Wednesday, January 4, 2017

आवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज वाचला... गाडी चालवताना समोरचं पाहायला मोठा विंडस्क्रीन असतो. पण मागचं पाहायला एक छोटा आरसा पुरतो... भविष्यातलं पाहायला मोठी दृष्टी हवी पण भूतकाळावर केवळ एक नजर टाकली तरी पुरते, अर्थात भुतकाळाचा फक्त आढावा घ्यायचा असतो, त्यात रमायचं नसतं अशा अर्थाचा तो मेसेज... सुरूवातीला हा मेसेज मला पटला. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या भूतकाळात संपूर्ण संध्याकाळ रमलो, रममाण झालो.  हे केवळ मीच केलं असं नाही तर गेल्या 53 वर्षात डोंबिवलीत राहीलेल्या शेकडो जणांनी माझ्यासारखा अनुभव घेतला. आम्हा सर्वाना सांधणारा दुवा होता टिळकनगर विद्यामंदिर ही आमची शाळा.

1964 साली आमच्या शाळेची स्थापना झाली. तेव्हापासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेत पुन्हा एकत्र बोलवावं असा विचार शाळेच्या संचालक मंडळाने प्रत्यक्षात उतरवला. तारीख ठरली 1 जानेवारी 2017, कित्येक महिने आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झालं. नावही विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आलं. अनेक पर्याय आले. त्यातून निवडलं गेलं 'आवर्तन' हे नाव, टॅगलाईनही ठरली, 'माझी शाळा, माझा जिव्हाळा'. संचालक मंडळ, माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग सर्वच जण कामाला लागले आणि साजरा झाला एक भव्य सोहळा.

खरं म्हणजे हा उपक्रम प्रत्यक्षात आणणं हेच खरं तर मोठं आव्हान होतं. 1964 सालापासून शाळेतून शिकलेले लाखो विद्यार्थी शोधणे, त्यांच्या नावांचं संकलन करणे, लग्न होऊन गेलेल्या मुलींना त्यांच्या नव्या नावांसह शोधणे... केवढं प्रचंड काम, पण शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलण्यात आलं. त्यासाठी मदत घेतली गेली ती इंटरनेटची... मंडप समिती, खानपान समिती, मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणारी समिती... कसल्या कसल्या समित्या स्थापन झाल्या. प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली, त्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकला गेला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. खरं म्हणजे इथे अनेकांची नावं घेण्याचा मोह होतोय. पण कोणाचं नाव न घेऊन अन्याय नको म्हणून तो मोह टाळतोय.

डॉ. महेश ठाकूरांनी वातावरण निर्मिती म्हणून एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला. आवर्तन या नावाचा... या ग्रुपवर या स्नेहसंमेलनाविषयी विविध गप्पा मारायला सुरूवात झाली. प्रसन्नकाका आठवले आपल्या सुंदर कविता करून शाळेची ओढ लावत होते. पर्यवेक्षिका मॅथ्यू बाईही शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्यामुळे लेखमाला लिहून शाळेची ओढ वाढवत होत्या. ग्रुपचा लोगो आमच्या बॅचच्या मिलिंद बडवेने तयार केला. दर विकेंडला आणि आठवड्यातूनही गरजेनुसार मीटींग होत होत्या, त्याचे अपडेट्स ग्रुपवर मिळत होते. यातून प्रचंड वातावरण निर्मिती होत होती. सुरूवातीला रजिस्ट्रेशन कमी होत होतं... रजिस्ट्रेशन समितीने प्रत्येक बॅचनुसार नोंदणीचेॆ आकडे ग्रुपवर टाकायला सुरूवात केली. त्यातून 'शाखेत चला' खेळ खेळल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या माहितीतल्या बॅचमेट्सना रजिस्ट्रेशन करायला भाग पाडू लागले... असं करता करता उगवला 2017 सालचा पहिला दिवस 1 जानेवारी... त्यादिवशी पुन्हा शाळेत जायचं होतं...

संध्याकाळी चार वाजल्यापासून शाळेत विद्यार्थी जमायला सुरूवात झाली, अनेकांनी कित्येक वर्षांनी शाळेत परत प्रवेश केला होता. अनेक जण शाळेच्या जवळच राहायचे, पण कित्येक वर्षात बाहेरून जाताना फक्त शाळा पाहीली होती.. अनेक जण पालक म्हणून अनेकदा शाळेत आले होते, पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा टिळकनगरी होऊन आले होते.. शाळेत शिरताना सर्वांचीच नजर टिळकांच्या पुतळ्याकडे जात होती. अनेकांचे हातही तेव्हासारखेच पटकन जोडले गेले. ओळखीचे चेहरे दिसत होते, मिल्या, पिके, वाशा, चंद्रू, टकल्या, पोटल्या अशा नावांनी एकमेकांनी हाका मारणं सुरू झालं... कित्येक वर्षांनी शाळेचे ग्रुप जमत होते, मिठ्या मारून पाठीत गुद्दे घालून प्रत्येकजण अक्षरशः मूल झाला. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून ज्या शाळेत रोज आले त्या शाळेत आज सगळे रंगीबेरंगी ड्रेस घालून आले होते. पण प्रत्येकाच्या मनात मात्र तोच गणवेश होता. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी गटागटाने विविध बॅचची मुलं गप्पा मारत होती. शिक्षक वर्ग शाळेत प्रवेश करत होता. आपापल्या शिक्षकांना पाहून जवळपास प्रत्येकजण खाली वाकून नमस्कार करत होता. शिंपी सर आले, त्यांच्या भोवती एकदम गर्दी झाली, सर बिचारे आता थकलेत, त्यांना त्रास द्यायला नको या भावनेने... डोळ्याच्या कडा ओलावलेल्या, खाली वाकून पायांना स्पर्श करून प्रत्येक जण त्यांना भेटायला लागला. बर्वेबाई आल्या, त्यांना पाहून अनेक जण भितीने मागे सरकले, न जाणो बाई अजूनही सांगतील, भिडे उभा राहा, देव हा शब्द संपूर्ण चालवून दाखव... गांधीबाई आल्या... त्यांना पाहून पुन्हा भूमितीचा वर्ग आठवला, बंगाली बाई आल्या, त्यांना पाहून हिंदीचा वर्ग आठवला, मॅथ्यू बाई लांबवर आयोजनात दिसत होत्या, त्यांना पटकन जाऊन भेटण्याची हिंमत अजूनही होत नाही. शास्त्राच्या वर्गातलं त्यांचं शिस्तबद्ध शिकवण  आणि केवळ करड्या नजरेतून निर्माण झालेला धाक अजूनही वाटतो... शोभा साळुंखे, मुग्धा साळुंखे बाईंना नजर शोधायला लागली. अत्रेबाई, मनिषा कुलकर्णी बाई, जोग बाई, मनिषा जोशी बाई,चौधरी सर, पाखरे बाई, सरतापे बाई, तामसे सर यांना पाहून पुन्हा वर्गात जाऊन बसावसं वाटलं. राठोड सर, गोखले बाई, कुलकर्णी सर, देशपांडे काकांच्या आठणवींनी भरून आलं. पळधे बाई आल्यावर पुन्हा सगळे जाऊन थेट त्यांना वाकून नमस्कार करायला लागले.. या शिक्षकांनी आमची आयुष्य केवळ घडवली नाहीत तर या आमच्या शाळेतल्या आईच आहेत सगळ्या...

