Wednesday, March 10, 2010

मित्रौ दी गड्डी

फुल से काटे अच्छे जो दामन थाम लेते है,
दोस्त से दुष्मन अच्छे जो जलकर बी नाम लेते है..

रस्त्यातून जाताना पुढे आरामात चाललेल्या एका ट्रकवाल्याला बरेच हॉर्न दिल्यावर त्याच्या बाजूला गाडी स्लो केली आणि जोरदार शिवी दिली.. काय रे बापाचा आहे का असा जोरदार प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्याने फक्त एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं आणि जाऊ दे अशा अर्थी हात दाखवला. थोड्यावेळाने त्याने पुन्हा एकदा ओव्हरटेक केलं. त्यावेळी त्याच्या नावाने लाखोली वाहून झाल्यावर त्याच्या मागे लिहीलेल्या या ओळी वाचल्या.. आणि मग मात्र हसायला आलं..

भारत हा एवढा अवाढव्य देश, या देशातून एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सतत ये जा करणारे हे ट्रकवाले हे खरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाचं.. अजब रसायन.. रस्ता त्यांच्या बापाचा नाही, त्यांचा स्वतःचाच.. हायवेंवर त्यांचाच हक्क..

समाजातला सर्वात उपेक्षित घटक कोणता असा प्रश्न मला विचाराल तर मी पहिल्यांदा या ट्रकवाल्यांचं नाव घेईन. या ट्रकवाल्यांना नाव, जात, धर्म, पंथ काहीही नसतो.. त्यांची ट्रकवाला एवढीच ओळख असते.. त्यांच्या हातात त्यांचं भविष्यही नसतं. असतं ते फक्त स्टिअरींग व्हिल.. व्हिल म्हणजे चाकाने मानवाच्या उत्क्रांतीत मोठा वाटा उचलला असं म्हणतात, ट्रकवाल्यांच्या हातात असलेल्या चाकानं या भारतात अर्थव्यवस्थेची घडी बसवली.. व्यापार उदीम, उद्योगधंदे, शेतकरी, बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजारसमित्या, काहीही असो ट्रकवाल्यांचा हातभार प्रत्येक धंद्यात आहेच. अशा पद्धतीने थोडा विचार केल्यावर मी या ट्रकवाल्यांच्या आणि त्यांच्या विश्वाच्या प्रेमातच पडलो..
जरा विचार करा.. श्रीनगरमधून माल घेऊन निघालेला ट्रक कन्याकुमारीला पोहोचेपर्यंत किती विविध अनुभव, विविध वातावरण, विविध शहरं, माणसं, रस्ते, माती, डोंगरदऱ्या, वाहनं, वेगवेगळे पोलीस, सरकारी अधिकारी, टोलवाले, धाबे पहात हे ट्रकवाले जात असतील.
या ट्रकमध्येही केवढे वेगवेगळे प्रकार आहेत. टाटा, अशोक लेलँड, आयशर, स्वराज मझदा अशा अनेक कंपन्या भारतात ट्रक बनवतात, विकतात. व्होल्वो, मर्सिडीझ सारख्या कंपन्याही आता भारताच्या रस्त्यांवर आल्या आहेत. मात्र तरीही भारतीय ट्रक म्हणजे अशोक लेलँड आणि टाटाचेच..
बरं, हे ट्रकवाले रसिकही तेवढेच असतात. कधी ट्रकच्या मागे केलेलं नक्षीकाम, रंगकाम पहा.. रंगीबेरंगी मोरापासून ते प्रियकराची डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या तरूणीपर्यंत अनेक चित्र आपण ट्रकच्या मागे पाहू शकू. बुरी नजर वाले तेरा मूह काला, एक तू ही निरंकार, हॉर्न ओके प्लीज ही वचनं तर आपण रोजच्या भाषेतही वापरायला लागलोय.
आई बाबांचा आशिर्वाद, सुजाता मुन्नी आणि बंटी, साथी हाथ बढाना..सोनू मोनू दी गड्डी, मित्रौ दी गड्डी.. अशा ओळी लिहून ट्रकवाले आपला कुटूंबवत्सलपणा दाखवतो.
बघतोस काय मुजरा कर असं ठणकावून ट्रकवाला आपला मुजोर स्वभावही दाखवून देतो. जवळपास प्रत्येक ट्रकवर मेरा भारत महान आणि जयहिंद लिहीलेलं असतं. याशिवाय काहीवेळा ट्रकवाले समाजप्रबोधनही करतात. अर्थात ते त्यांच्या खास स्टाईलमध्ये असतं..
एड्स टाळण्यासाठी काय कराल हे सांगण्यासाठी ट्रकवाल्यांची एखादी ओळ बास असते. मागून ठोकू नका, आय एम एचआयव्ही पॉझीटीव्ह, असं सांगणारा ट्रक ड्रायव्हर स्वतःची आणि आपल्या गाडीचीही.. वाचवतो.. (काय करणार त्याची पद्धत), कंडोम कब कब, यौन संबंध जब जब हे वाक्य देखील तो बिनधास्त लिहीतो..
ट्रकवाले नालायक असतात, ते रस्त्यात इतरांचा विचार करत नाहीत, गाड्या भरधाव चालवतात, ते दारू पितात, त्यांना अनेक रोग व्याधी असतात असे अनेक आरोप या जमातीवर केले जातात..
माझं मत वेगळं आहे. ते भरधाव गाडी चालवत नाहीत. हायवेवरून जरा निरीक्षण करा.. रस्त्यांची स्लो लेन पकडून ट्रकवाले आपला रस्ता कापत असतात. त्यांना त्यांचा स्पीड हा नियंत्रीत करावाच लागतो. भरलेला माल आणि तोडायचं अंतर यांचा विचार केला तर त्यांना एकाच स्पीडने का जावं लागतं हे तुम्हाला पटेल. घाटात कृपया त्यांना त्रास देऊ नका,, कारण मालाने ठासून भरलेला ट्रक चढणावर थांबला तर त्यांना परत चालायला प्रचंड जोर द्यावा लागतो. घाटात थांबणं कोणत्याही ट्रकवाल्याला आवडत नाही. ट्रकवाले दारू पितात, हो ते दारू पितात. गुजरातमधून आसाममध्ये ट्रक न्यायचा असेल, एवढं अंतर कापायचं असेल. एवढे त्रास सहन करायचे असतील तर रात्री ट्रकवाले दारू पितातच, मी म्हणीन तो त्यांचा हक्क आहे. ट्रकवाले वेश्यागमन करतात.. असाही आरोप होत असेल. खराही असेल तो.. महिनोनमहिने आपल्या कुटूंबापासून लांब रहायला लागल्यावर अशिक्षित ट्रकवाल्याने
काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे..


