
खरच किती सुंदर वातावरण होतं.. बाहेरचं पहाटेच्या रंगांचं सौदर्य पाहात काच थोडी उघडल, थंड वारा अंगावर घेत होतो. कानावर हरीपाठ पडत होते. डोळ्यात ते रूप साठवल्यावर मग अलगद डोळे मिटले. डोळे मिटल्यावर मनाने वेग घेतला. मनाने पोचले माथेरानमध्ये.. लक्ष्मी ह़ॉटेलची आमची नेहमीची ठरलेली खोली. त्याच्या समोर असणारी सुंदर बाल्कनी, आणि तिथून दिसणारा समोर पसरलेला गार्बट हील. माथेरानमध्येही आत्ता अशीच पहाट फुलत असणार. गार्बट माथेरानच्या पश्चिमेला आहे त्यामुळे तिथे थोडा कमी प्रकाश असणार, हा विचार करत असताना खरचं नाकात माथेरानचा सुंदर वास आला. हे क्षण अनुभवतो न अनुभवतो तोच मी अचावक माझ्या गावाला वाईला पोहोचलो.. वाईतही आळीमध्ये अशीच सुंदर पहाट फुलत असेल. आत्या राहायची त्या वाड्यात आम्ही राहायला जायचो. तिथे वाड्याबाहेर कृष्णाबाईच्या उत्सवाची लगबग सुरू होती.. पालखी येणार म्हणून पहाटेपासूनचं संपूर्ण आळी स्वच्छ झाली होती. बाहेर सडे घातले होते.. रांगोळ्या काढल्या होत्या.. कानावर हरीपाठ पडत होते.. नाकात वाईचा वास आला.. वाईच्या थंड पहाटेचा अनुभव घेतो न घेतो तोच वाई जवळच्या मेणवलीच्या घाटावर पोहोचलो. पहाटेच्या प्रकाश होता. कृष्णाबाईच्या पाण्यावर धुक्याचं आच्छादन होतं.. बाळं नावाचे पक्षी पाण्याच्या जवळून घिरट्या घालत होते.. समोर शेतात ऊसाचा फड धरला होता.. घाटावर बसून तिथल्या पहाटेचा आस्वाद घेतो तेवढ्यात पुन्हा घरात पोहोचलो.. सातवीत होतो.. सकाळचे पावणेसहा झाले होते. बाबांनी रेडिओ लावला होता.. सुरूवातीला वंदेमातरम् झालं.. मग आकाशवाणीचं म्युझिक, मग बाबांनी मला उठवलं.. त्यानंतर रेल्वेवृत्त, मग आजचे बाजारभाव,मग चिंतन हाच चिंतामणी आणि त्यानंतर मग भक्तीगीतं.. त्यातही आर एन पराडकरांची दत्ताची गाणी.. त्या वेळापत्रकावर इथे आमची शाळेची आवराआवर. सहा चाळीसची बस पकडून शाळेत गेलो. रेडीओवर त्यानंतर काय लागतं माहिती नाही.. कानावर हरिपाठ पडतच होते...
मनाने प्रचंड वेग घेतला.. एमआयडीसी ते डोंबिवली ही बस पकडायच्या ऐवजी मी पोहोचलो एकदम लांबपल्ल्याच्या गाडीत. गाडी चालली होती भोपाळला.. मी चाललो होतो एसएसबीला(एसएसबी म्हणजे सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड, थोडक्यात आर्मीसाठीचा इंटरव्ह्यू,युपीएससीची सीडीएस पास झाल्यावर द्यावी लागणारी परिक्षा), माझं रिझर्वेशन वेटींगवरच अडलं..मग दाराजवळ पांघरूण गुंडाळून रात्रभऱ खाली बसून प्रवास, त्यातच पहाट झाली. गाडी मस्त वेगात चालली होती. भुसावळ जाऊन साधारणतः गाडी एमपीमध्ये शिरली होती.. पहाटेचा गार वारा झोंबत होता.. प्रवास संपतच नव्हता.. कानावर हरीपाठ येत होते.. त्यानंतर भोपाळला पोहोचेन असं वाटत असताना मी मात्र मनाने पोहोचलो अलाहाबादला.. पहिली एसएसबी.. प्रचंड दडपण, फक्त साडेचार टक्के रिझल्ट लागला होता.. माझ्या बॅचमध्ये भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ३० मुलं होती.. पहाटे सहा वाजात नाश्ता करून साडेसहा वाजता आम्ही फॉलइन करून उभे.. एक ग्रुप टेस्टींग ऑफीसर मेजर मेहता पुढे कशा टेस्ट असतील याची माहिती देत होता... त्या ऐकताना परत प्रचंड दडपण आलं.. कानावर हरीपाठ पडतच होते..
