावर पुन्हा एकदा दृष्ट, मग चहापाणी, सुरूवातीच्या गप्पा झाल्यावर आगामी दोन दिवसात हे गाव आपल्याला निश्चित लळा लावणार हे लक्षात आलं.

सुंदर घर, त्याच्या भोवताली सारवलेलं स्वच्छ अंगण, बाजूचा गोठा, मागे वाडी, त्यापलीकडे मिरची, पावटा, चवळीचं शेत. त्याच्यापलीकडे वाहणारा पर्ह्या... त्याचं स्वच्छ, थंड पाणी.. त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा शेत, शेतात उगवलेला हिरवी पावटा, हे सगळं पहात असताना चवळीची कोवळी शेंग खाण्यातली मजा मी त्यादिवशी अनुभवली. तेवढ्यात पर्ह्या पलीकडून हाळी ऐकू आली.. काय चाकरमान्यानू.... कधी आयलय.. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळतीला चाललेला सुर्यनारायण.. ही माझी आणि निव्याची पहिली ओळख. घरांच्या भोवताली शेतं की शेतांत असलेली घरं, निव्याचं वर्णन कसं करावं हे मला कळत नाही.

गावात महाशि़वरात्रीचं वातावरण रंगायला लागलं होतं. रात्री घरात बसून टाळ, मृदुंगाच्या साथीने जोरदार भजन रंगलं. रोज लोकलमध्ये ऐकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं भजन कोकणात होतं असं ऐकलं होतं. त्याचा प्रत्ययही आला.
आजूबाजूला डोळ्यात बोटं घातली तरीही दिसणार नाही असा काळोख, थंड हवा आणि त्यात रंगलेलं भजन खरोखर अवर्णनीय असा माहोल होता. रात्री अंथरूणावर पडल्याबरोबर झोप लागली. सकाळ कधी झाली ते कळलंही नाही. आणि विशेष म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा रोजच्यासारखा थकवा अजिबात नव्हता.

नेहमीसारखा उत्सव पार पडला. आरत्या, भजनं, महाप्रसाद, रूद्रपठण, हे ऐकताना फार प्रसन्न वाटलं. सिद्धेश्वराचं मंदिरही अत्यंत सुंदर ठिकाणी आहे. मंदिराच्या भोवताली किर्रर्र जंगल आहे. थोडं खाली उतरून गेलं की लहानसा पर्ह्या आहे. तिथे जंगली श्वापदं पाणी प्यायला येतात असं सांगतात. त्यातही पाय सोडून पाणी उडवण्याची मजा अनुभवली.

निव्यातली शांतता, पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ, तिथल्या गायी, तिथलं पाणी, शेतं, झाडं हे सगळं खरोखर वेड लावणारं. घरात बसून घेतलेली काजूबीयांची चव, निरसं दूध, भाजीचा फणस, पानात वाढली गेलेली पावट्याची उसळ, हातसडीचा तांदूळ, त्याचा वाफाळता दरवळ, सोबत खारातली मिर्ची, शेतात फिरताना चावलेली कोवळी चवळीची शेंग, गुलकंदाच्या गुलाबाचा सुवास, पर्ह्याच्या पाण्याचा थंडगार स्पर्श, कधीही न विसरता येण्यासारखा. या गोष्टींच्या प्रेमात पडण्यासाठी अजून एक मोठी गोष्ट कोणती सांगू... हे सगळं आपल्या घरातलं आहे, आपल्या जमिनीत पिकलंय ही भावना....
लहानपणापासून मला गाव नाही, त्यामुळे गावाचं महत्त्व काय असतं ते मला नक्कीच माहित आहे. ज्याला गाव आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त... ते सुख मला निव्याने दिलं.

चौकट तीवर बालगणपती,
चौसोपी खण स्वागत करती,
झोपाळ्यावर अभंग कातर,
सवे लागती कड्या करकरू...

Wednesday, February 3, 2010

फाळक्यांची फॅक्टरी

एक तुतारी द्या मज आणून,
फुंकीन मी ती स्वप्राणांनी

एक तुतारी दादासाहेब फाळके फुंकली आणि त्यातून उभं राहीलं एक विश्व. ज्या चित्रपटसृष्टीने भारतात कित्येक हातांना काम, बुद्धीला चालना, अभिनयाला व्यासपीठ, कलेला वाव, सौंदर्याचं कौतूक, आणि रसिकांचं अक्षरशः वेडाकडे झुकणारं प्रेम मिळवून दिलं त्या चित्रपटसृष्टीचं बीज भारतात दादासाहेब फाळके या अवलियाने रूजवले. इंग्रज राजवटीची तलवार, बुरसटलेल्या विचारसरणीत गुरफटलेला कधीही बदलण्याची इच्छा नसलेल्या समाजात चित्रपट तयार करणं, आणि तोही पहिला, हे भयंकर आव्हान होतं, अशक्यच गोष्टं होती. ती दादासाहेबांनी करून दाखवली. दादासाहेबांच्या या कर्तुत्वाची कथा चित्रपटाच्याच माध्यमातून मांडणं हे एक अजून आव्हान. ते परेश मोकाशी यांनी समर्थरीत्या पेललं. भारतात बनलेल्या पहिल्या चित्रपटाची जन्मकथा आणि दादासाहेब फाळक्यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी त्या चित्रपटाच्या जन्मासाठी सोसलेल्या वेणा त्यांचं थोरपण सांगून जातं.
चित्रपटाला कुठेही कंटाळवाणं, निराशावादी न करण्याचं मोठं आव्हान परेश मोकाशी यांनी पेललंय. कारण असे संघर्ष करून ज्या कलाकृती निर्माण होतात त्यावेळी असंख्य त्रास कलाकाराला आणि त्याच्या कुटूंबियांना सोसावा लोगतो त्यातून निर्माण होणारं कारूण्य दाखवून लोकांच्या डोळ्यातून पाणी सहज काढता येतं, पण त्यातून विनोद निर्मिती करूनही वास्तवाचं चित्रण समर्थरीत्या करता येतं हे मोकाशी यांनी सिद्ध केलं. दादासाहेब फाळक्यांच्या स्वभावातला तर्कटपणा, विक्षिप्तपणा दाखवतानाच दादासाहेब फाळक्यांना असलेली नाविन्याची, विज्ञानाची आवड आणि सतत काही तरी शोधून काढण्याची वृत्ती आणि त्यातून आलेला धीटपणा ही खरोखर खुप काही शिकवून जाते. असा हा चित्रपट प्रत्येकाने खरोखर पहावा असाच आहे.
ज्या चित्रपटातून एवढी अवाढव्य चित्रपटसृष्टी निर्माण झाली. हिंदी व्यतिरीक्त प्रत्येक मुख्य भाषेत चित्रपट निर्माण होतायत. याशिवाय चित्रपटसृष्टीशी काहीसी संलग्नता बाळगणारं फॅशन जगत आलं, रूजलं. त्यानंतर छोटा पडदा आला. आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. ही चित्रपट क्रांती निर्माण करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वाची ओळख आजच्या पिढीला परेश मोकाशी यांनी करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

