Saturday, January 9, 2010

मज लोभस हा इहलोक हवा...

सुट्टीत फिरायला कुठे जायचं हा विषय निघाला की अनेक ठिकाणं आपल्या डोळ्यांपुढे येतात. सिमला कुलू मनाली, नैनिताल मसूरी, राजस्थान, पंजाब ही उत्तर भारतातली ठिकाणं पाहून झालेली. मध्यभारतात जबलपूर, भेडाघाट यांचीही चलती आहे. दक्षिण भारतात केरळाला सर्वाधिक पसंती मिळते. मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर अनेक ठिकाणं भारतात आहेत. त्याचा शोध घेतला तर फार सुंदर पर्यटन अनुभव आपल्याला येऊ शकतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय.

लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी ठिकाणांची शोध मोहीम सुरू होती. हनिमुनर्सचं आवडतं ठिकाण म्हणजे केरळ.. पण केरळमध्ये नंतर फिरायला जा.. हनिमूनसाठी अजिबात नको ही सल्ला अनुभवी नातलगांनी दिला. बंगलोर मैसूर उटी कोडाई हा प्लॅन ठरत होता. मात्र बंगलोरमध्ये आता पाहायचं काय हा प्रश्न पडला. उत्तरेकडे जायचं नव्हतं. आणि परदेश खिशाला परवडणारा नव्हता... तेवढ्यात दोन ठिकाणं कळली.. वायनाड आणि कूर्ग ही त्यांची नावं ऐकल्यावर ही भारतात आहेत का हा प्रश्न पडला. भारतातच आहेत, दक्षिणेकडे आहेत, आणि खिशाला परवडतील अशीही आहेत हे कळल्यावर नेटवर माहिती वाचली. कूर्गचं वर्णन स्कॉटलंड ऑफ इंडिया असं केलं होतं. ते वर्णन ऐकलं. फोटो पाहीले आणि ठरवलं.... बसं... वायनाड आणि कूर्गलाच जायचं...

आता ही ठिकाणं कुठे आहेत ते तुम्हालाही सांगतो. कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला केरळ सीमेला लागून कूर्ग हा जिल्हा आहे. आणि त्यालाच जोडून केरळमध्ये वायनाड हा जिल्हा आहे....

साधारणतः आठ दिवसात ही दोन्ही ठिकाणं पाहून होऊ शकतात. थंड हवा, सदाहरीत जंगलांचा प्रदेश, कमी गर्दी, चांगले लोक या सगळ्याच गोष्टींमुळे एक चांगलं मधूचंद्राचं ठिकाण म्हणून या ठिकाणांकडे पाहता येईल.

प्रथम वायनाड आणि मग कूर्ग या क्रमाने ही ठिकाणं पाहणं सोयीचं ठरतं.
वायनाडला जाण्यासाठी कालिकतला जाणे आवश्यक आहे. कालिकतचं नाव आठवतं का.. आठवत नसेल तर इतिहासाच्या
पुस्तकात डोकवा. वास्को द गामा हा पोर्तुगिज व्यापारी कालिकत बंदरात उतरला असा उल्लेख तुम्हाला आढळेल. रेल्वे रिझर्वेशन चार्टवर मात्र कालिकत असा उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. कालिकतला रेल्वेखातं कोझिकोडे असं म्हणते. आणि प्रत्यक्ष कालिकत, कोझिकोडे या शहरातले नागरिक त्यांच्या शहराला कोळीकोड असं म्हणतात. असो.... नावात काय आहे.

कोकण रेल्वेमार्गे कोळीकोड स्टेशनला उतरलं की व्यापारी बाजारपेठ असलेल्या शहरातून मार्गक्रमण करताना आपला हिरमोड होऊ शकतो. मात्र थांबा एकदम हिरमुसू नका.. कोळीकोडपासून १३ किलोमीटरवर असलेला कप्पड बीच नक्की पहा. साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा हा बीच पाहून खरोखर मनं सुखावतं.. थोडी जाडसर पिवळ्या धमक रंगाची अतीस्वच्छ वाळू.. त्यावर येणाऱ्या हिरव्या जर्द लाटा पाहून मन सुखावतं. आणि हो! हा बीच पर्यटकांच्या यादीत नाही. त्यामुळे सगळा बीच आपलाच असल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्यानंतर कोळीकोडमध्ये खास केरळी पद्धतीचं जेवण घ्या. कोळीकोडमध्ये एक दिवसाचा मुक्काम करावा लागतो आणि तो घ्या असा आग्रहही आहे. दुसऱया दिवशी सकाळी वायनाडला जाण्यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते तीन तासांचा अवधी तरी आवश्यक आहे.

