Wednesday, June 15, 2011

एका नाईट शिफ्टचा प्रवास....

नाईट शिफ्ट तुम्ही अनेकदा केली असेल. नाईटसाठी घरातून निघताना प्रचंड कंटाळा आलेला असतो. निघताना कामावरून परतणारी मंडळी आपल्याला विचारतात, “ अरे वा नाईट वाटतं..” आपण त्यांना हो.. काय करणार असं म्हणून हसून उत्तर देतो.. स्टेशनवरही आपण प्रवाहाच्या विरूद्ध चालत आहोत याची जाणीव होते. आपली गाडी येते, आपण अगदी रिकाम्या गाडीत बसतो.. गाडी सुरू होते.. मजल दर मजल करत आपण ऑफीसमध्ये पोहोचतो. आणि गपगुमान कामाला लागतो.. असा एक सर्वसाधारणपणे आपला नाईटशिफ्टचा प्रवास होतो.

पण आज नाईटला जाताना मी अत्यंत सुंदर प्रवास अनुभवला.. अचानक, काहीही ध्यानीमनी नसताना अतिषय तृप्त प्रवास झाला.. नेहमीसारखा कंटाळलेल्या वातावरणात ठाण्यापर्यंत आलो. माझं ऑफीस सीबीडी बेलापूरला आहे त्यामुळे मला ठाण्याला गाडी बदलावी लागते. ठाण्याला पनवेल गाडीत बसलो. रात्रीची १०.५० ची पनवेल असल्यामुळे रिकामीच होती. सरळ विंडो मिळाली. त्यामुळे गाडी सुरू होईपर्यंत सुखावलो होतो. गाडी निघायला पाच मिनिटं होती. झोप आणायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. मग कानाला इयरफोन लावला आणि मोबाईलवर गाणी ऐकायला सुरूवात केली. सुरूवात झाली ती हरीहरन यांच्या गझलांनी.. पहिलीच गझल सुरू झाली ती गुलो में रंग भरे, खरं म्हणजे ही गझल मेहंदी हसन यांची.. ती हरीभाईंच्या आवाजात माझ्याकडे आहे.. गुलो में रंग भरे, बादे नौ बहार चले... वा.. क्या बात है..

गुलो में रंग भरे, बाद नौ बहार चले,
चले भी आओ, के गुलशन का कारोबार चले..

गझल ऐकताना अचानक डोळे मिटले गेले, गाडी सुरू झाली... सगळं विसरायला झालं.. गुलो में रंग भरे पाठोपाठ सुरू झाली हरीभाईंच्याच धीरगंभीर आवाजातली...
हवा का जोर भी काफी बहाना होता है..
अगर चराग किसी को जलाना होता है..

बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता.. थंड तुषार चेहऱ्यावर उडत होते. डोळे उघडवत नव्हते. थंड वारा आणि पावसाचे तुषार चेहऱ्याला सुखावत होते. सुंदर सारंगी, कडक तबला आणि त्याला संतूर आणि बासरीची उत्तम साथ अशी हरीभाईंची जबरदस्त मैफल रंगली.

हमने इक शाम चरागो से सजा रखी है
शर्त लोगो ने हवाओ से लगा रखी है..

एकामागोमाग एक गझला सुरू झाल्या.. दिलनशीनमधली हमने काटी है तेरी याद मे राते अक्सर... त्यानंतर काश मधली झुम ले हस बोल दे प्यारी अगर है जिंदगी... त्यानंतर हाझीरमधली मरीज इश्क का जिया ना जिया..त्याला हरीभाईंना मिळालेली झाकीरभाईंची तुफान साथ... या दोघांनाही काही ठिकाणी वरचढ ठरणारी संतूरची साथ.. वेड लावून गेली. पावसाच्या तुषारांमुळे चेहरा संपूर्ण भिजला होता. पाणी उडतं म्हणून माझ्या बाजूचा माणूस वैतागला होता.. तो बहुदा नंतर कुठे तरी उतरून गेला.. पण मला अजिबात डोळे उघडवत नव्हते. काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधेपे तेरा सर होता.. वा क्या बात है.. नेरूळ ते सीबीडी या टप्प्यात या गझलेने धुंद केलं. हरीभाई बेस्ट की त्यांना साथ करणारी सतार बेस्ट की इलेक्ट्रीक गिटारवर वाजलेलं फ्युजन नावाजावं असा प्रश्न पडला. काय सुंदर ताळमेळ.. सीबीडी स्टेशन आलं. काय करणार ऑफीसला जायचं असल्यामुळे उतरावं लागलं...

उसने उलझा दिया दुनिया में मुझे,
वरना एक और कलंदर होता..