Monday, January 11, 2010

अतुलनीय.....

नटरंग हा चित्रपट आणि त्यातली गाणी फारच जोरात सगळीकडे वाजत होती. 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' ही गाणी खरोखर वेड लावत होती. मात्र नटरंग पहायला जाण्याचं कारण वेगळं होतं. अतुल कुलकर्णीला पाहण्यासाठी हा चित्रपट
पहायचा होता. मी अगदी खरं सांगतो, याआधी कधीही अतुलला पहायचं म्हणून हौसेने मी कोणताही चित्रपट पाहिला नव्हता. यावेळी गोष्ट वेगळी होती.

अतुलने आपल्या विविध भुमिकांतून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आपोआप अपेक्षा निर्माण होतात. बहुतांश वेळा तो त्या पूर्णही करतो. यावेळच्या अपेक्षा अजून वाढल्या होत्या. सध्याचा जमाना हा हिरोंच्या मेक ओव्हरचा आहे. सलमान खान, शाहरूख खान, सैफ अली खान यांनी हा प्रयोग केला. मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानलाही याचा आधार घ्यावा लागला. मराठीत मात्र हिरोनी कधी मेकओव्हर केल्याचं आढळलं नव्हतं. मात्र अतुलने हा प्रयोग केला. नटरंगसाठी गुणा कागलकर हे व्यक्तीचित्र उभे करताना त्याने केलेले परिश्रम आपल्याला माहित आहेतच. त्यामुळे अतुलने काय
केलंय हे पहायचं होत आणि त्यासाठी चित्रपटाची तिकीटं काढली.

तमाशा आणि त्यातला नाच्या यांचं पुनरूज्जीवन करायचं आणि त्यांच्या आधारावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणायचं हे आव्हान आहे. ते पेलणारा नटही तसाच तगडा हवा. मुळात आत्तापर्यंत अतुलने साकारलेली विविध पात्र आवडली असली तरी अतुल आणि तमाशा हा काही मेळ मनात जमत नव्हता. मात्र मित्रांनो अतुलने जिंकलं. गुणा कागलकर हे एका नावाचं पात्र अतुलने चित्रपटात तीन रंगात रंगवलं आहे. पैलवान गुणा, स्टेजवरचा नाच्या गुणा आणि पडद्यामागचा शाहीर गुणा.. प्रत्येकवेळा त्याचा आवाज त्याचं बेअरींग त्यानं एवढं चांगलं सांभाळलं आहे. कधीही नाच्या आणि शाहीर यांची गल्लत होत नाही. अतुलला खरोखर सलाम..

अर्थात अतुलने आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तीरेखा आठवा. प्रत्येकवेळी त्याने केलेलं काम उत्तमचं झालं. रंग दे बसंती मधला
सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है म्हणणारा लक्ष्मण पांडे आठवतो. पांडेने असंचं आपल्याला वेड लावलं होतं. हिंदूत्ववादी नेता लक्ष्मण पांडे, आणि नंतर परिवर्तन झालेला मित्र लक्ष्मण पांडे सुंदर झाला होता. अगदी अमीरच्या डिज्जे एवढाच लक्ष्मण पांडेही लक्षात राहील असा होता.

रंग दे बसंती मधला अतुल सगळ्यांच्या लक्षात आला असेल तर आता जरा मागे या.. दहावी फ मधला विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक आठवतो. दंगेखोर दहावी फ तुकडीतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने जात शिस्त लावणारा आणि त्याच वेळी मूल्यवर्धक शिक्षण पद्धतीचं महत्त्व सांगणारा एक शिक्षक कुठेही कंटाळवाणा झाला नाही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनाचं जेवढं कौशल्य तेवढचं किंबहुना
त्यापेक्षा जास्त कौशल्य अतुलचं हे मान्य करायला हवं.

आता अजून थोडं आठवा, 'देवराई' हा चित्रपट आठवतो का.. फारसा गाजला नसला तरीही वेगळ्या पठडीतला चित्रपट म्हणून देवराईचं खुप कौतुक झालं. त्यातला मनाने खचलेला शेश हा तरूण अतुलने साकारलाय. गावागावातल्या माळरानातल्या झपाट्याने कमी होत चाललेल्या देवराया आणि शेशचं हळुवार मनं या दोन गोष्टी अतुलने दाखवल्या. या दोन गोष्टींची कशी सांगड त्याने घातली असेल हा प्रश्न पडला होता. अर्थात पुन्हा एकदा भावे आणि सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीचं कौतुक करावं की त्यांची संकल्पना जशीच्या तशी मांडणारा अतुल नावाजावा हा प्रश्न पडतो. पण मनाला विचाराल तर ती संकल्पनासमजून पडद्यावर साकारणारा अतुलंच श्रेष्ठ वाटतो.