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेला अप्रतिम गाण्याचा कार्यक्रम, नंतर सचिव आशीर्वाद बोंद्रे यांचं भाषण, मॅथ्यू बाईंचं उत्तम निवेदन, त्यानंतर चेरी ऑन द टॉप म्हणजे शाळेचे विद्यार्थी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जगप्रसिद्ध स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांचं उत्तम भाषण झालं. त्यानंतर अल्पोपहार...

शाळेत सगळे भेटले. आमचे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, शाळेत ज्या मुलींशी कधीही बोललोही नाही, त्यांच्याशी शेकहँड करून बोललो.. आधीच्या बॅचचे भेटले, नंतरच्या बॅचचे भेटले... दिवस तुफान गेला... शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री. पुरोहीत सर आले होते. त्यांचा सत्कार होताना संपूर्ण शाळा उभी राहीली, एक साथ नमस्ते असा गजर झाला... मात्र शाळेला घडवणाऱ्या बाजपेयी सरांची उणीव मात्र पदोपदी जाणवत होती... शाळा पुन्हा एकत्र येत होती. हा सुवर्ण दिन पाहायला बाजपेयी सर मात्र नव्हते...

शाळेने सर्वांना एकत्र आणलं... माझ्या वर्गापाशी जाऊन आलो... काही दिवसांनी आमच्या शाळेची मूळ इमारत पाडणार आहेत. तिथे नवी इमारत बांधली जाणार आहे. आमचे वर्ग जातील, आमची शाळा पुन्हा दिसणार नाही. पूर्वी वर्गात मस्ती केली की आम्हाला पायाचे अंगठे धरून उभे करायचे. शाळेला एकच विनंती माझा वर्ग पाडू नका, मायेने शिक्षा होईल अशी जागा या जगात घराव्यतिरिक्त उरलेली नाही. आपल्याच पायाचे अंगठे धरून उभं राहायला, जमिनीवरच कायम राहायला लावणारी आमची ही हक्काची जागा आहे...

शाळेतून परत निघालो. मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता... भाषण सुरू असताना बडबडायची सवय अजूनही गेली नाही, मित्रांना भेटल्यावर अजूनही मस्ती करावीशी वाटते, वर्गातली 'ती' शोधायची सवय अजूनही जागी आहे. शिक्षकांना पाहिल्यावर अजूनही भीती वाटते.. माझ्या वर्गाची शान अजूनही भावते... माझ्या शाळेचं पटांगण अजूनही भव्य वाटतं... वंदे मातरम सुरू झाल्यावर अजूनही भरून आलं... वंदे मातरम संपल्यावर आमच्या शाळेच्या त्या प्रसिद्ध पितळी घंटेचा आवाज मनात ऐकायला यायला लागला. शाळेत असताना घंटेचा तो आवाज हवाहवासा होता... आता मात्र मनात सुरू असलेल्या घंटानादाचे घण सांगत होते की बेटा अजूनही ती लहानपण जपलयस... ते हरवू नको... माझ्या शाळेची इमारत माझ्याशी बोलत होती... परत परत ये, मला भेट, बाहेर खुप चुका करतोस, शहाणपणा करतोस, त्याची शिक्षा म्हणून तुला अंगठे धरून उभं करेन, चांगलं काही केलंस तर कौतुकाने शाबासकीही देईन... पण परत ये... मला विसरू नकोस.... 

Saturday, April 9, 2016

माती मधुनी दरवळणारे हे गाव... भाग-3

फडके रोड ही गोष्ट आम्हा डोंबिवलीकरांसाठी किती महत्त्वाची आहे हे केवळ एक सच्चा डोंबिवलीकरच जाणू शकेल. मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीचं बिरूद मिरवणाऱ्या या शहरात या रस्त्यावर ही संस्कृती नांदते. याचं कारण म्हणजे फडके रोडच्या एका टोकाला असलेलं आमचं ग्रामदैवत गणेशाचं भव्य मंदिर. डोंबिवलीतल्या अनेक कलांचा उगम या मंदिरात झाला. डोंबिवलीकर कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं हे व्यासपीठ. शहरातल्या अनेक कलाकारांनी इथल्या गणेशापुढे कला सादर करून पुढे देशाविदेशात मैफिली गाजवल्या. दिवाळीच्या दिवशी पहाटे फडके रोडवर जमणाऱ्या तरूणाईला फॅड म्हणून न हेटाळता या मंदिराने 'युवा शक्ती, युवा भक्ती दिन' म्हणत सामावून घेतलं. असाच उत्साह दिसतो तो गुढीपाडव्याच्या निमित्ताने.






गुढीपाडवा, मराठी नववर्षाचं स्वागत जल्लोषात आणि तितक्यात सुसंस्कृत पद्धतीने करण्याचा मंत्र डोंबिवलीने महाराष्ट्राला दिला. त्याची संकल्पनाही इथे मंदिरात उगम पावली आणि त्याचा केंद्रबिंदू झाला फडके रोड. 1990 मध्ये हा भव्य उपक्रम सुरू झाला. शहराच्या विविध भागातून भारतीय विशेषतः मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ, दिंड्या, पालख्या, पथकं, ढोल ताशे पथकं एका विशिष्ट ठरलेल्या मार्गाने प्रवास करून गणेश मंदिराजवळ नेहरू मैदानात एकत्र येतात. गंमत म्हणजे या उत्सवाच्या आयोजनात तरूणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. सर्व वयोगटातले डोंबिवलीकर आपापल्या चित्ररथ, शोभायात्रांच्या माध्यमातून एकत्र येतात.

