एक तुतारी द्या मज आणून,
फुंकीन मी ती स्वप्राणांनी
एक तुतारी दादासाहेब फाळके फुंकली आणि त्यातून उभं राहीलं एक विश्व. ज्या चित्रपटसृष्टीने भारतात कित्येक हातांना काम, बुद्धीला चालना, अभिनयाला व्यासपीठ, कलेला वाव, सौंदर्याचं कौतूक, आणि रसिकांचं अक्षरशः वेडाकडे झुकणारं प्रेम मिळवून दिलं त्या चित्रपटसृष्टीचं बीज भारतात दादासाहेब फाळके या अवलियाने रूजवले. इंग्रज राजवटीची तलवार, बुरसटलेल्या विचारसरणीत गुरफटलेला कधीही बदलण्याची इच्छा नसलेल्या समाजात चित्रपट तयार करणं, आणि तोही पहिला, हे भयंकर आव्हान होतं, अशक्यच गोष्टं होती. ती दादासाहेबांनी करून दाखवली. दादासाहेबांच्या या कर्तुत्वाची कथा चित्रपटाच्याच माध्यमातून मांडणं हे एक अजून आव्हान. ते परेश मोकाशी यांनी समर्थरीत्या पेललं. भारतात बनलेल्या पहिल्या चित्रपटाची जन्मकथा आणि दादासाहेब फाळक्यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी त्या चित्रपटाच्या जन्मासाठी सोसलेल्या वेणा त्यांचं थोरपण सांगून जातं.
चित्रपटाला कुठेही कंटाळवाणं, निराशावादी न करण्याचं मोठं आव्हान परेश मोकाशी यांनी पेललंय. कारण असे संघर्ष करून ज्या कलाकृती निर्माण होतात त्यावेळी असंख्य त्रास कलाकाराला आणि त्याच्या कुटूंबियांना सोसावा लोगतो त्यातून निर्माण होणारं कारूण्य दाखवून लोकांच्या डोळ्यातून पाणी सहज काढता येतं, पण त्यातून विनोद निर्मिती करूनही वास्तवाचं चित्रण समर्थरीत्या करता येतं हे मोकाशी यांनी सिद्ध केलं. दादासाहेब फाळक्यांच्या स्वभावातला तर्कटपणा, विक्षिप्तपणा दाखवतानाच दादासाहेब फाळक्यांना असलेली नाविन्याची, विज्ञानाची आवड आणि सतत काही तरी शोधून काढण्याची वृत्ती आणि त्यातून आलेला धीटपणा ही खरोखर खुप काही शिकवून जाते. असा हा चित्रपट प्रत्येकाने खरोखर पहावा असाच आहे.
ज्या चित्रपटातून एवढी अवाढव्य चित्रपटसृष्टी निर्माण झाली. हिंदी व्यतिरीक्त प्रत्येक मुख्य भाषेत चित्रपट निर्माण होतायत. याशिवाय चित्रपटसृष्टीशी काहीसी संलग्नता बाळगणारं फॅशन जगत आलं, रूजलं. त्यानंतर छोटा पडदा आला. आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. ही चित्रपट क्रांती निर्माण करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वाची ओळख आजच्या पिढीला परेश मोकाशी यांनी करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद
अमित, माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे सेम पिंच. माझा ब्लॉग याच विषयावर आहे. पण तू आधी लिहिलास आणि छान आहे. चित्रपटात कुठेही रडका स्वर नाही, आहे तो निर्विवाद आशावाद. ही बाब मला खूप समाधान देणारी वाटते. खरंच ग्रेट सिनेमा आहे.
ReplyDelete