याशिवाय 'हे राम' हा चित्रपट कमल हसनसाठी लोकांनी पाहिला पण या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मात्र अतुल कुलकर्णी घेऊन गेला. श्रीराम अभ्यंकर हे पात्र, त्याचे संवाद त्याचे डोळे, त्याचे विचार अतुलने मांडले आणि ते खरं म्हणजे मनात खुपले. फार भयानक असं ते पात्र अतुलने जबरदस्त मांडलं.
याशिवाय अतुलने वळूमध्ये साकारलेला स्वानंद गड्डमवार असो, किंवा चांदनी बारमधला पोत्या सावंत हा भाई असो. अतुलने प्रत्येकवेळी कौतुकाची थाप मिळवली आहे. मात्र अतुलचा गुणा कागलकर लक्ष्मण पांडे, दहावी फ मधले सर आणि देवराईतला शेश ही पात्र खरोखर अतुलनीय अशीच आहेत. हॅट्स ऑफ गड्या !!!

Saturday, January 9, 2010

मज लोभस हा इहलोक हवा...

सुट्टीत फिरायला कुठे जायचं हा विषय निघाला की अनेक ठिकाणं आपल्या डोळ्यांपुढे येतात. सिमला कुलू मनाली, नैनिताल मसूरी, राजस्थान, पंजाब ही उत्तर भारतातली ठिकाणं पाहून झालेली. मध्यभारतात जबलपूर, भेडाघाट यांचीही चलती आहे. दक्षिण भारतात केरळाला सर्वाधिक पसंती मिळते. मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर अनेक ठिकाणं भारतात आहेत. त्याचा शोध घेतला तर फार सुंदर पर्यटन अनुभव आपल्याला येऊ शकतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय.

लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी ठिकाणांची शोध मोहीम सुरू होती. हनिमुनर्सचं आवडतं ठिकाण म्हणजे केरळ.. पण केरळमध्ये नंतर फिरायला जा.. हनिमूनसाठी अजिबात नको ही सल्ला अनुभवी नातलगांनी दिला. बंगलोर मैसूर उटी कोडाई हा प्लॅन ठरत होता. मात्र बंगलोरमध्ये आता पाहायचं काय हा प्रश्न पडला. उत्तरेकडे जायचं नव्हतं. आणि परदेश खिशाला परवडणारा नव्हता... तेवढ्यात दोन ठिकाणं कळली.. वायनाड आणि कूर्ग ही त्यांची नावं ऐकल्यावर ही भारतात आहेत का हा प्रश्न पडला. भारतातच आहेत, दक्षिणेकडे आहेत, आणि खिशाला परवडतील अशीही आहेत हे कळल्यावर नेटवर माहिती वाचली. कूर्गचं वर्णन स्कॉटलंड ऑफ इंडिया असं केलं होतं. ते वर्णन ऐकलं. फोटो पाहीले आणि ठरवलं.... बसं... वायनाड आणि कूर्गलाच जायचं...

आता ही ठिकाणं कुठे आहेत ते तुम्हालाही सांगतो. कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला केरळ सीमेला लागून कूर्ग हा जिल्हा आहे. आणि त्यालाच जोडून केरळमध्ये वायनाड हा जिल्हा आहे....

साधारणतः आठ दिवसात ही दोन्ही ठिकाणं पाहून होऊ शकतात. थंड हवा, सदाहरीत जंगलांचा प्रदेश, कमी गर्दी, चांगले लोक या सगळ्याच गोष्टींमुळे एक चांगलं मधूचंद्राचं ठिकाण म्हणून या ठिकाणांकडे पाहता येईल.

प्रथम वायनाड आणि मग कूर्ग या क्रमाने ही ठिकाणं पाहणं सोयीचं ठरतं.
वायनाडला जाण्यासाठी कालिकतला जाणे आवश्यक आहे. कालिकतचं नाव आठवतं का.. आठवत नसेल तर इतिहासाच्या
पुस्तकात डोकवा. वास्को द गामा हा पोर्तुगिज व्यापारी कालिकत बंदरात उतरला असा उल्लेख तुम्हाला आढळेल. रेल्वे रिझर्वेशन चार्टवर मात्र कालिकत असा उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. कालिकतला रेल्वेखातं कोझिकोडे असं म्हणते. आणि प्रत्यक्ष कालिकत, कोझिकोडे या शहरातले नागरिक त्यांच्या शहराला कोळीकोड असं म्हणतात. असो.... नावात काय आहे.

कोकण रेल्वेमार्गे कोळीकोड स्टेशनला उतरलं की व्यापारी बाजारपेठ असलेल्या शहरातून मार्गक्रमण करताना आपला हिरमोड होऊ शकतो. मात्र थांबा एकदम हिरमुसू नका.. कोळीकोडपासून १३ किलोमीटरवर असलेला कप्पड बीच नक्की पहा. साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा हा बीच पाहून खरोखर मनं सुखावतं.. थोडी जाडसर पिवळ्या धमक रंगाची अतीस्वच्छ वाळू.. त्यावर येणाऱ्या हिरव्या जर्द लाटा पाहून मन सुखावतं. आणि हो! हा बीच पर्यटकांच्या यादीत नाही. त्यामुळे सगळा बीच आपलाच असल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्यानंतर कोळीकोडमध्ये खास केरळी पद्धतीचं जेवण घ्या. कोळीकोडमध्ये एक दिवसाचा मुक्काम करावा लागतो आणि तो घ्या असा आग्रहही आहे. दुसऱया दिवशी सकाळी वायनाडला जाण्यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते तीन तासांचा अवधी तरी आवश्यक आहे.

एक सल्ला देईन ही टूर प्लॅन करताना हॉटेल बुकींग्जबरोबर कोळीकोडलाच कारही ठरवून घ्या. कोळीकोड-वायनाड-कूर्ग अशी टूर एरेंज करणाऱया कारचं बुकींग मुंबईतूनही करता येतं.