अक्षरशः वय, देहभान, तहान भूक विसरून हा उत्सव साजरा केला जातो. कुठेही थिल्लरपणा नाही, गडबड गोंधळ, धिंगाणा नाही अशा प्रकारे हा सण साजरा होतो. शोभायात्रांचे विषयही कितीतरी... पाणीबचतीच्या संदेशापासून, पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि अध्यात्मापासून ते विज्ञान महतीपर्यंत.. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आणखी एका उत्साही कार्यक्रमाची भर पडलीय. डोंबिवलीत विविध ढोलपथकं निर्माण झाली आहेत. या ढोलपथकांची वर्षभर विविध ठिकाणी सुरू असलेली प्रॅक्टीस आणि त्यांची गुढीपा़डव्याच्या दिवशीची फडके रोडवरची अदाकारी निव्वळ पाहण्या आणि ऐकण्यासारखीच. अक्षरशः आमचा फडके रोड दणाणून जातो.


पण एवढे ढोल, ताशे वाजत असले तरी त्यात कुठेही कानठळ्या बसवणाऱ्या डिजेचा उबगावणेपणा नसतो. साऊंड आणि म्युझिक यातला फरक तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतो. ढोल, ताशे, झांजा, त्रिकोण, टोला आणि तत्सम वाद्य यांनी अक्षरशः भव्य वातावरण अनुभवायला मिळतं. मला कौतुक याचं वाटतं की फडके रोडच्या दुतर्फा हजारो नागरिक राहतात. पण कोणीही या प्रात्यक्षिकांना विरोध करत नाही. एकाच रंगाचे झब्बा सलवार घालून डोक्यावर फेटे, कमरेला शेले बांधून या पथकातले युवक युवती ढोल वादन करतात. अप्रतिम...

गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांची सुरूवात खरं म्हणजे चार दिवस आधीपासूनच होते. दीपोत्सव, सुक्त पठण, भीत्ती चित्र स्पर्धा असे विविध उपक्रम साजरे होतात. संपूर्ण डोंबिवली यात सहभागी होते.

सांगण्यासारखं बरच काही आहे... डोंबिवली हे शहर म्हणजे मुंबई नावाच्या बोर्ड रूमला लागून असलेली एक बेडरूम असं वर्णन केलं जातं. डोंबिवलीकराला हे वर्णन आवडत नाही, पण परिस्थिती खरंच तशी आहे हे तो मनोमन जाणून असतो. सकाळी 7.26, 7.43, 8.13, 9.52 अशा विचित्र वेळा दाखवणाऱ्या गाड्यांना लटकत मुंबई गाठणे, दिवसभर मरमर काम करणे आणि रात्री तशाच विक्राळ वेळा दाखवणाऱ्या गाड्यांना लटकत परतणं हे डोंबिवलीकरांच्या पाचवीला पुजलेलं. तरीही डोंबिवलीकर आपली सांस्कृतिक ओळख टिकवू शकला ते केवळ आणि केवळ अशा सुंदर सणांमुळे... असे सण साजरे केल्यावर हा डोंबिवलीकर पुन्हा तयार होतो, पुढच्या सोमवारसाठी.... 

Tuesday, September 22, 2015

मी तो गणेशोत्सव खुप मीस करतो...