एक सल्ला देईन ही टूर प्लॅन करताना हॉटेल बुकींग्जबरोबर कोळीकोडलाच कारही ठरवून घ्या. कोळीकोड-वायनाड-कूर्ग अशी टूर एरेंज करणाऱया कारचं बुकींग मुंबईतूनही करता येतं.

कोळीकोडमधून निघाल्यावर शहरी भाग सोडल्यावर मलबार विभागाचं खरं सौदर्य दिसायला लागलं. उंचचं उंच डोंगररांगा, सदाहरीत जंगलं, त्यामुळे उत्तुंग जाड बुंध्याची झाडं असा हा परिसर तुम्हाला भुरळ घालायला सुरूवात करतो. पाऊस एकदातरी हजेरी लावून जातो. त्यामुळे जंगलाला नेहमी एक ओलसर हिरवेपणा असतो. आजूबाजूला मसाल्याच्या पदार्थांचा बगिचा आणि त्यातून वाट काढत जाणारी कार असा हा एकंदर सुंदर अनुभव. वळणं वळणं घेत वायनाडचा घाट चढायला सुरूवात करते. गच्च जंगलातून मार्ग काढणारा हा घाटरस्ता खरोखर श्वास रोखून धरायला लावणारा आहे. मात्र एकदा का घाट संपला की रस्ताच्या दुतर्फा सुरू होतात चहाचे मळे. टेकड्यांच्या उतारावर लागवड करण्यात आलेले चहाचे मळे, पावसाळी हवा, आणि त्यामधला गुळगूळीत रस्त्यावरचा प्रवास वेड लावतो.

वायनाडला रहाण्याची सोय जिल्हा मुख्यालय असलेल्या कलपेट्टा या शहरात होते. काही चांगली हॉटेल्स या शहरात आहेत. स्टार हॉटेल्सही आहेत.

वायनाडला फिरण्यासारख्या मुख्यत्वे जागा म्हणजे एडेक्कल केव्हज्, मिनमुट्टी फॉल्स, पोकोट्ट लेक आणि कोरोव्हा आयलंड्स. यातील एडेक्कल केव्हज आणि मिनमुट्टी फॉल्स तुम्ही एकाच दिवशी करू शकाल. साधारणतः सकाळी एडेक्कल केव्हज् करून दुपारी मिनमुट्टी फॉल्स पहाता येतील. अर्थात या दोन्ही ठिकाणी चांगल्यापैकी चालावं लागतं.


एडेक्कल केव्हजवर जाण्याचा डोंगरातला मार्ग आकर्षक आहे. याठिकाणी तुम्ही पुरातन काळात कोरलेली भित्तीचित्र पाहू शकता. विशेष म्हणजे ती अजूनही उत्तम स्थितीत आहेत. आणि नीट लक्ष देऊन पाहिल्यास त्यांचा अर्थही कळू शकतो.