कोळीकोडमधून निघाल्यावर शहरी भाग सोडल्यावर मलबार विभागाचं खरं सौदर्य दिसायला लागलं. उंचचं उंच डोंगररांगा, सदाहरीत जंगलं, त्यामुळे उत्तुंग जाड बुंध्याची झाडं असा हा परिसर तुम्हाला भुरळ घालायला सुरूवात करतो. पाऊस एकदातरी हजेरी लावून जातो. त्यामुळे जंगलाला नेहमी एक ओलसर हिरवेपणा असतो. आजूबाजूला मसाल्याच्या पदार्थांचा बगिचा आणि त्यातून वाट काढत जाणारी कार असा हा एकंदर सुंदर अनुभव. वळणं वळणं घेत वायनाडचा घाट चढायला सुरूवात करते. गच्च जंगलातून मार्ग काढणारा हा घाटरस्ता खरोखर श्वास रोखून धरायला लावणारा आहे. मात्र एकदा का घाट संपला की रस्ताच्या दुतर्फा सुरू होतात चहाचे मळे. टेकड्यांच्या उतारावर लागवड करण्यात आलेले चहाचे मळे, पावसाळी हवा, आणि त्यामधला गुळगूळीत रस्त्यावरचा प्रवास वेड लावतो.

वायनाडला रहाण्याची सोय जिल्हा मुख्यालय असलेल्या कलपेट्टा या शहरात होते. काही चांगली हॉटेल्स या शहरात आहेत. स्टार हॉटेल्सही आहेत.

वायनाडला फिरण्यासारख्या मुख्यत्वे जागा म्हणजे एडेक्कल केव्हज्, मिनमुट्टी फॉल्स, पोकोट्ट लेक आणि कोरोव्हा आयलंड्स. यातील एडेक्कल केव्हज आणि मिनमुट्टी फॉल्स तुम्ही एकाच दिवशी करू शकाल. साधारणतः सकाळी एडेक्कल केव्हज् करून दुपारी मिनमुट्टी फॉल्स पहाता येतील. अर्थात या दोन्ही ठिकाणी चांगल्यापैकी चालावं लागतं.


एडेक्कल केव्हजवर जाण्याचा डोंगरातला मार्ग आकर्षक आहे. याठिकाणी तुम्ही पुरातन काळात कोरलेली भित्तीचित्र पाहू शकता. विशेष म्हणजे ती अजूनही उत्तम स्थितीत आहेत. आणि नीट लक्ष देऊन पाहिल्यास त्यांचा अर्थही कळू शकतो.

एडेक्कल केव्हज वरून निघाल्यावर साधारणतः १३ किलोमीटर्सवर मिनमुट्टी फॉल्स आहेत. याठिकाणी तीनशे रूपये प्रवेश फी घेतात. मात्र प्रवेश फीकडे पाहू नका. त्याच फीमध्ये तुम्हाला गाईड दिला जातो. हा गाईड घेतल्याशिवाय मिनमुट्टी फॉल्सना जाता येत नाही. कारण साधारण एक दिड किलोमीटरचा सगळा रस्ता डोंगरातला आहे. त्यापेक्षाही विशेष म्हणजे आधी चहाच्या आणि नंतर कॉफीच्या मळ्यातून, अक्षरशः मळ्यातून चालत जावं लागतं. कॉफीच्या झाडाखालून वाकून जाण्याचा आनंद काही वेगळाचं. डोंगरातून बरीच चढउतार केल्यावर मग दिसतो तो रौद्रभीषण प्रपात.
अप्रतिम याशिवाय कोणत्याच शब्दाने या प्रपाताचं वर्णन होत नाही. वायनाडमधला तो दिवस नक्की लक्षात राहील कारण रात्री झोपताना सुद्धा तो मिनमुट्टी फॉल्सचा धीरगंभीर आवाज तुमच्या कानात घुमत राहील.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पोक्कोट लेकला जाणं योग्य. अत्यंत निसर्गरम्य अशा तीन टेकड्यांच्यामध्ये हा तलाव आहे. या तलावात बोटींगची व्यवस्था आहे. तलावाच्या चहूबाजूंनी तलावाला फेरी मारण्यासाठी मातीचा पक्का रस्ता आहे. त्याचा नक्की आनंद घ्या.. हनिमून टूरमधला सर्वोत्तम हनिमून स्पॉट असं मी याचं वर्णन करीन. तलावाच्या काठावर एक छोटेसे कँटीन आहे. तिथे होममेड चॉकोलेट्स आणि स्पेशल वायनाड फिल्टर कॉफीचा आनंद नक्की घ्या. त्या थंड हवेत केळ्याची भजीही सुंदर लागतात. त्याशिवाय विशेष केरळी वस्तू मिळणारं एक सुंदर दुकानही आहे. येथे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ, कॉफी, चहा आणि अनेक उत्तम स्थानिक पदार्थ मिळू शकतात.
पोक्कोट लेकवरून पाऊल निघत नाही. मात्र मित्रांनो कोरोव्हो आयलंड्सना जाण्यासाठी आपल्याला निघायचं आहे. आणि पल्लाही मोठा आहे.
कोरोव्हो आयलंड्स हा एक चमत्कार म्हटला पाहीजे. नदीमध्ये कमीतकमी पाच पावलं आणि जास्तीत जास्त एक किलोमीटर परिघ असलेली तब्बल ६४ बेटं आहेत. या प्रत्येक बेटावर आपण नदीतून चालत जाऊ शकतो. फक्त त्यासाठी कमरेएवढ्या पाण्यातून चालण्याची तयारी हवी. त्यासाठी जास्तीचे कपडे घेऊन चला, पण प्रत्येक बेट फिरून नक्की पहा. तिथून आपण पुन्हा कलपेट्टाला येऊ शकतो.


कलपेट्टामध्ये सुंदर अशा वेगळ्याच रंगीबेरंगी मिरच्या मिळतात. त्यांचा अप्रतिम तिखट स्वाद चाखायलाच हवा. त्याशिवाय कलपेट्टामध्ये अप्रतिम असा हलवा बनवतात. बदामी हलव्यासारखा दिसणारा हा हलवा चवीला अत्यंत सुंदर असतो. याशिवाय दालवडा आणि अप्पम हे अख्ख्या केरळचे ट्रेड मार्क पदार्थ. कलपेट्टातही छोट्या छोट्या हॉटेल्सवर हे पदार्थ सुंदर मिळतात.
वायनाडमधला मुक्काम सोडताना मित्रांनो खरोखर डोळे पाणावतात. केरळला गॉड्स ओन कंट्री का म्हणतात हे पटतं.

