Wednesday, January 4, 2017

आवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज वाचला... गाडी चालवताना समोरचं पाहायला मोठा विंडस्क्रीन असतो. पण मागचं पाहायला एक छोटा आरसा पुरतो... भविष्यातलं पाहायला मोठी दृष्टी हवी पण भूतकाळावर केवळ एक नजर टाकली तरी पुरते, अर्थात भुतकाळाचा फक्त आढावा घ्यायचा असतो, त्यात रमायचं नसतं अशा अर्थाचा तो मेसेज... सुरूवातीला हा मेसेज मला पटला. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या भूतकाळात संपूर्ण संध्याकाळ रमलो, रममाण झालो.  हे केवळ मीच केलं असं नाही तर गेल्या 53 वर्षात डोंबिवलीत राहीलेल्या शेकडो जणांनी माझ्यासारखा अनुभव घेतला. आम्हा सर्वाना सांधणारा दुवा होता टिळकनगर विद्यामंदिर ही आमची शाळा.

1964 साली आमच्या शाळेची स्थापना झाली. तेव्हापासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेत पुन्हा एकत्र बोलवावं असा विचार शाळेच्या संचालक मंडळाने प्रत्यक्षात उतरवला. तारीख ठरली 1 जानेवारी 2017, कित्येक महिने आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झालं. नावही विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आलं. अनेक पर्याय आले. त्यातून निवडलं गेलं 'आवर्तन' हे नाव, टॅगलाईनही ठरली, 'माझी शाळा, माझा जिव्हाळा'. संचालक मंडळ, माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग सर्वच जण कामाला लागले आणि साजरा झाला एक भव्य सोहळा.

खरं म्हणजे हा उपक्रम प्रत्यक्षात आणणं हेच खरं तर मोठं आव्हान होतं. 1964 सालापासून शाळेतून शिकलेले लाखो विद्यार्थी शोधणे, त्यांच्या नावांचं संकलन करणे, लग्न होऊन गेलेल्या मुलींना त्यांच्या नव्या नावांसह शोधणे... केवढं प्रचंड काम, पण शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलण्यात आलं. त्यासाठी मदत घेतली गेली ती इंटरनेटची... मंडप समिती, खानपान समिती, मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणारी समिती... कसल्या कसल्या समित्या स्थापन झाल्या. प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली, त्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकला गेला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. खरं म्हणजे इथे अनेकांची नावं घेण्याचा मोह होतोय. पण कोणाचं नाव न घेऊन अन्याय नको म्हणून तो मोह टाळतोय.

डॉ. महेश ठाकूरांनी वातावरण निर्मिती म्हणून एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला. आवर्तन या नावाचा... या ग्रुपवर या स्नेहसंमेलनाविषयी विविध गप्पा मारायला सुरूवात झाली. प्रसन्नकाका आठवले आपल्या सुंदर कविता करून शाळेची ओढ लावत होते. पर्यवेक्षिका मॅथ्यू बाईही शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्यामुळे लेखमाला लिहून शाळेची ओढ वाढवत होत्या. ग्रुपचा लोगो आमच्या बॅचच्या मिलिंद बडवेने तयार केला. दर विकेंडला आणि आठवड्यातूनही गरजेनुसार मीटींग होत होत्या, त्याचे अपडेट्स ग्रुपवर मिळत होते. यातून प्रचंड वातावरण निर्मिती होत होती. सुरूवातीला रजिस्ट्रेशन कमी होत होतं... रजिस्ट्रेशन समितीने प्रत्येक बॅचनुसार नोंदणीचेॆ आकडे ग्रुपवर टाकायला सुरूवात केली. त्यातून 'शाखेत चला' खेळ खेळल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या माहितीतल्या बॅचमेट्सना रजिस्ट्रेशन करायला भाग पाडू लागले... असं करता करता उगवला 2017 सालचा पहिला दिवस 1 जानेवारी... त्यादिवशी पुन्हा शाळेत जायचं होतं...

