नटरंग हा चित्रपट आणि त्यातली गाणी फारच जोरात सगळीकडे वाजत होती. 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' ही गाणी खरोखर वेड लावत होती. मात्र नटरंग पहायला जाण्याचं कारण वेगळं होतं. अतुल कुलकर्णीला पाहण्यासाठी हा चित्रपट
पहायचा होता. मी अगदी खरं सांगतो, याआधी कधीही अतुलला पहायचं म्हणून हौसेने मी कोणताही चित्रपट पाहिला नव्हता. यावेळी गोष्ट वेगळी होती.
अतुलने आपल्या विविध भुमिकांतून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आपोआप अपेक्षा निर्माण होतात. बहुतांश वेळा तो त्या पूर्णही करतो. यावेळच्या अपेक्षा अजून वाढल्या होत्या. सध्याचा जमाना हा हिरोंच्या मेक ओव्हरचा आहे. सलमान खान, शाहरूख खान, सैफ अली खान यांनी हा प्रयोग केला. मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानलाही याचा आधार घ्यावा लागला. मराठीत मात्र हिरोनी कधी मेकओव्हर केल्याचं आढळलं नव्हतं. मात्र अतुलने हा प्रयोग केला. नटरंगसाठी गुणा कागलकर हे व्यक्तीचित्र उभे करताना त्याने केलेले परिश्रम आपल्याला माहित आहेतच. त्यामुळे अतुलने काय
केलंय हे पहायचं होत आणि त्यासाठी चित्रपटाची तिकीटं काढली.
तमाशा आणि त्यातला नाच्या यांचं पुनरूज्जीवन करायचं आणि त्यांच्या आधारावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणायचं हे आव्हान आहे. ते पेलणारा नटही तसाच तगडा हवा. मुळात आत्तापर्यंत अतुलने साकारलेली विविध पात्र आवडली असली तरी अतुल आणि तमाशा हा काही मेळ मनात जमत नव्हता. मात्र मित्रांनो अतुलने जिंकलं. गुणा कागलकर हे एका नावाचं पात्र अतुलने चित्रपटात तीन रंगात रंगवलं आहे. पैलवान गुणा, स्टेजवरचा नाच्या गुणा आणि पडद्यामागचा शाहीर गुणा.. प्रत्येकवेळा त्याचा आवाज त्याचं बेअरींग त्यानं एवढं चांगलं सांभाळलं आहे. कधीही नाच्या आणि शाहीर यांची गल्लत होत नाही. अतुलला खरोखर सलाम..
अर्थात अतुलने आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तीरेखा आठवा. प्रत्येकवेळी त्याने केलेलं काम उत्तमचं झालं. रंग दे बसंती मधला
सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है म्हणणारा लक्ष्मण पांडे आठवतो. पांडेने असंचं आपल्याला वेड लावलं होतं. हिंदूत्ववादी नेता लक्ष्मण पांडे, आणि नंतर परिवर्तन झालेला मित्र लक्ष्मण पांडे सुंदर झाला होता. अगदी अमीरच्या डिज्जे एवढाच लक्ष्मण पांडेही लक्षात राहील असा होता.
रंग दे बसंती मधला अतुल सगळ्यांच्या लक्षात आला असेल तर आता जरा मागे या.. दहावी फ मधला विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक आठवतो. दंगेखोर दहावी फ तुकडीतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने जात शिस्त लावणारा आणि त्याच वेळी मूल्यवर्धक शिक्षण पद्धतीचं महत्त्व सांगणारा एक शिक्षक कुठेही कंटाळवाणा झाला नाही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनाचं जेवढं कौशल्य तेवढचं किंबहुना
त्यापेक्षा जास्त कौशल्य अतुलचं हे मान्य करायला हवं.
आता अजून थोडं आठवा, 'देवराई' हा चित्रपट आठवतो का.. फारसा गाजला नसला तरीही वेगळ्या पठडीतला चित्रपट म्हणून देवराईचं खुप कौतुक झालं. त्यातला मनाने खचलेला शेश हा तरूण अतुलने साकारलाय. गावागावातल्या माळरानातल्या झपाट्याने कमी होत चाललेल्या देवराया आणि शेशचं हळुवार मनं या दोन गोष्टी अतुलने दाखवल्या. या दोन गोष्टींची कशी सांगड त्याने घातली असेल हा प्रश्न पडला होता. अर्थात पुन्हा एकदा भावे आणि सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीचं कौतुक करावं की त्यांची संकल्पना जशीच्या तशी मांडणारा अतुल नावाजावा हा प्रश्न पडतो. पण मनाला विचाराल तर ती संकल्पनासमजून पडद्यावर साकारणारा अतुलंच श्रेष्ठ वाटतो.
याशिवाय 'हे राम' हा चित्रपट कमल हसनसाठी लोकांनी पाहिला पण या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मात्र अतुल कुलकर्णी घेऊन गेला. श्रीराम अभ्यंकर हे पात्र, त्याचे संवाद त्याचे डोळे, त्याचे विचार अतुलने मांडले आणि ते खरं म्हणजे मनात खुपले. फार भयानक असं ते पात्र अतुलने जबरदस्त मांडलं.
याशिवाय अतुलने वळूमध्ये साकारलेला स्वानंद गड्डमवार असो, किंवा चांदनी बारमधला पोत्या सावंत हा भाई असो. अतुलने प्रत्येकवेळी कौतुकाची थाप मिळवली आहे. मात्र अतुलचा गुणा कागलकर लक्ष्मण पांडे, दहावी फ मधले सर आणि देवराईतला शेश ही पात्र खरोखर अतुलनीय अशीच आहेत. हॅट्स ऑफ गड्या !!!
भिडेश...गड्या लेख जोरदार आहे....
ReplyDeleteमराठी चित्रपटात हिट झालं की हिंदीकडे पळायचं आणि मिळेल ते रोल करायचे, असं करणारे कलाकार आपण खूप पाहिलेत. गेल्या काही दिवसात मात्र श्रेयस तळपदे, अतुल कुलकर्णी यांसारखे जिद्दी कलाकार मराठीचा `नटरंगी` आणि तितकाच तोडीस तोड `झेंडा` बॉलीवुडमध्ये दिमाखात फडकावताहेत, याला दाद तर द्यायलाच हवी.
बाय द वे... तुम्ही भिडे असूनही (म्हणजे मला आडनावातला कंजुसपणा म्हणायचंय)केबलवर, चॅनलवर चित्रपट येण्याची वाट न पाहता, थेट थिएटर गाठलं याबद्दल तमाम चित्रपट निर्माता मंडळी तुमचे नक्कीच आभार मानेल..धन्यवाद देईल..अभिनंदनही करतील....पण याचं `क्रेडिट` बहुतेक तुमच्या होम मिनिस्ट्रीला जाईल, अशी आपली आमची शंका आहे. रास्त आहे का ते तुम्हीच सांगा....