वायनाडवरून आपण दुतर्फा किर्रर्र जंगल असलेल्या रस्त्यातून मार्गक्रमणा करत पोहोचतो मेडीकेरीला.. मेडीकेरी हे कर्नाटक राज्यातल्या कूर्ग या जिल्ह्याचं मुख्यालय... स्कॉटलंड ऑफ इंडिया असं या शहराला म्हणतात. डोंगर उतारावर वर्तुळाकार आकारात वसलेलं हे शहर पहिल्या दर्शनातच प्रेमात पाडतं.

राजासीट, ओंकारेश्वर मंदीर, फोर्ट, पॅलेस ही ठिकाणं शहरातचं आहेत, ती पहिल्याच दिवशी पाहून घ्या. राजासीटवरून दिसणारा सुर्यास्ताचा देखावा विलोभनीय.

दुसऱ्या दिवशी दुबारे फॉरेस्टचा प्लॅन करता येतो. दुबारे फॉरेस्टमध्ये हत्ती फार्म आहे. मैसूरमधला दसरा उत्सव फेमस आहे. त्यासाठी लागणारे हत्ती इथे सजवले जातात. या हत्ती फार्मवर जाण्यासाठी बोटीतून नदी पार करावी लागते. हत्तीवरून सैर, हत्तीची अंघोळ आणि हत्तीचे इतर कारनामे इथे दाखवले जातात.
तिथून जवळचं आहे गोल्डन टेंपल. अप्रतिम असं हे बुद्ध मंदीर पहायलाच हवं. हे चुकवलंत तर काहीतरी मोठं पहायचं राहून गेलं याची हुरहूर लागेल.
गोल्डन टेंपल पाहून झाल्यावर मेडीकेरीकडे परत जाताना कावेरी निसर्गधाम लागते. बांबूचे हे वन नक्की पहा. बांबूच्या बनात एवढं सौंदर्य दडलेलं असतं हे तिथे कळतं. तिथेच बाजूला कावेरी नदीचा सुंदर प्रवाह आहे. या प्रवाहात संध्याकाळ घालवणं आनंददायी.
मेडीकेरीजवळच कावेरी नदीचा उगम आहे. या स्थळाचं नाव आहे थलकावेरी. एवढ्या मोठ्या पवित्र कावेरी नदीचं उगमस्थान फार सुंदर बांधून काढलं आहे. प्रसन्न धार्मिक वातावरणाला शिस्तचं सुंदर बंधन घातलं आहे. तिथून परतत असताना भगमंडला नावाचं गाव लागतं. येथे सुंदर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचं शंकर, गणपती आणि विष्णू यांचे मंदीर आहे. अप्रतिम कोरीव काम असलेली ही तीनही मंदीर ब्रिटीशांशी झालेल्या संघर्षात उध्वस्त झाली होती. मात्र आता त्याचा जिर्णोद्धार झालाय. या मंदिरातली देवाची मुर्ती, त्याला केलेली फुलांची आरास आणि त्या भोवताली असलेली दिव्यांची शोभा पाहून फार प्रसन्न वाटतं. भगमंडलातल्या देवळांच्या बाजूलाच सुंदर असा त्रिवेणी संगम आहे.

मेडीकेरीच्या बाजारात चांगले मसाल्याचे पदार्थ, होममेड कॉफी चॉकलेट्स, फिल्टर कॉफी, ग्रीन टी, काजू मिळतात. मेडिकेरी गावातून चालत डोंगरउतारांवरू फेरफटका मारतानाही वेळ चांगला जातो.

अशी ही वायनाड कूर्गची सुंदर सफर. मित्रांनो परतीच्या प्रवासासाठी आपण एकतर मैसूरला येऊ शकतो किंवा मंगलोरला येणेही सोयीचे पडते.
या सबंध प्रवासात काय वेगळं आहे हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. भारतातली तीच ती पर्यटन स्थळ पाहून तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हाला हा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो या अख्ख्या प्रवासात मला एकदाही फसवणूकीचा अनुभव आला नाही. भाषा समजत नाही तर या लोकांना नाडा ही वृत्ती इथल्या लोकांत आढळत नाही. आलेले पर्यटक आपले आहेत. त्यांची काळजी घेणं ही जबाबदारी आहे हे कटाक्षाने पाळलं जातं. वायनाड कूर्गवर जेवढा निसर्गाचा वरदहस्त आहे तेवढीच तिथली माणसंही चांगली आहेत. वायनाड आणि कूर्ग वरून परतत माझ्या पत्नीने कवी बा.भ. बोरकरांची एक कविता ऐकवली ती कविता सतत मनात रूंजी घालत होती.

स्वर्ग नको सूरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा,
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष नी शोक हवा

Sunday, December 6, 2009

मी अँकर बोलतोय

मित्रांनो ब्लॅक कॉमे़डी नावाचा विनोदाचा एक प्रकार आहे. नेटवर त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. तर विकीपेडीया डॉट कॉम या वेबसाईवर पुढील अर्थ दिला आहे.

Black comedy
is a sub-genre of comedy and satire in which topics and events that are usually regarded as taboo are treated in a satirical or humorous manner while retaining their seriousness.

आता हा विषय काढायला एक कारण आहे ...

माझा एक जिवलग मित्र आहे अमोल जोशी. अमोल जोशी हा झी चोवीस तास या वृत्तवाहिनीवर निवेदक आहे. म्हणजे बातम्या सांगतो. त्याला तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. मात्र बातम्या सांगणे एवढेच त्याला जमते असं नाही. तर तो सुंदर कविताही करतो. याआधी तो कवितांचे कार्यक्रमही करत असे. कामाच्या रगाड्यातून वेळ काढून त्याने एक सुंदर कविता केली आहे. ती कविता तुम्हा सर्वांना वाचता यावी यासाठी मी या ब्लॉगवर सादर करत आहे. अर्थात अमोलची त्यासाठी परवागनी घेतली आहे. कवितेत काय म्हटले आहे ते निव्वळ विनोद म्हणून वाचावे ही विनंती..
अमोल काय किंवा मी काय आमचा कोणाचाही हा प्रत्यक्ष अनुभव नाही हे आधीच स्पष्ट करतो.
( सिनियर्ससाठी!!!)... :)

जास्त काय बोलू कविता वाचा..