एडेक्कल केव्हज वरून निघाल्यावर साधारणतः १३ किलोमीटर्सवर मिनमुट्टी फॉल्स आहेत. याठिकाणी तीनशे रूपये प्रवेश फी घेतात. मात्र प्रवेश फीकडे पाहू नका. त्याच फीमध्ये तुम्हाला गाईड दिला जातो. हा गाईड घेतल्याशिवाय मिनमुट्टी फॉल्सना जाता येत नाही. कारण साधारण एक दिड किलोमीटरचा सगळा रस्ता डोंगरातला आहे. त्यापेक्षाही विशेष म्हणजे आधी चहाच्या आणि नंतर कॉफीच्या मळ्यातून, अक्षरशः मळ्यातून चालत जावं लागतं. कॉफीच्या झाडाखालून वाकून जाण्याचा आनंद काही वेगळाचं. डोंगरातून बरीच चढउतार केल्यावर मग दिसतो तो रौद्रभीषण प्रपात.
अप्रतिम याशिवाय कोणत्याच शब्दाने या प्रपाताचं वर्णन होत नाही. वायनाडमधला तो दिवस नक्की लक्षात राहील कारण रात्री झोपताना सुद्धा तो मिनमुट्टी फॉल्सचा धीरगंभीर आवाज तुमच्या कानात घुमत राहील.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पोक्कोट लेकला जाणं योग्य. अत्यंत निसर्गरम्य अशा तीन टेकड्यांच्यामध्ये हा तलाव आहे. या तलावात बोटींगची व्यवस्था आहे. तलावाच्या चहूबाजूंनी तलावाला फेरी मारण्यासाठी मातीचा पक्का रस्ता आहे. त्याचा नक्की आनंद घ्या.. हनिमून टूरमधला सर्वोत्तम हनिमून स्पॉट असं मी याचं वर्णन करीन. तलावाच्या काठावर एक छोटेसे कँटीन आहे. तिथे होममेड चॉकोलेट्स आणि स्पेशल वायनाड फिल्टर कॉफीचा आनंद नक्की घ्या. त्या थंड हवेत केळ्याची भजीही सुंदर लागतात. त्याशिवाय विशेष केरळी वस्तू मिळणारं एक सुंदर दुकानही आहे. येथे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ, कॉफी, चहा आणि अनेक उत्तम स्थानिक पदार्थ मिळू शकतात.
पोक्कोट लेकवरून पाऊल निघत नाही. मात्र मित्रांनो कोरोव्हो आयलंड्सना जाण्यासाठी आपल्याला निघायचं आहे. आणि पल्लाही मोठा आहे.
कोरोव्हो आयलंड्स हा एक चमत्कार म्हटला पाहीजे. नदीमध्ये कमीतकमी पाच पावलं आणि जास्तीत जास्त एक किलोमीटर परिघ असलेली तब्बल ६४ बेटं आहेत. या प्रत्येक बेटावर आपण नदीतून चालत जाऊ शकतो. फक्त त्यासाठी कमरेएवढ्या पाण्यातून चालण्याची तयारी हवी. त्यासाठी जास्तीचे कपडे घेऊन चला, पण प्रत्येक बेट फिरून नक्की पहा. तिथून आपण पुन्हा कलपेट्टाला येऊ शकतो.


कलपेट्टामध्ये सुंदर अशा वेगळ्याच रंगीबेरंगी मिरच्या मिळतात. त्यांचा अप्रतिम तिखट स्वाद चाखायलाच हवा. त्याशिवाय कलपेट्टामध्ये अप्रतिम असा हलवा बनवतात. बदामी हलव्यासारखा दिसणारा हा हलवा चवीला अत्यंत सुंदर असतो. याशिवाय दालवडा आणि अप्पम हे अख्ख्या केरळचे ट्रेड मार्क पदार्थ. कलपेट्टातही छोट्या छोट्या हॉटेल्सवर हे पदार्थ सुंदर मिळतात.
वायनाडमधला मुक्काम सोडताना मित्रांनो खरोखर डोळे पाणावतात. केरळला गॉड्स ओन कंट्री का म्हणतात हे पटतं.

वायनाडवरून आपण दुतर्फा किर्रर्र जंगल असलेल्या रस्त्यातून मार्गक्रमणा करत पोहोचतो मेडीकेरीला.. मेडीकेरी हे कर्नाटक राज्यातल्या कूर्ग या जिल्ह्याचं मुख्यालय... स्कॉटलंड ऑफ इंडिया असं या शहराला म्हणतात. डोंगर उतारावर वर्तुळाकार आकारात वसलेलं हे शहर पहिल्या दर्शनातच प्रेमात पाडतं.

राजासीट, ओंकारेश्वर मंदीर, फोर्ट, पॅलेस ही ठिकाणं शहरातचं आहेत, ती पहिल्याच दिवशी पाहून घ्या. राजासीटवरून दिसणारा सुर्यास्ताचा देखावा विलोभनीय.