ते दडपण ओसरत नाही तोवर अचानक पोहोचलो वैष्णोदेवीला.. रात्री रांगेत उभं राहून दर्शन केलं होतं.. पावणेपाचला वरती भैरोबाबाच्या मंदिरात पोहोचलो.. तिथे दर्शन घेतलं. उजाडायला लागणार होतं.. समोर लांब बर्फाच्छादीत शिखरांवर पहिली सुर्यकिरणं पोहोचून तिथे सोनं तयार झालं होत... थंड वातावरण. तिथला वास नाकात रेंगाळला.. तो वास घेतो न घेतो तोवर अचानक मी एकदम मागे गेलो... वय वर्ष दहाच्या आत.. पुण्याला आमच्या काकांकडे भिडे वाड्यात आम्ही राहायला जायचो... सातनंतर झोपलेलं काकांना चालायचं नाही.. अंथरूणावर पडलो होतो... पहाट होत होती. खालच्या प्राजक्ताच्या फुलांचा सुवास येत होता.. वाड्यात दुसऱ्या मजल्यावर शास्त्रीय गायिका मंजिरी आलेगावकर राहायची. त्यावेळी ती कर्वे होती. तिचा रोजचा पहाटेचा रियाझ सुरू झाला होता.. पहाटेच्या वातावरणात शास्त्रीय संगीताचे सूर.. आजही ते आठवलं की डोळ्यात पाणी येतं.. कानावर हरीपाठ पडतंच होता...
काय होत होतं.. माझं मलाच कळत नव्हतं... अचानक आठवलं अरे आज १२ डिसेंबर बरोबर ३ वर्षांपूर्वी अशाच एका सुंदर पहाटे मी आंघोळीच्या आधी खुर्चीवर बसलो होतो. आई ताई आणि वहिन्यांनी मला हळद लावली होती.. लग्नाची तयारी सुरू झाली होती.. काही जण चिडवत होते.मग आवरंलं.. आणि आम्ही हॉलमधे पोहोचलो.. गाणी लावली होती. कानावर हरीपाठ पडत होते...
आमच्या गाडीला एकाने कट मारला.. गाडी पटकन थांबली. दचकून डोळे उघडले.. पाम बिचरोडवर नेरूळ क्रॉस होत होतं... हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..कानावर स्पष्ट आवाज आला. ज्ञानोबांनी सांगितलेला हरीपाठ मला फार आवडला.. मनाचा वेग किती असतो हे ज्ञानदेवांनी सांगितलं होतं. त्याचा अनुभव आला. पहाट किती सुंदर असते हे त्यातून दिसलं. अनेक पहाटे आपण पाहिल्या होत्या.. पण त्यांचं सौदर्य तेव्हा कळलं.. मन केवढी भरारी मारून आलं होतं.. वायुवेग काय होता हे कळलं.. मग विचार सुरू झाले. झेवियर्समध्ये आम्हाला शिकवायला कवी महेश केळुसकर होते.. रेडीओ या माध्यमाविषयी त्यांनी आम्हाला शिकवलं होतं.. त्यावेळी 'पहाट' ही गोष्ट त्यांनी अक्षरशः उच्चारातून दाखवला होता..त्यावेळपासून पहाट आवडायला लागली होती. पण का आवडली पहाट.. दिवसाच्या प्रत्येक वेळेत काहीतरी उत्तम आहेच की.. मग पहाटचं का... पु. लं. नी म्हटलंय एखादी गाण्याची मैफल जागवून घरी परतताना अचानक भेटते ती पहाट.. खरंच आयुष्यातल्या काही पहाट अशाच भेटल्या...दिवाळीच्या दिवशी घडवून आणलेला दिवाळी पहाटेचा कार्यक्रम नाही.. तर अशा अवचित भेटलेल्या पहाटेंनी अशा अनेक दिवाळ्या मी जगलो होतो हे त्यादिवशी कळलं. मात्र प्रत्येक पहाटेत एक साम्य होतं.. प्रत्येक पहाट ही कसली तरी सुरूवात होती.. म्हणून ती आवडली होती.. काही तरी सुरू करण्याचा आनंद असतोच की.. हरीपाठ कानावर पडतचं होते.. आता सूरही यायला लागले..