मी अँकर बोलतोय

ना मी मालक, ना संपादक
ना तारक, ना मारक मी
वेळेत येतो, वेळेत जातो
आज्ञाधारक अँकर मी.... //धृ//

चेह-यावरती थापुनी मेक-अप
वेळापत्रक करुनी चेक-अप
शिरतो मग मी स्टुडिओमध्ये
जंटलमनचा करूनी गेट-अप
अंगावरच्या कोटाआतील, भुलतो गंजीची भोके मी
हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी
वेळेत येतो, वेळेत जातो......१

काय जाहले, जरी मी सध्या
घरात राही भाड्याच्या ?
खडसावूनी या जाब विचारी
अध्य़क्षाला म्हाडाच्या
स्टुडिओमध्ये गुरगुरतो, पण ऑफिसमध्ये शेळी मी
बाता करतो हापूसच्या अन्, घरात खातो केळी मी
वेळेत येतो, वेळेत जातो......

पटले वा, ना पटले तरीही
अंगावर घेतो व्हीआयपी
फिरून तरी माझीच मारती
इतुकाही ढळता टीआरपी
विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मग गोटा मी
प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी
वेळेत येतो, वेळेत जातो.......

माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली
बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली
आज्ञा येता विष ओकतो, होतो मिठ्ठाळ पेढा मी
बोलविता कोणी वेदही बोले, ज्ञानोबांचा रेडा मी
वेळेत येतो, वेळेत जातो,
आज्ञाधारक अँकर मी.........

अमोल जोशी.

(कविता या ब्लॉगवर सादर करायची परवानगी दिल्याबद्दल अमोल जोशी यांना धन्यवाद)