घरात नातेवाईक खुप जमलेत. आजीच्या बहिणी, आजोबांचे भाऊ बहीण, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं... घरात लेकी सुना एकत्र काम करत आहेत, हास्यकल्लोळ चाललाय, 50 जणांच्या रोजच्या स्वयंपाकात लुडबूड करत पुरूष मंडळी चहाची फर्माईश करत आहेत. बाहेर एखादे अण्णा मामा किंवा आजोबा तरूणांना, ''काय रे सध्या काय?'' असा सवाल करतायत... स्वयंपाकघरात काही आज्या हातातलं काम निपटवत असताना एकमेकींची सुखदुःख वाटून घेत आहेत... आणि बाहेर दिवाणखान्यात मखरात गणराय विराजमान झालेत. दुपारच्या आरतीची वेळ झालीय. सोवळं नेसलेला मामा आरतीला चला रे अशी हाक मारतो... बायका पदराला हात पुसत पुसत बाहेर येतात. घरात इकडे तिकडे करत असलेली मुलं गणपतीसमोर जागा पटकावतात. ठेवणीतल्या पिशवीतून झांजा बाहेर पडतात. आरामखुर्चीवर बसलेल्या आजोबांना एखादे काका धरून बाहेर आणतात. खणखणीत आवाजात आरती सुरू होते... मामाच्या हातातल्या ताम्हनात निरांजन, कापूर ओवाळला जात असतो. सुखकर्ता, दुखहर्तापासून सर्व देवांच्या आरत्या होतात.  येई यो विठ्ठलेला चांगला टीपेला आवाज लावला जातो... घालीन लोटांगण होतं... मंत्रपुष्पांजलीतला प्रत्येकाचा वेगळा स्वर अंगावर शहारा आणतो... आरतीचं तबक फिरतं... त्यातल्या कापूराच्या ज्योतीचा उबदार स्पर्ष हाताला जाणवतो. गणरायासोबत घरातले सर्व तृप्त होतात... आता नैवेद्य... आणि नंतर जेवणं... घरातले सगळ्यांच्या पंगती बसतात. आई, काकू, मामी, मावशी वाढायला येते. मोदकांचा आग्रह होतो. मोदक खाण्याच्या स्पर्धा लागतात. गणेशोत्सवाचे असे ते सुंदर पाच किंवा सात दिवस...
मी असा गणेशोत्सव अनुभवला आहे. आमच्या घरी असाच गणपती साजरा होत असे. पण आमच्या घरी गणपती आणण्याआधी आम्ही पुण्याला आमच्या काकांकडे, ठाण्याला आमच्या आजोबांकडे आणि डोंबिवलीत आमच्या आईच्या मामाकडे गणपतीला जायचो.. त्यातही डोंबिवलीत आईच्या मामाच्या घरी सुरेश मामाच्या घरी गणपतीला सर्वाधिक वेळा गेलोय. अगदी आमच्या घरी गणपती सुरू केल्यावर, दीड दिवसांचं विसर्जन झाल्यावरही आम्ही लगेच सुरेश मामाकडे जायचो. काय वातावरण असायचं. घरात माझे पणजी पणजोबा होते, माझ्या आजीचं ते माहेर... माझ्या आजीच्या सगळ्या बहीणी, भाऊ इथे यायचेच पण त्याच बरोबर माझ्या आजीच्या आत्याही आलेल्या मला आठवत आहेत. माझी आई सांगते आजीची आत्या, बबन आत्या, आईची मावशी सिंधू मावशी, हेमू मावशी, या सगळ्या आज्या करायच्या तसे मोदक जगात कोणी केले नसतील. मुळ्यांचा गणपती म्हणून या सगळ्या ज्येष्ठ स्त्रिया लीलया गणपतीची जबाबदारी घ्यायच्या. अंजू मामी त्यांची कॅप्टन आणि पणजी कोच... अशी मस्त टीम असायची. मी तेव्हा लहान होतो म्हणून मला कधी स्वयंपाकघरात थांबून ती मजा अनुभवता नाही आली. पण केवढ्या गप्पा रंगत असतील तिथे.. माझी आई, तिची मावशी शामू मावशी, शालन मावशी आणि अंजू मामी या तशा एकाच पिढीतल्या, काही वर्ष इकडे तिकडे... त्यांची एक टीम असायची. बाहेर अद्वैत, किशोर, चंदामामा, राजू मामा यांची एक टीम, तिकडे टीनू, लिनू, तुषार, मी यांची एक टीम, त्याही पलीकडे बेडरूममध्ये पणजोबा, माझे आजोबा, अण्णा मामा, सुरेश मामा, विसू मामा, रवी मामा, शेखर मुळे मामा, मोघे काका, पुण्याचे पिटपिट उर्फ मिराशी काका, पेंढारकर काका यांच्या झकास गप्पा रंगलेल्या असायच्या... विषय शेअर बाजारापासून क्रिेकेटच्या मैदानापर्यंत... क्या बात है...
मला आठवतं गणपतीचं मखर तयार करण्याची जबाबदारी चंदामामा आणि अद्वैत यांची असायची... थर्माकोलवर अप्रतिम नक्षी काढून, ती अर्ध्या ब्लेडने कापली जायची..गणपती आधी सुरेशमामाकडे गेलं तर हे दोघे ते काम मन लावून करत बसलेले दिसायचे. अप्रतिम मखर हे मुळ्यांच्या गणपतीचं वैशिष्ट्य..
गणपतीच्या दिवशी सकाळ अशी मस्त जायची. संध्याकाळी या पाच सात दिवसांत अक्षरशः हजारो माणसं दर्शनाला येऊन जायची. त्यांना मस्त मोदक पेढ्याचा प्रसाद आणि कॉफी किंवा बहुदा दूध असा मस्त कार्यक्रम असायचा. टिनू, लिनू या माझ्या मावशा त्या कामी पुढे असायच्या... काय धमाल... बाहेर गणपतीला आलेले विविध लोक पाहणं हा माझा एक तेव्हा आवडता कार्यक्रम असायचा. त्यांच्याशी घरातले बोलतात कसे, ते कसे बोलतात, काय बोलतात हे ऐकायला मजा यायची. अद्वैत, किशोर हे माझे मामा तसे माझे आदर्श असायचे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांशी हे दोघे काय बोलतात याचं निरिक्षण मी आणि तुषार करत बसायचो. तुषार हा माझा अजून एक मामा... मुळ्यांच्यातला सर्वात लहान भाऊ... माझ्या आईचा मावसभाऊ, शाळेत माझ्या एक वर्ष पुढे असलेला. त्यामुळे त्याचं आणि माझं जाम जमायचं.
गणपतीच्या अखेरच्या दिवशी, विसर्जनाला मजा असायची, समोर पाटलांचा गणपती, आणि मुळ्यांचा गणपती एकत्र निघायचा. मुळ्यांची सगळी गँग असायची... संगीतावाडीतल्या विहिरीवर विसर्जन व्हायचं... तिथून येताना सगळे सुन्न असायचे.. घरी आल्यावर परत वातावरण हलकं फुकलं करण्यासाठी कानिटकरच्या वडापावचं औषध असायचं... काय मजा यायची...
असा हा गणेशोत्सव... काळाच्या ओघात घरातले वयोवृद्ध गेले. पणजोबा, पणजी गेले, आजीच्या आत्या गेल्या, आईच्या काही मावश्या गेल्या. स्वतः सुरेश मामाचं कुटुंबही पुण्यात स्थायिक झालं...
आमच्या घरातल्या गणपतीचे दीड दिवस आम्ही भक्तीभावाने साजरे करतोच पण सुरेशमामाकडचा गणपतीच माझ्या आणि माझ्या ताईच्या मनावर कोरला गेलाय. आठवण त्या बाप्पाची निघतेच...
मला वाटतं मखरातला गणपती हे एक निमित्त असतं, ओढ असते ती गणपतीला जमलेल्या आपल्या गोतावळ्याची.. मोदक तर सगळेच सारखे असतात पण ते करणारे हातच खास असतात नाही का...?

Tuesday, September 15, 2015

आठवण गणरायाची...