दुसऱ्या दिवशी दुबारे फॉरेस्टचा प्लॅन करता येतो. दुबारे फॉरेस्टमध्ये हत्ती फार्म आहे. मैसूरमधला दसरा उत्सव फेमस आहे. त्यासाठी लागणारे हत्ती इथे सजवले जातात. या हत्ती फार्मवर जाण्यासाठी बोटीतून नदी पार करावी लागते. हत्तीवरून सैर, हत्तीची अंघोळ आणि हत्तीचे इतर कारनामे इथे दाखवले जातात.
तिथून जवळचं आहे गोल्डन टेंपल. अप्रतिम असं हे बुद्ध मंदीर पहायलाच हवं. हे चुकवलंत तर काहीतरी मोठं पहायचं राहून गेलं याची हुरहूर लागेल.
गोल्डन टेंपल पाहून झाल्यावर मेडीकेरीकडे परत जाताना कावेरी निसर्गधाम लागते. बांबूचे हे वन नक्की पहा. बांबूच्या बनात एवढं सौंदर्य दडलेलं असतं हे तिथे कळतं. तिथेच बाजूला कावेरी नदीचा सुंदर प्रवाह आहे. या प्रवाहात संध्याकाळ घालवणं आनंददायी.
मेडीकेरीजवळच कावेरी नदीचा उगम आहे. या स्थळाचं नाव आहे थलकावेरी. एवढ्या मोठ्या पवित्र कावेरी नदीचं उगमस्थान फार सुंदर बांधून काढलं आहे. प्रसन्न धार्मिक वातावरणाला शिस्तचं सुंदर बंधन घातलं आहे. तिथून परतत असताना भगमंडला नावाचं गाव लागतं. येथे सुंदर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचं शंकर, गणपती आणि विष्णू यांचे मंदीर आहे. अप्रतिम कोरीव काम असलेली ही तीनही मंदीर ब्रिटीशांशी झालेल्या संघर्षात उध्वस्त झाली होती. मात्र आता त्याचा जिर्णोद्धार झालाय. या मंदिरातली देवाची मुर्ती, त्याला केलेली फुलांची आरास आणि त्या भोवताली असलेली दिव्यांची शोभा पाहून फार प्रसन्न वाटतं. भगमंडलातल्या देवळांच्या बाजूलाच सुंदर असा त्रिवेणी संगम आहे.

मेडीकेरीच्या बाजारात चांगले मसाल्याचे पदार्थ, होममेड कॉफी चॉकलेट्स, फिल्टर कॉफी, ग्रीन टी, काजू मिळतात. मेडिकेरी गावातून चालत डोंगरउतारांवरू फेरफटका मारतानाही वेळ चांगला जातो.

अशी ही वायनाड कूर्गची सुंदर सफर. मित्रांनो परतीच्या प्रवासासाठी आपण एकतर मैसूरला येऊ शकतो किंवा मंगलोरला येणेही सोयीचे पडते.
या सबंध प्रवासात काय वेगळं आहे हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. भारतातली तीच ती पर्यटन स्थळ पाहून तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हाला हा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो या अख्ख्या प्रवासात मला एकदाही फसवणूकीचा अनुभव आला नाही. भाषा समजत नाही तर या लोकांना नाडा ही वृत्ती इथल्या लोकांत आढळत नाही. आलेले पर्यटक आपले आहेत. त्यांची काळजी घेणं ही जबाबदारी आहे हे कटाक्षाने पाळलं जातं. वायनाड कूर्गवर जेवढा निसर्गाचा वरदहस्त आहे तेवढीच तिथली माणसंही चांगली आहेत. वायनाड आणि कूर्ग वरून परतत माझ्या पत्नीने कवी बा.भ. बोरकरांची एक कविता ऐकवली ती कविता सतत मनात रूंजी घालत होती.

स्वर्ग नको सूरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा,
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष नी शोक हवा

1 comment:

  1. he sagle varnan jari agadi khara asle tari hi donhi thikane 'khas' vyaktisobat jast changli anubhavata yetat. so Amit, khas vyaktincha shodh laglelya saglyana ha nava pravas nakki avismaraniya rahil he nakki.

    ReplyDelete