Thursday, November 12, 2009

प्रिय सचिन तेंडुलकर यांस
सप्रेम नमस्कार ..
आमच्या आयुष्यावर आपण जी एक गडद छाया निर्माण केली आहे त्याला या १५ नोव्हेंबर २००९ ला वीस वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलण्यापेक्षा थेट आपल्यालाच लिहावं असं वाटलं.. म्हणून हा पत्रप्रपंच..
एक सांगू का.. लिहीताना ' तुम्हाला, तुमचे, आपण ' असे आदरार्थी उल्लेख करायचे आहेत. ते आमच्या मनात आहेत. पण लिहीताना फार कठीण जातंय. रोज बोलताना सचिन असा स्पष्ट एकेरी उल्लेख करतो. मॅच सुरू असताना कधीतरी ' तेंडल्या ' असं स्पष्टपणे म्हणतो. त्यामुळे या पत्रातही पुढे सचिन असा एकेरी उल्लेख करणार आहे. त्याबद्दल तुला राग येणार नाही अशी आशा आहे.
सचिन पत्राच्या सुरूवातीला म्हटलं की आमच्या आयुष्यावर तुझी गडद छाया पसरली आहे. मात्र ती छाया काळी नाही. कठोर उन्हाळ्यानंतर पावसाचं आगमन होतं. त्यावेळी ढगांची जी शितल छाया सृष्टीवर पसरते ना.. तशी ही छाया आहे. कारण तुला सांगू त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही मित्रांनी एक प्रयोग केला, दिवसभरात एकदाही सचिन हे नाव घेतले नाही असे किती दिवस आले मोजायचं. महिनाभरात असा एकही दिवस आला नाही. इतका तुझा प्रभाव. सचिन माझे वडिल सांगतात, सुनील गावसकर निवृत्त झाले त्यावेळी त्यांना असं वाटलं आता का क्रिकेट पहायचं, सचिन नेमकी हीच माझीही भावना आहे. तुझ्या निवृत्तीनंतर आम्ही का क्रिकेट पहायचं..
सचिन, तुझी क्रिकेट कारकिर्द आणि माझी शालेय आणि महाविद्यालयीन कारकिर्द एकाच काळातली. मी आणि माझ्या अवतीभवती असणारी मुलं आम्हा सर्वांना तू एक शिस्त लावलीस. माझ्या कॉलेजमध्ये एक सर होते, त्यांनी एकदा आमची कानउघडणी केली होती. त्यावेळी त्या क्रिकेटवेड्या सरांनी तुझे उदाहरण दिले होते. तुझ्या खेळातली खासीयत म्हणजे तुझा बॅलंस, तुझी खेळाकडे बघण्याची दृष्टी, एकाग्र होण्याची तुझी शक्ती, आणि फार थोड्या लोकांना मिळते अशी शक्ती म्हणजे दूरदृष्टी.. या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यावेळी त्याआम्हाला कळल्या नाहीत. खरंच सांगतो. त्यावेळी आम्ही फक्त ' तेंडल्या असा खेळला. तेंडल्याने वॉर्नला असा धुतला ' यातच रमलो. पण तुझ्या खेळातून आम्ही काय शिकू शकलो असतो हे तेव्हा उमगलेच नाही. तुला सांगू तुझ्यात आणि उतर टिन एजर्समध्ये असलेला हा मोठा फरक. टीनएजमध्ये जे आम्ही शिकावं ते तू आत्मसात केलं होतंस. आम्हाला काय शिकायचं आहे हेच कळलं नव्हतं.. असो शेवटी तेंडुलकर एकमेवाद्वितीय का आहे.. याचं हे उत्तर आहे.
सचिन तुझ्या कारकिर्दीतले अनेक क्षण न विसरता येण्यासारखे.. एकोणीसाव्या वर्षी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर तू केलेलं पराक्रमी शतक खतरनाक असं होतं. त्याआधी १९९० मध्ये इंग्लंडविरूद्ध ओल्ड ट्रॅफर्डवरचं पहिलं वहिलं शतकही न विसरता येण्यासारखं. १९९६-९७ हंगामातली केप टाऊनमधली खेळी लाजवाब. १९९९मध्ये पाकिस्तानविरूद्धची पाठदुखीने त्रस्त झाल्यावरही तुझ्या झुंजार १३६ धावा मी कधीच विसरू शकत नाही. कारण अवघ्या १२-१३ धावांनी हरल्यावर घरात मी रडलो होतो. ड्रेसिंगरूममध्ये तुझीही वेगळी अवस्था नव्हती अशी बातमी नंतर पेपरात वाचली होती. सचिन त्यानंतर इंग्लंडविरूद्ध पुन्हा एकदा चेन्नईतच तू शतकी खेळी केलीस आणि आपण तो सामना जिंकलो होतो.
सचिन पण आपण तुझ्या खेळी आठवताना शतकंच का आठवतो. दरबानमध्ये विश्वचषकात शोएब अख्तरला तू आणि सेहवागने दाखवलेली कयामत पाहून ऊर भरून आला होता. त्यावेळी तुला मिडऑफला रझाकने टाकल्यावर अक्रम भडकलेला पाहून खुप हसू आलं होतं. मात्र त्या सामन्यात तुझे शतक झाले नाही याची हळहळ वाटते. आणि म्हणून शोएबचा रागही येतो. शोएबवरून आठवलं. सचिन तुझी एक आठवण शोएबने सांगितली आहे ती आठवते. भारतात पाकिस्तानी संघ कसोटी मालिका खेळायला आला होता. त्यावेळी कोलकाता कसोटीच्या आदल्या दिवशी सरावाआधी पाकिस्तानी संघ एका अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या मुलांना भेटणार होता. त्या शाळेतल्या एका मूकबधीर मुलाला शोएबने विचारलं.. बेटा मै आपके लिये क्या करू ? त्यावर त्यामुलाने त्याला एका कागदावर उत्तर लिहून दिलं होतं. सिर्फ सचिनको आऊट मत करना...
सचिन मला काही प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. तुझ्या पदार्पणाच्या कसोटीत तुला वकारचा चेंडू तोंडावर लागला होता. रक्ताने तुझे तोंड माखले होते. तू फक्त सोळा वर्षांचा होतास. त्यावेळी तू घाबरला नाहीस.. ही शक्ती तुझ्याकडे कुठून आली. सचिन नवज्योत सिंग सिद्धू ती आठवण एकदा टिव्हीवर सांगत होता. त्यावेळी त्याने जोरात अली इराणीला हाक मारली.. रक्त पाहिल्यावर तो पॅनिक झाला होता. मात्र त्यावेळी तू एकच शब्द उच्चारलास... मै खेलेगा !
सचिन दुसरं म्हणजे पाठदुखीने तू त्रस्त असतानाही १३६ धावा करणं किंवा अनेकवेळा भारताची जबाबदारी एकट्य़ाने उचलणं हे धाडस करताना तू स्वतःचा विचार कधीच का केला नाहीस....
सचिन सर डोनल्ड ब्रॅडमन यांनी तुला भेटीसाठी बोलावले त्यावेळी तूझा मनात कोणत्या भावना उचंबळून आल्या होत्या.
सचिन हेन्री ओलोंगाला तू तिरंगी मालिकेत धुतला होतास आठवते का.. ते तू खुन्नस खाऊन मारले होतेस की नाही...
सचिन तूझे २५ वे एकदिवसीय शतक आटवतं का.. त्यावेळी तू केलेला सर्वाधिक कंटाळवाणा खेळ (मला माफ कर) ... आदल्या सामन्यात रनआऊट झाल्याचा तो राग होता का...
सचिन, भारताचे सामने जेव्हा फिक्स होत होते. तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या या भयानक गोष्टीत तू तूझे चित्त स्थिर कसं ठेवलंस. सचिन आहे तोवर फिक्सर्सचे घाणेरडे डाव कधीच यशस्वी होणार नाहीत असा विश्वास तू आमच्या मनात निर्माण केला होतास.. एखादा मोठा भाऊ असतो ना.. त्याच्याविषयी जो विश्वास मनात असतो ना तो हा विश्वास....
सचिन एवढ्यावेळा तू मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहेस तूला आता त्यात काही नाविन्य वाटतं का..
सचिन ज्यावेळी तुझ्यावर टिकेचे पहाड कोसळतात, ज्यावेळी आम्ही तुझ्यावर सर्व भार टाकून मोकळे होतो... त्यावेळी तुला कधी आमचा राग येतो का..
सचिन तुझ्यावर आम्ही अपेक्षांचे ओझे टाकतो... हो.. प्रत्येक सामन्यात तू शतक झळकवावेस असं आम्हाला वाटते. कोट्यावधी डोळे तुझ्या प्रत्येक कृतीकडे लागलेले असतात. तू काय करतोस, कसा खेळतोस याविषयी आम्ही प्रत्येकाने बोलण्याचा अधिकार घेतला आहे. हजारो होर्डींग्जवर आम्ही तुला पाहतो. आम्ही सगळे तूला ओळखतो.. तू आम्हाला ओळखत नाहीस. तरीही तू आमच्या अपेक्षा ओळखतोस आणि त्या पेलतोस.. म्हणून तू महान ठरतोस.
लोकांना सौंदर्यात काय पहायला आवडतं माहीत आहे ? सिमिट्री.. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असलेली प्रमाणबद्धता... सचिन मैदानातल्या तुझ्या हालचाली, तुझे वागणे, तुझे शॉट सिलेक्शन, तुझी खेळण्याची लकब, प्रतीपक्षाकडे पाहण्याची तुझी नजर, त्यांचे डावपेच ओळखण्याची तुझी धूर्तता, आणि प्रतीपक्षाला संपवण्याचा तुझा बेधडकपणा या सगळ्याच गोष्टीत एक प्रमाणबद्धता आहे. सचिन म्हणून सौंदर्यशास्त्रानुसारही तू मिस्टर परफेक्टच ( सॉरी राहुल..)
सचिन भारताची तू शान आहेस. तू भारतरत्न आहेस.. तू एक चांगला कर्णधार होऊ शकत नाहीस अशी टिका तुझ्यावर करतात. पण सचिन मला त्यांना असं उत्तर द्यावसं वाटतं की सचिन संघाला रूढार्थाने नेतृत्व देत नाहीस. पण तू उदाहरणांनी, स्वतःच्या कृतीतून नेतृत्व देतोस.. तू कर्णधार नाहीस तू त्यापेक्षाही पुढे आहेस.. एक आदर्श..
सचिन नुकतीच तू दोन एकदिवसीय शतके झळकावलीस.. त्यातली ऑस्ट्रेलियाविरूद्धची १७५ धावांची खेळी अजरामर. सचिन त्यावेळी तू पुन्हा एकदा तरूण झाल्यासारखा वाटलास. पुन्हा एकदा १९९८ मधला सचिन, शेनवॉर्नला डाऊन द ट्रॅक येत हाणणारा सचिन, कॅस्प्रोवीचला समोरच्या साईट स्क्रीनवर हवाईमार्गान दणकावणारा सचिन, थर्डमॅनला शोएबला भिरकावून देणारा सचिन, नजाकतदार पॅडलस्वीप सारखा भन्नाट शॉट इंप्रोवाईज करणारा सचिन, १९९४मध्ये सांगून चामिंडा वासला खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हज् मारणारा सचिन, तो सचिन पुन्हा एकदा अवतरल्यासारखं वाटलं.
सचिन एक क्रीडा पत्रकार म्हणून तुला मी अनेकवेळा पाहिला आहे. मी क्रीडापत्रकारीता क्षेत्रात पाऊल टाकेपर्यंत तू आमच्यापासून खुप लांब गेला होतास. तुझाशी बोलणं म्हणजे चंद्रावर जाऊन येण्यासारखं आहे. मात्र तरीही प्रत्यक्ष बोललो नसलो तरीही प्रत्येकवेळी तू अगदी माझ्यासारख्या युवा पत्रकाराचीही दखल घेतोस. तुझ्या नजरेत मी कधीही हा कोण हा भाव पाहिला नाही.. प्रत्येकवेळी तू सगळ्यांची दखल घेतोस, कधी बोलून कधी नजरेनं.. सचिन आजच्या युवा क्रिकेटपटूंमध्ये मला हे कधीही दिसत नाही.. तू शिखरावर आहेस पण तू आमच्याकडेही लक्ष देतोस..
सचिन हे पत्र संपवताना मला एक ओळ लिहावीशी वाटते.. ही ओळ माझी नाही... तुझ्या एका फॅनने तुझ्याविषयी हे लिहीले होते... इयन बॉथम हा क्रिकेटचा एरोल फ्लिन असेल, विव्ह रिचर्डस् क्रिकेटचा मार्टीन ल्यूथर किंग असेल, शेन वॉर्न क्रिकेटचा मर्लिन मन्रो असेल, मुथय्या मुरलीधरन क्रिकेटचा हॉबीट असेल.. तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला एक धर्मनिरपेक्ष संत आहे.. तू संत आहेस, खरोखर क्रिकेट हा धर्म असलेल्या भारत देशात तू एक संत आहेस...
तुझी कारकिर्द अशीच बहरत जावे आणि तुझ्या छायेतून आम्हाला बाहेर पडायची संधीही कधीही न मिळो अशी आमची तुला शुभेच्छा...
तुझा चाहता
अमित सुभाष भिडे