गणपतीच्या आगमनाची तयारी घरात पूर्ण झालीय. उद्या सकाळी गणपती आणायचा... माझ्या स्वतःच्या गाडीतून मी यावर्षी गणपती आणणार आहे याचा आनंद आहेच. पण गेल्यावर्षीपासून मनात एक खंतही सतावतेय. माझा चांदीचा गणराय आता आमच्यात नाही. एका विशिष्ट कारणासाठी आम्ही काही वर्षापूर्वी एका विशिष्ट कारणासाठी चांदीच्या गणेशाची सुंदर मूर्ती आणली होती. त्यावर मी एक पोस्ट याआधी टाकलीही आहे.. 

http://www.janeeva.blogspot.in/2009/08/blog-post_23.html

मात्र आता हा गणराय आमच्याकडे नाही. 20 मे 2014 या दिवशी आमच्या घरात घरफोडी झाली. त्यात हा गणराय चोरट्यांच्या हाती लागला. 800 ग्रॅमची ही मूर्ती चोरट्यांनी लांबवली. तेव्हापासून हा गणराय आमच्यापासून दूर गेलाय. कळत नाहीये काय करू. असंख्यवेळा पोलीस स्टेशनच्या खेपा घातल्या पण पोोलिसांनाही काही क्लू लागत नाहीये. पोलीस आता त्यात विशेष रसही घेत नाहीयेत. एका विशिष्ट कारणासाठी आमच्या घरात आलेला हा गणराय निघून गेलाय. 

 बिल्डींगच्या गेटपासून आत गजर करत गणपती आणायचा. त्याची शास्त्रोक्त दीड दिवस पूजा करायची आणि नंतर पार्कींगमध्ये पाण्याची बादली भरून त्यात विसर्जन करायचं. पाणी झाडांना घालायचं अशा स्वरूपात ही मूर्ती आम्ही काही वर्षे पूजली. त्यावरून आमच्यावर टीकाही झाली. प्रश्नही विचारले गेले. पण त्या गणपतीवरची आणि त्यापेक्षाही ज्या कारणासाठी तो आणला त्या तत्वावरची आमची निष्ठा अजिबात ढळली नाही. माझ्या घरातल्या गणपतीने मी नैसर्गिक जलस्त्रोत खराब होऊ देणार नाही ही त्यामागची भावना होती. पण मूर्ती चोरणा-या त्या हातांना या कोणत्याही तत्वांची किंवा उदात्त हेतूची वगैरे पडलेली नसते. 800 ग्रॅम चांदी... बास पळवा... एवढा एकमेव हेतू मनात ठेऊन ते आमच्या बाप्पाला घेऊन गेले. 

ठिक आहे, माझ्या मनात हे तत्व कायम आहे. ते त्या गणरायालाही माहिती आहे. आमच्या घरात राहून राहून त्याला कंटाळा आला असेल त्यामुळे सध्या तो फिरायला बाहेर गेला असेल. पण तो परत येईल हा माझा विश्वास आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात त्या मूर्तीचं रूपडं जिवंत आहे. त्याचा स्पर्ष माझ्या हाताला नेहमीच जाणवत असतं. आमचा हेतू प्रामाणिक होता. तो त्याला माहिती होता. त्या हेतूलाच पुन्हा मूर्त रूप देण्यासाठी आमचा चांदीचा गणराय पुन्हा येईल. 

गणपती बाप्पा मोरया... 

Thursday, December 13, 2012

पहाटेच्या रंगांचं सौदर्य


मॉर्निंग शिफ्टसाठी चाललो होतोमागच्या सीटवर खिडकीत बसलो होतोशिळफाटा येईपर्यंत मित्रांशी गप्पा झाल्यामग झोपावं की जागं रहावं असा विचार करता करता पाईपलाईनचा डोंगरी रस्ता क्रॉस झालाथंडीमुळे काच बंद होतीखिडकीतून सहज बाहेर पाहीलंउजाडायला लागलं होतंड्रायव्हरने मस्त पंडीत अजित कडकडे यांच्या स्वरातले हरीपाठ लावले होतेते ऐकत होतो. डोंगराच्या कडा दिसल्या.. बाहेर सुर्योदयाआधीचा पहाटेचा प्रकाश होताआकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं..त्याला किनार लाभली होती डोंगरांच्या कडांचीखुप मस्त वाटलं..माझा मित्र अमोल जोशीने न्यूजरूम लाईव्ह या दिवाळी अंकात लिहीलेल्या कथेची आठवण झालीत्यालाही अनेक वर्षांनी अशी सुंदर पहाट पाहायला मिळाली होती.. मला त्या कथेची आठवण आली.

खरच किती सुंदर वातावरण होतं.. बाहेरचं पहाटेच्या रंगांचं सौदर्य पाहात काच थोडी उघडथंड वारा अंगावर घेत होतोकानावर हरीपाठ पडत होतेडोळ्यात ते रूप साठवल्यावर मग अलगद डोळे मिटलेडोळे मिटल्यावर मनाने वेग घेतलामनाने पोचले माथेरानमध्ये.. लक्ष्मी ह़ॉटेलची आमची नेहमीची ठरलेली खोलीत्याच्या समोर असणारी सुंदर बाल्कनीआणि तिथून दिसणारा समोर पसरलेला गार्बट हीलमाथेरानमध्येही आत्ता अशीच पहाट फुलत असणारगार्बट माथेरानच्या पश्चिमेला आहे त्यामुळे तिथे थोडा कमी प्रकाश असणारहा विचार करत असताना खरचं नाकात माथेरानचा सुंदर वास आलाहे क्षण अनुभवतो न अनुभवतो तोच मी अचावक माझ्या गावाला वाईला पोहोचलो.. वाईतही आळीमध्ये अशीच सुंदर पहाट फुलत असेलआत्या राहायची त्या वाड्यात आम्ही राहायला जायचोतिथे वाड्याबाहेर कृष्णाबाईच्या उत्सवाची लगबग सुरू होती.. पालखी येणार म्हणून पहाटेपासूनचं संपूर्ण आळी स्वच्छ झाली होतीबाहेर सडे घातले होते.. रांगोळ्या काढल्या होत्या.. कानावर हरीपाठ पडत होते.. नाकात वाईचा वास आला.. वाईच्या थंड पहाटेचा अनुभव घेतो न घेतो तोच वाई जवळच्या मेणवलीच्या घाटावर पोहोचलोपहाटेच्या प्रकाश होताकृष्णाबाईच्या पाण्यावर धुक्याचं आच्छादन होतं.. बाळं नावाचे पक्षी पाण्याच्या जवळून घिरट्या घालत होते.. समोर शेतात ऊसाचा फड धरला होता.. घाटावर बसून तिथल्या पहाटेचा आस्वाद घेतो तेवढ्यात पुन्हा घरात पोहोचलो.. सातवीत होतो.. सकाळचे पावणेसहा झाले होतेबाबांनी रेडिओ लावला होता.. सुरूवातीला वंदेमातरम् झालं.. मग आकाशवाणीचं म्युझिकमग बाबांनी मला उठवलं.. त्यानंतर रेल्वेवृत्तमग आजचे बाजारभाव,मग चिंतन हाच चिंतामणी आणि त्यानंतर मग भक्तीगीतं.. त्यातही आर एन पराडकरांची दत्ताची गाणी.. त्या वेळापत्रकावर इथे आमची शाळेची आवराआवरसहा चाळीसची बस पकडून शाळेत गेलोरेडीओवर त्यानंतर काय लागतं माहिती नाही.. कानावर हरिपाठ पडतच होते...

