या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. हातकणंगले तालुक्यातले वारणा नदीच्या काठावरचे भादोले गाव. ऊस उत्पादनामुळे सधन आणि संपन्न गाव. या गावात शिरकाव केलेल्या परमिट रूम आणि दारूच्या गुत्त्यांना हद्दपार करण्याचा विडा या गावातल्या महिलांनी उचलला. त्यासाठी दारूबंदी कृती समितीचीही स्थापना केली. त्यासाठी मतदान घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार झाला. गावातल्या एकूण तीन हजार सातशे ब्याण्णव मतांपैकी अठराशे सत्ताण्णव मतांची गरज होती. महिलांनी मतदानात सहभाग घेतला आणि बहुमत मिळवत दारूबंदीचा लढा जिंकला....
एवढी साधी सोपी सरळ वाटणारी ही या लढ्याची गोष्ट... मात्र वाटते तेवढी साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मतदान घेऊ शांततेच्या मार्गानं आदोलन जिंकण्याचा निर्धार केलेल्या ग्राम भगिनींसमोर वेगळेच आव्हान होते. दारूबंदी व्हावी, गावातून दारू हद्दपार व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा होती का हा खरा प्रश्न आहे. मतदानासाठी जो दिवस निवडला गेला तो होता गौरी भोजनाचा. ग्रामिण भागात या सणाला केवढे महत्त्व असते आणि त्यादिवशी गरिब असो वा श्रीमंत गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी असते हे आपल्याला माहित
आहेच. हा सण खरोखर स्त्रीचा सण असतो. अशावेळी स्वयंपाकघरात गढून गेलेल्या स्त्रीला अशा सामाजिक प्रश्नासाठी मतदानासाठी घराबाहेर पडणे खरोखर कठीण आहे. याचा परिणाम मिळणाऱ्या मतांवर होणार हे उघड आहे. अशावेळी हाच दिवस मतदानासाठी ठरवला गेला. मात्र महिला हरल्या नाहीत. ग्रामभगिनींनी हिरीरीने उत्सवही साजरा केला आणि
मतदानासाठीही आवर्जून उपस्थिती लावली. आणि बहुमतही मिळवले. घरची जबाबदारी पार पाडून गावाच्या समोर उभा असलेला दारूरूपी राक्षस त्यांनी धुळीला मिळवला. तरूणींपासून अगदी म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्याजणींनी एकीचे बळ सिद्ध केले. तब्बल पाचशे चौतीस मतांची
आघाडी घेतली. गौरी म्हणून माहेरवाशिणीचे कौतुक सांगणाऱ्या देवीने दुर्गेचे रूप धारण करत दैत्याचा नायनाट केला. जिथे मांगल्य असते तिथे सरस्वती वास करते असं
म्हटलं जातं. दुर्गेचे रूप धारण करून भादोलीतल्या गौरींनी गौरी भोजन संपन्न केलंच आहे. आता अशा पवित्र ठिकाणी सरस्वती आणि त्यापाठोपाठ लक्ष्मीही नक्की कृपादृष्टी ठेवेल...( या ब्लॉगसाठी साम मराठी वृत्तविभागाचे अनंत सहकार्य मिळाले आहे. साम मराठी वृत्तविभाग आणि कोल्हापूरचे प्रतिनिधी निशिकांत तोडकर यांचे आभार )