संध्याकाळी चार वाजल्यापासून शाळेत विद्यार्थी जमायला सुरूवात झाली, अनेकांनी कित्येक वर्षांनी शाळेत परत प्रवेश केला होता. अनेक जण शाळेच्या जवळच राहायचे, पण कित्येक वर्षात बाहेरून जाताना फक्त शाळा पाहीली होती.. अनेक जण पालक म्हणून अनेकदा शाळेत आले होते, पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा टिळकनगरी होऊन आले होते.. शाळेत शिरताना सर्वांचीच नजर टिळकांच्या पुतळ्याकडे जात होती. अनेकांचे हातही तेव्हासारखेच पटकन जोडले गेले. ओळखीचे चेहरे दिसत होते, मिल्या, पिके, वाशा, चंद्रू, टकल्या, पोटल्या अशा नावांनी एकमेकांनी हाका मारणं सुरू झालं... कित्येक वर्षांनी शाळेचे ग्रुप जमत होते, मिठ्या मारून पाठीत गुद्दे घालून प्रत्येकजण अक्षरशः मूल झाला. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून ज्या शाळेत रोज आले त्या शाळेत आज सगळे रंगीबेरंगी ड्रेस घालून आले होते. पण प्रत्येकाच्या मनात मात्र तोच गणवेश होता. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी गटागटाने विविध बॅचची मुलं गप्पा मारत होती. शिक्षक वर्ग शाळेत प्रवेश करत होता. आपापल्या शिक्षकांना पाहून जवळपास प्रत्येकजण खाली वाकून नमस्कार करत होता. शिंपी सर आले, त्यांच्या भोवती एकदम गर्दी झाली, सर बिचारे आता थकलेत, त्यांना त्रास द्यायला नको या भावनेने... डोळ्याच्या कडा ओलावलेल्या, खाली वाकून पायांना स्पर्श करून प्रत्येक जण त्यांना भेटायला लागला. बर्वेबाई आल्या, त्यांना पाहून अनेक जण भितीने मागे सरकले, न जाणो बाई अजूनही सांगतील, भिडे उभा राहा, देव हा शब्द संपूर्ण चालवून दाखव... गांधीबाई आल्या... त्यांना पाहून पुन्हा भूमितीचा वर्ग आठवला, बंगाली बाई आल्या, त्यांना पाहून हिंदीचा वर्ग आठवला, मॅथ्यू बाई लांबवर आयोजनात दिसत होत्या, त्यांना पटकन जाऊन भेटण्याची हिंमत अजूनही होत नाही. शास्त्राच्या वर्गातलं त्यांचं शिस्तबद्ध शिकवण  आणि केवळ करड्या नजरेतून निर्माण झालेला धाक अजूनही वाटतो... शोभा साळुंखे, मुग्धा साळुंखे बाईंना नजर शोधायला लागली. अत्रेबाई, मनिषा कुलकर्णी बाई, जोग बाई, मनिषा जोशी बाई,चौधरी सर, पाखरे बाई, सरतापे बाई, तामसे सर यांना पाहून पुन्हा वर्गात जाऊन बसावसं वाटलं. राठोड सर, गोखले बाई, कुलकर्णी सर, देशपांडे काकांच्या आठणवींनी भरून आलं. पळधे बाई आल्यावर पुन्हा सगळे जाऊन थेट त्यांना वाकून नमस्कार करायला लागले.. या शिक्षकांनी आमची आयुष्य केवळ घडवली नाहीत तर या आमच्या शाळेतल्या आईच आहेत सगळ्या...

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेला अप्रतिम गाण्याचा कार्यक्रम, नंतर सचिव आशीर्वाद बोंद्रे यांचं भाषण, मॅथ्यू बाईंचं उत्तम निवेदन, त्यानंतर चेरी ऑन द टॉप म्हणजे शाळेचे विद्यार्थी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जगप्रसिद्ध स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांचं उत्तम भाषण झालं. त्यानंतर अल्पोपहार...

शाळेत सगळे भेटले. आमचे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, शाळेत ज्या मुलींशी कधीही बोललोही नाही, त्यांच्याशी शेकहँड करून बोललो.. आधीच्या बॅचचे भेटले, नंतरच्या बॅचचे भेटले... दिवस तुफान गेला... शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री. पुरोहीत सर आले होते. त्यांचा सत्कार होताना संपूर्ण शाळा उभी राहीली, एक साथ नमस्ते असा गजर झाला... मात्र शाळेला घडवणाऱ्या बाजपेयी सरांची उणीव मात्र पदोपदी जाणवत होती... शाळा पुन्हा एकत्र येत होती. हा सुवर्ण दिन पाहायला बाजपेयी सर मात्र नव्हते...

शाळेने सर्वांना एकत्र आणलं... माझ्या वर्गापाशी जाऊन आलो... काही दिवसांनी आमच्या शाळेची मूळ इमारत पाडणार आहेत. तिथे नवी इमारत बांधली जाणार आहे. आमचे वर्ग जातील, आमची शाळा पुन्हा दिसणार नाही. पूर्वी वर्गात मस्ती केली की आम्हाला पायाचे अंगठे धरून उभे करायचे. शाळेला एकच विनंती माझा वर्ग पाडू नका, मायेने शिक्षा होईल अशी जागा या जगात घराव्यतिरिक्त उरलेली नाही. आपल्याच पायाचे अंगठे धरून उभं राहायला, जमिनीवरच कायम राहायला लावणारी आमची ही हक्काची जागा आहे...

शाळेतून परत निघालो. मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता... भाषण सुरू असताना बडबडायची सवय अजूनही गेली नाही, मित्रांना भेटल्यावर अजूनही मस्ती करावीशी वाटते, वर्गातली 'ती' शोधायची सवय अजूनही जागी आहे. शिक्षकांना पाहिल्यावर अजूनही भीती वाटते.. माझ्या वर्गाची शान अजूनही भावते... माझ्या शाळेचं पटांगण अजूनही भव्य वाटतं... वंदे मातरम सुरू झाल्यावर अजूनही भरून आलं... वंदे मातरम संपल्यावर आमच्या शाळेच्या त्या प्रसिद्ध पितळी घंटेचा आवाज मनात ऐकायला यायला लागला. शाळेत असताना घंटेचा तो आवाज हवाहवासा होता... आता मात्र मनात सुरू असलेल्या घंटानादाचे घण सांगत होते की बेटा अजूनही ती लहानपण जपलयस... ते हरवू नको... माझ्या शाळेची इमारत माझ्याशी बोलत होती... परत परत ये, मला भेट, बाहेर खुप चुका करतोस, शहाणपणा करतोस, त्याची शिक्षा म्हणून तुला अंगठे धरून उभं करेन, चांगलं काही केलंस तर कौतुकाने शाबासकीही देईन... पण परत ये... मला विसरू नकोस....