मनाने प्रचंड वेग घेतला.. एमआयडीसी ते डोंबिवली ही बस पकडायच्या ऐवजी मी पोहोचलो एकदम लांबपल्ल्याच्या गाडीतगाडी चालली होती भोपाळला.. मी चाललो होतो एसएसबीला(एसएसबी म्हणजे सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्डथोडक्यात आर्मीसाठीचा इंटरव्ह्यू,युपीएससीची सीडीएस पास झाल्यावर द्यावी लागणारी परिक्षा), माझं रिझर्वेशन वेटींगवरच अडलं..मग दाराजवळ पांघरूण गुंडाळून रात्रभऱ खाली बसून प्रवासत्यातच पहाट झालीगाडी मस्त वेगात चालली होतीभुसावळ जाऊन साधारणतः गाडी एमपीमध्ये शिरली होती.. पहाटेचा गार वारा झोंबत होता.. प्रवास संपतच नव्हता.. कानावर हरीपाठ येत होते.. त्यानंतर भोपाळला पोहोचेन असं वाटत असताना मी मात्र मनाने पोहोचलो अलाहाबादला.. पहिली एसएसबी.. प्रचंड दडपणफक्त साडेचार टक्के रिझल्ट लागला होता.. माझ्या बॅचमध्ये भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ३० मुलं होती.. पहाटे सहा वाजात नाश्ता करून साडेसहा वाजता आम्ही फॉलइन करून उभे.. एक ग्रुप टेस्टींग ऑफीसर मेजर मेहता पुढे कशा टेस्ट असतील याची माहिती देत होता... त्या ऐकताना परत प्रचंड दडपण आलं.. कानावर हरीपाठ पडतच होते..
ते दडपण ओसरत नाही तोवर अचानक पोहोचलो वैष्णोदेवीला.. रात्री रांगेत उभं राहून दर्शन केलं होतं.. पावणेपाचला वरती भैरोबाबाच्या मंदिरात पोहोचलो.. तिथे दर्शन घेतलंउजाडायला लागणार होतं.. समोर लांब बर्फाच्छादीत शिखरांवर पहिली सुर्यकिरणं पोहोचून तिथे सोनं तयार झालं होत... थंड वातावरणतिथला वास नाकात रेंगाळला.. तो वास घेतो न घेतो तोवर अचानक मी एकदम मागे गेलो... वय वर्ष दहाच्या आत.. पुण्याला आमच्या काकांकडे भिडे वाड्यात आम्ही राहायला जायचो... सातनंतर झोपलेलं काकांना चालायचं नाही.. अंथरूणावर पडलो होतो... पहाट होत होतीखालच्या प्राजक्ताच्या फुलांचा सुवास येत होता.. वाड्यात दुसऱ्या मजल्यावर शास्त्रीय गायिका मंजिरी आलेगावकर राहायचीत्यावेळी ती कर्वे होतीतिचा रोजचा पहाटेचा रियाझ सुरू झाला होता.. पहाटेच्या वातावरणात शास्त्रीय संगीताचे सूर.. आजही ते आठवलं की डोळ्यात पाणी येतं.. कानावर हरीपाठ पडतंच होता...

काय होत होतं.. माझं मलाच कळत नव्हतं... अचानक आठवलं अरे आज १२ डिसेंबर बरोबर ३ वर्षांपूर्वी अशाच एका सुंदर पहाटे मी आंघोळीच्या आधी खुर्चीवर बसलो होतोआई ताई आणि वहिन्यांनी मला हळद लावली होती.. लग्नाची तयारी सुरू झाली होती.. काही जण चिडवत होते.मग आवरंलं.. आणि आम्ही हॉलमधे पोहोचलो.. गाणी लावली होतीकानावर हरीपाठ पडत होते...


आमच्या गाडीला एकाने कट मारला.. गाडी पटकन थांबलीदचकून डोळे उघडले.. पाम बिचरोडवर नेरूळ क्रॉस होत होतं... हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणापुण्याची गणना कोण करी..कानावर स्पष्ट आवाज आलाज्ञानोबांनी सांगितलेला हरीपाठ मला फार आवडला.. मनाचा वेग किती असतो हे ज्ञानदेवांनी सांगितलं होतंत्याचा अनुभव आलापहाट किती सुंदर असते हे त्यातून दिसलंअनेक पहाटे आपण पाहिल्या होत्या.. पण त्यांचं सौदर्य तेव्हा कळलं.. मन केवढी भरारी मारून आलं होतं.. वायुवेग काय होता हे कळलं.. मग विचार सुरू झालेझेवियर्समध्ये आम्हाला शिकवायला कवी महेश केळुसकर होते.. रेडीओ या माध्यमाविषयी त्यांनी आम्हाला शिकवलं होतं.. त्यावेळी 'पहाटही गोष्ट त्यांनी अक्षरशः उच्चारातून दाखवला होता..त्यावेळपासून पहाट आवडायला लागली होतीपण का आवडली पहाट.. दिवसाच्या प्रत्येक वेळेत काहीतरी उत्तम आहेच की.. मग पहाटचं का... पुलंनी म्हटलंय एखादी गाण्याची मैफल जागवून घरी परतताना अचानक भेटते ती पहाट.. खरंच आयुष्यातल्या काही पहाट अशाच भेटल्या...दिवाळीच्या दिवशी घडवून आणलेला दिवाळी पहाटेचा कार्यक्रम नाही.. तर अशा अवचित भेटलेल्या पहाटेंनी अशा अनेक दिवाळ्या मी जगलो होतो हे त्यादिवशी कळलंमात्र प्रत्येक पहाटेत एक साम्य होतं.. प्रत्येक पहाट ही कसली तरी सुरूवात होती.. म्हणून ती आवडली होती.. काही तरी सुरू करण्याचा आनंद असतोच की.. हरीपाठ कानावर पडतचं होते.. आता सूरही यायला लागले..