सीबीडीला उतरल्यावर इतर काहीही बोलण्याची ऐकण्याची इच्छा राहीली नाही.. हेडफोन काढून शांतपणे ऑफीसकडे चालत निघालो.. चाळीस मिनिटांपूर्वी आलेला कंटाळा, शीण, थकवा संपला होता.. रामदेव, त्याचं आंदोलन, क्रिकेट मॅच, भाजप, काँग्रेस, मुंडे असली सगळी जळमटं उडून गेली होती..

8 comments:

  1. खुपच छान लिहिले आहेस.

    ReplyDelete
  2. वा... क्या बात है अमित.. बढिया... सामोसे आणि कोल्डिंक्स घेऊन सभ्यपणे एखाद्या हॉलमध्ये ऐकलेली मैफल किंवा पक्की सुपारी टाकलेलं पान चघळत एखाद्या मांडवाखाली मांडी ठोकून, डोळे मिटून बुवांना दिलेली दाद, यापेक्षाही ही मैफल जास्त आवडली... सुरांत भिजून पाऊस ऐकण्यापेक्षा पावसात भिजत सूर ऐकणं, जास्त उत्कट वाटलं.

    ReplyDelete
  3. निरीक्षणं छान आहेत, अमित.
    पण,
    सितारों से आगे जहां और भी हैं

    ReplyDelete
  4. अमित, तू गझलची धुंदी अनुभवलीस..तुझा लेख वाचताना गझलचे आणि त्या पावसाचे काही तुषार इथंही अंगावर उडले आणि ऑफिसमध्येच थोडा ओला झालो..कीप इट अप..लोकलमध्ये माझ्याबाबत तरी मैफल सुरू होत नाही तोच संपायची वेळ येते

    ReplyDelete
  5. व्वा अमित मस्त झालाय ब्लॉग. धकाधकीच्या पत्रकारितेतही तू जाणिवा कायम ठेवल्या आहेत जागृत ठेवल्या आहेत, हे आवडलं.

    ReplyDelete
  6. अमित... मस्त रे! कॉमेंट टाकायला उशीर झालाय खरा... पण वाचून मस्त वाटलं. तुला ती हमालाची गोष्ट माहिती आहे? रोज लोकांची ओझी वाहून एक हमाल कंटाळलेला असतो. समोरून त्याचा मित्र (तो ही हमालच) डोक्यावर भला मोठा पेटारा घेऊन येत असतो. तो आपल्याच धुंदीत शिट्टी मारत आणि गुणगुणत जात असतो. पहिल्या हमालाला प्रश्न पडतो, की साला हा इतका आनंदात कसा काय? माझ्यासारखीच हादेखील लोकांची ओझी वाहणारा... मग तो त्याला अडवतो आणि विचारतो त्याच्या आनंदाचं कारण. त्याचा मित्र पेटारा खाली घेतो आणि त्यावर ठेवलेलं गुलाबाचं फुल दाखवतो आणि आपल्या सदा वैतागलेल्या मित्राला म्हणतो, 'मी कितीही ओझं असलं, तरी त्यावर आणखी या फुलाचं ओझं ठेवतोच... आणि मग विचार करतो की माझ्या डोक्यावर भला मोठ्ठा जड गुलाबाच्या फुलांचा ढीग आहे... त्यामुळे मला या कामाचं ओझं वाटत नाही... आनंद वाटतो...'
    आपण सगळे आपल्या पहिल्या हमालासारखे असतो. नाईट शिफ्टला वैतागलेले. पण अण्णा हजारे, मुंडे, जे. डे हत्याकांड या सगळ्यांमध्ये आपली 'गझल' शोधली की मॉर्निंग, सेकंड आणि नाईट या तीन्ही शिफ्ट संगीतमय होऊच शकतात...
    असो. शाळा खूप झाली. मला मात्र नाईट शिफ्ट आवडते. मनासारखं काम करायला मिळतं. सगळ्यात रटाळ मॉर्निंग आणि सगळ्यात मस्त अर्थातच सेकंड. एव्हर हॅपनिंग शिफ्ट!

    ReplyDelete
  7. प्रिय अमित वाचताना अंगावर रोमांच उभे राहिले, गझल हि ऐकण्याची नाही तर अनुबवायची असते, आणि ज्या वातावरणात तू ती अनुभवली मला तुझा हेवा वाटतो, खूप लहान असताना पासून मी गझल ऐकली आहे, अनेकदा तुला आलेला निशब्द करणारा अनुभव हि घेतला आहे.. त्यामुळे तू शब्दात व्यक्त केलेला अनुभव आणि गझले च्या ओळी वाचून पुन्हा त्याचा प्रत्यय आला..

    ReplyDelete
  8. Kya Baat Hai Amiy.
    Masta vatla vachun...aapla sangeet mandalachi aathvan zali mala.
    Superb. :)

    ReplyDelete