Wednesday, March 16, 2011

सेवाव्रत

या मुंबई शहरात अनेक लोक अनेक कारणांनी येतात. प्रत्येकाची या मुंबापुरीकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे शहर पूर्ण करतंय. एक गोष्ट इथं स्पष्ट केली पाहीजे हे शहर याचा अर्थ इथला समाज.

मुंबईत कोणीही उपाशी रहात नाही, प्रत्येकाला काम मिळतंच. त्याची हातातोंडाची गाठ पडतेच असं अभिमानाने म्हटलं जातं. त्यामुळे या शहराला जॉब हब असंही म्हणतात. जॉब मिळाला की सगळंच मिळतं जातं.. मुंबई सर्वांची गरज पूर्ण करते. पण याच मुंबईची अजून एक ओळख आहे. अद्ययावत वैद्यकीय मदत देणारी ही नगरी.. मेडिकल हब असं म्हणा ना.. त्यातही कँसर, हार्ट अशा असाध्य आणि किचकट रोगांवर इलाज हे मुंबईचं वैशिष्ट्य. राज्यातून, देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक रूग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. केईएम, टाटा, वाडीया, जसलोक, कूपर, कँसर रिसर्च सोसायटी अशी अनेक हॉस्पिटल्स इथे उभी आहेत. रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर इलाज सुरू आहेत. या हॉस्पिटल्सचे खरोखर उपकार आहेत. पण तेवढचे उपकार आहेत इथल्या काही सामाजीक संस्थांचे..

अशाच एका संस्थेत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. नाना पालकर रूग्ण सेवा समिती या संस्थेचं रूग्ण सेवा सदन परळला आहे. रूग्ण सेवा समितीद्वारे केलं जाणारं काम पाहीलं आणि थक्क व्हायला झालं. मुंबईत उपचारासाठी आल्यावर रूग्णांवर तर हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. पण या रूग्णांच्या नातेवाईकांचं काय. त्यांनी मुंबईत रहायचं कुठे. तर अशा रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी रूग्ण सेवा सदन सारखी वास्तू उभी आहे. आज तब्बल दहा मजल्यांची ही वास्तू आहे. तब्बल ७६ रूग्ण, प्रत्येक रूग्णांचे दोन नातेवाईक अशा एकूण २२८ जणांच्या भोजन निवासाची सोय इथे होते. एका खोलीत दोन रूग्ण आणि त्यांचे दोन दोन सहकारी अशी व्यवस्था केली जाते. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह पंखे, सोलरद्वारे गरम पाणी, लॉकर अशी सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे अतिषय नाममात्र दरात ही सोय केली जाते. इथे नाममात्र म्हणजे अक्षरशः नाममात्र असं म्हटलं पाहीजे. कारण त्यापेक्षाही कमी दरात सोय करायची असं म्हटलं तर म्हणजे फुकट असंच म्हटलं पाहीजे.. आणि तशी अक्षरशः फुकट सोयही इथे अतिषय गरीब आणि गरजूंचीही केली जाते हे नमुद केलंच पाहीजे.



नाना पालकर हे संघाचे एक विचारवंत कार्यकर्ते. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. एवढ्या कमी आयु्ष्यात नानांनी सेवाकार्य हेच आपलं जीवनध्येय आहे असं मानून संघकार्यासाठी जीवन समर्पित केलं. उत्तम लेखक, कवी, कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, ल अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. रूग्णसेवेविषयी त्यांना आत्यंतिक निष्ठा आणि आस्था होती. १९६७ मध्ये नाना पालकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर त्यांच्या सहयोगींनी १९६८ साली नाना पालकर स्मृती समितीची स्थापना केली.