Thursday, August 16, 2012

मी पाहीलेला मुख्यमंत्री


एमए (पोलिटीकल सायन्सच्या )दुसऱ्या वर्षी विद्यापिठामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला जायला मिळतं.. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनतर्फे राज्यातल्या सर्वच विद्यापिठातून पोलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याची संधी मिळते. मुंबई विद्यापीठाच्या आमच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभागातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात मलाही संधी मिळाली. राज्यशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्षात चालणारा संसदीय लोकशाहीचा कारभार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची चांगली संधी या अभ्यास दौऱ्यात मिळते. या दौऱ्यावर जाण्यासाठी खूप आकर्षण होतं.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ( आर.आर. पाटील, त्यांची खुप क्रेझ होती तेव्हा) भेटणार, इतरही मंत्री, विरोधी पक्षातली मंडळी, अरूण गवळी ( त्यावेळी नुकताच आमदार झाला होता) हे सगळे पाहता येणार म्हणून प्रचंड उत्सुकता होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभाहातली भाषणं, तिथला गदारोळ अनुभवता, पाहता येणार म्हणून खुप उत्सुकता होती. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.. विलासरावांचं काल (14 ऑगस्ट 2012) या दिवशी निधन झालं. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी झालेलं बोलणं याची खुप आठवण आली. त्यासाठी ही पोस्ट टाकावीशी वाटली.

6 डिसेंबर 2005ला आम्ही नागपूरला उतरलो.. 5 तारखेपासूनच अधिवेशनाला सुरूवात झाली होती. 7 तारखेपासून खऱ्य़ा अर्थाने आमच्या अभ्यास दौऱ्याला सुरूवात झाली.  विधान परिषदेच्या सभागृहात आमचे वर्ग होत. सकाळी आठ ते अकरा असे लेक्चर असे. या तीन तासात एक किंवा दोन वक्ते येत. तर 7 तारखेला ओरिएंटेशन होतं.. ओरिएंटेशनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही ज्येष्ठ मंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्य सचिव आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सचिव असे अनेक मान्यवर आमच्यासमोर बोलणार होते. विलासराव त्यावेळी मुख्यमंत्री, आर. आर. आबा उपमुख्यमंत्री, नारायण राणे विरोधी पक्षनेते, विलास पाटील मुख्य सचिव होते. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढ्या जवळून पाहीलं होतं. पांढरा सदरा, त्यावर त्यांच स्पेशल जॅकेट, कपाळावर आलेल्या बटा, आणि एकदम विलासी हास्य असं पेपर किंवा टीव्हीत पाहीलेलं त्यांचं रूप आम्ही जवळून पाहात होतो. अनेकांची भाषणं झाली. त्यानंतर नारायण राणे बोलले. आणि सगळ्यात शेवटी विलासराव बोलायला उभे राहीले.. पहिल्या काही वाक्यात, विद्यार्थ्यांना शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर त्यांनी एकदम राजकारणालाच हात घातला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांतला फरक काय असतो ते समजावून देताना त्यांनी अचानक नारायण राणेंकडे नजर टाकली आणि पुन्हा छद्मी हसत जोरदार टाँट मारला.. विलासराव म्हणाले , नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत की यावेळीही जनतेने त्यांच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपदच टाकलंय. आणि आमच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद... विलासरावांच्या या उदगाराने आम्ही सगळे फक्त हसले. राण्यांचा चेहरा पडला होता. तरीही उसनं हसू चेहऱअयावर ठेऊन तेही हसले, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात विलासरावांच्या या वाक्याची बातमी झाली होती.. त्यामुळे आम्हीही खुष.. आपल्यासमोर मुख्यमंत्री काल बोलले त्याची बातमी पेपरमध्ये छापून आली.. क्या बात है...

त्यानंतर नियमीत सत्र सुरू झाली.. तीन ते चार दिवसांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली. त्यानुसार दुपारी बारा साडेबाराच्या सुमाराला आम्ही त्यांच्या केबिनबाहेर जाऊन बसलो. पाच मिनिटात आम्हाला आत सोडलंही.. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची केबिन, विद्यार्थी वयात प्रचंड आकर्षणाचा विषय. केबिनमध्ये एक भलंमोठं टेबल होतं.. त्यामागे खुर्षी.. त्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख बसलेले. वर्णन सेम.. पांढरा कुडता. त्यावर त्यांचं स्पेशल जॅकेट.. कपाळावर आलेल्या बटा..आणि चेहऱअयावर विलासी हास्य... मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर चार चार खुर्च्यांच्या चार रांगा.. एकदम शेवटच्या रांगेत आम्हाला बसवलं.. पहिल्या रांगेत दोनजण बसले होते.. बहुतेक प्रिंटवाले पत्रकार असावेत. त्यांच्याशी विलासरावांनी काहीतरी चर्चा केली.. मग ते दोघे निघून गेले.. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाहीलं.. बाजूच्या पीएला विचारलं.. विद्यार्थी.. कोणती युनिव्हर्सिटी.. पीएने सांगितलं मुंबई विद्यापीठ... पुन्हा एकदा विलासी हास्य.. विलासरावांचा पहिला प्रश्न.. काय मुंबई विद्यापीठ. चार मुली.. दोन मुलगे.. मुलींच संख्या जास्त दिसत्ये...आम्ही थंड.. मग त्यांनी आम्हाला पुढच्या रांगेत येऊन बसायला सांगितलं. पहिल्या रांगेत 4 मुली बसल्या. दुसऱ्या रांगेत मी आणि माझा मित्र महेश दाभिळकर आणि आमच्या मॅडम मेघा देवळे होत्या.. विलासरावांना मग मॅडमनी एमएची थोडीशी माहिती दिली.. कोणते पेपर आहेत. कशी लेक्चर्स चालतात. आत्तापर्यंत अभ्यासदौऱयात काय काय झालं.. इत्यादी.. त्यानंतर विलासरावांनी आम्हाल प्रश्न विचारायला सांगितले.. आम्ही परत थंड. कोणाला प्रश्नच सुचेनात.. विलासराव हसले.. काय मुंबई विद्यापीठ.. प्रश्नच पडत नाहीत की काय.. मग देवळे मॅडमनी आमची बाजू सांभाळली.. मुख्यमंत्र्यांना पाहून मुलं बुजली आहेत असं सांगत त्यांनी आमची बाजू सांभाळली.. विलासराव हसले.. म्हणाले साहाजीकच आहे.. शेवटी आमच्यातून अनुया वर्टीने पहिला प्रश्न विचारला.. त्याचं उत्तर विलासरावांनी दिलं.. मग मला थोडा जोर आला.. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला.. त्यावेळी एनरॉनची वीज खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.. त्यावर एमएच्या मुंबईच्या वर्गात चर्चाही झाली होती.. त्यावरून मी प्रश्न विचारला.. माझा प्रश्न होता.. एनरॉन प्रकरणावरून राज्यात पुढे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतील आणि दुसऱ्या राज्यात गुंतवणूक करतील अशी शक्यता आहे का, यामुळे राज्याचं नुकसान आहे.. असा मी प्रश्न त्यांना विचारला.. विलासरावांनी त्याचंही आम्हाला समजेल असं उत्तर दिलं.. स्वतःच्या भूमिकेचं समर्थनही केलं.. आणि एनरॉनच्या निमित्ताने युतीलाही कोपरखळ्या मारल्या.. अजून दोन तीन प्रश्न झाले.मग ठरल्याप्रमाणे आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला मिळाले.. 