असे हे ट्रकवाले.. रस्त्यावरचा सर्वात दुर्बल घटक.. पोलीस, सरकारी अधिकारी, इतर वाहनधारक, टोलवाले, राज्याराज्यातले वेगवेगळे कायदे असे अनेक त्रास सहन करत भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारे हे अशिक्षित ट्रकवाले.. रस्त्यावर आडवा झालेला ट्रक आणि त्याच्याबाजूला हताश होऊन विडी फुंकत बसलेला ट्रकवाला हे चित्र तुम्ही हायवेवर पाहिलं असेल. कधीतरी त्याच आडव्या ट्रकबाजूला चादरीत लपेटलेला ट्रकवालाही तुम्ही पाहिला असेल. समाजातल्या अनेक घटकांची चिंता आपण करत असू.. या समाजाविषयी चिंतेतला च ही आपल्या मनात येत नाही.

अर्थात तुम्ही चिंता करा करू नका, त्यांच्यावर लेख लिहा, शॉर्ट फिल्म करा, टिका करा, शिव्या घाला हे सगळं बघायला त्यांना वेळ नसतो.. कारण त्यांना गाठायचं असतं त्याचं ठिकाण.. गाडी तर ओव्हर लोड झालेली असते.. मालकाने दोन दिवसात हजार किलोमीटर तोडण्याचं आव्हान दिलेलं असतं.. वाटेत पोलीस किती असतील, झोप मिळेल नाही मिळेल माहित नाही अशी स्थिती असते.. पुढे वाहात राहिलेल्या हायवेसारखं हे आयुष्य वाहात राहीलं पाहिजे हे तो जाणतो.. तेव्हा आपला हा ट्रकवाला गाडीला स्टार्टर मारतो.. आणि सरळ निघतो... त्याच्या पाठी लिहीलेलं असतं
यारां दा ट्रक बलिये... आयुष्य म्हणजेच ट्रक मित्रा..

3 comments:

  1. ट्रककडे आणि ट्रकचालकाकडे यापुढे बघताना तुझा लेख नक्की आठवेल. मुद्दाम ट्रकने मोठा प्रवास ड्रायव्हरच्या शेजारी बसून कर आणि मग तो अनुभवही जरुर शेअर कर. विशेषतः रात्रीचाही प्रवास असेल तर आणखी भारी. आपल्यासाठी लाइफ लाँग अनुभव आणि आठवण ठरेल.

    सागर गोखले

    ReplyDelete
  2. सही रे. एकदम आवडला. सागरने सुचवल्याप्रमाणे एकदा मला ट्रकने प्रवास करायची संधी मिळाली होती. एक-दीड तासांसाठी. अरे काय सजवला होता तो ट्रक, आणि छोट्या जागेत सगळ्या सुविधा. मस्त मजा वाटली होती. रस्त्यात गाडी बिघडल्यामुळे पुढचे थोडे अंतर कापण्यासाठी ट्रकने गेलो होतो. पण पठ्ठ्याने पैसे नाही घेतले आमच्याकडून. आम्ही कोणाला असे घेत नाही, पण तुम्ही लेडीज म्हणून सोडले, असं त्याचं साधं स्वच्छ उत्तर होतं. तुझ्या लेखामुले पुन्हा तो प्रसंग आठवला.

    ReplyDelete