पाऊलवाटा अंगणी मिळती
लवफुलवंती जुई शेवंती
शेंदरी आंबा सजे मोहरू
खेड्यामधले घर कौलारू...
ऊन पाऊस या चित्रपटातलं हे ग.दि. माडगूळकर यांचं गाणं.. हे घर कौलारू मी कधीच अनुभवलं नव्हतं. कोंकणात कोणाकडे पाहूणा म्हणून गेल्यावर मी अशी घरं पाहिली होती. मात्र आपल्या गावाला, आपल्या घरात जाणार आहोत ही भावना त्यात नसायची. माझी पत्नी वैशालीचं मूळ गाव रत्नागिरी जिल्हात देवरूखजवळ निवे हे आहे अशी मला फक्त माहिती होती. मात्र प्रत्यक्ष तिथे जाण्याची वेळ आली नव्हती. महाशिवरात्रीला निव्यात सिद्धेश्वराचा उत्सव असतो अशी माहिती कळली होती. वैशालीच्या वडिलांनी जाहिर केलं आपण सगळे निव्याला उत्सवाला जाणार आहोत. नवपरिणीत दांपत्याला सिद्धेश्वराचं दर्शन घडवणं आणि त्याचबरोबर राजवाड्यांचं मूळ गावही दाखवणं हे दोन्ही उद्देश होतेच. कोकणात जायचं असल्यामुळे आनंदाने निघालो. निव्यात पोहोचेपर्यंत कल्पना येत नव्हती तिथे काय असेल याची. मात्र खरंच सांगतो, परतताना पाय निघत नव्हता...

सुंदर घर, त्याच्या भोवताली सारवलेलं स्वच्छ अंगण, बाजूचा गोठा, मागे वाडी, त्यापलीकडे मिरची, पावटा, चवळीचं शेत. त्याच्यापलीकडे वाहणारा पर्ह्या... त्याचं स्वच्छ, थंड पाणी.. त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा शेत, शेतात उगवलेला हिरवी पावटा, हे सगळं पहात असताना चवळीची कोवळी शेंग खाण्यातली मजा मी त्यादिवशी अनुभवली. तेवढ्यात पर्ह्या पलीकडून हाळी ऐकू आली.. काय चाकरमान्यानू.... कधी आयलय.. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळतीला चाललेला सुर्यनारायण.. ही माझी आणि निव्याची पहिली ओळख. घरांच्या भोवताली शेतं की शेतांत असलेली घरं, निव्याचं वर्णन कसं करावं हे मला कळत नाही.
गावात महाशि़वरात्रीचं वातावरण रंगायला लागलं होतं. रात्री घरात बसून टाळ, मृदुंगाच्या साथीने जोरदार भजन रंगलं. रोज लोकलमध्ये ऐकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं भजन कोकणात होतं असं ऐकलं होतं. त्याचा प्रत्ययही आला.
आजूबाजूला डोळ्यात बोटं घातली तरीही दिसणार नाही असा काळोख, थंड हवा आणि त्यात रंगलेलं भजन खरोखर अवर्णनीय असा माहोल होता. रात्री अंथरूणावर पडल्याबरोबर झोप लागली. सकाळ कधी झाली ते कळलंही नाही. आणि विशेष म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा रोजच्यासारखा थकवा अजिबात नव्हता.

निव्यातली शांतता, पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ, तिथल्या गायी, तिथलं पाणी, शेतं, झाडं हे सगळं खरोखर वेड लावणारं. घरात बसून घेतलेली काजूबीयांची चव, निरसं दूध, भाजीचा फणस, पानात वाढली गेलेली पावट्याची उसळ, हातसडीचा तांदूळ, त्याचा वाफाळता दरवळ, सोबत खारातली मिर्ची, शेतात फिरताना चावलेली कोवळी चवळीची शेंग, गुलकंदाच्या गुलाबाचा सुवास, पर्ह्याच्या पाण्याचा थंडगार स्पर्श, कधीही न विसरता येण्यासारखा. या गोष्टींच्या प्रेमात पडण्यासाठी अजून एक मोठी गोष्ट कोणती सांगू... हे सगळं आपल्या घरातलं आहे, आपल्या जमिनीत पिकलंय ही भावना....
लहानपणापासून मला गाव नाही, त्यामुळे गावाचं महत्त्व काय असतं ते मला नक्कीच माहित आहे. ज्याला गाव आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त... ते सुख मला निव्याने दिलं.
चौकट तीवर बालगणपती,
चौसोपी खण स्वागत करती,
झोपाळ्यावर अभंग कातर,
सवे लागती कड्या करकरू...