Mumbai University Students with CM Vilasrao Deshmukh
प्रचंड एक्साईटेड वातावरणात आम्ही बाहेर पडलो.. ग्रेट आज आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो हा आनंद आणि भारलेपणा घेऊन आम्ही बाहेर पडलो...

त्यानंतर एका वर्षात मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलो.. त्यांच्याशी पुन्हा बोलायची संधी मिळाली ती क्रिकेटच्या निमित्ताने..ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि मग एमसीएचे अध्यक्ष असताना आम्ही त्यांचे विविध विषयावर फोनो घ्यायचो.. त्यावेळी त्यांना फोन करायला मिळायचा..

विलासराव यकृताच्या आजाराने गेले. मी विदयार्थी असताना त्यांच्या रूपात आम्हाला राज्याचा मुख्यमंत्री पहायला मिळाला.. त्याचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की मुख्यमंत्री हा शब्द उच्चारला की आजही मला डोळ्यासमोर पांढरा कुडता, स्पेशल काळं जॅकेट, कपाळावर केसांच्या बटा आणि चेहऱ्यावर विलासी हास्य असलेले विलासरावच आठवतात... 

Wednesday, February 8, 2012

माझी अशीच एक पिशवी होती....

काही गोष्टी अशा असतात की आपण त्या का करतो हे कधीच कळत नाही. त्या गोष्टी आत्ता आपल्याला आवश्यक असतातच असं नाही. पण तरीही त्यांची आठवण येत राहते. आत्ता त्या गोष्टी हातात मिळाल्या तरीही त्यांचा उपयोग शुन्य असतो. तरीही त्या गोष्टींची आठवण पुसता पुसली जात नाही.. असं सगळं कंफ्युजिंग मी का लिहीत असेन असा विचार मी स्वतः करतोय. पण खरोखर या वाक्यांसारखाच मी पण एका गोष्टीसाठी कन्फ्युज झालोय. खरोखर माझ्याकडे एक अशीच पिशवी होती. साधी पांढरी प्लॅस्टीकची पिशवी होती. आता मी विचार केला तर कशासाठी ती माझ्याकडे होती मला आठवत नाहीये. मात्र जेव्हा ती पिशवी होती तेव्हा तिचं मोल माझ्यासाठी खुप जास्त होतं.

माझ्या जन्माच्या बाराव्या दिवसापासून ते इयत्ता पाचवीपर्यंत मी डोंबिवली पश्चिमेला मयुर बिल्डींग इथे रहायचो. त्या काळात ती पिशवी माझ्याकडे होती. नेहमी मी ती गॅलरीत टांगून ठेवलेली असायची. ती पिशवी माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी होती. शाळेत येताजाता रस्त्यात दिसेल ती पडलेली निरूपयोगी वस्तू उचलायची मला सवय होती. लॉटरीची तिकीटं, संगमरवरी दगड, पट्ट्याचं बक्कल, कपड्यांची बटणं, वाळूतले रंगीत पांढरे दगड, वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपले, असल्या काय काय वस्तू त्या पिशवीत असायच्या. त्यातही त्यातले संगमरवरी दगड मला फार आवडायचे. मला वाटतं आमच्या बिल्डींगजवळ कोणीतही घरात रिनोव्हेशन केलं होतं. त्यातले टाकून दिलेले छोटे आयताकृती संगमरवराचे तुकडे मी जमवले होते. त्या संगमरवरावरचं राखाडी डिझाईन, त्याच्या चार बाजूंपैकी एका बाजूचा मऊ गुळगुळीत स्पर्ष, इतर तीन भागांचा खरखरीत स्पर्ष मी कधीच विसरू शकत नाही. तेल लावल्याने उरलेले तीन भाग गुळगुळीत होतील असं वाटल्यामुळे मी रोज त्या भागांना तेल लावून ठेवायचो. वाळूत मिळालेले पांढरे दगडही तेला बुडवून ठेवायचो. मला कळत नाही तेव्हा असं काही तरी का करावलं वाटायचं.. ती पिशवी माझी प्रॉपर्टी होती. अतिषय आवडती होती. त्यात अनेक निरर्थक वस्तू होत्या. आत्ता त्या निरर्थक वाटतात, पण तेव्हा मला त्या अतिषय आवडायच्या. हे असलं काही का जमवावसं वाटतं देव जाणे...

ती जागा आम्ही सोडली आणि डोंबिवली ईस्टला एमआयडीसीत ऋतुजा सोसायटीत रहायला आलो. ती पिशवी जुन्याच जागेत राहीली. आता तर एमआयडीसीतूनही आम्ही नव्या जागेत रहायला आलोय. पण अजूनही ती गॅलरीत अडकवलेली माझी पिशवी मला विसरता येत नाहीये.