Saturday, October 24, 2009

आम्हीच का ???



निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.


हे सर्व सुरू असतानाच.. निकालांच्या दुसऱ्याचं दिवशी ठाण्यात एवढा मोठा गर्डर गाडीवर कोसळला, ठार झाले १२ जखमी झाले. मुंबईची जीवनवाहिनी जवळपास दिवसभर बंद झाली...


काय झालं... नाक चेपलेल्या गाडीपुढे अनेक बघे जमले.. आम्ही मिडीयावाले कॅमेरा घेऊन धावलो... गाडीसमोर उभे राहून बडबड केली... आमच्या चॅनलसमोर असंख्य बघे बसले.. त्यातच काही नवनिर्वाचित माननीय आमदार त्या गर्दीत आले. त्यांनी बाईट्स दिले... रेल्वेकडे आम्ही मेगाब्लॉक मागितला तो त्यांनी दिला नाही अशी रेल्वेवर आगपाखड झाली. रेल्वेनेही हात झटकले... कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू झाला..


आर रामचंद्रन नावाचा एक मोटरमन होता तो गेला. एक प्रवासीही गेला, १२ जखमी झाले. पेपरवाल्यांनी त्यांची नावं छापली.. हे लोकही या जगात होते आहेत याचा एकमेव छापिल पुरावा राहीला. रेल्वेने मदत जाहीर केली. आणि झालं. अजून एक केस बंद झाली. गाड्या सुरू होतील ठाणे स्टेशन सोडल्यावर मुलुंडकडे जाताना अनेकवेळा त्या स्पॉटवरून जातील, सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल..


ठाण्यासारख्या अवाढव्य स्टेशनावर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा तय़ार नव्हती.. रेस्क्यू व्हॅन यायला दीड तास लागला... ठाणे फायरब्रिगेडकडे गॅसकटन नव्हता.. तो जवळच्या वेल्डींगवाल्याकडून आणावा लागला. आत माणूस अडकला आहे हे दिसत असतानाही आम्ही गॅसकटर वापरला.. अजून इतर कुठलाही कटर आमच्या कडे नव्हता.. ठिणग्या आतल्या माणसावर पडल्या.. तो मरता मरता अनेक चटके खाऊन गेला. तो मरायच्या आधी त्याचा हातही कोपरापासून काढावा लागला.. तो गेला.. गर्डर पडतोय हे लक्षात आल्यावर त्याने इमर्जन्सी ब्रेकही दाबला होता. गर्डर त्याच्या केबिनवर पडला. त्याच्या प्रसंगावधानामुळे तो मागच्या डब्यावर आला नाही... सर्वसामान्य मुंबईकर पुन्हा पुन्हा हे आठवणार.. तो आपल्या गाडीचा कितीवेळा मोटरमन असेल, त्याने कित्येकवेळा आपल्याला ऑफिसला नेलं असेल, घरी सोडलं असेल हे आठवून अंगावर शहारे येतील. ते शहारे गर्दीत थोड्याच वेळात विरून जातील. रेल्वेची बेपर्वाई, ठाणे महानगरपालिकेची बेपर्वाई आम्ही विसरून जाऊ...




निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.