या संस्थेने चालवलेले उपक्रम हे खरोखर गरीबांसाठी उपकारक ठरले आहेत. १० मजली रूग्ण सेवा सदनाची आपण ओळख वर करून घेतली आहेच. याशिवाय नाना पालकर चिकित्सालय, डॉ. ग. कृ. पाटणकर क्षय रोग चिकित्सा केंद्र, गोखले डायलेलिस केंद्र, तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी, मधू औषध पेढी, प्रभाकर कुटूंब कल्याण केंद्र, रूग्णमित्र हे वैद्यकीय मासिक असे अनेक मोठे उपक्रम राबवले जातात. याशिवाय रायगड जिल्ह्यात कुपोषित आजारी मुले व माता पोषक आहार, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव कुपोषण निर्मुलन, माटुंगा आणि औरंगाबाद इथे लिथोस्ट्रीप्सी केंद्र, टाटा हॉस्पिटलसमोरचं डॉ. शिवानंद लवेकर चिकित्सालय, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मोघालय इथे सेवा भारती आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम आणि सहउपक्रम नाना पालकर स्मृती समितीतर्फे राबवले जातात.

डायलेसिस सेंटर, लिथोस्ट्रीप्सी सेंटर, किंवा पॅथोलॉजिकल लॅब चालवणे यात नवल ते काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की या सर्व ठिकाणी हे सर्व उपचार आणि तपासण्या अतिषय नाममात्र दरात आणि काही केसेसमध्ये फुकटसुद्धा दिल्या जातात. आज मुंबईत डायलेसिसचे दर काय आहेत याची माहिती करून घ्या.. या संस्थेमध्ये डायलेसिस अवघ्या ३५० रूपयात केले जातात. विशेष म्हणजे २००४ पासून हे दर एक रूपयानेही वाढलेले नाहीत. सदनात १२ मशिन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण ३६ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळतो. याशिवाय तुलसियानी स्पेश्यालिटी लॅबोरेटरीमध्ये एड्स एचआयव्ही संबंधीत सी.डी.३, सी.डी. ४ तपासण्या अवघ्या २५० रूपयात केल्या जातात. याशिवाय बाकीच्या सर्व तपासण्या अत्यंत नाममात्र दरात केल्या जातात. मधु औषध पेढीमार्फत आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करू न शकणाऱ्या रूग्णांना औषधोपचार, आहार, फळे, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, जेवण, कपडे यांसाठी लागणारी मदत दिली जाते.


याशिवाय या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध रूग्णालयात बालरूग्णांच्या मातांना पोळी भाजी, बाल रूग्णांसाठी नाश्ता, फळवाटप केलं जातं. वाडिया, जेजे, नायर, सायन, पॅराप्लेजीक सोसायटी केईएम, रिसर्च सोसायटी, शिवडी, हाजी बच्चुअली रूग्णायल, क्षयरोग रूग्णालय या हॉस्पिटल्सना आर्थिक मदत दिली जाते. या हॉस्पिटल्समध्ये रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लागणारी आहार आणि औषध विषयक मदत दिली जाते.





या संस्थेचा मदतीचा आवाका पाहून थक्क व्हायला झालं. स्वतः नाना पालकरांसोबत काम केलेल्या ज्येष्ठांच्या हातात आज या संस्थेची धुरा आहे. श्री. छत्रे, श्री बोपर्डीकर, श्री. खरे, डॉ. अजित फडके यांच्या समर्थ हातात या संस्थेचं कार्य निस्पृहपणे सुरू आहे. यातल्या श्री. छत्रे आणि श्री. बोपर्डीकर यांच्याबरोबर ही संस्था पाहण्याचा योग आला. श्री. छत्रे स्वतः ८३ वर्षांचे आहेत. तर श्री. बोपर्डीकर ७५ वर्षांचे आहेत. पण या दोघांचा कामाचा आवाका, रूग्ण सेवेची कळकळ, आणि संस्थेवर असलेलं प्रेम पाहून 'तेथे कर माझे जुळती' अशी मनाची अवस्था होते.

काही व्यक्ती आणि संस्थांच्या चांगुलपणावर समाज टिकून आहे असं म्हणतात, त्यातली एक संस्था पहायचा योग आला एवढं नक्की..

3 comments:

  1. अशा सेवाभावी संस्था आणि व्रतस्थ माणसं असल्यानंच समाज तगून जातो ..माणसं तरुन जातात. एक नवी ओळख करुन दिलीस. छान!

    ReplyDelete
  2. खूपच उपयुक्त माहिती वाचायला मिळाली. खूपच छान.

    ReplyDelete
  3. ऋषी देसाईMarch 18, 2011 at 11:02 AM

    तेथे कर माझे जुळती

    ReplyDelete